पाकिस्तानमध्ये हिंदू लोकसंख्या वाढली असली, तरी हिंदूंची राजकीय ताकद वाढलेली नाही

पाकिस्तान मध्ये हिंदू लोकसंख्या वाढली असली तरी हिंदूंची राजकीय ताकद वाढलेली नाही
फोटो कॅप्शन, एमक्यूएम पाकिस्तानचे उमेदवार लालचंद (मध्यभागी)
    • Author, शुमाइला जाफरी
    • Role, बीबीसी न्यूज, उमरकोट-सिंध

पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील उमरकोट जिल्ह्यातील उपायुक्तांच्या कार्यालयाबाहेर तीर्थसिंह मेघवार यांच्या समर्थकांचा गट जमला होता. तीर्थसिंह मेघवार तिथे पोहोचताच त्यांच्या समर्थकांनी त्यांच्यासाठी जोरदार घोषणा द्यायला सुरुवात केली.

हे सर्वजण फॉर्म भरून आपलं निवडणूक चिन्ह घेण्यासाठी उपायुक्तांच्या कार्यालयात गेले. नोटीस बोर्डवर निवडणूक चिन्हं लावलेलीच होती. तीर्थसिंह यांनी स्वतःच्या इच्छेने 'पाटी' हे निवडणूक चिन्ह निवडलं.

तीर्थसिंह हिंदू आहेत आणि 8 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानमध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत उमरकोटमधून अपक्ष उमेदवार म्हणून उभे आहेत.

भारतीय सीमेपासून सुमारे 60 किलोमीटर अंतरावर असलेलं उमरकोट हे पूर्व सिंधमधील एक लहानसं शहर आहे.

पाकिस्तानच्या दक्षिणेकडील सिंध या प्रांतात देशातील बहुतांश हिंदू लोक राहतात. मुस्लीमबहुल पाकिस्तानमध्ये इस्लामिक कट्टरपंथीयांचा उदय झाला असला तरी सिंधने आपली ऐतिहासिक हिंदू वैशिष्ट्ये आणि परंपरा जपल्या आहेत.

पूर्वी उमरकोटचं नाव होतं अमरकोट. एका स्थानिक हिंदू राजाच्या नावावरून हे नाव ठेवण्यात आलं होतं.

11 व्या शतकात बांधलेल्या अमरकोट किल्ल्यात मुघल सम्राट अकबरचा जन्म झाला होता.

या शहराचा इतिहास समृद्ध आहेच. पण एका गोष्टीमुळे या शहराला वेगळी ओळख मिळाली आहे ती म्हणजे उमरकोटमध्ये आजही बहुसंख्य हिंदू आहेत.

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

स्थानिक लोक सांगतात की, फाळणीच्या वेळी इथली 80 टक्के लोकसंख्या हिंदू होती. मात्र, हिंदूंमधील सर्वात श्रीमंत ठाकूर समाजाचे लोक हळूहळू भारतात स्थलांतरित झाले.

मात्र अनुसूचित जातीच्या लोकांकडे इथून बाहेर पडण्यासाठी कोणतंच साधन नव्हतं, त्यामुळे ते इथेच राहिले. इथे राहणारे 90 टक्के हिंदू अनुसूचित जातीचे आहेत.

उमरकोटमध्ये हिंदू लोकसंख्या वाढली असली तरी हिंदूंची राजकीय ताकद वाढली नाही.

तीर्थ मेघवार हे देखील यांच्यापैकीच एक आहे. ते सांगतात की, इथे हिंदुंमधील अनुसूचित जातीची लोकसंख्या जास्त आहे. पण त्यांना देशाच्या राजकारणात पुरेसं प्रतिनिधित्व मिळालेलं नाही. यासाठी ते श्रीमंत उच्चवर्णीय लोकांना जबाबदार धरतात.

