काकांना मारलं, भावाला मारलं पण ट्रकवरच्या नावाने उघडलं हत्येचं रहस्य

फोटो स्रोत, SANKET SIDANA
- Author, भार्गव पारीख
- Role, बीबीसी गुजरातीसाठी
कौटुंबिक वादातून योगेश पटेलने आधी काकांची आणि नंतर भावाची हत्या केली आणि तो अपघात असल्याचं भासवलं.
"आमचं गिफ्ट शॉप होतं. तिथेच मी काम करत असे. पण काकांनी माझ्यावर चोरीचा आळ घेतला. माझ्यावर बहिष्कार टाकला. अडीच वर्षांपूर्वी मी काकांना मारलं. तो अपघात होता असं भासवलं. त्यामुळे मी पकडला गेलो नाही. त्यानंतर भावालाही त्याच पद्धतीने मारलं", योगेश पटेल नावाच्या आरोपीने पोलिसांसोर दिलेली ही कबुली.
एखाद्या थ्रिलरपटाला शोभावी अशी ही गोष्ट. प्रत्येकजण योगेशच्या बोलण्याने चक्रावून गेला. कबुली देणारा योगेश मेहसाणा इथल्या नानी कादी रस्त्यावरच्या एका बंगल्यात राहतो. दोन लोकांना मारलं हे सांगताना त्याच्या चेहऱ्यावर जराही दु:ख, पश्चाताप वगैरे काहीही नव्हतं. मी जे केलं ते योग्यच अशी त्याची भावना होती.
या केसशी संबंधित लोकांशी बीबीसी गुजरातीने संवाद साधला. या क्रूर हत्येमागचं कारण समजून घेण्याचा प्रयत्न केला.
अडीच वर्षांपूर्वी बापलेकाचा एका अपघताता मृत्यू झाला. तपास प्रक्रियेदरम्यान पोलिसांनी पुतण्याला आरोपी म्हणून ताब्यात घेतलं.
हत्येची कबुली दिल्यामुळे योगेशच्या नावाची सगळीकडे चर्चा आहे. पोलिसांनी ज्या पद्धतीने आरोपीचा माग काढला ते चित्रपटातील गोष्टीला साजेसं होतं. दोन कुटुंबातील वाद विकोपाला जाऊन बापलेकाची हत्या झाली.
काकाला मारल्यानंतर पकडला न गेल्याने योगेशने भावाचीही हत्या केल्याची कबुली दिली.
नक्की प्रकरण काय?
बीबीसी गुजरातीने नेमका वाद काय हे समजून घेण्याचा प्रयत्न केला. योगेशने कबुलीत सांगितलं की, "काका जादवजी पटेल आणि आमची सामाईक मालमत्ता आहे. आम्ही थोडी शेतजमीन विकून गिफ्टशॉप सुरु केलं. दुकान व्यवस्थित सुरु होतं. 2017 मध्ये काकांचं निधन झालं. काकांचा मुलगा आणि पुतण्या उद्योग सांभाळू लागला. शांताराम संकुलात आमचं दुकान होतं. विजयने माझ्यावर चोरीचा आळ घेतला. काकांनाही मुलाचं बरोबर आहे असं वाटलं आणि त्यांनी मला कामावरुन काढून टाकलं".
तो पुढे म्हणतो, मी माझा वाटा मागितला पण त्यांनी दिला नाही. बाजारभावाप्रमाणे त्यांनी पैसेही दिले नाहीत. त्यांच्याकडे पैसे जास्त होते. त्यांनी आमच्यावर बहिष्कारच टाकला. मला याचा राग आला.

फोटो स्रोत, SANKET SIDANA
"मी काकांना मारलं. काका दररोज संध्याकाळी चालायला जात असत. अडीच वर्षांपूवी ट्रक अपघात आहे असं भासवून मी त्यांची हत्या केली. त्या हत्येचा कोणताही पुरावा सापडला नाही. काकांच्या मृत्यसंदर्भात अपघाती मृत्यू असं पोलिसांनी नोंदवलं. काही काळानंतर केस बंद झाली".
"पकडलं न गेल्यामुळे माझा धीर चेपला. विजयने माझ्याविरुद्ध पुरावे गोळा करण्याचा कसोशीने प्रयत्न केला पण त्याला काहीच सापडलं नाही. काकांनी पैसे देईन असं सांगितलं होतं पण विजयने मला पैसे दिले नाहीत. त्यामुळे चिडून मी त्यालाही मारण्याची योजना आखली. 24 जानेवारीला ट्रकचा अपघात असल्याचं भासवत मारलं".
हे सगळं बाहेर कसं आलं?
मेहसाणाचे डीवायएसपी आर.आय. देसाई यांनी सांगितलं, "काही दिवसांपूर्वी गिफ्ट शॉपचं दुकान बंद केल्यावर घरी जाणाऱ्या एका माणसाला ट्रकने उडवल्याचं आम्हाला समजलं. रात्रीच्या वेळी काडीजवळ ही घटना घडली होती. मोटारसायकलवरुन जाणाऱ्या विजय पटेलला स्थानिकांनी रुग्णालयात दाखल केलं पण तोवर त्याचा मृत्यू झाला होता".

