बिटकॉइन-क्रिप्टोकरन्सी: 'हॅकर्सनी मला माझी गमावलेली बिटकॉइनमधील संपत्ती परत मिळवून दिली'

- Author, जो टायडी,
- Role, सायबरविषयक प्रतिनिधी, बीबीसी न्यूज
बिटकॉइनची नव्यानेच सुरुवात झाली होती, तेव्हा ऱ्होंडा कॅम्पर्ट त्या व्यवहारात पडली. तिने 2013 साली सहा बिटकॉइन विकत घेतली. त्या वेळी प्रत्येक बिटकॉइनसाठी सुमारे 80 डॉलर द्यावे लागत होते आणि इंटरनेटवरच्या मोजक्याच लोकांना या व्यवहारात रस होता.
"मी रेडिओवरचा एक टॉक-शो ऐकायचे. त्यात क्रिप्टोकरन्सी आणि बिटकॉइन याबद्दल ऐकायला मिळायचं, त्यामुळे मलाही त्यात रस वाटला," असं ती सांगते.
"त्यावेळी बिटकॉइन विकत घ्यायची प्रक्रियाही खूपच गुंतागुंतीची होती. पण मी त्यातून वाट काढत ते चलन विकत घेतलं."
अमेरिकेतील इलिनॉय शहरात राहणाऱ्या ऱ्होंडाने पुढच्या साधारण वर्षभरात तिच्याकडील काही डिजिटल पैसा खर्च केला आणि मग ती त्याबद्दल विसरून गेली.
पण बिटकॉइनचं मूल्य जवळपास 20 हजार डॉलरांपर्यंत वाढल्याचं तिने 2017च्या अखेरीला बातम्यांमध्ये पाहिलं, तेव्हा ती उत्साहाने कम्प्युटरपाशी गेली आणि लॉग-इन करून आपल्या बिटकॉइनची रोख रक्कम आता काढून घ्यावी असं तिने ठरवलं.
'मी हादरले'
त्यातच एक अडचण झाली. ऱ्होंडाला बिटकॉइनचं ऑनलाइन वॉलेट उघडण्यासाठी लॉग-इनचा तपशीलच आठवत नव्हता. ही 'वॉलेट' म्हणजे विविध गोपनीय क्रमांकांचा साठा करणारा एक कम्प्युटर प्रोग्राम असतो.
"माझं डिजिटल वॉलेट उघडण्यासाठी तिथे जी संख्या नोंदवावी लागायची, त्यातले शेवटचे काही अंक माझ्याकडच्या प्रिंट-आउटमध्ये आलेले नव्हते, असं माझ्या लक्षात आलं. त्यामुळे माझ्याकडच्या कागदावर पासवरड होता, पण वॉलेट-आयडीचा तपशील मी विसरून गेले होते," असं ऱ्होंडा सांगते.
"मी हादरले. पुढचे काही महिने मी सगळी खटपट करून बघितली, पण निराशेशिवाय हाती काहीच लागलं नाही. मग मी जवळपास त्याचा विचारच सोडून दिला."

त्यानंतर गेल्या वसंतातल्या महिन्यांमध्ये बिटकॉइनचं मूल्य अचानक 50 हजार रुपयांच्या वर गेलं. म्हणजे आठ वर्षांपूर्वी ऱ्होंडाने एक बिटकॉइन विकत घ्यायला जितके पैसे भरले होते, त्याच्या सहाशे पटींपेक्षाही जास्त मूल्य झालं.
आपलं चलन परत मिळवण्यासाठी ती नव्या निर्धाराने इंटरनेटवर गेली आणि तिथे तिला ख्रिस व चार्ली ब्रूक्स ही वडील-मुलाची जोडी भेटली. ते क्रिप्टो करन्सीमधील हरवलेल्या रकमा मिळवून द्यायचं काम करतात.
"या मंडळींशी ऑनलाइन थोडं बोलल्यावर मला त्यांच्यावर विश्वास ठेवावा असं वाटलं. मग मी माझ्या आठवणीतला लॉग-इन इत्यादीचा सगळा तपशील त्यांच्याकडे दिला आणि वाट पाहायला लागले," असं ऱ्होंडा सांगते.
