ओमप्रकाश : मोस्ट वाँटेड गुन्हेगार ज्यानं 30 वर्षं फरार राहून 28 सिनेमांमध्ये कामही केलं

- Author, गीता पांडे
- Role, बीबीसी न्यूज, दिल्ली
हरियाणाच्या मोस्ट वॉंटेड गुन्हेगारांच्या यादीत नाव असलेला ओमप्रकाश उर्फ पाशा. मागच्या 30 वर्षांपासून आपली ओळख लपवून उत्तरप्रदेशामध्ये राहात होता.
भारतीय सैन्यात सेवा बजावलेल्या या ओमप्रकाशवर दरोडा आणि हत्येचा आरोप होता. मात्र मागच्या 30 वर्षांपूर्वी त्याने हरियाणातून पलायन करून उत्तरप्रदेश गाठलं.
तिथंच आपली नवी ओळख तयार केली, एका स्थानिक महिलेशी लग्नही केलं आणि तीन मुलं सुद्धा जन्माला घातली.
पण या आठवड्याच्या सुरुवातीलाचं वयाची पासष्टी गाठलेल्या या वृद्धाचं नशीब फिरलं.
हरियाणा पोलिसांनी गाझियाबाद शहरातील एका झोपडपट्टीतून त्याला अटक केली.
ही अटक होईपर्यंत त्याने वेगवेगळे व्यवसाय करून पोलिसांपासून लपायचा प्रयत्न केला. त्याने ट्रक चालक म्हणून काम केलं तर कधी धार्मिक प्रसंगी भक्तिगीते गाण्यासाठीच्या ग्रुपमध्ये काम केलं.
एवढंच नाही तर त्याने लो बजेट अशा 28 स्थानिक चित्रपटांमध्ये सुद्धा अभिनय केलाय.
ओमप्रकाश सध्या अटकेत असून त्याच्यावर लावलेल्या आरोपांवर त्याने आपली बाजू मांडलेली नाही.
पण हरियाणाच्या स्पेशल टास्क फोर्सचे (एसटीएफ) उपनिरीक्षक तसेच ओमप्रकाशला अटक करणाऱ्या टीमचा भाग असलेले विवेक कुमार बीबीसीशी बोलताना सांगतात की, 1992 मध्ये झालेल्या खुनात तो सहआरोपी आहे.
ओमप्रकाशच्या अटकेनंतर लगेचच बातम्या आल्या. पण त्याची बाजू काय असेल हे जाणून घेण्यासाठी मी त्याच्या कुटुंबीयांच्या शोधात निघालो.
हरबंस नगरच्या विस्तीर्ण अशा झोपडपट्टीत गोंधळात टाकणाऱ्या अरुंद गल्ल्या आहेत. तिथं घरांना नंबरही नाहीयेत.
या झोपडपट्टीतून ओमप्रकाशचं घर शोधायला मला तब्बल साडेतीन तास लागले.
मी ओमप्रकाशची पत्नी राजकुमारी आणि त्याच्या तीन मुलांपैकी एक मुलगा आणि 14 वर्षांच्या मुलीला भेटलो.
ओमप्रकाशची पत्नी राजकुमारी बेडरूममध्ये जाऊन गादीखाली ठेवलेली वृत्तपत्रांची कात्रण घेऊन आली.
त्यात तिच्या नवऱ्यावर लावलेल्या आरोपांच्या हिंदी बातम्या होत्या. ती म्हणते, "मी या धक्क्यातून अजूनही सावरलेले नाही.
त्याच्या या गुन्हेगारी पार्श्वभूमीबद्दल कोणालाच कल्पना नव्हती."
ओमप्रकाशची बाजू ऐकण्यासाठी मी त्याच्या कुटुंबाच्या शोधात गेले असतो तर ते व्यर्थ ठरलं असतं, कारण त्याच्याबद्दल त्यांच्याकडे काहीच माहिती नव्हती.

राजकुमारीने त्याच्यावर विश्वासघाताचा आरोपही केला. ती म्हणते की, "मी 1997 मध्ये त्याच्याशी लग्न केलं. पण तो आधीच विवाहित आहे, हरियाणामध्ये त्याचं कुटुंब आहे हे मला माहीत नव्हतं."
