डॅनियल मसीह: देशासाठी जीव धोक्यात घालून 'हेरगिरी' करणाऱ्यांवर मजुरी करण्याची वेळ

- Author, नियाज फारुकी
- Role, बीबीसी प्रतिनिधी
डॅनियल मसीह यांच्या दाव्यानुसार ते भारतीय हेर होते. त्यांनी पाकिस्तानात हेरगिरी केली आणि तिथं अटक झाल्यानंतर त्यांना प्रचंड यातना सहन कराव्या लागल्या.
पण त्यानंतरही भारत सरकारकडून त्यांना कोणत्याही प्रकारचा मोबदला किंवा नुकसान भरपाई देण्यात आली नाही. शिवाय भारतानं त्यांच्या सेवा अधिकृतरित्या मान्यही केल्या नाहीत, असंही ते सांगतात.
डॅनियल मसीह भारताच्या सीमाभागात राहतात. जवळपास आठ वेळा पाकिस्तानात जाऊन गोपनीय माहिती मिळवली, असाही त्यांचा दावा आहे.
मसीह यांनी केलेल्या या दाव्यावर बीबीसीनं भारत सरकारकडून त्यांची बाजू जाणून घेण्याचाही प्रयत्न केला. पण भारत सरकारनं यावर प्रतिक्रिया देण्यासंदर्भातील बीबीसीच्या विनंतीला काहीही उत्तर दिलं नाही.
डॅनियल मसीह यांच्या दाव्यानुसार, ते आठव्या वेळी भारताची सीमा ओलांडून पाकिस्तानात गेले, तेव्हा त्यांना अटक करण्यात आली होती.
त्यांनी पाकिस्तानी अधिकाऱ्यांना दारू तस्कर असल्याचं सांगितलं, पण त्याचा फायदा झाला नाही. अखेर त्यांना हेरगिरीच्या आरोपात तीन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली.
चार वर्षे पाकिस्तानातील विविध तुरुंगात कैदेत ठेवल्यानंतर मसीह यांना सोडण्यात आलं. ते जेव्हा भारतात परत येत होते तेव्हा त्यांना हेर म्हणून कामगिरी केल्याबद्दल स्वतःचा अभिमान वाटत होता.
पण ज्या भारतीय संस्थेनं त्यांना पाकिस्तानात पाठवलं होतं, त्या संस्थेनं हात वर करत त्यांच्याशी संबंधच नसल्याचं म्हटलं.
डॅनियल मसीह सध्या सायकल रिक्षा चालवतात. त्यांच्या पत्नी साफ-सफाईची कामं करतात. ते जेव्हा कैदेत होते, तेव्हा त्यांच्या आईला एका अनोळखी पत्त्यावरून महिन्याला 500 रुपये मिळत होते. पण त्यांच्या सुटकेनंतर ते मिळणंही अचानक बंद झालं, असं ते सांगतात.
हेरगिरी करण्यासाठी त्यांनी पत्करलेल्या धोक्याच्या मोबदल्यात सरकारकडून मदत मिळावी, म्हणून आजही ते प्रतिक्षेत आहेत.
पण डॅनियल असे एकटेच नाही.
त्यांच्या मते, सीमेवर असलेलं त्यांचं गाव भारतात 'हेरांचं गाव' या नावानं प्रसिद्ध आहे. या गावातील अनेक जण हेरगिरीसाठी पाकिस्तानात जाऊन आले आहेत. पण त्यापैकी अनेकांना काहीही आर्थिक मदत मिळाली नाही.
भारताच्या सीमेवरील अशा जिल्ह्यांमधील लोकांनी गुप्तचर संस्थांसाठी काम करणं, यात वेगळं असं काहीच नसल्याचं, भारतीय अभ्यासक सांगतात.
असे दावे करणाऱ्या तथाकथित हेरांपैकी अनेकजण आता या जगातही नाहीत. तर बहुतांश जण माध्यमांशी बोलण्यास घाबरतात.
मसीह यांनी मात्र अगदी मोकळेपणानं आपबिती सांगितली. डॅनियल यांचं गाव इतर सर्वसाधारण भारतीय गावासारखंच आहे. जुनी आणि पडकी घरं, अरुंद गल्ल्या, त्यातून धावणाऱ्या मोटरसायकली आणि इकडं तिकडं बसलेले बेरोजगार तरुण.
मसीह म्हणतात की, आमच्या मागण्या अगदी साध्या आहेत. 'देशासाठी दिलेल्या सेवांचा' मोबदला आणि अधिकृत मान्यता एवढ्याच.
भारताच्या सुप्रीम कोर्टानं नुकताच भारत सरकारला एका व्यक्तीला मोबदला किंवा भरपाई म्हणून 10 लाख रुपये देण्याचा आदेश दिला होता.
भारताच्या एका गुप्तचर संस्थेनं 1970 च्या दशकात त्यांना हेरगिरीसाठी पाकिस्तानात पाठवलं होतं, असा दावा त्यांनी केला होता. पण त्याठिकाणी ते पकडले गेले आणि हेरगिरीच्या आरोपात त्यांना 14 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली.

