भारत-पाकिस्तान फाळणीमुळे हिंदू-मुस्लीम प्रेमकहाणीस गेला तडा

- Author, दिव्या आर्य
- Role, बीबीसी प्रतिनिधी
ही फाळणीच्यावेळची प्रेमकहाणी आहे. प्रेम मिळवण्यासाठी धर्म आणि देशही सोडला. मात्र त्यानंतरही सरकारशी संघर्ष कराव्या लागणाऱ्या युगुलांची ही गोष्ट आहे.
वर्ष होतं 1947. रावळपिंडीच्या पठाण कुटुंबातील इस्मतचं वय त्यावेळी 15 होतं. अमृतसरच्या लालाजी कुटुंबातील जीतू 17 वर्षांचा होता.
त्याआधीच्या काही वर्षांमध्ये सुट्टीच्या निमित्ताने दोन्ही कुटुंबीयांची श्रीनगरमध्ये एकमेकांशी भेट झाली होती.
इस्मत आणि जीतू यांच्यातल्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं होतं. मात्र फाळणीने त्या दोघांना तसंच त्यांच्या कुटुंबीयांना वेगळं केलं.
इस्मतला कळलं होतं की आता जीतू आपला आयुष्यभराचा साथीदार होणं कठीण आहे.
जीतूच्या प्रेमात आकंठ बुडालेली इस्मत घरातून पळून हिंदूधर्मीय निर्वासितांच्या छावणीत दाखल झाली.
तिथे गेल्यावर ती म्हणाली, "मी एक हिंदू मुलगी आहे. आईवडिलांपासून ताटातूट झाली आहे. मला कृपा करून भारतात पाठवा."
फाळणीनंतरच्या काही महिन्यांमध्ये दोन्ही देशांतल्या हजारो महिलांचं अपहरण झालं होतं. अनेकजणींचा त्यांच्या मर्जीविरुद्ध धर्म बदलण्यात आला. सक्तीने त्यांची लग्नंही लावण्यात आली.
याकारणासाठीच भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या सरकारने बेपत्ता झालेल्या स्त्रियांना शोधून काढून त्यांना त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचवण्याचं काम हाती घेतलं. या मोहिमेला 'ऑपरेशन रिकव्हरी' हे नाव देण्यात आलं होतं.
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतील निर्वासितांच्या छावण्यांमधील महिलांना आपापल्या देशात पाठवण्याकरता सामाजिक कार्यकर्त्या कमला पटेल यांची नियुक्ती करण्यात आली.
इस्मत कमल यांना भेटली. फाळणी झाल्यानंतर लगेच पंजाब प्रांताचे हिंदू आणि मुस्लीम यांची बोलीभाषा आणि पोशाख एकसारखे होते.
इस्मतच्या बोलण्यावर विश्वास ठेवत तिला हिंदू मानण्यात आलं. शिबिरातील बाकी निर्वासितांच्या बरोबरीने तिला रावळपिंडीहून अमृतसरला पाठवण्यात आलं.
अमृतसरला पोहोचल्यानंतर इस्मतने जीतूच्या घरच्यांना निरोप पाठवला. जीतू ताबडतोब शिबिरात पोहोचला.

जीतूच्या आईवडिलांच्या परवानगीने अल्पवयीन असूनही इस्मतचं जीतूशी लग्न लावून देण्यात आलं. अमृतसरच्या प्रसिद्ध सुवर्णमंदिरात हे लग्न झालं.
त्याचवेळी देशांची सीमा पार करून फळलेल्या या प्रेमकहाणीच्या नात्यात एक कठीण क्षण आला.
इस्मतच्या कुटुंबीयांनी आमच्या मुलीचं अपहरण झालं आहे अशी तक्रार केली. पाकिस्तान सरकारने तिला शोधून काढावं असंही त्यांचं म्हणणं होतं.
फाळणीवेळी बेपत्ता झालेल्या स्त्रियांना आपल्या घरच्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी भारत आणि पाकिस्तान यांच्यादरम्यान करार झाला होता. इस्मत आणि जीतू यांच्या प्रेमात या कराराच्या रुपाने अडथळा निर्माण झाला.
इस्मतचा खोटेपणा उघड झाला. तिला पाकिस्तानला परत जाणं भाग होतं.

घाबरलेला जीतू सामाजिक कार्यकर्त्या कमला पटेल यांना जाऊन भेटला.
"इस्मतचं अपहरण झालेलं नाही. इस्मतचं माझ्यावर प्रेम आहे आणि स्वत:च्या मर्जीने भारतात आली आहे. तुम्ही कृपा करून माझी मदत करा," अशी त्यानं विनंती केली.
आपल्या मुलीचं अपहरण झालेलं नाही यावर अल्पवयीन मुलीचे पालक कसा विश्वास ठेवणार?
याप्रकरणी सूट किंवा सवलत दिली तर संपूर्ण अभियान कोलमडण्याची भीती होती.
इस्मतसारख्या मुली किंवा स्त्रियांना जबरदस्तीने परत पाठवण्याच्या कमल पटेल विरोधात होत्या.
या मुद्यावरून वाद घटना समितीपर्यंत पोहोचला. अनेक स्त्रियांनी याला विरोध केला. पण करार अबाधित राहिला.
पोलिसांपासून वाचण्यासाठी इस्मत आणि जीतू पळून कोलकात्याला गेले.
कमल पटेल आणि त्यांच्या सहकाऱ्यांवरचा दबाव वाढत होता.

