पाकिस्तानी तरूणीनं आजारामुळे 12 वर्षं घरात काढली, भारतीय डॉक्टरनं दिलं जीवनदान

अफशीन, भारत, पाकिस्तान
फोटो कॅप्शन, अफशीन

पाकिस्तानमध्ये राहणाऱ्या अफशीन गुलला एका दुर्मिळ आजाराने ग्रासलं होतं. यामुळे तिची मान 90 अंशात वाकली होती.

या आजारावर उपचार शोधण्यासाठी तिच्या कुटुंबियांनी जंगजंग पछाडलं. सरतेशेवटी यावर योग्य उपचार मिळाला तो भारतात. बीबीसी उर्दूचे रियाझ सोहेल यांनी अफशीनला उपचार मिळेपर्यंतचा प्रवास त्यांच्या या लेखामध्ये मांडलाय.

मित्र म्हणजे काय असतात?

बऱ्याच मुलांसाठी त्यांचे मित्र म्हणजे शाळेतले वर्गमित्र असतील, त्यांच्या शेजारी राहणारे त्यांचे समवयस्क सोबती असतील. किंवा मग एखादा प्राणी, नाहीतर एखादं खेळणं त्यांच्यासाठी त्यांचा मित्र असू शकेल.

पण पाकिस्तानच्या सिंध प्रांतात राहणाऱ्या 13 वर्षांच्या अफशीन गुलला कोणी मित्रमैत्रिणी नाहीत. कारण ती कधी शाळेतच गेली नाही, किंबहुना ती बाहेर तिच्या मित्रांसोबत खेळलीही नाही. घरात आपल्या सात भावंडांपैकी सर्वात लहान असलेली अफशीन एका आजारानं ग्रस्त होती.

अफशीन अवघ्या 10 महिन्यांची असताना तिचा एक अपघात झाला होता. खेळताना अफशीन तिच्या बहिणीच्या हातून सुटून खाली पडली होती. यात तिची मान वाकडी होऊन 90 अंश काटकोनात वळली. तिच्या पालकांनी तिला जवळच असलेल्या डॉक्टरांकडे नेलं. तिथं डॉक्टरांनी अफशीनला गोळ्या औषध आणि मानेला लावायचा पट्टा दिला. यात तिची प्रकृती आणखीच बिघडली.

"ना तिला चालता येत होतं, ना खाता येत होतं. तिला बोलता ही येत नव्हतं. ती फक्त जमिनीवर पडून असायची. तिच्या रोजच्या जगण्यात आम्ही तिला मदत करायचो."

आमच्याकडे तिच्या उपचारांसाठी पुरेसे पैसेच नव्हते, असं अफशीनची आई जमीलन बीबी सांगतात.

अफशीनलाही सेरेब्रल पाल्सी आहे. ती सहा वर्षांची असताना चालायला शिकली, आठ वर्षांची असताना बोलायला शिकली. या सगळ्यात ती तिच्या वयाच्या इतर मुलांपेक्षा मागे पडली.

अफशीन, भारत, पाकिस्तान

फोटो स्रोत, AFSHEEN GUL/INSTGRAM

फोटो कॅप्शन, डॉ. राजगोपालन कृष्णन यांच्याबरोबर

कराचीपासून सुमारे 300 किमी दूर असलेल्या मिठी या गावातल्या बंदिस्त घरात तिने तिच्या आयुष्याची 12 वर्ष काढली.

पण मार्चमध्ये अफशीनचं आयुष्यच बदललं. एका भारतीय डॉक्टरांनी तिच्या झुकलेल्या मानेवर यशस्वीपणे शस्त्रक्रिया केली. हे डॉक्टर म्हणजे दिल्लीतील अपोलो हॉस्पिटलमधील स्पाईन सर्जरीचे तज्ञ डॉ. राजगोपालन कृष्णन. त्यांनी अफशीनवर मोफत शस्त्रक्रिया करून देण्याची तयारी दर्शवली.