डॅनियल यांचा हेरगिरीचा प्रवास
डॅनियल यांच्या मते, त्यांचा हेरगिरीचा प्रवास 1992 मध्ये सुरू झाला. एका सायंकाळी ते ओळखीच्या व्यक्तीबरोबर दारू पीत होते. त्या व्यक्तीनं त्यांना भारतीय गुप्तचर संस्थांसाठी काम करायला पाकिस्तानला जाणार का? असं विचारलं. त्यावर डॅनियल यांनी हो म्हटलं.
त्यावेळी त्यांची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट अशी होती. पाकिस्तानात जाऊन हेरगिरी करण्यासाठी प्रत्येक वेळी काही हजार रुपये मिळण्याच्या आश्वासनानं ते या कामाकडं आकर्षित झाले.
डॅनियल सांगतात की, त्या व्यक्तीनं त्यांना गुप्तचर संस्थेच्या एका हँडलरची भेट घालून दिली. त्यानं डॅनियल यांना दारू देऊ केली आणि त्याचबरोबर त्यांना मोठी-मोठी स्वप्नंदेखील दाखवली.
त्यानंतर त्यांना अगदी बेसिक असं प्रशिक्षण देण्यात आलं. त्यानंतर काही दिवसांनी तो क्षण आला. एका 'मिशन'साठी त्यांना हेरगिरीच्या कामावर पाठवण्यात आलं.
डॅनियल यांच्या दाव्यानुसार, त्यांच्या हँडलरनं त्यांना गाडीत बसवून सीमेपलीकडं नेलं. "त्यानंतर रावी नदीजवळ पोहोचल्यानंतर त्यांनी मला एका नावेमध्ये बसवलं."
पाकिस्तान सीमा सुरक्षादलाची गस्त संपल्यानंतर संधी मिळताच, ते सीमेपलिकडं गेले. "दुसऱ्या वेळी मी एकटा गेलो. असाच येत जात राहिलो. मी जवळपास आठ वेळा पाकिस्तानला गेलो होतो."
त्यांच्या दाव्यानुसार पाकिस्तानात ते एका ओळखीच्यांकडे थांबत होते. ती व्यक्तीदेखील भारतासाठी काम करत होती आणि डॅनियल यांच्या हँडलरनं सोपवलेली कामं पूर्ण करण्यात मदत करायची.
"आम्हाला जे काम मिळायचं, ते आम्ही पूर्ण करुन यायचो. एखाद्या रेल्वेचं वेळापत्रक, पुलाचा फोटो किंवा लष्कराची काही चिन्हं घेऊन यायची असायची. त्या काळात इंटरनेटचा वापर हा आजच्याप्रमाणे सहज करणं शक्य नव्हतं त्यामुळं संदेश पाठवण्यासाठी आधुनिक यंत्रणा उपलब्ध नव्हती."
काम पूर्ण करून ते पाकिस्तानातून भारतात यायचे तेव्हा त्यांच्या हँडलरला याची माहिती देण्यासाठी त्यांच्याकडे आधीपासून ठरलेला असा एक कोड असायचा. त्याच्या मदतीनं ते रात्रीच्या वेळी सीमा ओलांडायचे.
"एक तर आम्ही लांबूनच सिगारेट पेटवायचो, म्हणजे त्यावरून हा आपला माणूस आहे हे हँडलरला समजायचं. किंवा आम्ही आवाज द्यायचो तेव्हा ते कोण आहे? असं विचारायचे, त्यावर आम्ही कलाकार असं उत्तर द्यायचो. हा आमचा ठरलेला कोड होता."
डॅनियल यांच्या दाव्यानुसार, त्यांना एकदा पाकिस्तानातून एका निवृत्त सैनिकाला भारतात आणण्यास सांगण्यात आलं होतं. "मी निवृत्त सैनिकाला आणू शकलो नाही, मात्र एका सामान्य नागरिकाला घेऊन आलो आणि परतही सोडून आलो होतो."
या कामामध्ये प्रचंड धोके होते, असं ते सांगतात. एकदा सीमा ओलांडत असताना ते जवळपास पकडलेच जाणार होते. गव्हाच्या एका शेतातून जाताना पाकिस्तानी रेंजर्स जवळ येत असल्याचं त्यांनी पाहिलं. परिस्थिती आणखी बिघडणार एवढ्यात पाकिस्तानी रेंजर्सची एक चूक त्यांच्या पथ्यावर पडली, असं डॅनियल म्हणाले.
रेंजर्स मोठ्या आवाजात गाणी गात होते, त्यामुळं डॅनियलला ते आल्याचं समजलं आणि रेंजर्सनी पाहण्यापूर्वीच लपण्यात त्यांना यश आलं. "ते गाणं गात होते, म्हणून आम्ही त्यांना लांबूनच पाहिलं होतं. मी शेतात लपून बसलो आणि ते आमच्या जवळून गेले. पण त्यांना काहीही समजलं नाही," असं डॅनियल म्हणाले.
पण शेवटच्या चकरेवेळी नशिबानं साथ दिली नाही. आठव्या वेळी सीमा ओलांडण्याच्या प्रयत्नात असताना त्यांना अटक झाली. त्यावेळी त्यांनी हेर नसून दारुची तस्करी करत असल्याचं सांगितलं. पाकिस्तानी लष्करानं अनेक अत्याचार केल्यानंतरही त्यांनी धैर्य सोडलं नाही असं डॅनियल सांगतात. पण अखेर हेरगिरीच्या आरोपात त्यांना शिक्षा सुनावण्यात आली.

