हिंदू-शीख पाकिस्तानातून जीव वाचवून पोहोचले होते 'या' रेल्वे स्टेशनवर

फाळणीनंतर दु:ख आणि शोकांतिकेचं दृश्य सीमेच्या दोन्ही बाजूंना पाहायला मिळालं जे इतिहासात क्वचितच कुठेतरी पाहायला मिळते.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, फाळणीनंतर दु:ख आणि शोकांतिकेचं असं काही दृश्य दोन्ही बाजूंना पाहायला मिळालं जे इतिहासात क्वचितच कुठेतरी पाहायला मिळते.
    • Author, विवेक शुक्ला
    • Role, वरिष्ठ पत्रकार, बीबीसी हिंदीसाठी

गेल्या 75 वर्षांत दिल्लीने अनेक बदल झालेले पाहिले. डझनभर फ्लायओव्हर, मेट्रो ट्रेन, मोठ-मोठाले मॉल्स उभे राहिले आणि अजूनही नवनवीन विकासात्मक घडामोडी होतच आहेत. पण जुन्या दिल्लीतील कमोबेश रेल्वे स्टेशन मात्र जसं 1947 होतं, आजही त्याच रुपात उभं आहे. कोणत्याही बदलावाविना.

या स्टेशनच्या मुख्य प्रवेशद्वारावर लागलेली ते जुनं घड्याळ आजही पाकिस्तानातून आलेल्या हिंदू-शीख निर्वासितांची आठवण करून देतं.

दिल्लीत आपल्याला पाठीचा कणा वाकलेली काही म्हातारी माणसं दिसून येतील, ज्यांच्या डोळ्यात त्या आठवणी अजूनही ताज्या आहेत. ते फाळणीनंतर कसेबसे आपला जीव वाचवत आले आणि या रेल्वे स्टेशनवर उतरले होते.

एकीकडे हिंदू-शीख जुनी दिल्ली आणि अमृतसर स्टेशनवर उतरत होते, तर दुसरीकडे लोधी कॉलनी रेल्वे स्टेशनवरून लुटलेल्या मुस्लिमांना लाहोरला पाठवले जात होते.

भारताचे प्रसिद्ध धावपटू मिल्खा सिंह यांच्या कुटुंबातील अनेक सदस्यांची त्यांच्या डोळ्यादेखत हत्या करण्यात आली.

मिल्खा सिंह थेट सीमारेषा ओलांडून दिल्लीत आले नव्हते. ते आधी पश्चिम पंजाबच्या कोट अद्दू शहराकडून मुल्तान शहरापर्यंत रेल्वेने आले आणि तेथून त्यांनी ट्रकने फिरोजपूर गाठलं.

फाळणीच्या अत्यंत कटू आणि भयाण आठवणी त्यांना जशाच्या तशा लक्षात होत्या. त्यांच्या वडिलांची दंगलखोरांनी हत्या केली होती.

मृत्यूच्या क्षणी वडिलांचे “भाग मिल्खा भाग” हे शब्द त्यांच्या कानावर होते. फिरोजपूरवरून ते दिल्लीला आले. गावातून आपला जीव वाचवून बाहेर पडताना ते आपल्या बहिणीपासून विभक्त झाले.

मिल्खा सिंग तो प्रसंग आठवून सांगत असताना अंगावर शहारे यायचे.

दिल्लीत निर्वासितांचे लोंढेच्या लोंढे येऊ लागले. सर्वत्र विखुरलेलं चित्र होतं. मिल्खा सिंह त्यांची बहीण हुंडी यांच्या शोधात दिल्लीला आले होते.

निर्जन ठिकाणी हत्याकांड

दिल्लीत येणाऱ्या अनेक निर्वासितांना कुठेच आश्रय नव्हता. त्यांना देवाचं नाव घेऊन भारताच्या सीमेवर पोहोचायचं होतं. मात्र, हे खूप जोखमीचं काम होतं, कारण दिल्लीच्या दिशेने येण्याऱ्या वाहनांवर निर्जन ठिकाणी हल्ले होत होते.