तीर्थ सिंह म्हणतात, "आम्ही सत्ता मिळवूनच या व्यवस्थेत बदल घडवून आणू शकतो. त्यामुळेच आम्ही निवडणूक लढवत आहोत. आपल्या समाजाला प्रतिनिधित्व देण्यासाठी आम्ही मैदानात उतरलो आहोत."

ते म्हणतात, "गेल्या अनेक वर्षांपासून इथले प्रमुख राजकीय पक्ष आमच्या राखीव जागा मोठमोठे जमीनदार, व्यापारी आणि उच्च जातीतील श्रीमंत लोकांना विकत आहेत. त्यामुळे आमची राजकीय ताकद कमी होत आहे. याचा विरोध आम्हाला करावा लागेल, तरच आम्ही सामाजिक प्रगती करू शकतो."

पूर्वी पाकिस्तानात अल्पसंख्याकांसाठी स्वतंत्र मतदार संघ असायचा, पण 2000 साली माजी लष्करी प्रमुख परवेझ मुशर्रफ यांनी अल्पसंख्याकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ही व्यवस्था संपवली.

आजही अल्पसंख्याकांसाठी राष्ट्रीय आणि प्रांतीय विधानसभांमध्ये जागा राखीव आहेत आणि ते इतर नागरिकांप्रमाणे देशाच्या कोणत्याही भागातून निवडणूक लढवू शकतात.

मात्र, उमरकोटच्या हिंदू समाजातील लोकांना असं वाटतं की संयुक्त मतदारसंघांमुळे त्यांची राजकीय ताकद कमी झाली आहे.

हिंदू अनुसूचित जातीच्या एखाद्या उमेदवाराने अपक्ष राहून निवडणूक लढवण्याची ही पहिलीच वेळ नाहीये.

2013 पासून अनुसूचित जातीच्या अनेक उमेदवारांनी निवडणुकीत आपलं नशीब आजमावून पाहिलंय पण ते विजयापासून बरेच लांब आहेत.

उच्चवर्णीय हिंदूंचा दबदबा

या समाजातील एक कार्यकर्ते शिवराम सुथार म्हणतात, "पैसा हे एक प्रमुख कारण आहे, पण ती विश्वास ठेवण्यायोग्य गोष्ट नाही."

शिवराम म्हणतात की अनुसूचित जातीचे उमेदवार सहसा निवडणुकीच्या काही दिवस आधीच मैदान सोडतात. त्यामुळे त्यांचे समर्थक निराश होतात.

शिवराम म्हणतात, "म्हणूनच स्थानिक हिंदू लोकही त्यांच्यावर विश्वास ठेवायला तयार नाहीत. त्याऐवजी, ते मुस्लिम उमेदवारांना मत देतात, कारण हे उमेदवार निदान त्यांचं काम तरी करून देतील असं त्यांना वाटतं."

पाकिस्तान मध्ये हिंदू लोकसंख्या वाढली असली तरी हिंदूंची राजकीय ताकद वाढलेली नाही

उमरकोटच्या समस्येबद्दल बोलताना शिवराम यांनी सांगितलं की, इथे हिंदू आणि मुस्लिम दोघांच्याही समस्या समान आहेत.

ते सांगतात, "वेगळ्या धर्मामुळे आपल्याला अडचणींचा सामना करावा लागतो असं नाही. वास्तविक, तुमची आर्थिक स्थिती काय आहे यावर बरंच काही अवलंबून असतं. गरिबांचे प्रश्न तसेच आहेत. आरोग्य, शिक्षण यासारख्या सुविधांची वानवा आहे. गरीब हिंदू असो वा गरीब मुस्लिम याने काही फरक पडत नाही. प्रत्येकाला समान समस्यांचा सामना करावा लागतोय."

पाकिस्तान पीपल्स पार्टी आणि हिंदू उमेदवार

एमक्यूएम या पक्षाने सिंध मध्ये तीन अनुसूचित जातीचे उमेदवार उभे केले असून लालचंद हे त्या तीन उमेदवारांपैकी एक आहेत. ते व्यवसायाने वकील आहेत.