आज चार महिन्यांनंतर अफशीन स्वतः चालू शकते, बोलू शकते आणि खाऊ शकते. तिच्या शस्त्रक्रियेच्या जखमा भरून आल्या आहेत. डॉ कृष्णन दर आठवड्याला स्काईपद्वारे तिची तपासणी करतात.

अफशीनचा भाऊ याकूब कुंबर म्हणतो, "ती आता थोडी अशक्त आहे आणि ती शाळेतही जाऊ शकत नाही. पण डॉक्टर म्हणतात की तिला बरं होण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागेल."

"आता आम्ही खूप आनंदी आहोत. डॉक्टरांनी माझ्या बहिणीचा जीव वाचवला. ते आमच्यासाठी देवदूत आहेत." असं कुंबर म्हणतो.

अफशीनला 'अटलांटो - अॅक्सीयल रोटरी डिस्लोकेशन' म्हणजे मणका सतत हलत राहण्याचा आजार होता. यावर डॉ. कृष्णन म्हणाले, "अशा प्रकारची ही जगातील कदाचित पहिलीच घटना असावी."

असे पुढे आले मदतीचे हात

2017 मध्ये एका न्यूज वेबसाईटने अफशीनच्या आजाराचा लेख प्रकाशित केला होता. यामुळे सगळ्या जगाचं तिच्या या स्थितीकडे लक्ष वेधलं गेलं.

अफशीन, भारत, पाकिस्तान

फोटो स्रोत, AFSHEEN GUL/INSTAGRAM

फोटो कॅप्शन, अफशीन

प्रसिद्ध पाकिस्तानी अभिनेता अहसान खानने त्याच्या फेसबुक वॉलवर अफशीनचा एक फोटो शेअर करून लोकांना मदत करण्याचं आवाहन केलं होतं. अफशीनच्या आईला सनम बलोचने तिच्या मॉर्निंग शोमध्ये बोलावलं होतं. तिच्या कुटुंबाला शस्त्रक्रियेला आर्थिक मदत मिळावी म्हणून यूएसमधील एका संयोजकाने ऑनलाइन निधी उभारणी देखील केली होती.

नोव्हेंबर 2017 मध्ये, सत्ताधारी पाकिस्तान पीपल्स पार्टी (PPP) च्या खासदार नाझ बलोच यांनी ट्विट करून 'सिंध सरकार अफशीनला मोफत उपचार पुरवेल' असं म्हटलं होतं.

2018 च्या फेब्रुवारीमध्ये अफशीनला पाकिस्तानच्या सर्वात मोठ्या खाजगी हॉस्पिटल आगा खान युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. डॉक्टर म्हणाले की, ते तिच्यावर शस्त्रक्रिया तर करतील पण "तिच्या जगण्याचे 50 टक्के चान्सेस आहेत." असं कुंबरने सांगितलं.

अफशीनच्या पालकांनी यावर विचार करण्यासाठी डॉक्टरांकडून वेळ मागून घेतला. त्याच दरम्यान अफशीनच्या मोठ्या बहिणीचं लग्न ठरलं. "आम्ही सर्वजण आमच्या बहिणीच्या लग्नाच्या गडबडीत होतो आणि म्हणून अफशीनवर उपचार पूर्ण होऊ शकले नाहीत." असं तिच्या भावाने सांगितलं.

कुंबर पुढे म्हणाला की कुटुंबातला लग्नसोहळा पार पडल्यानंतर आम्ही अफशीनवर उपचार पुन्हा सुरू करण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. पण त्यांनी सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने आम्ही निराश झालो.

सनम बलोच यांनी मात्र शेवटपर्यंत माघार घेतली नाही. त्यांनी परदेशातील स्वयंसेवी संस्थांशी संपर्क साधून अफशीनच्या उपचाराची व्यवस्था करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्थांनी या कुटुंबाच्या मदतीसाठी तयारी दर्शविली.

