मराठवाड्यातले विद्यार्थी पुण्यात शिकायला का येतात?

पुण्यातले विद्यार्थी
    • Author, प्राची कुलकर्णी
    • Role, बीबीसी मराठीसाठी

मराठवाडा-विदर्भातून पुण्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांवर बीबीसी मराठीने एक बातमी केली होती. त्यावर बीबीसी मराठीकडे अनेक प्रतिक्रिया आल्या.

या बातमीमुळे विद्यार्थ्यांच्या समस्या समजल्या असं काही जण म्हणाले, काही जणांनी असा प्रश्न विचारला की तालुका आणि जिल्ह्याला महाविद्यालय असताना मग ही मुलं-मुली पुण्यात का येतात? अनेकांना हे समजून घ्यावंसं वाटत होतं. त्यानंतर बीबीसी मराठीने या विषयावरही बातमी करण्याचा निर्णय घेतला.

आपलं गाव सोडून पुण्याला शिक्षणासाठी येण्यामागे विद्यार्थ्यांची काय भूमिका असते, त्यांची परिस्थिती काय असते? हे समजून घेण्याचा प्रयत्न बीबीसी मराठीने या बातमीतून केला आहे.

26 वर्षांची रत्नमाला पवारचं शालेय शिक्षण सुरू असतानाच तिचं संपूर्ण कुटुंब तुळजापूरमधून पुण्यात रहायला आलं.

बहिणीला इंजिनीअरिंगचं शिक्षण घ्यायचं होतं आणि त्यासाठी तिच्या कुटुंबाला योग्य पर्याय वाटला होता तो अर्थातच पुण्यात येण्याचा.

खरंतर तिच्या पालकांकडे त्यांच्या गावी सांगवी मार्डीला 2 एकर शेतजमीन आहे. पाण्याचाही प्रश्न नाही. पण ती 2-3 एकरची जमीन पडिक ठेवून संपूर्ण कुटुंब पुण्यात स्थायिक झालं आहे.

रत्नमालाची आई पार्वती पवार या मिळेल ती वेगवेगळी कामं करतात आणि त्याच्या जोरावर रत्नमाला आणि तिच्या भावंडांचं शिक्षण होतं.

मुलांचं शिक्षण हे पार्वती पवार यांच्यासाठी कायमच प्राधान्याने होतं.

पार्वती पवार जेव्हा इयत्ता चौथीत शिकत होत्या तेव्हा त्यांचं लग्न झालं होतं. लग्नानंतर 7 वी पर्यंत शिकण्याची संधी त्यांना मिळाली. पण त्यानंतर मोठी मुलगी घराबाहेर पाठवायची नाही म्हणून त्यांचं शिक्षण थांबवण्यात आलं.

यामुळेच त्यांची जिद्द होती आपल्या वाट्याला आलेली परिस्थिती मुलांच्या वाट्याला येऊ नये.

बीबीसी मराठीशी बोलताना पार्वती पवार म्हणाल्या, “गावात शिक्षणाची सोय नाही. गावापासून 7-8 किलोमीटरवर शाळा होती. पण ती सुद्धा 7वी पर्यंत.

"अशात मुलींना शिक्षण कसं द्यायचं हा प्रश्न होता. पुण्याबद्दल कायम ऐकलं होतं. इथं मुलांचं शिक्षण होईल आणि आपल्याला काम मिळेल याचा आत्मविश्वास होता.

"म्हणून मग मुलांना घेऊन घराबाहेर पाठवायचं ठरवलं. त्यातच मुलांना वेगवेगळं काही शिकायची इच्छा होती. मराठवाड्यात एका ठिकाणी शिक्षणाची सोय झाली नसती. पुण्यात सोय आणि काम दोन्हीचा प्रश्न सुटणार होता. त्यामुळे पुण्याची निवड केली."

विद्यार्थी

फोटो स्रोत, Getty Images

पुण्यात आल्यानंतर पहिले 2 महिने त्यांनी फक्त कामाची शोधाशोध करण्यात घालवले. मग पुण्यातल्या भारती विद्यापीठातच स्वीपर म्हणून नोकरी मिळाली. ती करुन उरलेल्या वेळात त्या इतर कामं करायच्या. यातून कुटुंबाचा चरितार्थ भागत होता.

त्यांच्या मुलीने म्हणजेच रत्नमालाने आता एमएसडबल्यू पूर्ण केलं आहे आणि सरकारी नोकरीसाठी असलेल्या परीक्षा देत आहे.