"अखेरीस आम्ही व्हिडिओ-कॉलवर आलो आणि सर्व गोष्टी उलगडताना पाहिल्या. ख्रिस यांनी वॉलेट उघडलं, तेव्हा माझा जीव भांड्यात पडला!"
त्या वेळी ऱ्होंडाच्या डिजिटल वॉलेटमध्ये असणाऱ्या साडेतीन बिटकॉइनांची किंमत तब्बल 1 लाख 75 हजार डॉलर (अंदाजे 1.33 कोटी रुपये) इतकी झाली होती.
"ख्रिस आणि चार्ली यांना ठरल्यानुसार मी 20 टक्के वाटा दिला. मग 10 हजार डॉलरांइतकी रक्कम काढून माझ्या मुलीच्या- मेगनच्या कॉलेजमधील शिक्षणासाठी बाजूला ठेवली."
उर्वरित रक्कम आपण हार्डवेअर स्वरूपातील वॉलेटमध्ये बंदिस्त ठेवणार असल्याचं ऱ्होंडा सांगते. हे वॉलेट म्हणजे यूएसबी स्टिकसारखा प्रकार असतो, त्यात बिटकॉइनसंबंधीचा वापरकर्त्याचा तपशील ऑफलाइन स्वरूपाच सुरक्षितपणे साठवला जातो. या हार्डवेअर वॉलेटशी संबंधित लॉग-इनचा तपशील तिने पक्का पाठ करून ठेवला आहे.
आता तिच्याकडील बिटकॉइनचं मूल्य प्रत्येकी 43 हजार डॉलर इतकं आहे, आणि ते आणखी वाढेल अशी तिला आशा आहे. शेअरबाजारात आणि क्रिप्टो-करन्सीमध्ये दैनंदिन पातळीवर ट्रेडिंग करणं, हे तिचं सध्याचं काम आहे. यातून निवृत्ती घेतल्यानंतरचा निर्वाहनिधी म्हणून ती बिटकॉइनच्या तिच्या साठ्याकडे पाहते.
गमावलेले अब्जावधी डॉलर
ऱ्होंडासारख्या अनेकांना याबाबत मदतीची गरज असते.
'चेनअनॅलिसिस' या क्रिप्टो-करन्सीशी संबंधित संशोधन करणाऱ्या संस्थेच्या अनुमानानुसार, सध्या एक कोटी 89 लाख बिटकॉइन चलनात आहेत, त्यातील 37 लाख कॉइन संबंधित मालकांनी गमावलेली आहेत.
क्रिप्टो-करन्सीच्या विकेंद्रित जगामध्ये विशिष्ट कामाची जबाबदारी असणारा कोणी अधिकारी समोर दिसत नसल्यामुळे आपल्या वॉलेटशी संबंधित लॉग-इनचा तपशील आपण विसरलो, तर त्याचा शोध घ्यायला फारसे स्त्रोत उपलब्ध नाहीत.

फोटो स्रोत, Getty Images
ख्रिस आणि चार्ली यांच्या अंदाजानुसार, त्यांच्यासारख्या लोकांकडून पुरवल्या जाणाऱ्या सेवेतून किमान 2.5 टक्के गमावलेली बिटकॉइन (म्हणजे सुमारे 3.9 अब्ज डॉलर) परत मिळवता येऊ शकतात. ख्रिस आणि चार्ली त्यांच्या संगणकांचा वापर करून लॉग-इन आयडी व पासवर्ड यांच्या हजारो संभाव्य जोड्या लावून संबंधित माणसाचा योग्य लॉग-इन तपशील शोधायचा प्रयत्न करतात.
ख्रिस यांनी 2017 साली 'क्रिप्टो अॅसेट रिकव्हरी' या नावाने हा व्यवसाय सुरू केला, पण काही काळासाठी ते हे काम थांबवून इतर प्रकल्पांमध्ये गुंतले होते. मग वर्षभराने आपला मुलगा चार्ली याच्याशी चर्चा केल्यावर त्यांनी हा व्यवसाय पुन्हा सुरू केला.