रेल्वे बोर्डाचे माजी अध्यक्ष वाय. पी. आनंद आपल्या कुटुंबासह सियालकोटवरून जम्मूच्या दिशेने 21 किलोमीटरचा प्रवास करीत होते. सियालकोटमध्ये दंगल उसळल्यानंतर त्यांच्या कुटुंबाला तिथं राहणं शक्यत नव्हतं.

फाळणी

फोटो स्रोत, KEYSTONE/GETTY IMAGES

फोटो कॅप्शन, मालमत्तेचं रक्षण करण्यात लाखो लोकांचा जीव गेला. त्यात हिंदू, मुस्लिम आणि शीख समाजातील लोक होते.

वाय. पी. आनंद त्यावेळी 13 वर्षांचे होते. ती आठवण अजूनही त्यांच्या मनात ताजी आहे.

एका निर्जनस्थळी रेल्वे थांबवण्यात आली होती. अचानक काही शस्त्रांसह आंदोलक ट्रेनमध्ये घुसले. त्यांनी ट्रेनमधील अनेक प्रवाशांची हत्या केली.

आनंद यांच्या समोर त्यांच्या कुटुंबातील निम्म्याहून अधिक सदस्यांना मारलं गेलं. त्या भीषण आठवणी आठवताना त्यांचे डोळे भरून येतात. रक्ताने माखलेली ती रेल्वे जम्मूमध्ये पोहोचली. काही दिवसांनंतर आनंद आपल्या उरलेल्या कुटुंबीयांसह जुन्या दिल्ली रेल्वे स्टेशनवर आले. स्टेशनच्या जवळ हजारो निर्वासित तंबू ठोकून होते.

बीबीसी न्यूज मराठी
बीबीसी न्यूज मराठी

भीष्म साहनींचा अनुभव

फाळणीच्या त्या भीषण प्रसंगांचं जिवंत वर्णन कथाकार भीष्म साहनी यांनी त्यांच्या ‘अमृतसर आ गया है’ या पुस्तकात केलंय.

‘अमृतसर आ गया है’ पुस्तकात एका ट्रेनमध्ये बसलेले सरदारजी सर्वांना विचारत होते की, “पाकिस्तान बनल्यानंतर जिन्ना साहेब मुंबईतच राहतील की पाकिस्तानमध्ये जाऊन तेथे स्थायिक होतील, यावर एकजण म्हणतं, मुंबई का सोडून जाणार ते, पाकिस्तानात येणं-जाणं करत राहतील, मुंबई सोडण्यात काही अर्थ नाही! लाहोर आणि गुरदासपूरबाबतही हा अंदाज लावला जात होता की कोणतं शहर कोणत्या बाजूला जाईल.”

भीष्म साहनी आपल्या कुटुंबासह रावळपिंडी रेल्वेने दिल्लीला आले. भीष्म साहनी सांगायचे की, रावळपिंडी ते लाहोरदरम्यान रक्तपाताच्या बातम्या ऐकायला मिळायच्या. लाहोरजवळच असलेल्या शेखुपुरा शहरात हजारो लोक मारले गेले. तर ठिकठिकाणी रेल्वेवर दगडफेक केली जात होती.

फाळणी

फोटो स्रोत, KEYSTONE FEATURES/GETTY IMAGES

फोटो कॅप्शन, मुस्लीम जीव वाचवून पाकिस्तानात जात होते तर हिंदू आणि शीख भारताकडे येत होते

रेल्वे अमृतसरला पोहोचली की बरेच यात्रेकरू तेथे उतरून जात. तेथे रेल्वे विभागाकडून गाड्यांचीही तपासणी करण्यात यायची. गंभीर जखमी आणि आजारी असलेल्यांवर तातडीने उपचार करता यावेत, यासाठी काही डॉक्टरही तेथे उपस्थित असायचे.

