पाकिस्तान : कराची शहर आजही हातोडा गँगचं नाव काढलं तर हादरतं कारण....

फोटो स्रोत, Lokesh Sharma/ BBC
- Author, जाफर रिझवी आणि रियाझ सुहैल
- Role, बीबीसी उर्दू, कराचीहून
"त्याने पिस्तुल काढलंच होतं. पण माझ्या शेजारी उभ्या असलेल्या अधिकाऱ्याने कुऱ्हाडीचा घाव घालून गाडीची काच फोडली...आणि आम्ही त्याच्यावर नियंत्रण मिळवलं."
कर्नल (सेवानिवृत्त) सईद यांनी आवेशात येऊन या अटकेच्या घटनेचं वर्णन आम्हाला सांगितलं.
कर्नल सईद हे पाकिस्तानी लष्कराच्या स्पेशल सर्व्हिस ग्रुप (SSG) चे माजी अधिकारी आहेत. त्यांनी सिंध आणि बलुचिस्तान पोलिस खात्यात डीआयजी हे पदही भूषवलं आहे. आता ते वृद्धत्वाकडे झुकलेत, मात्र या वयातही त्यांची स्मरणशक्ती विलक्षण आहे.
कर्नल सईद मला ज्या अटकेबद्दल सांगत होते त्या अटकेने कराचीतील दहशतीचा अर्थात 'हातोडा गँग'चा बीमोड झाला होता.
सन 1985 ते 86 या दरम्यानच्या काळात कराचीत जी भीती आणि दहशत पसरली होती त्याची, एक ते दोन वर्षांत सलग डझनच्यावर झालेले मृत्यू. त्याचीच ही गोष्ट. आजही या घटनेच्या आठवणीने कराची हादरतं.
आणि कर्नल सईद मला किरकोळ अटकेबद्दल सांगत नव्हते.
तर "हातोडा गँग" या कुख्यात अशा आंतरराष्ट्रीय पात्राच्या अटकेचे ते तपशील होते.
पण कर्नल सईद यांनी माहिती देण्याआधी आंतरराष्ट्रीय दहशतवादाशी संबंधित असलेल्या या हातोडा गँगविषयी माहिती घ्यावी लागेल. आणि स्थानिक पातळीवरील या गँगचा जागतिक परिस्थितीशी काय संबंध होता हे समजून घ्यावं लागेल.
त्या काळात पाकिस्तानातील वृत्तपत्रे आणि नियतकालिकांमधून प्रसिद्ध झालेल्या अहवालावरून दिसून येत की, त्या काळात देशाच्या राजकारणात अशांतता असूनही, इतर ठिकाणांच्या तुलनेत कराचीमध्ये कायदा व सुव्यवस्था राखली गेली होती.

फोटो स्रोत, Getty Images
5 जुलै 1977 मध्ये जनरल झिया-उल-हक यांनी तत्कालीन पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांची सत्ता उलथवून देशात मार्शल लॉ लागू केला होता. त्यावेळी जनतेने केलेल्या विरोधामुळे लष्करी सरकारसमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या.
पण 1985 पर्यंत पंतप्रधान मोहम्मद खान जुनेजो यांनी देशात सरकार स्थापन केलं होतं. या सरकारला जनरल झिया यांच्या कारकिर्दीत काम करताना अडचणी निर्माण होत होत्या.
त्यावेळी अफगाणिस्तानातील परिस्थितीमुळे पाकिस्तानच्या या सरकारचे आंतरराष्ट्रीय समुदायाशी विशेषत: अमेरिकेशी चांगले संबंध प्रस्थापित झाले होते.
शेजारच्या अफगाणिस्तानात कमालीची राजकीय अस्थिरता होती. तिथे रशियन सैन्याने 24 डिसेंबर 1979 रोजी सशस्त्र हस्तक्षेप केला. आणि हा हस्तक्षेप 15 फेब्रुवारी 1989 पर्यंत म्हणजे जवळपास दहा वर्षे सुरूच होता.
रशियाने अफगाणिस्तानात केलेल्या हस्तक्षेपाचा अमेरिकेने कडाडून विरोध केला. याचा परिणाम अमेरिकेने अफगाणिस्तानातील प्रतिकार करणाऱ्या गटांना आर्थिक आणि लष्करी मदत देण्याचा निर्धार केला. अमेरिकेच्या या हेतूमध्ये पाकिस्तान मुख्य भाग बनला. पाकिस्तानने या अफगाण प्रतिकार गटांना लष्करी उपकरणं आणि लष्करी प्रशिक्षण देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
पाकिस्तानचा या निर्णयामुळे एकीकडे अमेरिका खूश झाली, पण दुसरीकडे रशियन अधिकाऱ्यांनी याला विरोध करत हा पक्षपात असल्याचं म्हटलं.
अफगाणिस्तानातील रशियन लष्करी हस्तक्षेपाचा पाकिस्तानवरही परिणाम झाला. यात अंदाजे तीस लाख अफगाण निर्वासित सीमावर्ती आदिवासी भागातून पाकिस्तानात घुसले. आपल्या छावण्या किंवा वस्त्यांपुरतं मर्यादित न राहता या निर्वासितांनी रोजगाराच्या शोधात पाकिस्तानचं आर्थिक केंद्र असलेलं कराची गाठलं.

फोटो स्रोत, Lokesh Sharma/ BBC
दरम्यान याच कालावधीत शेजारील देशांमध्येही राजकीय उलथापालथ सुरू होती.
