दर्शना पवार : UPSC-MPSC च्या नादात आयुष्याचं गणित चुकतंय का?

UPSC, MPSC, स्पर्धा परीक्षा, दर्शना पवार

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो
    • Author, प्राजक्ता ढेकळे
    • Role, मुक्त पत्रकार
    • Reporting from, पुणे

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून परिक्षेत्र वन अधिकारी (RFO) पदाची परीक्षा उत्तीर्ण होत राज्यात सहाव्या आलेल्या दर्शना पवारची हत्या झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. तिचा मित्र असलेल्या राहुल हंडोरेने केलेल्या हत्येने पुन्हा एकदा स्पर्धा परीक्षेचा विषय चर्चेत आला आहे.

या घटनेनंतर सोशल मीडिया, वर्तमानपत्र, टीव्ही चॅनलच्या माध्यमातून विविध पोस्ट, बातम्या यातून वेगवेगळी माहिती समोर येतेय. मात्र, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे वाढते वय आणि शारीरिक गरज व भावनिक गुंतागुंतीच्या बाजूवर कोणीच बोलत नाही.

या दोन पातळयांवर विद्यार्थ्यांची होणारी कुचंबणेविषयी त्यांच्या नेमक्या भावना काय आहेत?

परीक्षेच्या नादात आयुष्याचं कॅल्क्युलेशन चुकलं का?

गेल्या सात वर्षांपासून स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा सुनील (नाव बदलेलं आहे) सांगतो की, "स्पर्धा परीक्षा करण्याचा निर्णय पूर्णत: माझा होता. अभ्यासाला सुरुवात करत असताना माझ्या नियोजनानुसार काही प्रयत्न द्यायचे. त्यानंतर पोस्ट मिळाली की लग्न करायचं आणि सेटल व्हायचं, असं एकदम साधं गणित डोक्यात ठेवलं होतं. मात्र सुरुवातीला अभ्यासाचा आवाका, तयारी यात पहिल्या दोन प्रयत्नात अपयश आले. त्यानंतर वाटले की आपल्या आता अभ्यासाचा आवाका आलाय पुन्हा जोमाने प्रयत्न करून अभ्यास पूर्वक प्रयत्न देवू. मात्र पुन्हाही अपयश आले. असं करत करत गेली सात वर्षे मी स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय.

"काही परीक्षांमध्ये अपयश आले. मध्येच कोरोनात दोन वर्षे गेली तर काही परीक्षांचे निकाल अजूनही लागलेले नाहीत. मात्र या सगळयात माझं वय वाढलं. आता लग्न करायचं म्हटलं तर हातात चांगली नोकरी नाही. मुलगी कोण देणार असं घरचे म्हणतात.

"वाढतं वय, परीक्षेतील अपयश, सभोवतालच्या माणसांकडून पोस्टबाबत, यशाबाबत होणारी अहवेलना या सगळयात मनातल्या भावनांना वाट करून द्यावी इतक्या जवळचेही कुणी नाही. दिवसेंदिवस पालकांवरील आर्थिक अवलंबित्व, कौटुंबिक नात्यांमधला ताण, पालकांशी विसंवाद,अपेक्षांचं ओझं या सर्व बाबींचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम होऊन माझ्या सारख्या अनेक मुलांचं मानसिक खच्चिकरण होण्याचं प्रमाण अधिक वाढलंय ही कोंडी सोडवताना अत्यंत दमछाक होत असते. या दरम्यान एक परीक्षार्थी म्हणून शारीरिक व मानसिक पातळीवर अनेक ठिकाणी सतत गळचेपी सहन करावी लागतेय."

ही अवस्था एकटया सुनीलची नाही तर स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या बहुतांश मुलांची हीच स्थिती आहे.

एमपीएससी, स्पर्धा परीक्षा

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो

पुण्यात स्पर्धा परीक्षेसाठी येणाऱ्या मुलांमध्ये ग्रामीण भागातून येणाऱ्या मुलामुलींचे प्रमाण अधिक आहे.