निर्वासितांमध्ये काही गर्भवती महिलाही असायच्या. भीष्म साहनी यांच्यासाठी ऑगस्ट महिना दोन गोष्टींसाठी खास होता. पहिली गोष्ट म्हणजे ऑगस्टच्या 8 तारखेला त्यांचा जन्मदिवस होता, तर दुसरी गोष्ट म्हणजे ऑगस्ट महिना येताच ते त्यांचं जन्मस्थळ असलेल्या रावळपिंडीच्या आठवणींत हरवून जायचे.

देशाच्या फाळणीमुळे त्यांना त्यांचं शहर सोडून दिल्लीला यावं लागलं.

भीष्म साहनी देशाच्या फाळणीनंतर दिल्लीला आले आणि ईस्ट पटेल नगर येथे राहू लागले. तिथेच स्थायिक झाले. पुढे त्यांनी दिल्ली विद्यापीठातून इंग्रजीचे शिक्षण घेतलं.

पाकिस्तानी कौमी तराना लिहिणारेही आले

धर्माच्या आधारावर भारताचं विभाजन होऊन पाकिस्तानची निर्मिती झाली. जिन्ना यांनी उर्दू शायर जगन्नाथ आजाद यांच्याकडून पहिला कौमी तराना लिहून घेतला. जिन्ना यांच्या विनंतीवरून जगन्नाथ आझाद यांनी अल्पावधीतच गीत लिहिलं. ते असं होतं - 'ऐ सर जमीन पाक...'

मात्र, हे गीत फक्त 18 महिनेच पाकिस्तानचे राष्ट्रगीत राहिले आणि 11 सप्टेंबर 1948 रोजी जिन्ना यांच्या मृत्यूनंतर लगेच ते गीत हटवण्यात आलं.

चौदा महिने रेडिओ पाकिस्तानवर हे गीत ‘तराना-ए-पाकिस्तान’च्या रुपात गायलं गेलं. जिन्ना यांच्या मृत्यूनंतर जगन्नाथ आजाद संपूर्ण कुटुंबासह दिल्ली जंक्शनवर आले. ते दिल्ली जंक्शनजवळील पूल बंगश भागात ते राहायचे.

फाळणी

फोटो स्रोत, THE PARTITION MUSEUM, TOWN HALL, AMRITSAR

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

पूल बंगशच्या याच घरात आजाद यांच्याकडे उर्दूचे दुसरे नामवंत शायर फिराक गोरखपुरी यायचे.

आजाद साहेब यांची दोन मुलं दिल्लीतच राहायचे, त्यातील एक दुरदर्शनमध्ये होता. तो मालवीय नगर येथे राहायचा.

दिल्लीत आल्यानंतर शरणार्थींसमोर निवाऱ्यापासून अन्नापर्यंतच्या सर्व गोष्टींचं आव्हान होतं. त्यांचे बरेच हाल होत होते. स्टेशनवर उतरून अनेकजण आपापल्या कुटुंबाबरोबर सब्जी मंडी, करोल बाग, दरियागंज अशा भागातील काही क्वार्टरमध्ये राहू लागले. ज्यांचं या शहरात कोणी नव्हतं ते फतेहपुरी, काश्मिरी गेट, चाँदणी चौकातील दुकानांपुढे रात्रीच्या निवाऱ्याची सोय करू लागले.

सकाळ-संध्याकाळचं जेवण गुरुद्वारा सीसगंज, गौरी-शंकर मंदिर आणि दुसऱ्या स्वयंसेवी संघटनांमुळे मिळायचं. या भागात आल्यानंतर अनेक आठवडे ते इकडे-तिकडे डोक्याखाली छप्पर शोधत राहिले. मग काही शाळांमध्ये त्यांना रात्री झोपण्यासाठी छप्पर मिळाले.

पंचकुईया रोडवरील वाल्मिकी मंदिरातही काही निर्वासित कुटुंबे राहू लागली. जुन्या दिल्ली रेल्वे स्टेशनवर जाणे हे त्यांचे रोजचे काम होते. ते तिथे आपल्या मित्रपरिवाराची, नातेवाईकांची विचारपूस करायला जायचे. अनेकदा त्यांना कोणीतरी सापडत असे, ज्याला ते रडत-रडत मिठी मारायचे.

