डिजिटल अरेस्ट : स्वत:च्याच घरात 22 दिवस कैदेत, 51 लाख रुपयेही लुटले

- Author, नवजोत कौर
- Role, बीबीसी पंजाबी प्रतिनिधी
“ते 22 दिवस क्षणोक्षणी माझ्याबरोबर व्हीडिओ कॉलवर होते. अगदी बाथरुमला जातानासुद्धा मला त्यांना तसा मेसेज करावा लागायचा.”
ही गोष्ट आहे चंदिगढ येथे राहणाऱ्या हरिनाथ यांची. त्यांना ऑनलाइन घोटाळेबाजांनी डिजिटल अरेस्ट म्हणजे डिजिटल पद्धतीने अटक केली होती.
हरिनाथ सांगतात, “मी एक-दोन दिवसानंतर बँकेत जायचो आणि त्यांना लाखो रुपये पाठवायचो. आतापर्यंत त्यांनी माझ्याकडून 51 लाख 2 हजार रुपये लुटले आहेत.”
त्यांचा दावा आहे की 2 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबरपर्यंत त्यांनी सायबर घोटाळेबाजांचं सगळं ऐकलं आणि 22 दिवस त्यांना पैसे पाठवत राहिले.
हरिनाथ सांगतात की, अगदी घरातून निघतानासुद्धा ते घोटाळेबाजांना मेसेज करायचे.
भारतात डिजिटल अरेस्टचा मुद्दा आता इतका गंभीर झाला आहे की, 27 ऑक्टोबरला झालेल्या 'मन की बात' कार्यक्रमात याचा उल्लेख केला. या प्रकारापासून सावध राहण्याचा सल्ला त्यांनी लोकांना दिला.
ते म्हणाले, “डिजिटल अरेस्ट या प्रकारामुळे प्रत्येक वर्गातले आणि प्रत्येक वयोगटातले लोक आहेत. फक्त भीतीपायी लोक कष्टाने कमावलेले लाखो रुपये गमावत आहेत.”
हरिनाथ भोपाळचे आहेत आणि गेल्या सात वर्षांपासून ते चंदिगढला राहतात.
कशी झाली डिजिटल अरेस्ट?
या घटनेबद्दल हरिनाथ यांनी बीबीसीला माहिती दिली, “मी एका वर्तमानपत्रात फोटो एडिटर म्हणून काम करत होतो. 2017 मध्ये या कामानिमित्त मी चंदिगढला आलो होतो.”
कोरोना काळात त्यांची नोकरी गेली. त्यांची बायको एका खासगी शाळेत शिक्षिका आहे. शाळेव्यतिरिक्त त्या घरीसुद्धा मुलांना शिकवतात.
नोकरी सोडल्यानंतर त्यांनी आपल्या बायकोबरोबर मुलांना शिकवण्याचं काम सुरू केलं.
डिजिटल अरेस्टबद्दल ते सांगतात, “2 ऑक्टोबरला रात्री बारा वाजता मला एका मुलीचा फोन आला. आणि म्हटलं की, मी एका टेलिकॉम कंपनीतून बोलत आहे. दोन तासांनंतर तुमचा फोन बंद होईल.”
ते सांगतात, “ती मुलगी म्हणाली की 30 ऑगस्टला तुमच्या आधार कार्डावर एक सिमकार्ड जारी झालं होतं. त्या सिमकार्डच्या विरोधात फसवणुकीच्या सात तक्रारी आणि एक एफआयआर दाखल झाला आहे.
“मी त्यांना सांगितलं की मुंबईत मी कुणाला ओळखत नाही. मी चंदिगढमध्ये राहतो आणि त्यानंतर एक तोतया पोलीस अधिकारी माझ्याशी बोलला.”