11 फेब्रुवारी 1979 रोजी पाकिस्तानचा शेजारी इराणमध्ये अयातुल्ला रुहोल्लाह खामेनी यांच्या नेतृत्वाखाली शाह रजा शाह पहलवीची यांची सत्ता उलथवून टाकण्यात आली. इराणमध्ये 'क्रांती' सुरू झाली. याशिवाय जवळपास आठ वर्षे सुरू असलेलं इराण-इराक युद्धही जोमात आलं होतं.
त्यावेळी कराचीत काय परिस्थिती होती?
त्या काळात कराचीमध्ये प्रशासकीयदृष्ट्या तीन जिल्हे होते. म्हणजे पूर्व, पश्चिम आणि दक्षिण. कराचीचा मध्य त्यावेळी पश्चिम जिल्ह्याचा भाग होता.
काही संपन्न भाग वगळता, कराचीत बहुतेक मध्यम आणि निम्न मध्यमवर्गीयांच्या जुन्या वस्त्या आणि जुने मोहल्ले होते.
या वस्त्यांमध्ये राहणारे लोक एकमेकांना ओळखायचे. आणि त्याचमुळे त्या वस्त्यांमध्ये एकोप्याचं वातावरण होत. त्यावेळी ना टीव्ही होता ना इंटरनेट, ना सोशल मीडिया ना मोबाईल फोन. लोकांची जीवनशैली एकदम साधी होती.
हातोडा गँगचा उदय
आणि अचानक कराचीच्या या शांतीपूर्ण वातावरणात एका टोळीचा जन्म झाला. हातोडा गँगचा...
ही गोष्ट आहे एप्रिल 1985 ची. मुलतानचा रहिवासी असलेले अल्लाह वसाया त्या रात्री खैबर मेलने कराचीला पोहोचले होते आणि क्लिफ्टनजवळ राहणाऱ्या त्याच्या नातेवाईकांकडे जाणार होते. रात्र झाल्याने त्यांनी ती रात्र पुलाखाली काढू असं ठरवल.
ते झोपले तेव्हा पुलाखाली होते. पण जेव्हा शुद्धीवर आले तेव्हा मात्र त्यांचं शरीर रक्ताने माखलेल होतं. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती आणि रक्तस्त्राव सुरूच होत. अल्लाह वसायाच्या आसपास जखमी झालेले आणखी असेच दोन लोक पडले होते. ते मृत पावले होते. 2 एप्रिल 1985 रोजी घडलेली ही घटना कराचीतील हातोडा गँगने केलेल्या पहिल्या हल्ल्याची घटना होती.
या घटनेच्या दोनच दिवसांनंतर क्लिफ्टन ब्रिजपासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या पीर बुखारी शाह ऊर्फ जिंदा पीर यांच्या दर्ग्याच्या आवारात आणखी दोन मृतदेह आढळून आले. या दोघांना ही त्याचप्रकारे ठार करण्यात आलं होत. हे दोघेही पीरमजार मागच्या बाजूला जिथं मेळावा भरतो त्या भागात झोपले होते.
दरम्यान काही आठवड्यांनंतर, 21 एप्रिल रोजी सिटी स्टेशनवर तीन लोकांची हत्या करण्यात आली होती. ते तिघेही रात्री प्लॅटफॉर्म क्रमांक एक आणि चार वर झोपले होते. त्यात एक फकीर आणि एक कुली यांचा समावेश होता. मात्र केवळ कुलीची ओळखच पटवता आली. त्याच रात्री करसाज ते एअरफोर्स हॉल्ट दरम्यान रेल्वे रुळावर एक मृतदेह आढळून आला. त्या मृतदेहाच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा मृत्यू झाला होता. 24 एप्रिलपर्यंत अशा प्रकारे मृतांची संख्या नऊवर गेली होती.
निर्जन भाग आणि रेल्वे मार्गावर घडणाऱ्या अशा घटनांमुळे वस्तीच्या भागात आणि गल्लीबोळात घबराट पसरली.

फोटो स्रोत, Lokesh Sharma/ BBC
यानंतर जुना गोलिमार परिसरातील ल्यारी नदीच्या काठावरील हसन ओलिया गावात घडलेल्या घटनेने मात्र तत्कालीन सरकार आणि प्रशासन चांगलंच हादरलं होतं. या घटनेत एकाच कुटुंबातील मुलांसह सात जणांना अशाच प्रकारे डोक्यावर जड वस्तूचा प्रहार करून ठार करण्यात आलं होतं.
या घटनेत माजी नगरसेवक अब्दुल गनी यांच्या दोन म्हेवण्या आणि भाची यांचा मृत्यू झाला. अब्दुल गनी यांच्या म्हणण्यानुसार, ही घटना रात्रीच्या सुमारास घडली. सकाळी नेहमीप्रमाणे दरवाजा उघडला नाही म्हंटल्यावर शेजारचे काळजीत पडले. त्यांनी आतमध्ये उडी मारून पाहिलं तर आत मृतदेह पडलेले होते.
त्यांचे आणखीन एका नातेवाईक एहसान सांगतात की, तीन मृतदेह एका खोलीत आणि चार मृतदेह दुसऱ्या खोलीत होते. मृतांमध्ये एका मुलाचाही समावेश होता. तर अजून एक मुलगा झोपेतचं पलंगाखाली गेल्याने तो मारेकऱ्यांच्या लक्षात आला नाही आणि तो वाचला.
त्यानंतर मात्र अशा घटना संपूर्ण शहरभर घडू लागल्या.
घराबाहेर, रस्त्यावर किंवा फुटपाथवर झोपलेले लोक, मजूर, भिकारी, रोजगाराच्या शोधात कराचीत येणारे परदेशी, दुकानांमध्ये आणि छोट्या हॉटेल्समध्ये काम करणारे कामगार हे बळी ठरू लागले.