त्यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, शहरातील 52 टक्के लोकसंख्या हिंदू आहे. तरीही पाकिस्तान पीपल्स पार्टीने उमरकोटमधील सर्वसाधारण जागेवर कधीही हिंदू उमेदवार उभा केलेला नाही.

लालचंद सांगतात, "मुख्य प्रवाहातील पक्षांनी आमचे हक्क हिरावून घेतलेत. ते फक्त भांडवलदार आणि जमीनदारांना प्रोत्साहन देतात. एमक्यूएम पाकिस्तानने आमच्या समुदायावर विश्वास व्यक्त केला याबद्दल मी खूप आभारी आहे.

पाकिस्तान मध्ये हिंदू लोकसंख्या वाढली असली तरी हिंदूंची राजकीय ताकद वाढलेली नाही

ते म्हणतात, "इथे भिल्ल, कोळी, मेघवार मल्ही, योगी या जातींचे लोक मोठ्या प्रमाणावर असून ते मोठ्या जमीनदारांच्या शेतात काम करतात. त्यामुळे घरमालक ज्या उमेदवाराला मतदान करायला सांगतो त्यालाच ते मत देतात. उच्चवर्णीय हिंदूंना आमची वेदना समजत नाही. ते सत्तेत बसलेल्या लोकांसोबत असतात आणि आमच्यासारखे बहुसंख्य हिंदू अन्यायाचे बळी ठरतात."

लालचंद बीबीसीशी बोलताना म्हणाले की, राजकारण हा पैशांचा खेळ असल्याचं बहुतांश राजकीय पक्षांना माहीत आहे. त्यामुळे ज्यांच्या विजयाची शक्यता कमी असते अशा उमेदवारांना ते आपलं पाठबळ देत नाहीत. मात्र कामगार वर्गातील अधिकाधिक लोक आता पुढे येत आहेत. पण तरीही त्यांची विधानसभेत पोहोचण्याची शक्यता फारच कमी आहे.

इम्रान खान यांचा पक्ष आणि हिंदू उमेदवार

इम्रान खान यांच्या तहरीक-ए-इन्साफ पक्षाने उमरकोटमधील मल्ही समाजातील दोन श्रीमंत भावांना राष्ट्रीय आणि प्रांतीय विधानसभेसाठी उमेदवारी दिली आहे.

या पक्षाला सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक लढवण्यास मनाई केली आहे. त्यामुळे ते आता अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत.

पक्षाचे उमेदवार लेखराज मल्ही यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, सरकार ज्याप्रमाणे पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफच्या नेतृत्वाला आणि उमेदवारांना लक्ष्य करत आहे, त्याचप्रमाणे त्यांच्या कुटुंबालाही त्रास दिला जातोय.

पाकिस्तान मध्ये हिंदू लोकसंख्या वाढली असली तरी हिंदूंची राजकीय ताकद वाढलेली नाही

ते सांगतात, "आमच्या घरांवर छापे टाकण्यात आले. दहशतवादाला प्रोत्साहन दिल्याबद्दल आमच्यावर खटले दाखल करण्यात आले. माझ्या मोठ्या भावाला अटक करण्यात आली. सर्व धमक्या आणि सूडबुद्धीच्या कृत्यांनंतरही आम्ही इम्रान खान यांच्या विचारसरणीसोबत उभे आहोत. कारण पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या पकडीतून उमरकोटला बाहेर काढायचं असेल तर तहरीक-ए-इन्साफचीच मदत होऊ शकते."

जाणकारांच्या मते, नजीकच्या काळात हे दृश्य बदलेल अशी शक्यता आता तरी वाटत नाही. पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ पक्ष पंजाब आणि वायव्य खैबर पख्तूनख्वा या प्रांतापर्यंत मर्यादित आहे. सिंधमध्‍ये अजून त्यांना आपले पाय रोवता आलेले नाहीत.

इतकं असूनही निवडणुकीत हिंदूंमधील अनुसूचित जातींचा सहभाग निश्चितच परिवर्तनाचं प्रतीक आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)