भारत-पाकिस्तान दरम्यान हेरगिरी
भारत आणि पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थांकडून माहिती मिळवण्यासाठी एकमेकांच्या हद्दीत हेर पाठवणं यात काहीही नवीन नाही.
तंज्ञत्रानाच्या नवनवीन उपकरणांमुळं त्यांच्यावरील अवलंबित्व आता कमी झालं आहे. पण तरीही प्रत्यक्ष हेरांचं महत्त्वं अजूनही टिकून आहे.
त्याशिवाय भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्धी देशांमध्ये असलेलं संस्कृती, भाषा आणि इतर गोष्टींतील साम्य यामुळं हेरगिरीच्या या प्रक्रियेत मदत होत असते.

चंदिगडमधील वकील रंजन लखनपाल यांनी भारत आणि पाकिस्तानच्या अनेक तथाकथित हेरांच्या सुटकेसाठी भारतीय न्यायालयांमध्ये खटले लढले आहेत.
त्यांच्या मते, "दोन्ही देशांमधून एकमेकांकडे हेर पाठवणं ही अगदी सामान्य बाब आहे."
"पाकिस्तानातूनही लोक येतात आणि भारतातूनही त्याठिकाणी जातात. ते त्यांचं काम करत असतात. काही लोक पकडले जातात आणि 20-20 किंवा 30-30 वर्षही तुरुंगात राहतात. त्यानंतर त्यांना त्यांच्या देशात परत पाठवलं जातं."
"दोन्ही देशांमध्ये सगळं असंच घडत असतं," असं रंजन सांगतात.