यातच शहरातील वातावरणात रुळने, रुजणे यामध्येही मुलांचा वेळ जातो. त्यानंतर अभ्यासिका, क्लासेस स्वतःचे शेड्युल बसवण्यात जातात. त्यानंतर बाकीच्या सगळ्या गोष्टीनंतर येतात.

यामध्ये विदर्भातून स्पर्धा-परीक्षेच्या तयारीसाठी सदाशिव पेठेत आलेल्या ललितचा (नाव बदलेलं आहे) अनुभव काहीसा वेगळा आहे.

तो म्हणतो की पेठत स्पर्धा परीक्षा करणारी मुलं-मुली प्रत्येक चहाच्या टपरीवर, नाश्त्याच्या ठिकाणी, गल्लोगल्लीत सुरु झालेल्या अभ्यासिकांमधून दिसतील. पण यात पद भरतीचे प्रमाण व त्या भरतीमध्ये यशस्वी होणाऱ्यांचं प्रमाण पाहिलं तर अत्यंत कमी आहे.

या पेठांमध्ये पदवीचे शिक्षण घेऊन अभ्यासासाठी आलेल्या कोवळ्या पोरांचे आता चांगले भारदस्त, दणकट पुरुष झालेत, पण गेली कित्येक वर्षे ही सगळी पोरं इथंच आहेत. केवळ अभ्यासिका, राहण्याचा परिसर, चहा, नाश्ता, खानावळी बदलल्या आहेत. बाकी आयुष्य तसंच सुरु आहे.

यातून बाहेर पडू वाटतं पण...

दिवसागणिक वाढत असलेलं वय, 'पोस्टचं' ग्लॅमर यामुळं 'काय कलेक्टर', 'आरं ! कधी तुझ्या पोस्टचा गुलाल उधळायला भेटणार' असं सतत विचारून मानसिक खच्चीकरण करणे. कुटुंबाकडून पोस्टबद्दल होणारी सातत्यानं होणारी विचारणा यात तयारी करणाऱ्या पोरांच्या भाव-भावनांचा विचार कुठेच होत नाही.

मग वयाबरोबरच वाढणाऱ्या शारीरिक गरजांवर बोलणं तर खूप लांबची गोष्ट आहे. यातून मग सोयीस्कर मार्ग म्हणून पोरं-पोरी अभ्यासिकेत, क्लासेसमध्ये, ग्रुप स्टडीच्या माध्यमातून आपला कम्फर्ट झोन शोधू पाहतात.

आपल्या भावनांना मोकळी वाट करून देता येईल, मनातलं सगळं बोलता येईल असं कुणीतरी शोधायचा प्रयत्न करतात. त्यातूनच मैत्री होते. एकमेकांच्या सोबत चहा, नाश्ता, खानावळ, अभ्यासाच्या चर्चा करू वाटतात. कित्येकदा ही नुसती मैत्री राहत नाही, तर तिचे प्रेमातही रुपांतर होते. यातून एकमेकांच्या बद्दल पझेसिव्हनेस वाढत राहतो.

या पेठांमध्येच त्यांचं स्वतःच स्वप्नरंजन रुपी जग तयार होतं जातं. पण हे वास्तवात उतरण्याची शक्यता खूपच कमी असते. त्यातून काहीजण जिथलं तिथं सोडून पुढे जातात. पण काहीजण मात्र नैराश्याच्या गर्तेत अडकतात.अनेकांना यातून बाहेर पडू वाटतं पण पडता येत नाही.

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यामध्ये अनेकदा मुलं आपली बौद्धिक कुवत ओळखत नाही. तसेच आर्थिक स्थितीही विचारात घेत नाही. केवळ कुणालातरी पोस्ट मिळालेली असते. त्याला मिळणारे मान मरातब पाहून, कधी कुटुंबाच्या आग्रहाखातर इकडे वळालेली असतात. त्यामुळे काहीकाळ अभ्यास केल्यानंतर या अभ्यासाला लागणारे सातत्य ठेवणे त्यांना जमत नाही. साहजिकच द्विधा मनस्थितीत अडकून असतात. यातून काही मुलेही केवळ टाईमपास करतानाही आढळून येतात. यामध्ये मुलींना जाणवणाऱ्या समस्या आणखी वेगळ्या आहेत.