फाळणी

या बातम्याही वाचा :

फाळणी

सब्जी मंडी स्टेशनवर कोण उतरायचे?

दिल्लीत येणारे काही निर्वासित सब्जी मंडी रेल्वे स्टेशनवरही उतरायचे. तेथून नवीन ठिकाणांच्या शोधात इकडे-तिकडे भटकायचे. अनेक निर्वासित कित्येक दिवस सब्जी मंडी रेल्वे स्टेशनवरच थांबायचे. सब्जी मंडी रेल्वे कॉलनीतील रहिवासी त्यांना सकाळ-संध्याकाळचं जेवण आणि नाश्ता देत असत.

सब्जी मंडी रेल्वे कॉलनी 1930 साली तयार झाली. तीस हजारी कोर्टातील वकील पदम कुमार यांचा या परिसराशी जवळपास अर्ध्या शतकाहून अधिकचा संबंध आहे.

पाकिस्तानातून आलेले निर्वासित सब्जी मंडीच्या जवळपास असलेल्या घंटाघर, सदर बाजार, चांदणी चौक, पुल मिठाई, किशन गंड, बाडा हिन्दूराव, कूचा हब्श खाँ यांसारख्या भागातही राहू लागले, असं ते सांगतात.

फाळणी

फोटो स्रोत, Keystone-France

दिल्लीचे मुख्य कार्यकारी नगरसेवर जगप्रवेश चंद्र हे किशनगंजमधील एका खोलीच्या छोट्या घरात राहू लागले. त्यांच्यासोबत त्यांचे आई-वडील आणि बहीण असा परिवार होता. त्यांनी लवकरच येथील निर्वासितांमध्ये समाजसेवेचं कार्य करण्यास सुरुवात केली. दिल्लीमध्ये सन 1951 साली पहिल्या विधानसभा निवडणूक झाली. त्यांनी किशनगंजमधून काँग्रेसच्या निवडणूक लढवली आणि जिंकली, म्हणजेच दिल्लीत आल्यानंतर चार वर्षांनी ते इथले आमदार झाले.

छोले कुलचा ते बटर चिकन

दिल्लीत आल्याच्या काही दिवसानंतर निर्वासितांनी रस्त्यांवर कंगवा, रुमाल, छोले-कुल्चे विक्रीस सुरुवात केली. पोटासाठी काहीतरी करावेच लागणार होते. दिल्लीत दीर्घकाळापासून रहिवासी असलेले 50 हून अधिक वयवर्षांच्या लोकांना दर्यागंजमधून येता-जाता मोती महल रेस्टॉरंटला पाहून भूतकाळातील दिवस जरूर आठवत असतील.

हे रेस्टॉरंट कुंदनलाल गुजराल, ठाकूर दास आणि कुंदन लाल जग्गी यांनी सुरू केलं होतं.

फाळणी

फोटो स्रोत, Keystone Feature

ते सर्व 1947 साली जुन्या दिल्लीच्या रेल्वे स्टेशनवर आले होते. तिघेही पेशावर येथील एका रेस्टॉरंटमध्ये काम करायचे.

एक दिवस दिल्लीत त्यांची भेट झाली. तो एक कठीण काळ होता. तिघांनीही दिल्लीत काहीतरी व्यवसाय उभारण्याची योजना आखली. शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ बनवण्यासाठी आणि विकण्यासाठी त्यांनी दर्यागंजमध्ये एक छोटी जागा भाड्याने घेतली.

त्या काळात रेफ्रिजरेटर (फ्रिज) नव्हते. रात्री उरलेल्या चिकनला टोमॅटो, क्रीम आणि बटरची ग्रेव्हीमध्ये टाकून ठेवायचे जेणेकरून नरम राहील आणि खराबही होणार नाही. त्या ग्रेवीमध्ये गरम मसाले टाकून एक नवीन पंजाबी डिश तयार झाली ज्याचं नाव ‘बटर चिकन’ असं ठेवण्यात आलं. आज बटर चिकन जगभरात विकले जाते, त्याची सुरुवात याच दर्यागंजमधील ‘मोती महल’पासून झाली.

