MPSC - UPSC करण्यासाठी मुलं पुण्यातच का येतात?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, रोहन नामजोशी
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
पुण्याच्या सदाशिव पेठेतून एक सहज चक्कर मारलीत तर तुम्हाला जुन्या पुण्याच्या खुणा तर दिसतीलच, पण त्याबरोबर दिसतील त्या स्पर्धा परीक्षेच्या क्लासेसच्या नव्याने आलेल्या इमारती, जुन्या इमारतीत असलेले क्लासेस, विविध फ्लेक्स, आणि अधिकारी होण्याचं स्वप्न पहात असलेले हजारो तरुण तरुणी.
ही मंडळी घोळक्यात चहा पीत असतात, चालू घडामोडींवर चर्चा करतात, परीक्षेचं नियोजन करत असतात एक ना अनेक. सदाशिव पेठ हा भाग म्हणजे स्पर्धा परीक्षेची पंढरी झाला आहे. महाराष्ट्रातून हजारो मुलं मुली इथे नोकरी मिळवण्याच्या दृष्टीने, अधिकारी होण्याचं स्वप्न घेऊन येत असतात.
गेल्या काही वर्षांत ही संख्या प्रचंड वाढली आहे. स्पर्धा परीक्षेच्या निमित्ताने एक मोठी बाजारपेठ इथे निर्माण झाली आहे. या विद्यार्थ्यांच्या निमित्ताने त्यांना रहायला मिळणाऱ्या जागा, खानावळ, अभ्यासिका, पुस्तकांची दुकानं, अशी एक समांतर अर्थव्यवस्था तिथे उभी राहिली आहे. पण ही हजारो महाराष्ट्रातली इतर मोठी शहरं सोडून पुण्यातच का येतात या प्रश्नाचा घेतलेला आढावा..
पुणे शहराला विद्येचे माहरेघर म्हटलं जातं. पुण्यात महाराष्ट्रातील अनेक प्रतिष्ठित शैक्षणिक संस्था आहेत. त्यामुळे शिक्षणासाठी पुणे हे पहिलं पसंतीचं ठिकाण समजलं जातं. शुभम पाटील सुद्धा शिक्षणासाठी पुण्याला आले होते. त्यांनी फर्ग्युसन कॉलेज मधून पदवी प्राप्त केली त्यानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला, अजुनही करत आहेत.
त्यांना यावर्षी मुख्याधिकारी हे पद मिळालं आहे. त्यांनी स्पर्धा परीक्षेसाठी पुणं का निवडलं याच्या उत्तरादाखल ते म्हणाले, “पुण्याचं वातावरण स्पर्धा परीक्षेसाठी पोषक आहे, सगळे मोठे क्लासेस इथे आहे. पुण्यात एकूणच शैक्षणिक वातावरण चांगलं आहे. कोणतंही पुस्तक प्रकाशित आलं, नवीन आलं की इथे लगेच उपलब्ध होतं. छोट्या शहरात या सुविधा नसतात. त्यामुळे मी शिक्षणासाठी इथे आलो तरी पुन्हा स्पर्धा परीक्षेसाठी इथेच थांबलो. जरी मी शिक्षणाला इथे आलो नसतो, तरीही मी इथेच थांबलो असतो.”
स्पर्धापरीक्षा तज्ज्ञ भूषण देशमुख यांनीही या विषयावर त्यांचं मत व्यक्त केलं. ते म्हणाले, “पुणे हे विद्येचे माहेरघर पूर्वी होतं आजही आहे. पुणे इतकं चांगलं शैक्षणिक वातावरण राज्यामध्ये इतर कुठेही नाही. तुलनात्मक दृष्ट्या स्वस्तामध्ये होणारे राहायची सोय, वर्षभर थंड वातावरण, पुरेसे पाणी यामुळे अभ्यासासाठी पुणे उत्कृष्ट ठरते. खुद्द लोकमान्य टिळक, आगरकर हे शिक्षणासाठी पुण्यात आले होते. पुढे टिळक कायद्याचे वर्ग चालवत. थोडक्यात अगदी टिळकसुद्धा पुण्यात क्लास चालवत होते, यातच सगळे आले.”
गावापेक्षा सोयी सुविधा चांगल्या
केदार बोरबोले सध्या पोलीस उपअधीक्षक म्हणून काम करतात. त्यांनी पुण्यात नोकरी केली आहे आणि पुण्यातच तयार केली आहे. त्यांच्या मते पुण्यात अभ्यासाच्या चांगल्या सोयी आहेत. गावाच्या ठिकाणी किंवा मूळ गावी अभ्यासाच्या सोयी नसतात. स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे गट नसतात, घरी असल्यामुळे घरच्या जबाबदाऱ्या असतात. मात्र पुण्यात या सगळ्यापासून दूर असल्यामुळे फोकस ठेवून अभ्यास करता येतो असं त्यांचं मत आहे.