फोटो स्रोत, SANKET SIDANA
"अपघाती मृत्यू अशी आम्हा सुरुवातीला नोंद केली. पण कुटुंबाने विजयच्या वडिलांचाही अशाच पद्धतीने वर्षभरापूर्वी मृत्यू झाल्याचं सांगितलं. हा अपघात नसून हत्या असल्याचं कुटुंबीय म्हणाले. आम्ही तांत्रिक तपशील अभ्यासायला सुरुवात केली. बनासकाठा नावाच्या गावातून आम्ही तीन लोकांना अटक केली. योगेशचाही त्यात समावेश होता. त्याने ड्रायव्हरला पाच लाखांची सुपारी देऊन हत्येचा कट आखला".
"जेव्हा विजयच्या कुटुंबीयांनी हत्येचा संशय व्यक्त केला तेव्हा आम्ही त्या दिशेने तपास सुरु केला. अपघाताच्या ठिकाणी मोटारसायकल आढळली होती. आम्ही फॉरेन्सिक टीमची मदत घेतली. ट्रकने मोटारसायकलला अशा पद्धतीने उडवण्यात आलं की चालवणाऱ्याच्या डोक्याला गंभीर दुखापत होईल. आम्ही त्या भागाचं सीसीटीव्ही फुटेज पाहिलं. मिनी ट्रकवर नंबर प्लेटच्या इथे एक स्टिकर होता. तो ट्रक आम्हाला संशयास्पद वाटला".

फोटो स्रोत, SANKET SIDANA
"नंबरप्लेट नसलेला मिनी ट्रक सापडणं म्हणजे गवताच्या गुंजीत सुई मिळण्यासारखं होतं. कदिना मार्केट इथे दररोज शेकडो ट्रक येतात. विविध राज्यातले ट्रक तिथे कामानिमिताने येत असतात. आम्ही ट्रकचा रंग पाहिला. ट्रकच्या मागच्या बाजूला कोणत्या गोष्टी रंगवण्यात आल्या आहेत त्या अभ्यासल्या. अंश आणि जयेश अशी दोन नावं ट्रकच्या मागच्या बाजूवर लिहिली होती. त्यावरुन ट्रकचा मालक गुजरातचाच असल्याचं आम्हाला कळलं".
"पण गुजरातमध्ये जयेश हे अनेकांचं नाव असतं. त्यामुळे मग आम्ही ट्रकवर रेखाटण्यात आलेली पानंफुलांचं डिझाईन पाहिलं. बनासकाठाच्या ट्रकवर इंग्रजीत स्पीड आणि किलोमीटर हे शब्द असतात. सतलासणा नावाच्या भागातल्या ट्रकवर असं डिझाईन असतं असं आमच्या लक्षात आलं. तेलगढच्या परिसरातल्या पेंटर्सना हुडकलं आणि चौकशी केली".
इन्स्पेक्टर एन.आर पटेल यांनी योगेशचा माग कसा काढला ते सांगितलं. ते म्हणाले, "ते गाव छोटं होतं त्यामुळे त्या मिनी ट्रकवरचं डिझाईन कोणी काढलं त्या पेंटरला आम्ही शोधून काढलं. त्याच्या माध्यमातून ट्रकच्या मालकापर्यंत आम्ही पोहोचलो. ट्रकमालकाने सांगितलं की ज्या दिवशी हत्या झाली त्यादिवशी त्याने योगेशला ट्रक दिला होता. दिवसाला 1,500 या रकमेवर त्याने ट्रक दिला".
"योगेशच्या स्मार्टफोनचं लोकेशन मारी गाव दाखवत होतं. मारी गावातील राजदीप सिंग आणि राजूभा झाला यांच्या तो सतत संपर्कात असल्याचं स्पष्ट झालं. दाढना गावातही त्याचा संपर्क होत होता. आम्ही योगेशवर लक्ष ठेवलं आणि दुसरीकडे राजदीप आणि राजूभा यांना ताब्यात घेतलं".
ट्रकने लाल रंगाच्या मोटारसायकलला उडवण्यासाठी पाच लाख रुपये मिळाल्याचं त्यांनी सांगितलं.

फोटो स्रोत, SANKET SIDANA
ते पुढे म्हणाले, "या दोघांच्या कबुलीवरुन आम्ही योगेशला अटक केली. चौकशीदरम्यान त्याने हत्येची कबुली दिली. योगेशने काकांना मारलं. ट्रकच्या नंबरप्लेटवर स्टीकर लावून त्याने ते कृत्य केलं. अडीच वर्ष तो पकडला गेला नाही. कालव्याजवळ सीसीटीव्ही नसल्याने त्याने हे केल्याला काही पुरावा नव्हता. त्याने भावालाही अशाच पद्धतीने मारलं. पण यावेळी तो पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकू शकला नाही".
मृत विजयची पत्नी भूमी पटेलने बीबीसी गुजरातीशी बोलताना सांगितलं की, "माझे पती विजय अतिशय सुरक्षितपणे बाईक चालवत असत. त्यामुळे अपघाताचा प्रश्नच नाही. माझे सासरे गेले तेव्हा विजयने पुरावे गोळा करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण कोणालाही ट्रकची नंबरप्लेट दिसली नाही. त्यामुळे पुरावा म्हणून काही सादर करता आलं नाही. पण ज्या पद्धतीने विजय यांना मारण्यात आलं त्यावरुन त्यांना कोणीतरी मारलं आहे असं मला आणि माझ्या भावाला वाटलं. मारणारा आमच्या घरचाच माणूस निघाला. घरचा माणूस नवऱ्याला मारेल असं कधीही वाटलं नाही".
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