"कॉलेजातून मी जरा ब्रेक घेतला होता, थोडा प्रवास करून आलो होतो. त्यामुळे घरातून काम करण्याच्या काही संधई आहेत का, याबद्दल डॅडशी बोलायला लागलो," असं 20 वर्षीय चार्ली सांगतो.
"तेव्हा आम्हाला त्यांचा जुना व्यवसाय पुन्हा सुरू करायची कल्पना सुचली. आम्ही घरातच बसवण्यासाठी सर्व्हर विकत घेतले आणि मग सगळं पुन्हा जोमाने सुरू झालं."
न्यू हॅम्पशायरमध्ये समुद्राकाठी घरात बसून काम करणाऱ्या या वडील-मुलाच्या जोडगोळीला दिवसाकाठी शंभराहून अधिक ई-मेल व कॉल येतात. विशेषतः नोव्हेंबर 2021मध्ये बिटकॉइनचं मूल्य प्रचंड वाढल्यानंतर त्यांच्याकडे या संभाव्य ग्राहकांची रांग लागली आहे.
आता ते मागे राहिलेलं काम हातावेगळं करत असल्यामुळे ग्राहकसंख्या थोडी कमी झाली आहे.
हा व्यवसाय इतका चांगला चालू लागलाय की, चार्ली आता कम्प्युटर सायन्सच्या पदवीसाठीचं शिक्षण पूर्ण करण्याच्याही मनस्थितीत नाही. पण आपला बराचसा वेळ निराशेतच जातो, असा विनोद ते दोघे करतात.
त्यांच्याकडे आलेल्या ग्राहकांना अंधुकसा आठवणारा तपशील ते नोंदवून घेतात, मग कागदांवर आकडेमोड सुरू करतात, त्यातून त्यांना संभाव्य लॉग-इन तपशिलाचे काही संकेत मिळतात, आणि या सगळ्या खटपटीत फक्त सुमारे 30 टक्के वेळाच ते अचूक तपशील मिळवण्यात यशस्वी होतात.
पण बहुतेकदा त्यांना हाती आलेल्या माहितीनंतरही निराशाच पदरी पडते.
"एखाद्या वॉलेटमध्ये किती रक्कम आहे हे आम्ही आधीच ओळखू शकत नाही, त्यामुळे आम्हाला त्याबाबत ग्राहकावर विश्वास ठेवावा लागतो. म्हणजे आम्ही जितकी खटपट करतो त्याचा समाधानकारक मोबदला मिळण्याइतकी रक्कम आत असेल की नाही, याची खात्री नसते."
"गेल्या उन्हाळ्यात एका ग्राहकाने आम्हाला सांगितलं की त्याच्याकडे 12 बिटकॉइन आहेत. आम्ही त्यांच्याशी अर्थातच अगदी व्यावसायिकतेने वागलो, पण आमच्या घरात मात्र आम्ही जवळपास नाचत होतो. कारण इतक्या बिटकॉइनची संभाव्य रोख रक्कम प्रचंड झाली असती आणि त्यातला आमचा वाटाही अर्थातच लाभदायक ठरणारा होता."
"त्या ग्राहकाचा लॉग-इन तपशील शोधण्यासाठी आम्ही सुमारे 60 तास कम्प्युटर सर्व्हर वापरला, त्याने दिलेल्या सर्व खाणाखुणा नोंदवण्यासाठी सुमारे 10 तास घालवले.
"मग व्हिडिओ कॉलवर आम्ही त्याला सगळं उघडून दाखवलं, तेव्हा वॉलेट पूर्ण रिकामं होतं."