त्या पोलीस अधिकाऱ्याने धमकी दिल्याचं हरिनाथ यांचं म्हणणं आहे.
त्यांच्यामते पोलीस अधिकारी म्हणाला, “ अरे तुम्ही हे काय केलं? तुम्ही खूप मोठा घोटाळा करत आहात. नरेश गोयल नावाच्या व्यक्तीबरोबर खूप मोठा घोटाळा झाला आहे. तुमच्या नावाने बँक अकाऊंट उघडलं आहे.”
तोतया पोलीस अधिकाऱ्याने हरिनाथला सांगितलं, “या खात्यातून 6 कोटी 80 लाख रुपयांचा व्यवहार झाला आहे. त्यातली 10 टक्के रक्कम तुमच्या नावावर आली आहे. तुमच्याविरुद्ध अटकेचा वॉरंट जारी करण्यात आला आहे. पोलीस दोन तासात तुम्हाला अटक करण्यास येत आहेत.”
हरिनाथ सांगतात, “मी घाबरून गेलो होतो. मी काहीच पडताळणी करण्याचा प्रयत्न केला नाही. त्यानंतर त्या पोलीस अधिकाऱ्याने मला सांगितलं की हे प्रकरण फारच गंभीर आहे. या प्रकरणाची चौकशी आरबीआय, सीबीआय आणि सुप्रीम कोर्ट करत आहेत. मी सीबीआय अधिकाऱ्याशी तुमचं बोलणं करवून देत आहे.”
त्यानंतर त्यांनी हरिनाथ यांचं बोलणं तोतया सीबीआय अधिकाऱ्याशी करवून दिलं.
हरिनाथ सांगतात, “त्यांनी मला लवकरात लवकर मुंबईला येण्यास सांगितलं. मी म्हटलं की मी इतक्या लवकर मुंबईला कसा येऊ शकतो? माझ्यावर माझ्या पत्नी आणि मुलांची जबाबदारी आहे.”
“ते नंतर मला म्हणाले की ठीक आहे. तुम्ही मुंबईला येऊ शकत नसाल, तर आमच्याकडे अजून एक मार्ग आहे. तुम्ही घरी रहा आणि तपासात सहकार्य कराल.”


हरिनाथ यांनी दिलेल्या माहितीनुसार ते म्हणाले, “या दरम्यान तुम्ही मोबाईलच्या माध्यमातून तुमच्याशी सतत संपर्कात राहू. आता आम्ही उद्या सकाळी 10 वाजता पुन्हा तुम्हाला भेटू.”
“तुम्ही तुमच्या संपत्तीची माहिती आमच्याबरोबर शेअर कराल. आरबीआय तुमच्या संपत्तीची चौकशी करेल. जर तुम्ही निर्दोष असाल तर तुम्हाला सोडून देण्यात येईल.”
हरिनाथ म्हणाले की दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे 3 ऑक्टोबरला सकाळी 10 वाजता व्हीडिओ कॉलवर ते घोटाळेबाज पुन्हा त्यांना भेटले.
त्या भेटीत या सायबर घोटाळेबाजांनी विचारलं की तुमच्याकडे किती पैसा आणि संपत्ती आहे.
हरिनाथ यांनी सांगितलं, “मी त्यांना सगळं खरं खरं सांगितलं की, माझ्याकडे फिक्स डिपॉझिट म्हणून 9 लाख रुपये आहेत.”

हरिनाथ यांनी सांगितलं, “त्यांनी लगेच मला बँकेत जाऊन पैसे पाठवण्यासाठी सांगितलं. 3 ऑक्टोबरला संध्याकाळी मी माझी एफडी तोडली. चार तारखेला आमची पुन्हा भेट झाली.”
“या भेटीत त्यांनी मला सांगितलं की, जर बँकेत गेला तरी हा व्हीडिओ कॉल सुरू राहील आणि हे तुम्ही कोणालाही सांगणार नाही की हे पैसै तुम्ही का आणि कोणाला पाठवत आहात. तुम्ही बँकेतही कोणाशी काहीही बोलणार नाही.”
हरिनाथ सांगतात, “हीच माझ्याकडून खूप मोठी चूक झाली की हे लोक कोण आहेत याची पडताळणी करण्याचा मी प्रयत्न केला नाही. सीबीआय, आरबीआय, व्हॉट्सअपवरून आपल्याशी संपर्क का करतील? असा मला प्रश्न पडला. मी घाबरून गेलो होतो. मला जसं जसं करायला सांगितलं होतं, तसं तसं मी करत गेलो.”
सकाळी लहान मुलांना शिकवण्यापासून, ते भाजी करण्यापर्यंत आणि मंदिरात दिवा लावण्यापर्यंत प्रत्येक कामाची माहिती हरिनाथ त्या घोटाळेबाजांना द्यायचे.
कुटुंबाशी बोलण्यास मनाई
हरिनाथ सांगतात, “पहिल्यांदा मला असं वाटलं की, मला खरंच वाटलं की हे आरबीआय किंवा सीबीआय आहेत. मला त्यांच्यावर काहीच संशय आला नाही.”
“व्हीडिओ कॉलवर ते सतत मला बघत असायचे. मला कळत नव्हतं की मी काय करू. त्यांनी मला कोणालाही काहीही सांगायला मज्जाव केला होता.”
“माझ्या बायकोने मला अनेकदा विचारलं पण मी कोणत्या गोष्टीत फसलो आहे हे मी तिला सांगितलं नाही.
हरिनाथ यांचं म्हणणं आहे, “त्यांनी मला पैसे पाठवायला सांगितलं होते. मी पहिल्यांदा 4 ऑक्टोबरला आरटीजीएसच्या माध्यमातून 9 लाख 80 हजार इतकी रक्कम पाठवली.”
हरिनाथ यांचा दावा आहे, “दुसऱ्यांदा मी त्यांना 5 ऑक्टोबरला 20 लाख रुपये पाठवले. त्यानंतर 7 ऑक्टोबरला 9 लाख 80 हजार पाठवले आणि त्यानंतर 50 हजार रुपये पाठवले. 9 ऑक्टोबरला पुन्हा 5 लाख रुपये पाठवले.”
अशाप्रकारे पैसे पाठवणं सुरूच होतं.
“13 ऑक्टोबरला 99 हजार 999 रुपये पुन्हा पाठवले. 14 ऑक्टोबरला 2 लाख 80 हजार रुपये पाठवले.”
त्यानंतर ऑनलाइन घोटाळेबाजांनी हरिनाथ यांना सांगितलं की, आपल्याविरुद्ध झालेला एफआयआर रद्द करायचा असेल तर त्यांना आणखी 2 लाख रुपये द्यावे लागतील.