कोण आहे ओमप्रकाश, त्याच्यावर नेमके काय आरोप आहेत?
हरियाणाच्या स्पेशल टास्क फोर्सचे (एसटीएफ) उपनिरीक्षक विवेक कुमार सांगतात, हा ओमप्रकाश हरियाणाच्या पानिपत जिल्ह्यातील नरैना गावचा रहिवासी आहे.
त्याने भारतीय सैन्यात सिग्नल कॉर्प्समध्ये 12 वर्ष ट्रक ड्रायव्हर म्हणून काम केलंय. 1988 मध्ये चार वर्षं गैरहजर राहिल्यामुळे त्याला काढून टाकण्यात आलं.
कुमार पुढे सांगतात की, हत्येचा आरोपापूर्वी त्याच्यावर इतरही गुन्हे दाखल झाले होते.
1986 मध्ये एक कार, चार वर्षांनंतर एक मोटारसायकल, एक शिलाई मशीन आणि एक स्कूटर चोरल्याचा आरोप होता. हे गुन्हे वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये घडले आणि त्यातील काही ठिकाणी त्याला अटक करण्यात आली. पण नंतर त्याची जामिनावर सुटका झाली, असं पोलिसांचं म्हणणं आहे.

कुमार सांगतात, "जानेवारी 1992 मध्ये ओमप्रकाश आणि दुसर्या एका व्यक्तीने बाईकवरून प्रवास करणाऱ्या एका माणसाला लुटण्याचा प्रयत्न केला."
"त्या माणसाने प्रतिकार केला तेव्हा त्यांनी त्याला भोसकलं. गावकऱ्यांचा एक गट त्यांच्याकडे धावताना दिसला तेव्हा त्यांनी त्यांची स्कूटर टाकून पळ काढला."
ओमप्रकाश सोबत जो दुसरा व्यक्ती गुन्ह्यात सामील होता त्याला पकडण्यात पोलिसांना यश आलं.
तो सात-आठ वर्षे तुरुंगात होता. आता तो जामिनावर बाहेर आला असल्याचं कुमार सांगतात.
पण ओमप्रकाश मात्र गायब झाला. पोलिसांनी त्याला "मोस्ट वॉंटेड" घोषित केलं आणि त्याची फाईल धूळ खात पडली.
त्या हत्येनंतर ओमप्रकाश दक्षिणेकडे गेला. तिथं त्याने तामिळनाडू आणि आंध्रप्रदेशातील मंदिरांमध्ये आश्रय घेतल्याचं पोलिसांना सांगितलं.
एका वर्षानंतर तो उत्तर भारतात परतला. पण घरी जाण्याऐवजी, त्याने गाझियाबादमध्ये गाठलं.
घरापासून 180 किमी दूर असलेल्या गाझियाबादमध्ये तो ट्रक चालकाचं काम करायला लागला.
1997 मध्ये राजकुमारीशी त्याने लग्न केलं.
त्या सांगतात, 1990 च्या दशकात चित्रपटांचे व्हिडिओ कॅसेट रेकॉर्डर (व्हीसीआर) विकत आणि भाडे तत्वावर देण्याचं त्याचं दुकान होतं, त्यामुळे स्थानिक लोक त्याला बजरंग बली किंवा बजरंगी म्हणून ओळखायचे. तो सैन्यात होता म्हणून त्याला "फौजी ताऊ" सुद्धा म्हटलं जायचं.

2007 पासून तो स्थानिक हिंदी भाषेतील चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका करायला लागला. यात गावचा सरपंच, खलनायक, अगदी पोलीस हवालदाराची भूमिकासुद्धा त्याने वठवली.
टकराव नावाच्या चित्रपटात त्याने भूमिका केलीय. हा चित्रपट युट्युबवर जवळपास 76 लाख वेळा पाहिला गेलाय.
चित्रपटातल्या छोट्या छोट्या क्लिप्स तर या आकड्यांपेक्षा ही पुढं आहेत.
विवेक कुमार सांगतात "त्याने मतदान ओळखपत्र आणि आधार कार्ड यांसारखे अधिकृत कागदपत्र मिळवले."
