जीएन साईबाबांचे निधन, हैदराबादच्या रुग्णालयात उपचारादरम्यान झाला मृत्यू

फोटो स्रोत, Getty Images
दिल्ली युनिव्हर्सिटीचे माजी प्राध्यापक जीएन साईबाबा यांचं शनिवारी सायंकाळी हैदराबादच्या निम्स रुग्णालयात निधन झालं. सायंकाळी 8 वाजून 36 मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार साईबाबा यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
गेल्या महिन्यात शस्त्रक्रिया करून त्यांचं पित्ताशय काढण्यात आलं होतं. त्यानंतर तब्येतीबाबत काही अडचणी निर्माण झाल्यानं त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल केलं होतं.
त्यानंतर त्यांच्या हृदयानं काम करणं बंद केलं.
डॉक्टरांनी सीपीआर देत त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना यश आलं नाही. त्यानंतर निम्स रुग्णालयाच्या डॉक्टरांनी त्यांच्या निधनाची घोषणा केली.
मार्च महिन्यात मुंबई उच्च न्यायालयाने माजी प्राध्यापक जी.एन. साईबाबा यांची माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्तता केली होती.


पत्नीने काय सांगितले?
साईबाबा यांच्या पत्नी वसंता यांनी एक निवेदन जाहीर केलं आहे. त्यात त्यांनी म्हटलं की, "गेल्या महिन्यात 28 सप्टेंबरला हैदराबादच्या निम्स रुग्णालयात पित्ताशय काढण्याची शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर साईबाब पूर्णपणे तंदूरुस्त झाले होते."
"पण नंतर त्यांना पोटदुखीचा त्रास झाला. ऑपरेशनच्या सहा दिवसांनंतर त्यांच्या पोटात पित्ताशय काढून स्टेंट टाकलेल्या ठिकाणी संसर्ग सुरू झाला."
"गेल्या एका आठवड्यात साईबाब यांनी 100 च्यावर ताप होता आणि त्यांचं पोटही प्रचंड दुखत होतं. त्यामुळं ते डॉक्टरच्या निगराणीत होते."

फोटो स्रोत, Getty Images
"त्यानंतर 10 ऑक्टोबरला त्यांना पुन्हा आयसीयूमध्ये हलवण्यात आलं. त्यांच्या पोटात रक्तस्राव होत होता. पोटाला सूज आल्यानं त्यांचा रक्तदाबही कमी झाला होता. "
"शनिवारी त्यांच्या हृदयानं काम करणं बंद केलं. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना सीपीआर दिला. पण साईबाबांना वाचण्यात त्यांना यश आलं नाही."
जी. एन. साईबाबा कोण होते?
जी. एन. साईबाबा हे दिल्ली विद्यापीठातील आनंद महाविद्यालय येथे इंग्रजी विषयाचे प्राध्यापक म्हणून काम करत होते. त्यांना 2014 साली महाराष्ट्र पोलिसांनी नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या प्रकरणात अटक केली होती.
मार्च 2017 मध्ये साईबाबा यांना UAPA कायद्याअंतर्गत दोषी ठरवून त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यांना नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातील अंधार कोठडीत ठेवण्यात आलं होतं.
साईबाबा शारिरीक दृष्ट्या 90 टक्के अपंग होते. वयाच्या पाचव्या वर्षी त्यांना पोलिओ झाला होता. दोन्ही पायांनी चालता येत नसल्याने ते लहानपणापासूनच व्हीलचेअरला चिकटून होते.
तुरुंगात रवानगी झाल्यापासून साईबाबा यांना अनेक आरोग्य समस्यांचा सामना करावा लागला. यामध्ये मज्जातंतूशी संबंधित आजार, यकृताच्या समस्या, रक्तदाब, हृदयविकार आदी गोष्टींचा समावेश आहे, असा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला होता.

भीमा कोरेगाव प्रकरणात अनेकांना अटक करण्यात आली होती. त्यात साईबाबांसह गौतम नवलखा, आनंद तेलतुंबडे यांचा समावेश होता.
या लोकांचा माओवाद्यांशी संपर्क असल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. भीमा कोरेगावमधील कार्यक्रमाचं आयोजन माओवाद्यांच्या पाठिंब्यानं झालं होतं, असाही आरोप त्यावेळी करण्यात आला होता.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