फोटो स्रोत, Getty Images
हरिनाथ सांगतात, “मी 16 ऑक्टोबरला 88 हजार रुपये पुन्हा पाठवले.”
“त्यानंतर आरबीआयने तपास केला आहे. त्याची फी 1.5 लाख रुपये आहे. त्यानंतर मला असं वाटलं की मला जर माझे पैसे परत हवे असतील तर मला हे पैसे द्यावे लागतील. त्यामुळे त्यांच्या खात्यात मी 1 लाख 50 हजार आणखी टाकले.”
त्यानंतर हरिनाथ यांना जाणवलं की त्यांच्याबरोबर फसवणूक झाली आहे.
ते म्हणतात, “मी माझ्या कुटुंबियांशी बोललो आणि त्यानंतर मी पोलीस स्टेशनला गेलो. त्यांनी मला सायबर सेलशी संपर्क करायला सांगितला. मी सेक्टर 17 मधील पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार नोंदवली.”
हरिनाथ यांचं म्हणणं आहे की, 24 ऑक्टोबरला जेव्हा त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली तेव्हा पोलिसांनी त्यांना तातडीने फोन बंद करण्याचा सल्ला दिला.
चंदीगडच्या सायबर क्राइमचे पोलीस अधीक्षक केतन बन्सल यांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रार दाखल करण्यात आली असून तपास केला जात आहे.
या प्रकरणात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मात्र लोकांना जागरुक करणं हा मोठा मुद्दा आहे.
51 लाख रुपये आले कसे?
हरिनाथ चंदीगडला एका भाड्याच्या घरात राहतात.
पानिपत येथे त्यांचे दोन फ्लॅट होते. ते विकून त्यांनी सगळा पैसा शेअर बाजारात लावला होता.

फोटो स्रोत, Getty Images
हरिनाथ सांगतात, “नोकरी सोडल्यावर माझ्याकडे चार ते पाच लाख होते. मी माझी कार 1 लाख 71 हजारांना विकली. त्याशिवाय माझ्याकडे 12-13 लाख रुपये होते. तसंच मी माझा आणखी एक फ्लॅटही विकला होता.”
डिजिटल अरेस्ट म्हणजे काय?
हा ऑनलाइन घोटाळ्याचा नवीन प्रकार आहे. त्यात काही लोक स्वत:ला पोलीस अधिकारी किंवा सरकारी कर्मचारी असल्याचं सांगून घाबरवण्याचा प्रयत्न करतात.
हे घोटाळेबाज व्हीडिओ कॉलच्या माध्यमातून क्षणोक्षणी एखाद्यावर लक्ष ठेवून असतात. तुम्ही काय करता, कोणाशी बोलता सगळ्यावर त्यांचं लक्ष असतं.
व्हीडिओ कॉलच्या माध्यमातून हे घोटाळेबाज लोकांना एकप्रकारे नजरकैदेत ठेवतात.

फोटो स्रोत, Getty Images
हे लोक अटक करण्याची धमकी देतात आणि लोकही अटक टाळण्यासाठी त्यांचं म्हणणं ऐकतात.
त्यानंतर हे घोटाळेबाज चौकशीची धमकी देऊन लोकांना पैसे ट्रान्सफर करायला सांगतात.
हरिनाथ लोकांना सांगतात की, पैशांच्या कोणत्याही बाबतीत कोणावरही विश्वास ठेवू नका. असा कॉल आला तर कुटुंबीयांना त्याची माहिती द्या.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.