पण पोलिसांच म्हणणं आहे की, त्याच्या नव्या कागदपत्रांमध्ये त्याचं आणि त्याच्या वडिलांचं खरं नाव होतं. ही एक गंभीर चूक होती.
राजकुमारीची गोष्ट
ओमप्रकाशच्या उत्तरप्रदेश मधल्या कुटुंबाला किंवा त्याच्या शेजाऱ्यांपाजऱ्यांना त्याच्या कथित "गुन्हेगारी पार्श्वभूमीबद्दल" कल्पना नव्हती हे पोलीस मान्य करतात.
राजकुमारी सांगतात की, त्यांच्या लग्नानंतरही ओमप्रकाश तिच्यापासून काहीतरी लपवतोय असं वाटायचं.
लग्नानंतर तो राजकुमारीला त्याच्या नरैना गावात घेऊन गेला. तिथं त्याने त्याच्या भावाशी आणि त्याच्या कुटुंबाशी ओळख करून दिली. पण ते त्याचे मित्र आहे असं राजकुमारीला सांगितलं.
राजकुमारी पुढे सांगतात, "पुढे काही वर्षांनंतर, त्याची पहिली पत्नी राजकुमारीच्या घरी आली आणि तिने त्यांच्या दारात गोंधळ घातला. तेव्हा त्याच्या पूर्वीच्या लग्नाबद्दल कळलं."
"तेव्हा मला आणि आमच्या सर्व शेजाऱ्यांना कळलं की त्याला एक पत्नी असून एक मुलगा ही आहे. त्याने हे सगळं लपवून ठेवलं होतं. आम्हाला विश्वासघात झाल्यासारखं वाटलं."
राजकुमारी आणि ओमप्रकाशचं लग्न झाल्यानंतर तो बरेच दिवस घराबाहेर असायचा. तो ट्रक ड्रायव्हर असल्यामुळे इतके दिवस घरापासून लांब असायचा असं वाटायचं. पण तो त्याच्या दुसऱ्या दुसऱ्या कुटुंबाला भेट द्यायचा असं त्या ठामपणे सांगतात.
त्यांच्या नात्यात कटुता यायला लागली. हे जोडपं नेहमीच भांडायचं. पुढे 2007 मध्ये तो पुन्हा गायब झाला.

राजकुमारी सांगतात, "मला इतका कंटाळा आला होता की मी त्याच्याशी असणारे सर्व संबंध तोडून टाकले होते. मी स्थानिक सरकारी कार्यालयात गेले आणि लेखी हमीपत्र दिलं की मला त्याच्याशी काही देणंघेणं नाही. पण सात वर्षांनंतर तो परत आला."
ओमप्रकाशची 14 वर्षांची मुलगी पुढे सांगते, "ते आम्हाला नावाने हाक मारायचे. ते जेव्हा जेव्हा परत यायचे तेव्हा आम्ही त्यांच्यावर दया दाखवायचो ते आमचे म्हातारे वडील आहेत."
राजकुमारीचं म्हणणं आहे की, यापूर्वीही एकदा हरियाणा पोलिस चोरीच्या संशयास्पद प्रकरणात त्याला घेऊन गेले होते.
"त्यानंतर त्याने सहा-सात महिने तुरुंगात काढले. पण तो सुटून परत आला आणि त्याने आम्हाला सांगितलं की त्याची सर्व आरोपातून मुक्तता करण्यात आली आहे."
अटक होऊनही तो खुनातील फरारांच्या यादीत होता. कारण पोलिसांचे रेकॉर्ड त्यावेळी डिजिटल नसावेत. तसेच वेगवेगळ्या जिल्ह्यांतील पोलीस रेकॉर्डसच्या बाबतीत एकमेकांच्या संपर्कात नव्हते.
पण ओमप्रकाश पोलिसांच्या हाती लागला कसा?
2020 मध्ये संघटित गुन्हेगारी, अंमली पदार्थ जप्ती, दहशतवाद आणि राज्याची सीमा ओलांडणाऱ्या प्रकरणांवर लक्ष ठेवण्यासाठी हरियाणाने विशेष टास्क फोर्सची स्थापना केली.
या टास्क फोर्सने ओमप्रकाशची फाइल पुन्हा ओपन केली.