1986 च्या सुरुवातीला घडलेल्या अशाच एका मोठ्या घटनेनंतर गुप्तचर यंत्रणांचेही कान टवकारले.

फोटो स्रोत, Lokesh Sharma/ BBC
पत्रकार तनवीर बेग यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना फेडरल बी भागातील मुसा कॉलनी या कामगार वसाहतीत घडली होती. रस्त्यावर झोपलेल्या आठ कामगारांची जड शस्त्रांने हत्या करण्यात आली होती.
यावेळी संसदेत निवडून आलेल्या सदस्यांनीही हा मुद्दा मांडला. त्यानंतर तपासासाठी पोलिसांसह कायदा अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांचे विशेष पथकही तयार करण्यात आले.
त्यावेळी अलाउद्दीन खानजादा हे उर्दू वृत्तपत्र जसारतचे क्राईम रिपोर्टर होते.
ते सांगतात, "सुंदर शहर म्हणून ओळख असलेल्या कराचीमध्ये हे गुन्हेगार सक्रिय झाले होते. शहराच्या जुन्या भागात, म्हणजे ओल्ड सिटी एरियातील अनेक जुन्या वस्त्यांमध्ये घराबाहेर झोपण्याची किंवा शेजाऱ्यांशी गप्पा मारण्याची प्रथा आजही प्रचलित आहे. तेव्हा घराबाहेर खाट टाकली जाई. लोक बराच उशिरापर्यंत जागे राहायचे आणि बेफिकीर होऊन झोपायचे. वस्तीतील हे लोक खरे तर त्या गुन्हेगारांच्या वाटेतला सर्वात मोठा अडसर होते. सायंकाळपर्यंत ही गजबज संपावी आणि आणि दरोडा टाकण्याची संधी सहज मिळावी, म्हणून डोकं फोडून लोकांना संपवण्याच्या घटनांचा ऊत आला असं बहुतांश पोलिस अधिकाऱ्यांचं मत होत."
अलाउद्दीन सांगतात की, ल्यारी भागातही एक घटना घडली होती ज्यात महिला आणि पुरुषांसह नऊ जणांची हत्या करण्यात आली होती.
तनवीर बेग सांगतात की, जवळपास शंभर लोकांचा या घटनांमध्ये बळी गेला.
त्यावेळी उर्दू वृत्तपत्रांमधून 'मारेकरी' अंगावर तेल किंवा वंगण लावून येतात असा कयास लावायला सुरुवात केली होती. जेणेकरून कोणी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला तरी ते पकडले जाऊ नयेत आणि सहज फरार होता येईल म्हणून.
सिंध पोलिस दलातील माजी आयजी अफझल शिगरी म्हणतात की, पंजाबच्या काही भागात यापूर्वी अशाच घटना घडल्या होत्या, परंतु त्या कोणत्याही संघटित गुन्हेगारीचा भाग नव्हत्या.
अफझल शिगरी 1988 मध्ये कराचीचे पोलिस प्रमुख होते. तर 1993 मध्ये ते सिंधचे आयजी म्हणून नियुक्त झाले होते.
अफझल शिगरी बीबीसीशी बोलताना सांगतात, "पहिल्यांदा रावळपिंडीत अशी एक भयानक घटना घडली. त्यानंतर झेलम आणि नंतर काश्मीर आणि त्यानंतर हजारा विभागात अशाच घटना घडल्या. मुरी रोड (रावळपिंडी) वरील कमिटी चौकाजवळ महिला आणि मुलांसह एका कुटुंबाची हत्या करण्यात आली. ही हत्या झाल्याने लोकांमध्ये प्रचंड भीती व घबराट निर्माण झाली."
ते सांगतात, "नंतर माझी बदली झाली, पण एक आरोपी पकडण्यात यश आलं होतं. तो सायको 'सिरियल किलर' होता. तो हत्या केल्यानंतर महिलांचे लैंगिक शोषण करायचा नाही. मात्र महिलांच्या शरीराच्या खालच्या भागातील वस्त्र काढून न्यायचा. जेव्हा तो पकडला गेला तेव्हा त्याने आणखी दोन घटनांची कबुली दिली. पण त्याचा कराचीच्या हातोडा गँगशी काहीही संबंध नव्हता."
हातोडा गँग हे नाव कसं पडलं?
26 एप्रिल 2015 रोजी पाकिस्तानचं इंग्रजी वृत्तपत्र 'डॉन'मध्ये नदीम फारुक पराचा यांचा एक लेख छापून आला होता. त्या लेखानुसार, 1985 मध्ये दक्षिण जिल्ह्यातील बर्न्स रोडच्या फूटपाथवर झोपलेल्या भिकाऱ्यावर हल्ला झाला तेव्हा पोलिसांना हे प्रकरण एकाच व्यक्तीने किंवा मग एखाद्या सिरीयल किलरने केलेला गुन्हा असंच वाटत होतं.
मात्र या हल्ल्यातून बचावलेल्या भिकाऱ्याने पोलिसांना सांगितलं की, "तो झोपला होता. काहीवेळाने त्याला रस्त्यावर कारची चाक घासल्याचा आवाज आला आणि त्याला जाग आली. कारमधून पांढरे कपडे घातलेले चार जण बाहेर पडले. त्यांनी काळ्या कपड्याने तोंड झाकले होते. गाडीतून उतरल्यानंतर ते त्याच्याजवळ गेले आणि त्यांच्यापैकी एकाने त्याच्या डोक्यावर हातोड्याने जोरदार प्रहार केला, त्यामुळे तो बेशुद्ध पडला."