2019 मध्ये अफशीन पुन्हा चर्चेत आली. अलेक्झांड्रिया थॉमस नावाच्या एका ब्रिटीश महिला पत्रकाराने तिच्या स्थितीबद्दल आणि तिच्या कुटुंबाच्या आर्थिक स्थितीबद्दल बातमी दिली होती.

अफशीन, भारत, पाकिस्तान

फोटो स्रोत, AFSHEEN GUL/INSTAGRAM

फोटो कॅप्शन, अफशीन भावाबरोबर

थॉमस यांनी अफशीनच्या कुटुंबाला दिल्लीतील डॉ. कृष्णन यांच्याशीही संपर्क साधायला मदत केली. डॉ. कृष्णन यांनीही कुंबरशी बोलून अफशीनला मदत करायला तयार असल्याचं सांगितलं.

अफशीनच्या कुटुंबाने मेडिकल कारण सांगून व्हिसासाठी अर्ज केला आणि गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ते भारतात आले. दारुल सुकून या चाईल्ड केअर ऑर्गनायझेशनने त्यांना या प्रक्रियेत मदत केली.

अडचणींवर मात करत यशस्वी झाली शस्त्रक्रिया

कुंबर सांगतो, अफशीन आणि कुटुंबासाठी हा अत्यंत कसोटीचा काळ होता. "डॉ कृष्णन यांनी आम्हाला सांगितलं की ऑपरेशन दरम्यान तिचं हृदय किंवा फुफ्फुस बंद पडू शकतात."

आर्थिक अडचणीही होत्याच. अफशीनच्या कुटुंबाकडे तिच्या उपचारासाठी पैसे नव्हते. त्यामुळे खर्च भागवण्यासाठी ते ऑनलाइन फंड उभारणीवर अवलंबून होते.

पण डॉ. कृष्णन यांनी कुटुंबाला आशा दिली. कुंबर सांगतो की, या काळात ते बऱ्याच डॉक्टरांच्या संपर्कात होते. पण डॉ. कृष्णन यांच्यासारखे 'संवेदनशील आणि दयाळू' दुसरे कोणीही नव्हते.

त्यांच्या प्रयत्नांमुळे आणि देखरेखीखाली ऑपरेशन यशस्वी झाल्याचं कुंबर सांगतो.

मानेची मुख्य शस्त्रक्रिया करण्यापूर्वी अफशीनवर दोन मोठ्या शस्त्रक्रिया झाल्या होत्या. त्यानंतर आणखी एक मोठी शस्त्रक्रिया करण्यात आली.

फेब्रुवारीमध्ये मुख्य शस्त्रक्रिया झाली. डॉ कृष्णन बीबीसीशी बोलताना म्हणाले की, त्यांनी आणि त्यांच्या टीमने सहा तासांच्या ऑपरेशनमध्ये अफशीनची कवटी तिच्या पाठीच्या कण्याला जोडली. नंतर मान सरळ ठेवण्यासाठी एक स्टिक आणि स्क्रू वापरून कवटी मानेच्या मणक्याला जोडली.

शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर डॉ. कृष्णन यांनी पत्रकारांना सांगितलं की, अफशीन उपचाराशिवाय फार काळ जगू शकली नसती.

पण ती आता हसते आहे आणि बोलते आहे. कुंबरने जुलैमध्ये ईदच्या एक दिवस आधी फेसबुकवर त्याच्या हसणाऱ्या बहिणीचा फोटो पोस्ट केलाय.

पण अजूनही काहीशी गुंतागुंत आहे. ती अजूनही इतर मुलांपेक्षा स्लो आहे आणि तिच्या याच गोष्टीसाठी तिला जज केलं जातंय, असं तिच्या भावाने सांगितलं

"वेळ जाईल तसं सगळं नीट होईल. पण सध्या माझी बहीण जिवंत आहे आणि आनंदी आहे यातच माझं सुख आहे."

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)