खुशवंत सिंह

फोटो स्रोत, Sondeep Shankar

फोटो कॅप्शन, खुशवंत सिंह

ज्येष्ठ लेखक आणि पत्रकार त्रिलोक दीप 1947 च्या फाळणीवर बोलण्यास फारसे उत्सुक दिसत नाहीत.

ते म्हणतात, ‘राहू द्या. फाळणीने बऱ्याच जखमा केल्यात. त्या जखमा मला पुन्हा नाही आठवायच्या.’

पण थोडं आग्रहाने सांगितल्यावर ते बोलतात. ते सांग होते, “मी जवळपास 10 वर्षांचा असेल, तेव्हा आई-वडीलांसह ऑगस्ट 1947 च्या आधी रावळपिंडीहून लाहोरमार्गे लखनौला पोहोचलो होतो.

"रावळपिंडीची स्थिती खूप वाईट होत चालली होती, त्यामुळे तेथे थांबणे शक्य नव्हते. लाहोरकडे जाताना माझे आजोबा अमीचंदजी आणि आजी भाग्यवतीजी यांना मारून टाकण्यात आले. ते एका वाहनाची वाट पाहत होते, ज्यातून कसं-बसं लाहोरला पोहोचता येईल आणि तेथून दिल्लीला जाता येईल. मात्र, ते कधीच तेथे पोहचू शकले नाहीत.”

सियालकोटचे धर्मपाल गुलाटी करोल बागमध्ये...

निर्वासितांचा दिल्लीला येण्याचा ओघ सुरुच होता. सप्टेंबरचा महिना सुरु होता. सर्वाधिक निर्वासित हे लाहोर, रावळपिंडी, सियालकोट आणि मुल्तानहून येत होते. त्यांना जिथे-जिथे रिकामी घरे मिळाली तिथे ते राहू लागले, यातील बहुतांश घरे मुस्लिमांची होती, ज्यांना दंगलीनंतर पाकिस्तानात जावे लागले.

करोल बागमधून हजारो मुस्लीम पाकिस्तानात गेले. पाकिस्तानचे पूर्व कसोटी क्रिकेटर सिकंदर बख्त यांचं कुटुंबही स्वातंत्र्याआधी करोल बागमध्ये राहायचे. करोल बागमधून जाणारे त्यांची घर कुलूपबंद करत होते. त्यांना आशा होती की, ही घरे त्यांच्या ताब्यात राहतील. परंतु, लोकांनी त्या बंद घरांचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.

सीमेच्या दोन्ही भागातील स्थिती सारखीच होती. हिंदू आणि शिखांच्या रिकाम्या घरामंध्ये मुस्लिमांनी ताबा घेतला, तर दिल्ली आणि अमृतसरसारख्या शहरातील मुस्लिमांची बंद घरे निर्वासित हिंदू-शिखांनी ताब्यात घेतली.

महाशय धर्मपाल गुलाटी

फोटो स्रोत, MDH SPICES

फोटो कॅप्शन, महाशय धर्मपाल गुलाटी

दिल्ली विद्यापीठात अर्थशास्त्राचे प्राध्यापक राहिलेले वीरेन्द्र लाल वाधवा सांगतात की, करोल बागेतील फैज रोड आणि आर्य समाज रोडवर सातत्यानं निर्वासितांचं येण सुरु होतं. त्यात सियालकोटचे चुन्नीलाल गुलाटी यांचं कुटुंबही होतं. ते सियालकोटमध्ये मसाले विक्री करायचे.

त्या कुटुंबातील एक तरुण धर्मपाल गुलाटी पुढे जाऊन महाशय धर्मपाल गुलाटी म्हणून प्रसिद्ध झाले. याच धर्मपाल गुलाटींनी एमडीएच मसाले नावाची मसाल्यांची एक मोठी कंपनी उभारली.