लेखात पुढे असं ही लिहिलयं की, तो मेलाय असं समजुन हल्लेखोरांनी तिथून पळ काढला. त्यानंतर जखमी भिकाऱ्याने आरडाओरड केल्यावर स्थानिक लोकांनी त्याला रुग्णालयात दाखल केलं.
जेव्हा पोलिसांनी हा जबाब नोंदवला तेव्हा एकीकडे पोलीस आणि गुप्तचर यंत्रणांनी घटनेकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलला. या घटना म्हणजे एकाच सायको सिरियल किलरचं काम नसून एक विचारपूर्वक आखलेली योजना आहे. एक संघटित टोळी. आणि याचा सुनियोजित प्लॅन आहे.
दुसरं म्हणजे वृत्तपत्रांनी या संघटित टोळीचं नामकरण हातोडा गँग असं केलं.
साहजिकच अशा घटना यापूर्वीही घडल्या होत्या. मग काय? लवकरच उर्दू वृत्तपत्रांच्या 'मसालेदार' बातम्यांमधून अत्यंत भीषण अशा हत्येच्या घटना भय आणि दहशतीचे प्रतीक बनल्या.
लवकरच, उर्दू वृत्तपत्रांनी राजकीय परिस्थितीच्या संदर्भात, रशियन गुप्तचर संस्था 'केजीबी' आणि अफगाण गुप्तचर संस्था 'खाद' यांच्याशी संबंधित असलेल्या काल्पनिक बातम्यांमध्ये या घटनांचा संदर्भ दिला. तर कोणी या घटना म्हणजे आपली शक्ती वाढवण्यासाठी जनरल झिया यांच्या लष्करी राजवटीचा पराक्रम सांगितला.
परंतु सरकारी स्त्रोताने किंवा अधिकाऱ्यांनी, राजकीय वर्तुळातील लोकांनी अशा कोणत्याही बातम्यांना दुजोरा दिला नाही.
डॉनच्या या वृत्तपत्राच्या म्हणण्यानुसार तर एका इंग्रजी मासिकाला या घटना "सैतानी पंथाच्या" "इंटेलिजन्स क्लब" ला जोडायच्या होत्या.
मजहर अब्बास हे डॉन ग्रुपच्या दुपारी प्रकाशित होणाऱ्या 'स्टार' या इंग्रजी वृत्तपत्राचे क्राइम रिपोर्टर होते.

फोटो स्रोत, Lokesh Sharma/ BBC
मजहर अब्बास सांगतात, "आज मागे वळून पाहताना कराचीचे राजकीय महत्त्व लक्षात घेतलं तर असं दिसतं की एका खास योजनेअंतर्गत भीतीचं वातावरण ठेवण्याची ही प्रवृत्ती मागील अनेक दशकांपासून सुरू आहे. नाहीतर हातोडा गँगसारखी कारवाई अचानक सुरू होऊन अचानक कशी संपली? आणि यांचं टार्गेट कोण होत? नोकरदार वर्ग, बेघर, रस्त्यावर झोपणारी माणसे...यांना टार्गेट करण्याचं कोणतही कारण समजत नाही. हा प्रकार नक्की काय होता?"
कारण या घटनांमध्ये कुणालाही अटक झाली नाही.
मजहर अब्बास म्हणाले की, या घटना पाकिस्तानातील इतर शहरांमध्येही घडल्या. परंतु तत्कालीन सरकार किंवा कोणत्याही सरकारी यंत्रणेकडून कोणत्याही प्रकारचा वैज्ञानिक किंवा अत्याधुनिक तपास करण्यात आलाच नाही. त्यावेळच्या पोलीस अधिकाऱ्यांचा शोध घेऊन आता या प्रकरणाचा तपास केला, तर संपूर्ण प्रकरण नेमक काय होतं, याचा तपशील तुम्हाला मिळू शकेल."
किंबहुना 'हातोडा गँग'ची वास्तविकता काय होती हे ही माहीत नव्हतं.
त्या काळातील अनेक पोलीस आणि काही नागरी गुप्तचर संस्थांच्या वरिष्ठ अधिकार्यांशी झालेल्या संभाषणावरून असं समजतं की, त्यांच्यापैकी अनेकांना या घटनेची सत्यता माहित आहे. मात्र काही कारणांमुळे उघडपणे व्यक्त व्हायला हे लोक टाळाटाळ करतात.
ही वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी मी सर्वप्रथम सिंध पोलिस दलातील माजी आयजी आफताब नबी यांच्याशी संपर्क साधला. आफताब नबी हे कराचीचे पोलिस प्रमुख (डीआयजी) आणि फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीचे (एफआयए) सहसंचालक देखील होते.
कराचीमध्ये हातोडा गँगची चर्चा होती त्या कालावधीत, म्हणजे जुलै 1984 ते जून 1985 या कालावधीत ते पाकिस्तानच्या सिव्हिल इंटेलिजन्स ब्युरो (IB) च्या राजकीय विभागात तैनात होते.
आफताब नबी सांगतात, "जेव्हा या घटना सुरू झाल्या आणि बेघर लोकांना टार्गेट करण्यात येऊ लागलं, सामान्य नागरिकांचे जीवन धोक्यात आलं तेव्हा इतर सर्व कायद्याची अंमलबजावणी करणार्या एजन्सीच्या अधिकार्यांप्रमाणे आमच्यावरही खूप दबाव यायला लागला."
"राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, मुख्य सचिव या सर्वांनीच आदेश दिला होता की, यासर्व घटनेच्या पाठीमागे कोणाचा हात आहे ते शोधा?"