'टॉर्न फ्रॉम द रुट्स: अ पार्टिशन मेमॉयर' या पुस्तकात कमल पटेल यांनी त्यावेळच्या स्त्रियांच्या अवस्थेचं वर्णन केलं आहे. फळांच्या अदलाबदलीप्रमाणे महिलांची अदलाबदली होते असं त्यांनी या ऑपरेशनचं वर्णन केलं आहे.
या पुस्तकाच्या प्रकाशक रितू मेनन यांनीही भूमिका मांडली. कमला पटेल यांनी सुटका करून आणलेल्या स्त्रियांना निर्वासितांच्या छावणीतून पळून जाण्यात मदत केली.
जेणेकरून या स्त्रिया ज्या ठिकाणहून सुटका झाली आहे तिथे परत जाऊ शकत असत.
तो काळ तसाच होता. स्त्रियांचं मन समजून घेणं आवश्यक होतं.
नातेसंबंधांसाठी तो नाजूक काळ होता. नातं तोडण्यापेक्षा ते टिकवणंच उचित होतं.
इस्मत आणि जीतूचं नातं असंच काहीसं होतं. पण सरकारी कायद्याला या छोट्या भावभावनांमध्ये गुंतायचं नव्हतं.

इस्मत आणि जीतू यांना परत आणण्यासाठी पाकिस्तानने हा खटला बंद केला आहे अशी अफवा उठवण्यात आली.
अफवेला खरं मानून इस्मत आणि जीतू पुन्हा अमृतसरला पोहोचले.
एका आठवड्यासाठी लाहोरला जावं असं कमल यांनी इस्मतला समजावलं.
तिथल्या पोलीस आयुक्तांच्या घरी राहून आईवडिलांची भेट घ्यावी आणि त्यानंतर कुठे राहायचं याचा अंतिम निर्णय घ्यावा.
आपल्या मनाविरुद्ध असं वागणं कमल पटेल यांच्यासाठी सोपं नव्हतं.
कमल यांच्या बहीण नयना पटेल यांनी कमला यांची त्यावेळची स्थिती मांडली. त्यांच्यावर खूप दबाव होता. लोकांच्या आयुष्याचा निर्णय होता. पाच वर्षं अभियानाचा भाग म्हणून निर्वासितांच्या छावण्यांमध्ये राहून त्यांचं खाणंपिणंही बिघडलं होतं.
ऑपरेशन रिकव्हरीअंतर्गत 30,000 स्त्रियांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचवण्यात आलं.
यामध्ये इस्मत आणि जीतू यांच्याप्रमाणे अनेक प्रकरणं होती. अधिकृतरित्या अशा गोष्टींची दप्तरी नोंद नाही.

कमला पटेल यांनी लिहिलेलं पुस्तक अशा प्रेमकहाण्यांमधील अवघड क्षण समोर आणतं.
त्यांच्या पुस्तकानुसार जीतू इस्मतला लाहोरला सोडून अमृतसरला परत आला. त्यानंतर इस्मत कधी परतेल या प्रतीक्षेत तो दिवस मोजत असे.
मात्र चौथ्या दिवशीच इस्मतला आईवडील आपल्या घरी घेऊन गेल्याचं कमल पटेल यांना कळलं. तिला भेटण्यासाठी कमल पटेल तातडीने निघाल्या. मात्र तोपर्यंत तिकडचं चित्र पूर्णत: बदललं होतं. इस्मतचं बोलणं आणि कपडे दोन्ही बदललं होतं.
इस्मत हात उंचावून रोखून म्हणाली, या स्त्रियांनीच मला पाकिस्तानला येऊ दिलं नाही. मी वारंवार विनंती केल्यावरही मला इकडे येऊ दिलं गेलं नाही.
जीतूचं नाव ऐकताच तिचा तिळपापड झाला. त्या गद्दार माणसाचं मी तोंडही पाहू इच्छित नाही. माझ्यात ताकद असती तर त्याचे तुकडे तुकडे केले करून कुत्र्यांना खायला दिले असते.

इस्मतचं बोलणं जीतूच्या कानावर पोहोचलं आणि तो तातडीने लाहोरला पोहोचला. इस्मतवर आईवडिलांचा दबाव आहे. मी बरोबर असतो तर ती असं बोललंच नसती असं जीतू म्हणाला.
जीतू तिथे पोहोचेपर्यंत इस्मतचे घरचे तिथून गायब झाले होते.
लाहोरमध्ये जीवाला धोका असूनही जीतूने इस्मतला शोधण्याचे सगळे प्रयत्न केले.
कमला पटेल यांनी त्याला अनेकदा समजावलं. फाळणीचा हिंसाचार शमला नव्हता.
जीतू म्हणाला, 'माझं आयुष्य बरबाद झालं आहे. मी मेलो तरी काय फरक पडणार आहे? '.

प्रचंड पैसा खर्च झाला. जीतूला क्षयरोग झाला.
पाच वर्षानंतर कमला पटेल यांनी जीतूला शेवटचं पाहिलं तेव्हा तो अगदी कृश झाला होता. चेहरा पिवळा पडला होता. तो अगदी एकटा पडला होता.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