महाशय धर्मपाल गुलाटी करोल बागमध्ये चप्पल-जोडे घालून कधीच फिरत नव्हते. ते म्हणायचे, ‘करोल बागची ही जमीन मला मंदिराप्रमाणे आहे. या भूमीने मला सर्वकाही दिले. मी येथे चप्पल-जोडे घालू शकत नाही.’

खरतर लाहोर आणि रावळपिंडीहुन दिल्लीसाठी सतत रेल्वे सुरू होती. यात काही सुरक्षारक्षकही असायचे.

लेखक आणि दिल्ली सरकारमधील मंत्री राहिलेले रमाकांत गोस्वामी दोन वर्षांचे असताना त्यांचे वडील आणि सनातन धर्मसभेचे गोस्वामी गिरधारी लाल यांच्या बरोबर जुन्या दिल्लीत आले.

गोस्वामी गिरधारी लाल लाहोरमध्ये मुलांना हिंदी आणि संस्कृत शिकवायचे. ते कामानिमित्त दर दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी सायकलने लाहोर ते अमृतसरला येणं-जाणं करायचे.

रमाकांत गोस्वामी यांनी त्यांच्या कुटुंबातील काही वडिलधाऱ्यांकडून ऐकले होते की, दिल्लीत निर्वासितांच्या सततच्या ओघाने स्थानिक लोक खूश नाहीत. इथे आल्याने दिल्लीतील लोकसंख्येचे स्वरूप पूर्णपणे बदलेल असे त्यांना वाटायचे. गोस्वामी गिरधारी लाल हे दीर्घकाळ बिर्ला मंदिराचे मुख्य पुजारी होते. पंडित नेहरूंचे अंत्यसंस्कार त्यांच्या देखरेखीखाली झाले.

गांधी आणि वाट पाहणारे निर्वासित

परिस्थिती खूप बिकट होती. तेव्हा अनेक कुटुंबातील सदस्य एकमेकांपासून विभक्त झाले होते. एखाद्याची आपल्या कुटुंबाशी भेट झालीच तर तो देवाला अनेक धन्यवाद द्यायचा, तर उर्वरित लोक आपल्या कुटुंबाशी भेट होऊदे म्हणून देवाकडे प्रार्थना करायचे. आणि पुन्हा रेल्वे स्टेशनवर येऊन शोध घ्यायचे.

यात लक्षात ठेवण्याची एक महत्वाची गोष्ट म्हणजे दिल्लीला येणारे सगळेच रेल्वेने येत नव्हते.

खुशवंत सिंह यांना लाहोरच्या पंजाब हायकोर्टात प्रॅक्टिस सुरू करून काहीच काळ झाला होता. फाळणीमुळे त्यांनाही त्यांचं प्रिय शहर लाहोर सोडून दिल्लीला यावं लागलं. ते लाहोरहून दिल्लीला आपली कार चालवत आले.

गांधी

फोटो स्रोत, Universal History Archiv

खुशवंत सिंह यांनी लिहिलंय, “लाहोर ते दिल्ली प्रवासादरम्यान मला पक्षीदेखील क्वचितच दिसत होते. जसजसा मी दिल्लीच्या जवळ आलो, तसतशी माणसं दिसू लागली.”

खुशवंत सिंह यांचे भाऊ मोहन सिंग यांनीही त्यांच्या कुटुंबाला रावळपिंडीहून कारमधून दिल्लीत आणले.

भाई मोहन सिंग यांचा रावळपिंडीत यशस्वी बांधकामाचा व्यवसाय होता. दिल्लीत आल्यानंतर त्यांनी आपला व्यवसाय बदलला. त्यांनी फार्मा क्षेत्रात प्रवेश केला आणि रॅनबॅक्सी फार्माचे अध्यक्ष बनले आणि अब्जाधीश झाले.

फाळणीच्या स्थलांतरावेळी जे श्रीमंत होते, ते त्यांच्या वाहनांतून सुरक्षितपणे दिल्लीला पोहोचत होते.

(हा लेख यापूर्वी म्हणजे 12 ऑगस्ट 2022 रोजी बीबीसी हिंदीवर प्रकाशित करण्यात आला आहे.)