फोटो स्रोत, Getty Images
'सरबजितच्या मृत्यूनंतर प्रचंड पैसा दिला'
सरबजित सिंह हेदेखील एक हेर होते असं म्हटलं जातं. 2013 मध्ये एका पाकिस्तानी तुरुंगात त्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर सरकारनं त्यांच्या कुटुंबीयांना पुरेसा मोबदला दिला होता.
डॅनियल हा मुद्दा पकडत तक्रार करतात. "सरबजितचा मृत्यू झाला तेव्हा खूप पैसा देण्यात आला. आर्थिक मदत करण्यात आली. आम्हाला मात्र 15 हजारांशिवाय एक रुपयाही देण्यात आला नाही," असं ते म्हणतात. डॅनियल मसीह यांचे शेजारी असलेले सुरेंद्रपाल सिंह यांच्या वडिलांनीही कारगिलच्या युद्धादरम्यान हेर म्हणून काम केलं होतं.
"माझे वडील सतपाल सिंह यांनी 14 वर्ष गुप्तचर संस्थांसाठी काम केलं होतं. 1999 मध्ये कारगिल युद्ध सुरू होतं, तेव्हा ते अखेरचे पाकिस्तानला गेले होते. युद्धाच्या दरम्यान त्यांना लागोपाठ पाकिस्तानात चकरा माराव्या लागल्या आणि त्याचदरम्यान सीमेवर ते पकडले गेले," असं ते सांगतात.
काही दिवसांनी त्यांच्या वडिलांचा मृतदेहच आला. सीमेपलिकडं त्यांना वडिलांचा मृतदेह देण्यात आला तेव्हा तो भारतीय ध्वजात गुंडाळलेला होता. "त्यावर रक्ताचे डाग होते. ते आजही त्या ध्वजावर तसेच आहेत. सरकारकडून आम्हाला मदत मिळत नाही तोपर्यंत मी ते तसेच ठेवणार आहे. ती माझ्या वडिलांची अखेरची आठवण आहे."
सतपाल सांगतात की, त्यांचे वडील जीवंत असताना अनेकदा, लष्करी गणवेशातील लोक त्यांच्या घरी भेटवस्तू घेऊन यायचे.
"एकदा बहिणीच्या लग्नासाठी हुंड्याची रक्कमही घेऊन आले होते. ते लोक माझ्या वडिलांशी बंद खोलीत चर्चा करायचे. वडिलांच्या मृत्यूनंतर मात्र कोणीही आलं नाही," सतपाल सांगतात.

सुरेंद्र पाल त्यावेळी शाळेत शिकत होते, पण त्यांना शिक्षण सोडावं लागलं. सरकारकडून मोबदला मिळवण्याचे त्यांचे सर्व प्रयत्नदेखील अपयशी ठरले.
ते सर्व गुप्तचर संस्थांच्या कार्यालयांमध्ये गेले, मात्र कोणीही त्यांच्या वडिलांना हेर म्हणून मान्यता दिली नाही. दिल्ली, मुंबई किंवा अमृतसरमध्ये अधिकाऱ्यांचं लक्ष वेधून घेण्यात त्यांना यश आलं नाही.
''त्यानंतर आई आणि दोन्ही बहिणींना शहरात जाऊन धुणी-भांडी धुण्याचं काम करावं लागलं," असं ते सांगतात.
फिरोजपूर या सीमाभागातील जिल्ह्यातले रहिवासी गौरव भास्कर हे अशा हेरगिरी केलेल्यांसाठी एक अॅडव्होकेसी ग्रुप (वकिली गट) चालवतात. त्यांचे वडील कवी होते आणि 1970 च्या दशकात हेरगिरीच्या आरोपात पाकिस्तानात कैदेत होते. पण शिमला करार आणि सहकारी कवी हरिवंशराय बच्चन यांच्या विनंतीवरून त्यांना सोडण्यात आलं होतं.
अशा हेरांकडे पुरावा म्हणून दाखवायला कागदही नसतो, असं त्यांचं म्हणणं आहे. "ज्या लोकांच्या माध्यमातून त्यांना हे काम देण्यात आलं होतं, त्यांची एक तर बदली झाली आहे किंवा ते आता या जगात नाहीत."

फोटो स्रोत, SURENDRA PAL SINGH
'त्यांचं कोणीही वारसदार नाही. ज्या संघटनेसाठी काम करत त्यांनी देशाची सेवा केली, त्यात आता त्यांचं कोणीही राहिलेलं नाही,' असंही ते म्हणाले.
इतर हेरांच्या मागणीबद्दलही त्यांनी पुनरुच्चार केला. "त्यांची घरं सोन्या-चांदीनं भरुन टाका असं मी म्हणत नाही." मी केवळ माणुसकीच्या दृष्टीकोनातून बोलतोय. जे जीवंत आहेत त्यांच्या कुटुंबाला माणुसकी म्हणून एखादी नोकरी मिळावी म्हणजे त्यांना दोन वेळचं अन्नं मिळवता येईल.
डॅनियल यांच्या बोलण्यातून तेही हताश झाल्याचं जाणवतं. 'मी तारुण्यातील जे दिवस तिकडं घालवले, त्याचा मोबदला मला आजवर मिळालेला नाही,' असं ते म्हणतात.
"तिकडं गेल्यानं आयुष्यच उध्वस्त होऊन जातं, जसं माझं झालं."
टिप : डॅनियल मसीह यांनी केलेल्या सर्व दाव्यांवर भारत सरकारची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न बीबीसीनं केला. पण या प्रकरणी प्रतिक्रिया देण्यासाठी केलेल्या विनंतीला भारत सरकारनं काहीही उत्तर दिलं नाही.