आपल्या वॉलेटमध्ये मुळात असलेल्या रकमेपेक्षा कमी रक्कम असेल, असा अंदाज बांधणारा एकच ग्राहक आत्तापर्यंत त्यांना भेटलेला आहे. त्याला वॉलेटमध्ये फारशी रक्कम नसेल असं वाटत होतं, पण ते उघडल्यावर आता 2 लाख 80 हजार डॉलर किंमतीची बिटकॉइन होती. तेव्हा ख्रिस आणि चार्ली यांना मोठा फायदा झाला.
गेल्या वर्षभरात सुमाहे सात अंकी मूल्याची बिटकॉइन आपण परत मिळवून दिली आहेत, असं ते सांगतात.
हार्डवेअर हॅकिंग
लोकांना त्यांची हरवलेली क्रिप्टो-करन्सी परत मिळवून देण्यासाठी मदत म्हणून स्वतःचं कौशल्य वापरणाऱ्या एथिकल हॅकरांचा उद्योग सध्या वाढता आहे. ख्रिस-चार्ली ही वडील-मुलाची जोडीही असंच एथिकल हॅकिंग करते.

पोर्टलँड, ओरेगॉन इथे राहणारे जो ग्रँडसुद्धा असाच व्यवसाय करतात. त्यांनी कुमारवयापासून हॅकिंगला सुरुवात केली आणि 1998 साली अमेरिकी सिनेटसमोर झालेली त्यांची साक्ष हॅकिंग समुदायामध्ये बरीच गाजली होती. 'किंगपिन' या त्यांच्या इंटरनेटवरील ओळखीद्वारे इंटरनेटवरच्या काही संभाव्य धोक्यांची माहिती त्यांनी त्या वेळी दिली.
अलीकडे थिटा या क्रिप्टो-करन्सीचा वापर करणारं आणि 20 लाख डॉलर किंमतीचं चलन साठवलेलं हार्डवेअर वॉलेट आपण कसं उघडलं, हे दाखवणारा व्हिडिओ त्यांनी यू-ट्यूबवर अपलोड केला होता.
त्यासाठी त्यांना अनेक महिने तयारी करावी लागली आणि इतर अनेक हार्डवेअर वॉलेटवर हॅकिंगचा सराव करावा लागला, तेव्हा कुठे त्यांनी एक विशिष्ट पद्धत शोधून काढली.
आधी शोधलेल्या दोन पळवाटांचा यशस्वी वापर करून त्यांनी हे हार्डवेअर वॉलेट उघडलं. काळजीपूर्वक, वेळेनुसार इलेक्ट्रिक शॉक दिला, तर या वॉलेटचा पिनकोड मिळण्याची शक्यता होती.
"एखादं क्रिप्टो-वॉलेट उघडताना, म्हणजे कोणत्याही सुरक्षाकवचाला भेदताना, कितीही वेळा ते केलेलं असलं तरी प्रत्येक वेळी जादू घडल्यासारखं वाटतं," असं ते म्हणतात.
"मी हे वॉलेट हॅक करू शकतो, असं मला आधीच्या चाचण्यांमध्ये अनेक वेळा सिद्ध करता आलं होतं. पण तरी त्या दिवशी मला चिंता वाटत होती. कारण कधी काय होईल याचा अंदाज नसतो. एखादा वेळेस शॉक देताना गफलत झाली तर सगळी वस्तू तुटून जाऊ शकते आणि चलन कायमचं गमावलं जाऊ शकतं. एका अर्थी तांत्रिक पातळीवर खजिना शोधण्याचाच हा प्रकार असतो."
आपली उत्पादनं हॅकरांपासून सुरक्षित कशी ठेवायची, याचं प्रशिक्षण उत्पादकांना देण्याचं काम जो दिवसाच्या वेळेत करतात. पण आता त्यांनी त्यांचे पहिले ग्राहक डॅन राइश यांच्या साथीने वॉलेट उघडण्याचा जोडधंदा सुरू केला आहे.
"पुरेशा संख्येने वॉलेटं बंद पडलेली असतील आणि माझा वेळ घालवावा इतका खजिना त्यात लपलेला असेल, तर प्रयत्न करून बघायचा," असं ते म्हणतात.

हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