"या सर्व घटना रात्रीच्या अंधारात दोन ते पाच वाजण्याच्या दरम्यान घडायच्या. आणि साधारणपणे पहाटे उजाडल्यावर, रात्री कोणीतरी कोणाचं तरी डोकं फोडून करून खून केल्याचं समजायचं."
"असं भयंकर वातावरण तयार झालं होतं की ज्याची कल्पना करणं केवळ अशक्य होतं. कुठे तीन होत तर कुठे चार तर कुठे दोन, कुठे एक असे खून व्हायचे. मृतांच्या डोक्याला गंभीर दुखापत झालेली असायची. जणू त्यांना खूप जड अशा कोणत्यातरी गोष्टीने मारलं असावं. यातल्या बहुतेक घटना या दक्षिण जिल्हा, केंट रेल्वे स्टेशन, सिटी रेल्वे स्टेशन किंवा कोरंगी इथं घडल्या होत्या. कारण इथे बऱ्यापैकी कामगार वर्ग आणि बेघर लोकांच्या वस्त्या होत्या."
"पण हे कोण करतंय हे काही माहीत पडलंच नाही. लोकांमध्ये भीती आणि घबराट पसरली होती. तुम्ही याला दहशतवाद देखील म्हणू शकता. त्या वेळी इतर गुन्हे देखील घडत होते परंतु या घटनांची भीती आणि दहशत जास्त होती. मग आम्ही रात्री तीन वाजेपर्यंत गस्त घालायला सुरुवात केली. पण तपास अधिकार पोलिसांकडे असल्याने ते काम पोलिसांचं होत,आम्ही तर आयबीमध्ये होतो. आमचं काम म्हणजे शक्य तितकी माहिती उपलब्ध करून संबंधित कार्यालयांना देण्याचं होत."
त्यानंतर सिंध पोलिसांना या घटनेचं रहस्य उलगडण्यात काही प्रमाणात यश मिळालं. आणि त्याचा सुगावाही सापडला.
त्यांनी दावा केला की, ह्या घटनांचे पुरावे एकदम गुप्त ठेवण्यात आले आहेत. यामागे कोण होत हे सरकारी पातळीवर आम्हाला सुद्धा सांगितलं नाही. आणि त्यानंतर अचानकचं या सर्व घटना थांबल्या.
सिंधचे माजी आयजी अफझल शिगरी सांगतात, "जेव्हा कराचीमध्ये हातोडा गँगच्या या घटना सुरू झाल्या, तोपर्यंत पंजाबमध्ये 'सायको सिरीयल किलर'च्या घटना घडत होत्या. त्यामुळे आम्ही (सिंध पोलीस आणि इतर एजन्सीसोबत) पुराव्यांची तुलना केली.
ते म्हणतात, "जर हातोडा गँग ही कोणत्या शत्रू देशाने केलेलं ऑपरेशन असेल ज्याद्वारे त्यांना लोकांमध्ये भीती आणि दहशत पसरवायची असेल तर अशी शक्यता आहे की, पंजाबमध्ये घडलेल्या घटनांमुळे भीती प्रचंड प्रमाणात वाढली होती. आणि नेमक्या त्याच पद्धतीने ही भीती कराचीत पण पसरवता येऊ शकत होती."
भीती पसरवण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे असं हातोडा गँगला वाटलं असावं म्हणून त्यांनी कराचीतही हाच प्रयोग केला.
दोस्त अली बलोच हे कराची पोलिसांच्या दहशतवादविरोधी शाखेचे (ATW) प्रमुख होते.
ते कराची पोलिसांच्या गुप्तचर विभागाच्या विशेष शाखेचे प्रमुख (एसएसपी) देखील होते.
12 नोव्हेंबर 1997 मध्ये अमेरिकन ऊर्जा एजन्सी युनियन टेक्सासच्या चार अमेरिकन कर्मचाऱ्यांची हत्या असो वा 23 जानेवारी 2002 रोजी अमेरिकन मासिक वॉल स्ट्रीट जर्नलचे अमेरिकन पत्रकार डॅनियल पर्ल यांचे अपहरण आणि हत्या असो. दोस्त अली बलोच हे बऱ्याच वर्षांपासून कराचीतील दहशतवादाच्या जवळपास प्रत्येक घटना, तपासाच्या प्रत्येक टप्प्यात, दहशतवादाशी आणि अटकेशी थेट संबंधित राहिले आहेत.
हातोडा गँगच्या घटना जेव्हा सुरू झाल्या, त्यावेळी ते कराची पोलिसांच्या स्पेशल ब्रांच मध्ये रुजू झाले होते.
हातोडा गँगचे सत्य
दोस्त अली बलोच स्पष्ट सांगतात की, "जेव्हा ATW चे संघटन करण्यात आलं होतं तेव्हा आम्ही सेवानिवृत्त झालेल्या 'वरिष्ठ ऑपरेटर' दोबार नियुक्त केलं होतं. त्यांच्या थेट संभाषणावरून आणि एसएसपी स्पेशल ब्रांचच्या रेकॉर्डवरून मला दिसलं की, कोणत्यातरी एजन्सीने 'पाक लिबिया होल्डिंग' (दोन्ही देशांमधील गुंतवणुकीसाठी स्थापन केलेला संयुक्त निधी किंवा संस्था) नावाच्या उपक्रमात गुंतलेल्या व्यक्तीला 'मुख्य संशयित' लिस्ट डाऊन केलं होतं. हा लिबियन नागरिक होता."