स्पर्धा परीक्षा

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो

शारीरिक व मानसिक गरजाबाबत बोलणं तर खूप लांबची गोष्ट

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

याविषयी बोलताना 29 वर्षांची परिमल (नाव बदलेलं आहे) म्हणते, "मी फर्ग्युसन कॉलेजमधून बी.ए. केल्यानंतर मी स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यास सुरुवात केली. पहिल्यांदा दिलेल्या दोन प्रयत्नात पूर्व व मुख्य परीक्षेपर्यंत पोहचले, पण मुलाखतीत गेले, पोस्ट निघाली नाही. पुन्हा जोमाने तयारी सुरु केली त्याच दरम्यान कोरोनाचे संकट आले आणि घरी जावे लागले. कोरोनाच्या संकटात दोन वर्षे गेली. पुन्हा पुण्यात येऊन अभ्यासाचे रुटीन बसवण्यात बराच कालावधी गेला. त्यात पुन्हा आयोगाकडून जाहिराती काढण्यास होणार विलंब, जाहिराती काढल्यातर परीक्षा घेण्यास आणि त्याचा निकाल लावण्यास दिरंगाई. यात मी माझ्या वयाची जवळपास तिशी गाठली आहे. कोरोना नंतर अभ्यासाचं शेड्युल बसवता बसवता आता घरून अजून किती दिवस करणार अशी विचारणा होऊ लागली आहे. माझ्या बरोबरीच्या काही मुलींची कोरोनात लग्न उरकली. तर काहींनी अभ्यास थांबवत घरी राहिल्या.

"आज माझ्याकडे केवळ बी.ए.ची पदवी आहे. आता स्पर्धा परीक्षा सोडून दुसरे काय करायचं म्हटलं तर या पदवीच्या आधारे मला कसली नोकरी मिळणार असा प्रश्न उभा राहतोय. या सगळ्या झाल्या करिअरच्या गोष्टी पण लग्नाचं वय उलटून गेल्यानं माझ्यासह घरचे तणावात असतात.

"दुसरीकडं संपूर्ण स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना अभ्यासाकडं दुर्लक्ष होईल ही भावना मनात धरून मी कुणाशी घनिष्ट मैत्री केली नाही. यात आपण गावाकडचं असल्यानं कुठल्याही मुलासोबत फिरताना, चर्चा करताना दिसलो तर ही भीतीही मला सतावते. गावाकडं कुणी काही चुकीचं सांगितलं तर या भीतीनं मी प्राधान्यानं मुलांसोबत मैत्री करणे टाळत आले. माझ्या फ्रेंडलिस्टमध्ये थोडीफार केवळ जुजबी ओळख असली मुलं आहेत. या सगळ्याचा परिणाम मनावर असा होऊन बसलाय, की आपण स्पर्धा परीक्षेच्या नादात आयुष्याचा आनंद घ्यायचा विसरूनच गेलोय असं वाटतं. त्यात स्पर्धा परीक्षेच्या संदर्भातून प्रेमप्रकरणाच्या अश्या काही घटना घडल्या की घरचे धास्तवलेल्या स्थितीत फोन करतात. थेट काहीच म्हणत नाहीत पण उगाच आडून-आडून चुकीचं वागू नका असे सल्ले देत राहतात. मग शारीरिक व मानसिक गरजाबाबत बोलणं तर खूप लांबची गोष्ट होऊन बसली आहे. या सगळ्यावर खुलेपणानं बोललं पाहिजे हे कळतं पण बोलणार कधी, कुठे आणि कुणासोबत हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो."