पुण्याच्या निवडीबद्दल रत्नमाला म्हणते, "चांगलं शिक्षण मिळण्याचं आई वडिलांचं स्वप्न होतं. आणि बहिणीच्या शिक्षणाच्या निमित्ताने सगळेच पुण्यात आले. त्यामुळे संधी कळल्या. त्यामुळे एमएसडब्ल्यूचं शिक्षण घेऊ शकले.”

रत्नमालाचं कुटुंब पुण्याला आलं आणि तिला मार्ग सापडला.

पण धाराशीवच्या उमेश पाटोळेने मात्र धडपडत मार्ग शोधला. आई-वडील ऊसतोड कामगार म्हणून काम करत असलेल्या उमेशने पाचवीपर्यंतचं शिक्षण गावातल्या शाळेत पूर्ण केलं. त्यानंतर त्याची नवोदय विद्यालयात निवड झाली. नवोदयमधून शिकत असतानाच पुढे काय असा प्रश्न खुणावत असताना त्याने निवड केली ती पुण्याची.

विद्यार्थी
फोटो कॅप्शन, प्रतिनिधिक छायाचित्र

उमेश सांगतो, "पुण्यात शिक्षण चांगलं आहे. तेव्हा शिष्यवृत्ती मिळेल असंही वाटलं होतं. पण कोरोनामुळे शिष्यवृती मिळू शकली नाही.

"कमवा शिकाच्या माध्यमातून शिक्षण सुरू केलं. पुण्यात आल्यावर शिक्षणाबरोबरच मिळणारं एक्सपोजर, आणि इथं इंडस्ट्री असल्याने मिळणाऱ्या संधी मला महत्त्वाच्या वाटल्या."

"गावाकडे माझ्या वर्गात असलेल्या 50 मुलांपैकी फक्त 10-15 जणांचं शिक्षण सुरू आहे. मुलींचं शिक्षण कधीच सुटलं. आणि शिकणाऱ्या मुलांपैकी अगदी थोडेच जण शिकायला कॅालेजला जातात,” उमेश सांगतो.

रत्नमाला आणि उमेश मराठवाड्यातून पुण्यात शिक्षणासाठी दरवर्षी दाखल होणाऱ्या 20 ते 25 हजार मुलांची प्रातिनिधिक उदाहरणे आहेत.

पुणे का याची उत्तरं यातल्या प्रत्येक जणच अगदी दोन शब्दात देतो- 'शिक्षण' आणि 'संधी.'

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

ही मुलं त्याच मराठवाड्यातून येतात ज्याच्या शिक्षणासाठीचा लातूर पॅटर्न राज्यभरात प्रसिद्ध होता.

मग नेमकं काय बदललं हे सांगताना पुण्यातला फिल्ममेकर आणि एफटीआयआयचा विद्यार्थी मदन स्वतःचंच उदाहरण देतो. मदनचं शिक्षण लातूरला झालं. दहावीनंतर त्याने आर्ट्सची निवड केली.

पण 12वी ला चांगले मार्क पडल्याने त्याच्या शिक्षकांनी मग त्याला पुन्हा मार्ग बदलायला सांगितला आणि त्याला 'बीसीए'ला प्रवेश घ्यायला सांगितलं. बीसीएची तीन वर्षं कशीबशी ढकलावी लागल्याचं मदन सांगतो.

बीबीसी मराठीशी बोलताना तो म्हणाला, "मला त्यातलं काहीच कळायचं नाही. कशीबशी डिग्रीपर्यंत गाडी ढकलली. मग पुण्यात जाऊन कोर्स कर म्हणून सांगितलं गेलं आणि मी पुण्यात आलो.

"इथं आल्यावर फिल्ममेकिंग बद्दल कळालं. त्यात रस निर्माण झाला. काही लोकांना असिस्ट केलं आणि नंतर एफटीआयआयची प्रवेश परिक्षा दिली आणि तिथं अॅडमिशन घेतली. पुण्यात येईपर्यंत मात्र असं काहीच माहीत नव्हतं. पुण्यातल्या एक्सपोजरने फरक पडतो. संधी कळतात.”

संग्रहित छायाचित्र
फोटो कॅप्शन, दुष्काळाविरोधात झुंजणाऱ्या शेतकऱ्याचे संग्रहित छायाचित्र
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

आज मराठवाड्यात एकूण 4 विद्यापीठं आहेत. त्यापैकी एक कृषी विद्यापीठ आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ ही दोन विद्यापीठं सरकारी आहेत. अलीकडेच MGM विद्यापीठाच्या रुपाने मराठवाड्याला पहिले खासगी विद्यापीठ मिळाले आहे.

यातल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील संलग्न महाविद्यालयांची संख्या आहे 428.