"पाक-लिबिया होल्डिंग ही एक प्रकारची गुंतवणूक बँक होती. त्याकाळात जसं शेख झायेद प्रशासनाने शेख झायेद फाउंडेशन तयार केल होत किंवा कुवेत फंडाची स्थापना केली होती, जसं पाक-सौदी इन्व्हेस्टमेंट स्थापन झाली होती, त्याचप्रमाणे पाक-लिबिया होल्डिंग देखील एक व्यावसायिक आधारावर स्थापन झालेली संस्था होती."
मात्र, गुप्तचर यंत्रणांच्या निदर्शनास आल्यानंतरही हा संशयित लगेच पकडला गेला नाही. उलट, दीर्घ काळ पाळत ठेवल्यानंतर आणि त्याच्याविरुद्ध भरपूर पुरावे जमा केल्यानंतर त्याला थेट ताब्यात घेण्यात आलं.

फोटो स्रोत, Lokesh Sharma / BBC
दोस्त अली बलोच यांनी दिलेल्या माहितीतून एक प्रकारचा संकेत मिळाल्यानंतर, मी एका अत्यंत उच्चस्तरीय सरकारी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर आणि मी केलेल्या विनंतीमुळे, 'मी केवळ तुम्हाला, आरोपीला अटक केलेल्या अधिकाऱ्यांच नाव सांगू शकतो' असं सांगितलं. मात्र त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचे काम तुम्हाला स्वतः करावे लागेल असं ही ते म्हणाले. आणि ते नाव होतं कर्नल सईद.
कोण आहेत कर्नल सईद?
हातोडा गँगच्या आरोपींना पकडण्यासाठी पोलिस आणि गुप्तचर यंत्रणांच्या संयुक्त कारवाईत कर्नल सईद हे मुख्य पात्र होते.
ऑक्टोबर 1961 मध्ये ते सैन्याच्या बलूच रेजिमेंटमध्ये दाखल झाले. मात्र लवकरच त्यांना लष्कराच्या विशेष सेवा गटात (एसएसजी) समाविष्ट करण्यात आलं. एसएसजी जवान आणि अधिकाऱ्यांना विशेष प्रशिक्षण दिलं जातं, ज्याला 'कमांडो ट्रेनिंग' म्हणतात.
सोमवार, 15 एप्रिल 1985 ला, जेव्हा सर सय्यद गर्ल्स कॉलेजची विद्यार्थिनी बुशरा झैदी हिचा एका वाहतूक अपघातात मृत्यू झाला तेव्हा हिंसाचार उसळला. आणि त्याला हाताळण्यासंबंधी कराची पोलिसांच्या उणिवा उघड झाल्या. त्यावेळी पोलिसांना प्रशिक्षण देण्याची आणि दलाच्या पुनर्रचनेची गरज भासू लागली. त्यानंतर पोलीस आणि राज्य अधिकार्यांनी संयुक्तपणे सैन्याला विनंती केली की सिंध पोलिसांना प्रशिक्षण देण्यासाठी सैन्यातील काही (एसएसजी प्रशिक्षित) अधिकारी पाठवून द्यावे.

फोटो स्रोत, Lokesh Sharma/ BBC
निवडलेल्या तीन लष्करी अधिकार्यांपैकी एक होते कर्नल सईद. ते सिंध पोलिस दलात सेवा कर्तव्यावर आले. त्यांची पोलिस प्रशिक्षण केंद्र, सैदाबादचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली.
त्यानंतर कर्नल सईद यांची डीआयजी सिंध राखीव पोलिस (एसआरपी) म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांनी कलात बलुचिस्तान पोलिस दलात डीआयजी म्हणूनही काम केल.
कर्नल सईद यांनी मला सांगितलं की जेव्हा हातोडा गँगच्या घटना सुरू झाल्या, तेव्हा सिंधचे आयजी आगा सआदत अली शाह यांनी मला फोन केला आणि सांगितलं की, सिंध पोलिसातील कोणत्याही अधिकाऱ्याला लष्कराच्या एसएसजीसारखे प्रशिक्षण मिळालेलं नसल्यामुळे तुम्हाला या अटकेची जबाबदारी घ्यावी लागेल.
कर्नल सईद म्हणाले, "सआदत अली शाह यांचा आदेश ऐकल्यानंतर मी हे करणार नाही, म्हणून स्पष्टपणे नकार दिला होता. ते माझं काम नव्हतं. ज्या देशात पंतप्रधानांना फाशी देण्यात येऊ शकते त्या देशात मी माझ्या अधिकारक्षेत्राबाहेरील काम कसं करू शकतो? ही माझी ड्युटी नाही आणि मी हे करणार नाही. जेव्हा त्यांनी आग्रह धरलाच तेव्हा मात्र मी त्यांना सांगितल की तुम्ही सरकार मधील उच्च अधिकाऱ्याला मला असे आदेश द्यायला सांगा."
"जेव्हा मी सआदत अली शाह यांना नकार देऊन परत आलो, तेव्हा आयबीचे तत्कालीन प्रमुख ब्रिगेडियर नेक मुहम्मद माझ्याकडे आले आणि म्हणाले की ही अटक करायची आहे. मी ब्रिगेडियर नेक मुहम्मद यांनाही सांगितले, सर! तुम्ही आर्मी ऑफिसर आहात आणि मी सिंध पोलिस दलात आहे. तुम्ही माझे कमांडर नाही. सिंधचे आयजी माझे कमांडर आहेत, मी थेट तुमचे आदेश कसे मानू? यात काही गडबड झाली तर कोणीही मदत करत नाही."