आजही आपल्याकडे मुलींच्या शिक्षणावर पैसे खर्च करण्यापूर्वी विचार केला जातो. खूप कमी कुटुंब कुठलाही विचार न करता पैसे खर्च करताना विचार करत नाहीत. त्यात अनेक मुलींची आर्थिक स्थिती अत्यंत बेताची असते. त्यांचे कुटुंब अतिशय काटकसर करून पैसे पुरवतात. त्यामुळे परीक्षेच्या तयारीसाठी एक ठराविक वेळ दिला, कधी-कधीतर पात्रता असूनही केवळ आर्थिक गणितांमुळे माघार घ्यावी लागते.

मर्यादित वेळ, वाढत्या वयामुळे लग्नाच्या अनेक समस्यांनाही मुलींना सामोरे जावे लागते. लग्नाचा विषय घेऊन कुटुंबीयही चिंतेत असलेली दिसून येतात.

स्पर्धा परीक्षा

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो

चिंता,तणाव, झोप न लागण्याच्या समस्या स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांमध्ये जास्त

स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत बोलताना समुपदेशक सौ. रोहिणी भोसले-शेख सांगतात, "माझ्याकडे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या केसेसमध्ये बहुतांश मुले-मुली नैराश्याच्या गर्तेत अडकलेली येतात. याचे मुख्य कारण म्हणजे वाढते वय आणि त्याबरोबर कमी होत चाललेला संवाद होय. कारण ही मुले स्पर्धा परीक्षेत असलेली वयाची मर्यादा संपेपर्यंत परीक्षा देतच असतात. त्यामध्ये त्यांची आशावादी भूमिका असते, की मला पोस्ट निघेल. पण हे करत असताना अनेकदा आपला किती वेळ जातोय किंवा याला आपण पर्याय 'बी' शोधलाय का? याचा विचार ते करत नाहीत. याचाच परिणाम म्हणजे येणाऱ्या अपयशामुळे, वाढत्या वयामुळे, सामाजिक बंधनांमुळे नैराश्य यायला लागत. यातच स्पर्धेत टिकून राहण्यासाठी वाढत्या वयाचा,भावनिक गरजा विचार ना घेता दाबून ठेवल्या जातात. कधी त्या लक्षात आल्याचं तर त्याच एवढा मोठा बाऊ करुन ठेवलाय की त्याबाबत कधीच खुलेपणानं बोललं जात नाही. कुटुंबातून कधी खुलेपणाने संवाद होत नाही.

"स्पर्धा परीक्षेच्या मुलांमध्ये चिंता वाढणे, तणावात राहणे, झोप न लागणे, व्यसनाच्या आहारी जाण्याचे प्रमाण अलीकडच्या काळात अधिक आहे. याचं मुख्य कारण मुला-मुली या परीक्षांमध्ये येणारं अपयश, आवडत्या मुलीशी किंवा मुलाशी लग्न न होणं, समाजात रुजलेलया यशाच्या व्याख्येत बसत नसल्यानं होणारी अहवेलना होय. मानसिकरित्या स्ट्रॉंग राहण्यासाठी मनमोकळा संवादच त्यांच्याबरोबर होत नाही. यातून या मुलांचा लोकांना टाळण्याकडे काळ अधिक वाढतोय. काही ठराविक मित्रमैत्रिणी सोबतच संपर्क ठेवणे.

"आर्थिक गोष्टींसाठी पालकांवर अवलंबून असल्यानं केवळ त्यांच्याशी जुजबी बोलणं सुरु राहत. या गोष्टी टाळण्यासाठी स्पर्धा परीक्षांच्या मुलांसोबत सर्वात पहिलं कुटुंबानं खुलेपणानं संवाद साधला पाहिजे. जरी स्पर्धा परीक्षा करण्याचा निर्णय त्यानं घेतला असला तरी एका टप्प्यावर थांबायला हवं हे त्याच्याशी मनमोकळेपणानं बोललं पाहिजे. करिअरचा दुसरा पर्याय त्याला सुचवला पाहिजे. पण प्रामुख्याने बोललं पाहिजे. आज आपण सामाज प्रगत झाला असं म्हणत असताना आजही वयात आलेल्या किंवा वयाची तिशी गाठलेल्या तरूण-तरुणींसोबत शारीरिक, मानसिक गरजांबाबत किती खुलेपणाने बोलतो याचा विचार होणं महत्त्वाचं आहे. समाजात आरोग्य जपण्यासाठी जसा वेळ दिला जातो पण मानसिक आरोग्य जपण्याबाबत अनास्था असलेली दिसून येते."