तर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या संलग्न महाविद्यालयांची संख्या आहे 376. म्हणजे ही दोन विद्यापीठे मिळूनच जवळपास 700 हून अधिक महाविद्यालये मराठवाड्यात आहेत. तरीही मुलांना शिक्षणासाठी पुण्याची ओढ का वाटते?

याविषयी मदन सांगतो, “एक तर गावात शिक्षणाची धड सोय नाही. त्यासाठी जावं लागतं तालुक्याच्या ठिकाणी. तिथे जाणारी बस चुकली तर मग त्या दिवशीचा अभ्यास बुडणार.

"तसंच 2004 पर्यंत लातूर पॅटर्नचं भूत होतं. पण नंतर त्याचंही बाजारीकरण होत गेलं. काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी क्लास सुरू करण्याचे प्रकार झाले. त्यातून खून पडले. आणि मग या क्लासेस कडचा मुलांचा ओढा कमी झाला.”

अर्थात तरीही या लातूरमध्ये जेईई इंजिनियरींग आणि मेडिकल प्रवेशासाठीचे क्लास अजूनही सुरुच असल्याचं पत्रकार डॉ. माधव सावरगावे सांगतात.

बीबीसी मराठीशी बोलताना डॉ. सावरगावे म्हणाले, "लातूर पॅटर्न हा दहावी आणि बारावी साठी. मेडिकल इंजिनिअरींग साठी अजूनही मेडीकलची तयारी करणारी मुले आहेत. पुण्यात शिकणारी मुले ही पदवी किंवा पदवीकेचं शिक्षण घेणारी आहेत.

"पुणे, नांदेड, बीड, लातूर,उस्मानाबाद हे दळणवळणासाठी दूर होतं. प्रवास, राहणे असा खर्च जास्त होता आता वाहतूक व्यवस्था सुधारली. त्यातच पूर्वी नांदेडला चार जिल्ह्याचं विद्यापीठ आणि औरंगाबादला 4 जिल्ह्याचं विद्यापीठ होतं. ते 2010 पर्यंत व्यवस्थित सुरू होतं. नंतर शिक्षणाचा स्तर घसरला.

"आता तालुक्याच्या ठिकाणी देखील 2-3 कॅालेज सुरू होत आहेत. ग्रामीण भागातल्या महाविद्यालयात गुणवत्ता नाही. त्यामुळे चांगल्या दर्जाचं शिक्षण हवं ते कुठे तर ते पुण्यात मिळेल म्हणून पुण्याकडे शिक्षणासाठी ओढा जास्त आहे," सावरगावे सांगतात.

प्रतिनिधिक छायाचित्र
फोटो कॅप्शन, प्रतिनिधिक छायाचित्र

पुण्यात एमपीएससीची तयारी करणारा नितीन आंधळे देखील हेच अधोरेखित करतो.

नितीनच्या मते, "मराठवाड्यातल्या शिक्षण संस्थापैकी नामांकित अशी कोणतीही संस्था नाही. उलट अनेक ठिकाणी घोटाळेच झाल्याच्या बातम्या कानावर पडतात.

"शिक्षण तर पूर्ण होतं, पण पुढे नोकरीची संधी मात्र मिळताना पुण्याकडच्या विद्यार्थ्यांना प्राधान्य मिळतं आणि आम्ही मागे पडतो. कारण त्यांची तयारी, त्यांचा अभ्यास जास्त असतो. मराठवाड्यातल्या डिग्रीला तितकं महत्त्व मिळत नाही," नितीन आंधळे पुढे सांगतो.

तर मराठवाड्यातून येऊन पुण्यात शिक्षण पूर्ण केलेला आणि आता मराठवाड्यातल्या मुलांसाठी काम करणारा कुलदीप आंबेकर म्हणतो, "लोकांना वाटतं की पुण्यात शिकलं की मुलांना नोकरी मिळेल आणि आपलंच नाही तर सगळ्या कुटुंबाचं भलं होईल. आजूबाजूला अशा सक्सेस स्टोरी ऐकलेल्या असतात. आणि त्यामुळे पुण्याला प्राधान्य मिळतं."

शिक्षण संस्था अनेक असल्या तरी यातल्या अनेक शिक्षण संस्थांचा दर्जा खालावल्याचं हे विद्यार्थी सांगतात. आपण शिकलेल्या किंवा मित्र शिकत असलेल्या महाविद्यालयांमधील प्राध्यापक संस्थाचालकांची वैयक्तिक कामं करत असतात, असाही दावा हे विद्यार्थी करतात.