त्यांनी दावा केला की, "त्यानंतर मला सिंधचे तत्कालीन गव्हर्नर आणि डीएमएलए (डेप्युटी मार्शल लॉ अॅडमिनिस्ट्रेटर) जनरल जहांदाद खान यांनी बोलावलं. त्यांनी मला लिबियन आरोपींना अटक करायची आहे असं सांगितलं. मी म्हणालो, "सर, माझी लहान मुलं आहेत. जर का काही गडबड झालीच तर? मी मर्यादा ओलांडून कसं काम करू?" त्यावर जनरल जहांदाद खान मला म्हणाले, 'राष्ट्राच्या हितासाठी तु हे काम माझ्या जबाबदारीवर कर. मी तुझ्या मागे उभा आहे.' शेवटी मग मी हो म्हणालो."
प्रकरण उघडकीस आलं?
कर्नल सईद यांनी दावा केला की "गुप्तचर विभागाच्या माहितीनुसार, लिबियन होल्डिंग (बँक) चा प्रभारी 'अम्मार' असं नाव असलेला आरोपी होता.
लिबिया हा तर पाकिस्तानचा मित्र देश आहे, पाकिस्तानात दहशतवाद पसरवून त्यांना काय फायदा ? या प्रश्नावर कर्नल सईद म्हणाले, "त्यावेळी अमेरिकेशी आपले चांगले संबंध होते आणि त्यांना ते आवडत नव्हतं."
दोस्त अली बलोच स्पष्ट करतात की अधिकाऱ्यांच्या मते हे लिबियाचे अधिकृत धोरण नव्हते.
काही अधिकाऱ्यांच्या मते, अफगाणिस्तानात रशियाच्या लष्करी हस्तक्षेपाविरुद्ध पाकिस्तान अमेरिका हे देश अफगाण विरोधकांबद्दल सहानुभूती दाखवत होते. आणि हेच रशियन समर्थक असणाऱ्या अफगाण सरकारला आणि इतर अनेक देशांना आवडलं नव्हतं.
दोस्त अली बलोच यांनी दावा केलाय की त्यावेळचं "सोव्हिएत साम्राज्य" देखील त्यांचा वापर शकलं असतं. मात्र संबंधित व्यक्तीला इथं 'स्लीपर सेल' म्हणून पाठवण्यात आलं आणि त्यानंतर त्यांनी नेटवर्क उभारलं.

फोटो स्रोत, Lokesh Sharma/ BBC
ते म्हणाले की, "हातोडा गँग वेगळं असं काहीच नव्हतं. हा एक मोठ्या रहस्याचा भाग होता. रातोरात परिणाम मिळवणं हा त्यांचा उद्देश असू शकत नाही. उदाहरण म्हणून तुम्ही जेव्हा संगीत ऐकता तेव्हा ढोल, तबला, सतार, बासरी अशी अनेक वाद्ये वाजत असतात. हेच जर तुम्ही त्यांना वेगळवेगळं करून ऐकलं तर लक्षात येणार नाही, मात्र ते एकत्र ऐकले की कळतं की हा तर सूर आहे. अगदी तसंच दहशतवादाच्या घटना एकेक बघितल्या तर काही समजत नाही. पण जर सर्व लिंक जोडल्या तर समजतं की हा तर मोठा गेम आहे."
पत्रकार मजहर अब्बास यांनी मला सांगितलं, "2009 मध्ये एआरवाय टीव्हीसाठी दिलेल्या मुलाखतीत (यूट्यूबवर उपलब्ध) जनरल हमीद गुल, माजी आयएसआय प्रमुख यांनी मला सांगितलं होतं की, सोव्हिएत युनियनचे शासक गोर्बाचेव्ह यांचे प्रतिनिधी पाकिस्तानात आले होते. त्यांनी पाकिस्तान सरकारकडे आग्रह धरला होता की येणाऱ्या सार्वत्रिक निवडणूका पुढे ढकलाव्या अशी रशियन नेतृत्वाची इच्छा आहे."
ते सांगतात, "कदाचित याचाही काहीतरी संबंध असावा. कारण हे सर्व अशा वेळी घडत होत जेव्हा अफगाण निर्वासितांचा ओघ पाकिस्तानात सुरू झाला होता. पाकिस्तानातील लोक हेरॉइनसारखी ड्रग्ज आणि कलाश्निकोव सारखी हत्यार पहिल्यांदाच बघत होते."
त्यामुळे मोठी लोकसंख्या असलेलं कराची शहर शस्त्रास्त्र आणि अंमली पदार्थ या दोन्हींची मोठी बाजारपेठ बनू शकत होत. त्यामुळे अशा नेटवर्कचा हातोडा गँगशी काही संबंध असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हातोडा गँगची काम करण्याची पद्धत
कर्नल सईद दावा करतात की, या 'संघटित नेटवर्कमध्ये पाकिस्तानीही सामील असावेत. "जे पाकिस्तानात पण होते आणि लिबियात देखील होते."
दोस्त अली बलोच यांनी देखील स्पष्ट केलं की, "नक्कीच स्थानिक इंफ्रास्ट्रक्चर अस्तित्वात असतंच. संपूर्ण नेटवर्क बाहेरून आणता येत नाही."

फोटो स्रोत, Lokesh Sharma/ BBC
कर्नल सईद यांच्या म्हणण्यानुसार, "गुप्तचर विभागाच्या माहितीनुसार, लिबियामध्ये राहणाऱ्या आमच्या (पाकिस्तानी) लोकांना पाकिस्तानात आणण्यात आलं होतं. इथे एका IB अधिकाऱ्याच्या (इन्स्पेक्टर लतीफ) मदतीने त्यांना विमानतळावर सर्व शक्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. लिबियातून संध्याकाळी फ्लाईट यायची, रात्री लोक मारण्याच्या घटना घडायच्या आणि त्या रात्रीतच ते मारेकरी परतायचे. हे लोक कराची किंवा पाकिस्तानमध्ये जिथे राहायचे तिथेच गुन्हे करायचे.
