बायकोचा खून करून पळाला, दहा वर्षं लपूनछपून राहिला, पण एक चूक केली आणि

भीमसिंह पाटील

फोटो स्रोत, BHARGAV PARIKH

    • Author, भार्गव परीख
    • Role, बीबीसी गुजराती

"जर मी मोबाईल फोन वापरला, ट्रेन किंवा बसमधून निघालो तर कुठेतरी पकडला जाईन हे कळत होतं. मी माझ्या बायकोचा खून केला होता आणि शटल रिक्षा घेऊन नादियादला गेलो. तिथून मी वेगवेगळ्या वाहनांचा वापर करत मध्य प्रदेशला पोहोचलो.

मी कोणतंही काम करायला गेलो, तर कोणीतरी मला पाहील आणि पोलिस मला पकडतील, अशी भीती होती. मला जास्त पैसे मिळत नव्हते, तरीही मी हॉटेलमध्ये डिश विसळायचो आणि तिथेच मागच्या बाजूला झोपायचो. अशी मी दहा वर्षं काढली... पण अखेरीस पोलिसांनी मला पकडलंच."

आरोपी भीमसिंह पाटील सांगत होते. आपल्या बायकोच्या खूनाचा आरोप असलेले भीमसिंह पाटील दहा वर्षं लपूनछपून राहात होते.

अहमदाबाद क्राइम ब्रँचकडे त्यांनी आपल्या गुन्ह्यांची कबुली दिल्यानंतर बीबीसीच्या प्रतिनिधीनेही पोलीस अधिकाऱ्याच्या मदतीने त्यांच्याशी बोलून त्यांच्याबद्दल अधिक माहिती घेतली.

बायकोच्या खूनाचा आरोप असलेले 68 वर्षांचे भीमसिंह पाटील हे दहा वर्षांनी पोलिसांच्या ताब्यात आले.

दहा वर्षांपूर्वी अहमदाबादच्या आमराईवाडी भागात भीमसिंह पाटील यांनी त्यांच्या बायकोचा खून केल्याचा आरोप होता.

ते मूळचे महाराष्ट्रातल्या जळगाव जिल्ह्यातल्या ढालकी गावातले, पण तिथे शेतीची कामं नसल्यामुळे ते मजूर म्हणून अहमदाबादला आले.

नवीन आयुष्य सुरू करायचं म्हणून अहमदाबादला आलेल्या भीम सिंह यांनी आपल्या बायकोचा खून का केला? तिथून पळून जाऊन ते दहा वर्षं लपूनछपून कसे राहिले आणि पोलिसांनी कायद्याला चकवा देत राहिलेल्या या आरोपीचा शोध अखेरीस लावला तरी कसा?

लाल रेष

• गुजरातमधल्या अहमदाबाद इथे आपल्या बायकोचा खून करून फरार झाल्याचा आरोप असलेल्या भीम सिंहला शहर गुन्हे विभागाने ताब्यात घेतलं.

• आरोपीने दहा वर्षांपूर्वी आपल्या बायकोचा खून केला आणि मग वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये काम करत राहिला.

• क्राइम ब्रँचच्या टीमने त्याला महाराष्ट्रातल्या जळगावमधून अटक केली.

• पण गेली दहा वर्षं न सुटलेली ही केस अचानक पुन्हा कशी चर्चेत आली? नेमकं काय घडलं आरोपीने एक चूक केली आणि कायद्यापासून इतकी वर्षं लपून राहिलेलं त्याचं बिंग फुटलं

लाल रेष

बायकोच्या चारित्र्यावर संशय

बीबीसी गुजरातीशी बोलताना भीम सिंह यांनी सांगितलं, "मी अहमदाबादला आलो आणि एका फॅक्टरीमध्ये काम सुरू केलं. पण नंतर चहाची टपरी सुरू केली."