ओला दुष्काळ
फोटो कॅप्शन, ओला दुष्काळ

त्यातून मग लेक्चर होणार आणि या लेक्चरला बसणं मुलांना बंधनकारक नाही. अशातून बाहेर पडलेली मुलं अनेकदा नोकरी मिळवून स्थिरस्थावर होण्याऐवजी काही इतरच कामधंदे करत असल्याचं निरीक्षण ते नोंदवतात. याबरोबरच प्रादेशिक असमतोल हे देखील महत्वाचं कारण असल्याचं ते नमूद करतात.

"अनेक ठिकाणी एमआयडीसी नाही त्यामुळे पर्यायाने नोकऱ्या नाहीत. सुरू झालेल्या कंपन्या बंद होतात. यातून मग संधी कमी होते.

"एकीकडे शेतीतलं उत्पन्न घटतंय. दुष्काळाची सततची छाया आहे आणि त्यात नोकरीधंद्यांची उपलब्धता नाही. माझ्या गावात एक कारखाना सुरू झाला. तो एकच वर्ष चालला आणि बंद झाला," उमेश सांगतो.

याविषयी बीबीसी मराठीशी बोलताना प्राध्यापकांची संघटना असणाऱ्या बामुक्टोचे जनरल सेक्रेटरी प्राध्यापक मारुती तेगमपुरे म्हणाले, “पुण्यात शैक्षणिक दर्जा चांगला हा समज आहेच. पण त्याबरोबरच इतरही कारणे आहेत.

"मराठवाड्यात बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठांमध्ये संलग्न असलेल्या महाविद्यालयांची संख्या चारशेपेक्षा पुढे आहे. पण यापैकी अनुदानित महाविद्यालयांची संख्या आहे 117.

"उर्वरित महाविद्यालयांमध्ये जे शिक्षण दिलं जातं तिथे मान्यताप्राप्त प्राध्यापक नेमले जात नाहीत. सक्षम ग्रंथालये नाहीत. विज्ञान शाखेच्या महाविद्यालयात प्रयोगशाळा सक्षम नाहीत. खेळाची मैदाने नाहीत. त्यामुळे विद्यार्थी प्रवेश घ्यायला येतो आणि परीक्षेला येतो.

"शिक्षणाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. याबरोबरच प्रादेशिक असमतोल हे गंभीर कारण आहे. दांडेकर समितीने असमतोल मांडला पण तो कमी करण्यासाठी काही प्रयत्न झाले नाहीत.

"मराठवाडा शैक्षणिकदृष्ट्या इतर भागांच्या तुलनेत 100 वर्षं मागे आहे. म्हणजे इतर ठिकाणी सुरू झालेल्या महाविद्यालयांच्या तुलनेत मराठवाड्यात विद्यापीठाची स्थापनाच उशिरा झाली. त्यामुळे गॅप हा शंभर वर्षांचा आहे," तेगमुपरे सांगतात.

विद्यार्थी

लेखक बालाजी सुतार यांनी संधी बरोबरच सोयीचाही मुद्दा अधोरेखित केला. बालाजी सुतार यांच्या साहित्यातही विद्यार्थ्यांचे स्थलांतर हा विषय येतो.

बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले, "शिक्षण संस्था खूप आहेत. त्यांची कमतरता नाही. पण अनेकांची समजूत अशी आहे की अधिक चांगलं शिक्षण पुण्यात गेलं तर घेता येईल. सरसकट शिक्षण चांगलं नाही असं म्हणता येणार नाही. काही शाळा खूप चांगल्या दर्जाच्या आहेत.

"खासगी शिक्षण संस्थांमध्ये मात्र दर्जा खालावला असतो. दुसरा मुद्दा म्हणजे उद्योग व्यवसायांच्या संधी कमी आहेत. नोकऱ्या मिळतात पण पुणे-मुंबईला चांगल्या नोकऱ्या मिळतात. 1972 च्या दुष्काळात पुण्या-मुंबईकडे स्थलांतर झालं लोकांचं. त्यात पुणे जवळचं."

"त्यामुळे पुण्यात परकं वाटत नाही. मधल्या काळात स्पर्धा परीक्षांचा क्लास हा प्रकारही वाढला आहे. इकडे ग्रॅज्युएशन झालेली मुलंही स्पर्धा परीक्षांसाठी जातात. संधी नाहीतच मराठवाड्यात मुलांना. छत्रपती संभाजीनगर इकडचं मोठं शहर असलं तरी तिथले उद्योग सेट आहेत. पुण्यात संधी जास्त मिळते आणि सोय असते हे प्रामुख्याने कारण ठरतं," असंही बालाजी सुतार सांगतात.

हेही नक्की वाचा

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)