फोर्सने त्याला त्यांच्या "मोस्ट वॉन्टेड" यादीत ठेवलं. सोबतच त्याला पकडून देणाऱ्याला 25,000 रुपयांचं बक्षीस जाहीर केलं.

यापूर्वीही अनेक दिवस, कधी कधी दशकांहून जास्त काळ फरार असलेल्या गुन्हेगारांना अटक करण्यात पोलिसांना यश मिळाल्याच्या घटना घडल्या आहेत.
गाझियाबादमध्ये गुन्ह्यांच्या कथांचा मागोवा घेणारे इंडियन एक्सप्रेसचे वरिष्ठ पत्रकार अमिल भटनागर सांगतात, "पोलीस अशा धूळखात पडलेल्या केसेस तेव्हाच उघडतात जेव्हा त्यांना दहशतवाद किंवा खुनाबद्दल काही गुप्त माहिती मिळते. फोर्सने या प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याचा निर्णय का घेतला हे पूर्णपणे स्पष्ट होत नाही."
दोन महिन्यांपूर्वी पोलिसांनी नरैना गावाला भेट दिली. या गावातील 50 ते 60 च्या दशकातल्या अशा लोकांशी बोलले ज्यांना ओमप्रकाशची काही आठवण असेल.
तिथूनच त्यांच्या हाती पहिला धागा लागला. सुमारे दोन दशकांपूर्वी ओमप्रकाश गावात आला होता आणि तो आता उत्तरप्रदेशात कुठेतरी राहत असावा अशी माहिती पोलिसांना मिळाली.
पुढे पोलिसांना ओमप्रकाशच्या नावाने नोंदणीकृत एक फोन नंबर सापडला. या पत्यावरून शेवटी ओमप्रकाशचा माग काढण्यात पोलिसांना यश आलं.
पोलिसांनी एक आठवड्यात तो भाग पिंजून काढला आणि त्याच्या घरावर पाळत ठेवली.
पोलिसांकडे त्याचा 30 वर्षांपूर्वीचा एक फोटो होता.
त्या फोटोवरून आताच्या ओमप्रकाशला ओळखणं त्यांच्यासाठी आव्हानात्मक होतं.
"आम्हाला योग्य माणूस मिळाला आहे याची खात्री करायची होती," असं कुमार सांगतात.
कुमार पुढे सांगतात, "ऑपरेशन अत्यंत गुप्ततेने पार पाडण्यात आलं. कारण आम्हाला भिती होती की एक चुकीचं पाऊल आणि हा माणूस पुन्हा 30 वर्षांसाठी गायब होईल."
आता पुढे काय?
एवढी वर्ष गायब असलेल्या व्यक्तीला अटक करणं हा स्पेशल टास्क फोर्सचा विजय असेल.
पण पत्रकार असलेले भटनागर म्हणतात की पोलिसांसाठी आता खरी परीक्षा सुरू झाली आहे.
"त्यांना कोर्टात हे सिद्ध करावं लागेल की त्यांनी ताब्यात घेतलेला माणूस तोच आहे. त्यानंतर ज्याच्यावर आरोप आहेत, त्याने खरंच गुन्हा केलाय की नाही याची पडताळणी कोर्टाला करावी लागेल."
अनेक दशकांपूर्वी घडलेला गुन्हा लक्षात घेता, भटनागर म्हणतात, पुराव्याच्या गुणवत्तेवरही लक्ष केंद्रित केलं जाईल.
"पुरावे गहाळ होणं हा अशा गुन्ह्यातील खटल्यांचा एक अतिशय मूर्त पैलू आहे. पोलिस आणि फिर्यादी यांच्यासाठी ही केस आव्हानात्मक असेल."
राजकुमारीचं घर सोडण्यापूर्वी मी त्यांना विचारलं की, त्याला अटक झाल्यापासून तुम्ही त्याला भेटण्याचा प्रयत्न केलाय का?
यावर राजकुमारी म्हणतात, "आम्हाला त्याला भेटायचं असेल तर आम्हाला आमची ओळखपत्रे जमा करावी लागतील असं पोलीस म्हणाले आहेत. पण मला तसं करायचं नाहीये. यातून काय फायदा होऊ शकतो?"
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