पेठांमध्ये प्रेमकहाण्या सुरु होतात अन् तिथंच संपतात

स्पर्धा परीक्षेची तयारी करून एका ठराविक काळानंतर थांबलेल्या व पत्रकारितेच्या क्षेत्रातील शिक्षण घेऊन त्यात आपले करिअर स्थिर केलेला महेश शेळके म्हणतो, "पुण्यातल्या पेठात काय किंवा दिल्लीतील राजेंद्र नगरमध्ये काय स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचं जग फार छोटं आहे. इथं पोस्ट निघाली तरच ओळख अन्यथा तुम्हाला कोणी ओळखत नाही. पुण्यातल्या पेठेत परीक्षेची तयारी करताना अभ्यासाबरोबरच अनेक लायब्ररी, चहाच्या जागेवर अनेक प्रेमकहाण्या सुरू होतात. यशस्वी मात्र क्वचितच होतात.

"परीक्षेची तयारी करत असताना विद्यार्थ्यांचं वय वाढत असत आणि त्याच्यासोबत फस्ट्रेशनही. कारण अभ्यास करत असताना आयुष्यातील इतर अनेक गोष्टी आनंद घेता येत नाही. कारण यशस्वी होण्याचा दबाव हा सर्व बाजूनं वाढत असतो. विद्यार्थ्यांमध्ये परीक्षा देणाऱ्यांचं प्रमाण अधिक आहे. पण यशस्वी होण्याचं प्रमाण अत्यंत कमी आहे. दररोजचं शेड्यूल फॉलो करत असताना शारीरिक आकर्षण, भावनिक गुंतागुंत याला तितकसं महत्त्व दिलं जात नाही. याच मुख्य कारण म्हणजे असुरक्षिततेची भावना होय. त्याच्याविषयी वाटणारी अनामिक भीती आहे."

आपल्या समाजात शारीरिक व भावनिक गरजांबाबत समाजात मोठा टॅबू आहे. एवढंच नव्हे तर समाज काय म्हणेल या भीतीने कुटुंबातही यावर कधीही खुलेपणाने बोललेलं जात नाही. एखाद्या कुटुंबात खूप मोकळं वातावरण असले आणि एखाद्या मुलाने किंवा मुलीने आपल्या अत्यंत जवळच्या मित्र- मैत्रिणीविषयी घरी सांगितलं, तरी त्यावर फारसा सकारात्मक विचार होत नाही. याउलट पुढे जाऊन पोस्ट नाही मिळाली तर तू उगाच मैत्री करण्यात अडकून पडला त्यामुळे असं अपयश आलं असं म्हटलं जातं. साहजिकच विद्यार्थ्यांना या गोष्टीवर बोलू वाटलं तरी त्या टाळलेल्या बऱ्या असा कल अधिक दिसतो. पण महेशसारखी मुलं ही हाताच्या बोटावर मोजण्याइतकी आहेत.

जे स्पर्धा परीक्षेत यशस्वी झाले नाही तरीही दुसऱ्या करिअरमध्ये स्थिरावले आहेत. पण अनेक मुलांची अयशस्वी झाल्यानंतरही करिअरचा दुसरा मार्ग निवडण्याची मानसिकता नसते. प्रशासकीय व्यवस्थेतील खाचखळगे कळलेले असतात. त्यामुळे त्यात चांगल्या गोष्टी ऐवजी दोष जास्त दिसत असतात.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)