अटक कशी झाली?
कर्नल सईद म्हणतात की आयबीने दिलेल्या गुप्त माहितीनुसार, पाक-लिबिया होल्डिंग्जचा प्रमुख (हातोडा गँगचा म्होरक्या) अम्मार हा कराचीच्या डिफेन्स एरियातील फेज-फाइव्हच्या 23 व्या स्ट्रीटजवळ राहायचा. आपल्या ठिकाणापर्यंत पोहोचण्यासाठी ते लोक याच मार्गाचा वापर करायचे.
ते पुढे सांगतात, "मग मी 23 व्या स्ट्रीटवर शोध घेतला. अम्मार नावाचा आरोपी हा 48 ते 50 वर्षांचा क्लीन शेव्ह केलेला माणूस होता. तो त्याच्या ड्रायव्हरसोबत प्रवास करायचा. म्हणून आम्ही त्याला त्या ठिकाणी पकडण्याची योजना आखली."
"तिथून रस्ते तीन वेगवेगळ्या दिशेने वळतात. मी पहाटेपासून तिन्ही रस्त्यांवर नाकाबंदी करवून घेतली होती. तो एका निळ्या रंगाच्या रॉयल सलून कारमध्ये होता. तो निघाला तेवढ्यात मी त्याला थांबवलं. मी थांबवल्यावर त्याने पिस्तूल काढलचं होत. पण माझ्यासोबत असलेल्या एका अधिकाऱ्याने कुऱ्हाडीने कारची खिडकी तोडली आणि दरवाजा उघडल्याबरोबर आम्ही त्याला कारमधून बाहेर काढले."
"आम्ही त्याच्यावर नियंत्रण मिळवून त्याला आमच्या गाडीत बसवलं. तिथे आजूबाजूला घर होती. तिथले वॉचमन आमच्याकडे बघत होते. पण आम्ही त्याला गाडीत बसवून घेऊन गेलो आणि त्याला आयबी अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिलं."
"नंतर तपासात त्याने गुन्ह्याची कबुली दिली आणि पाकिस्तानातील एक आयबी अधिकारीही त्याच्याशी संबंधित असल्याचं त्याने सांगीतलं. तो त्याला विमानतळावर ये-जा करायला मदत करायचा. तपासात त्या अधिकार्याचे नावही समोर आल्यावर संबंधित अधिकार्यांनी त्याची चौकशीही केली. त्यावेळी अम्मारने ज्यावर जबाब दिला होता तो कागदाच या अधिकाऱ्याने खाऊन टाकला."
पण या पाकिस्तानी अधिकाऱ्याचं काय होणार होत ? जेव्हा या घटनेचं रहस्य उलगडलं तेव्हा त्या लिबियन नागरिकावर ना कोणतीही कायदेशीर कारवाई करण्यात आली ना त्यांच्यावर कोणतेही आरोप दाखल केले गेले. त्याऐवजी, त्याला एक नापसंत व्यक्ती म्हणून लेबल करून लिबियामध्ये पाठवण्यात आलं. कारण त्याच्याकडे असलेल्या डिप्लोमेट व्हिसामुळे त्याला डिप्लोमेट इम्युनिटी होती.
कर्नल सईद यांनी दावा केलाय की, 'त्या व्यक्तींच्या अटकेनंतर आणि त्याला हद्दपार केल्यानंतर देशात हातोडा गँगशी संबंधित एकही घटना घडली नाही.'
ते म्हणाले की, "हे सर्व कोणाच्या इशाऱ्यावर सुरू होत हे मात्र मी सांगू शकत नाही."
"खर्या आरोपींना अटक केल्यावर लोकल लेव्हलवर असणार नेटवर्क पण तोडण्यात आलं," असं दोस्त अली बलोच सांगतात.
दोस्त अली बलोच सांगतात की, ज्या रात्री गुन्हा घडायचा त्याच रात्री हातोडा गँगच्या सदस्यांना लिबियात परत पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली होती. त्या काळात कॅमेरे वगैरे नव्हते, कम्युनिकेशन ही तितकास वेगवान नव्हत. पण नंतर कळलं की कोणीतरी आम्हाला शत्रू म्हणून निवडलं होत, पण आपल्याला अंदाज आला नाही.
या मुद्द्यावर पाकिस्तानी अधिकार्यांच्या दाव्यांना उत्तर देता यावं म्हणून लिबिया, रशियन किंवा अफगाण सरकारची बाजू समजून घेणे ही बीबीसी आपली नैतिक जबाबदारी असल्याचं मानतं.
पण आता लिबियाचे तत्कालीन शासक कर्नल गद्दाफी ह्यात आहेत ना त्यांचे सरकार अस्तित्वात आहे.
आता सोव्हिएत युनियन अस्तित्वात नाही. सोव्हिएतने केलेल्या कृतींपासून त्यांचा बचाव करण्यासाठी किंवा त्यांच्यावरील संभाव्य आरोपांना योग्य उत्तर देण्यासाठी कोणताही एजन्सी नाही.
आणि अफगाणिस्तानात बबरक कारमल किंवा डॉ. नजीब यांच रशियन समर्थक सरकार ही अस्तित्वात नाही. सोबतच पाकिस्तानी अधिकार्यांच्या दाव्यांना उत्तर देण्यासाठी किंवा त्यांनी लावलेल्या आरोपंच खंडन करण्यासाठी कोणताही अधिकारी अस्तिवात नाही.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