ते पुढे सांगत होते, "आमच्या मुलांची लग्न झाली होती आणि ती आमच्यापासून वेगळी राहात होती. माझी बायको 45 वर्षांची होती. जेव्हा जेव्हा मी टपरीवरून घरी परत यायचो, तेव्हा ती घरी नसायची. दिवसभर ती फोनवर बोलत असायची किंवा मेसेज करत असायची. नवीन कपडे आणायची, सिनेमाला जायची."

भीमसिंह पाटील यांची पत्नी

फोटो स्रोत, BHARGAV PARIKH

तिच्या अशाप्रकारच्या वर्तनामुळेच भीम सिंह यांना संशय येऊ लागला. आजूबाजूचे लोकही त्यांना काहीबाही सांगायचे.

भीस सिंहच्या सांगण्यानुसार, जेव्हा त्यांनी आपल्या बायकोला या सगळ्याबद्दल थेट विचारलं, तेव्हा तिने उडवाउडवीचं उत्तर दिलं.

'...आणि मी माझ्या बायकोचा खून केला'

खूनाच्या आधी घडलेल्या घटनांबद्दल बोलताना भीम सिंह यांनी म्हटलं, "या घटनेनंतर आमच्या दोघांमध्येही भांडणं व्हायला लागली. मी तिला समजावलं की, हे थांबव. नाहीतर आपल्या दोघांपैकी कोणाचा तरी जीव जाईल."

आमच्यात सारखीच भांडणं व्हायला लागली होती. मला तो दिवस अजून आठवतोय. शनिवार होता. मला कोणाचा तरी फोन आला. त्याने मला सांगितलं की, तुमची बायको रिक्षा पकडून कुठेतरी बाहेर गेलीये. मी टपरी बंद केली आणि तातडीने घरी आलो."

"घरी कोणीच नव्हतं. त्यामुळे मी वाट पाहात बसलो. ती घरी आली, तेव्हा मी तिला 'कुठे गेली होतीस' असं विचारलं. त्यानंतर आमचं भांडण सुरू झालं आणि मला राग आला. मी घरातच पडलेली सळई तिच्या डोक्यावर मारली. तिच्यावर रक्त जमलेलं होतं. मी ते पुसून काढलं."

खुनाच्या नंतर झालेल्या सगळ्या घटना क्रमाबद्दल सांगताना भीमसिंह यांनी म्हटलं, " आपण खून केल्याचं माझ्या लक्षात आलं. म्हणून मी पळून जायचं ठरवलं.

पहिल्यांदा मी माझा फोन फोडून टाकला आणि सिम कार्ड नष्ट केलं. मग मी रिक्षा घेऊन आधी नाडियादला गेलो, जेणेकरून पोलिसांनी मला पकडू नये. त्यानंतर वेगवेगळ्या वाहनांमधून प्रवास करत इंदौरला पोहोचलो."

हा गुन्हा केल्यानंतर भीम सिंह पोलिसांपासून स्वतःचा बचाव करण्याच्या वेगवेगळ्या युक्त्या लढवत राहिला.

भीमसिंहनी सांगितलं, "मी जाणूनबुजून इंदौरमधल्या हॉटेलात डिश विसळण्याचं काम करायला सुरूवात केली. त्यामागे माझा हेतू होता. जर मी वेटर म्हणून काम केलं असतं, तर टेबलावर जेवण द्यायला गेल्यावर कोणीतरी मला ओळखूही शकलं असतं. म्हणून मी किचनमध्येच थांबून भांडी घासायचो."

पण इंदौरमध्ये असं किती काळ थांबणार? हा विचार भीम सिंह यांच्या मनात आला आणि त्यांनी आपलं उर्वरित आयुष्य आपल्या मूळ गावाच्या आसपास काढण्याचा विचार केला. जेणेकरून त्यांचं काही बरं वाईट झालं तर कोणीतरी त्यांना ओळखून क्रियाकर्म तरी करेल.

"हा विचार आला आणि मी जळगावला पोहोचलो. तिथल्या एका हॉटेलध्ये भांडी घासायचं काम करायला लागलो. तिथेच मागे एका झोपडीत झोपायचो."