कोरोनाच्या काळापासून ही परिस्थिती बदलल्याचं एक महत्त्वाचं निरीक्षण ते नोंदवतात. कोरोना काळात केदार त्यांच्या गावी गेले होते. तेव्हा ऑनलाईन माध्यमांचं महत्त्व त्यांच्या लक्षात आलं. विविध माध्यमांचा वापर करून त्यांनी अभ्यास केला. त्यामुळे त्यासाठी पुण्यात जाण्याची गरज उरली नाही असं ते म्हणतात. कोरोनाच्या आधी ही गरज होती आता ती गरज नसल्याचं ते सांगतात.
'पुण्याला जायची गरज नाही'

फोटो स्रोत, Getty Images
मुख्याधिकारी म्हणून काम करत असलेले शशिकांत बाबर यांनी मात्र पुण्याला न जाता तयारी केली. त्यामुळे त्यांचं काहीही अडलं नाही असं ते सांगतात. “पुण्याला रहायचं म्हणजे महिन्याचा किमान सात ते आठ हजार खर्च येतो. तो खर्चच परवडत नाही त्यामुळे क्लासेसचा खर्च परवडायचा प्रश्नच नव्हता. दुसरी गोष्ट म्हणजे लोक पुण्यात वातावरण मिळावं म्हणून तिथे येतात. माझ्या मते त्याचा फारसा फरक पडत नाही. आपलं वाचन हेच शेवटी महत्त्वाचं असतं. घरी बसून अभ्यास करायचा म्हणजे अनेक पर्याय उपलब्ध असतात. अनेक ऑनलाईन माध्यमातून आता अभ्यास करता येतो. त्यामुळे त्यासाठी पुण्याला जाण्याची गरज नाही.”
“दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अनेक लोकांना असं वाटतं की ते पुण्यात जाऊन एक अभ्यास करणारा गट शोधतील. पण असा गट मिळालाच नाही तर? सोबत अभ्यास करणारा हुशार असेल तर बऱ्याच गोष्टी साध्य होतात असं म्हणतात. पण असं कोणी सापडलं नाही तर काय करणार? त्यामुळे या मायावी दुनियेत भरकटण्याचा धोका जास्त होतो.”
आपल्या घरात राहून सुद्धा अभ्यास होतो. एकट्याने अभ्यास केला तरी एकलकोंडं होऊन अभ्यास करू नये, अनेक जणांचा असा गैरसमज असतो की स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा म्हटल्यावर सगळं बंद करून बसायचं असं नाही. त्यामुळे एकट्याने अभ्यास करावा पण एकलकोंडं होऊन करू नये असा सल्लाही ते द्यायला विसरत नाही.
मुलींना पुण्यात येऊन तयारी करणं हाही एक वेगळा विषय आहे. पुण्यात आता स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढते आहे. त्यामुळे त्याबरोबर येणाऱ्या सामाजिक समस्याही वाढीला लागत आहेत. अभ्यासाच्या निमित्ताने दिवस दिवस एकत्र राहिल्याने मुलींच्या मोकळेपणाचा वेगळा फायदा घेणारे किंवा त्यातूनच लग्नाच्या मागण्या घालणे, होकार न दिल्यास त्यातून निर्माण होणारी गुंतागुंत असे अनेक प्रकार झाल्याचं निरीक्षण तृप्ती बांदल नोंदवतात.

फोटो स्रोत, Getty Images
पुणे हे कायम शिक्षणाचं मुख्य केंद्र असलं तरी बदलत्या काळानुसार त्यातही अनेक बदल होत आहेत. कोरोना काळानंतर शिक्षण ऑनलाईन झालं, युट्यूब सारख्या माध्यमांवर अनेक क्लासेस त्यांचे लेक्चर अपलोड करतात. टेलिग्राम, व्हॉट्स अप ग्रुप, वेबसाईटवर ढीगाने अभ्यास साहित्य उपलब्ध होत असल्यामुळे आता पुण्याला यायची गरज नाही असं मत अनेक स्पर्धक आणि अधिकाऱ्यांनी नोंदवलं.
पुण्यात सदाशिव पेठ हे स्पर्धा परीक्षा हे मुख्य केंद्र आहे. तिथे सगळे मोठे क्लासेस आहेत. पण तिथेही आता महागाई वाढते आहे. जागांचे, खाण्याचे भाव वाढीला लागले आहेत. त्यामुळे मुलं पार अगदी धायरी, सांगवी या भागातही रहायला गेली आहेत.
शिक्षण, आयटी, यानंतर आता पुणं स्पर्धा परीक्षेचं हब झालं आहे. तिथे येण्याची किती गरज आहे याचे ठोकताळे बदलत आहेत. तरी ‘तयारी’ करायची म्हटली की आधी वाट पुण्याचीच धरली जाते हे वास्तव नाकारून चालणार नाही.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