पोलिसांनी आरोपीला कसं पकडलं?

गृह मंत्रालयाने स्थानिक पोलिसांना पाच वर्षांपेक्षा जास्त काळ ज्या केसेस सोडविण्यात यश आलं नव्हतं, अशा केसेस क्राइम ब्रँचकडे सोपविण्याचा निर्णय घेतला. त्याचाच भाग म्हणून ही केसही क्राइम ब्रँचकडे देण्यात आली.

सिसोदिया

फोटो स्रोत, BHARGAV PARIKH

अहमदाबाद क्राइम ब्रँचमधील पोलिस सब इन्स्पेक्टर के. एस. सिसोदिया यांच्यावर दहा वर्षांपासून न सुटलेल्या या केसची जबाबदारी दिली गेली.

बीबीसी गुजरातीशी बोलताना केएस सिसोदिया यांनी सांगितलं, "जेव्हा ही केस आमच्याकडे आली, तेव्हा कोणत्याही तांत्रिक मार्गाने पाळत ठेवणं शक्य नव्हतं. त्यामुळे आम्ही आमच्याच बुद्धीचा वापर करण्याचं ठरवलं. पण हे म्हणजे गवताच्या गंजीतून सुई शोधण्यासारखं होतं."

भीम सिंहची मुलं काही त्यांच्यासोबत राहात नव्हती. त्यामुळे त्यांना त्याच्याशी काही देणंघेणं नव्हतं. म्हणून मग आम्ही आमचा तपास वेगळ्या मार्गानं करायचा ठरवला, असं सिसोदियांनी पुढे सांगितलं.

तपासाबद्दलची अधिक माहिती देताना सिसोदियांनी सांगितलं, "सुरुवातीला आम्ही आमराईवाडी भागातच चौकशीला सुरुवात केली. तेव्हा आसपासच्या लोकांनी सांगितलं की, तो एखाद्या हॉटेलमध्ये काम करत असेल किंवा चहाची टपरी चालवत असेल. कारण त्याला बाकी काहीच कामं यायची नाहीत."

"मग आम्ही जळगावच्या आसपासच्या भागात शोधायला सुरूवात केली. आम्हाला भीम सिंहचे एक लांबचे नातेवाईक भेटले. त्यांनी जळगावमध्ये त्याला पाहिलं होतं. तो जळगावतल्या फुलघाट भागात कोठेतरी असल्याचं त्यांचं म्हणणं होतं

जळगावमध्ये महामार्गावर फार कमी हॉटेल्स आहेत. आम्ही तिथून सुरुवात केली. एका हॉटेलमध्ये 68 वर्षं वयाचा एक माणूस मालकाला कोणतीही ओळखपत्रं न देता काम करत होता," सिसोदिया सांगत होते.

सिसोदियांनी पुढे सांगितलं, "भीम सिंह हुशार होता. तो कधीच हॉटेल सोडायचा नाही. आपण पकडले जाऊ, या भीतीने तो सार्वजनिक वाहतूक, फोन काहीही वापरायचा नाही. हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आपण दिसू नये यासाठी कायम भटारखान्यात भांडी घासत राहायचा.

दहा वर्षं तो एका जागी न थांबता भटकत होता. पण शेवटी तो जळगावला येऊन स्थिरावला. कारण आपण मेलो, तर कोणी आपल्यावर अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भीती त्याला वाटायला लागली होती. म्हणून तो गावाच्या जवळच राहायला लागला. आपली ओळख आणि पत्ता लिहिलेला कागद त्याच्या खिशात असायचा."

भावनेच्या आहारी घेतलेला हा एक निर्णय भीम सिंह यांचा दहा वर्षांचा सगळा बनाव उघडकीस आणणारा ठरला आणि अखेरीस ते पोलिसांच्या ताब्यात आले.

बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर
फोटो कॅप्शन, बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)