जावेद इक्बाल पाकिस्तान : 100 मुलांचे खून करणाऱ्या व्यक्तीच्या जीवनावरील चित्रपट वादात

फोटो स्रोत, YASIR HUSSAIN INSTAGRAM
"सोशल मीडियावर लोकांना बराच फावला वेळ असतो, त्यामुळे ते काहीतरी लिहीत राहतातच. इतके ट्रेलर नि टीझर प्रदर्शित झालेले आहेत. पण या छोट्या चित्रपटाने लोकांनी हादरवलं आहे. या चित्रपटात काय आहे ते लोकांना स्वतःला पाहावं लागेल."
चित्रपट दिग्दर्शक अबू अलीहा यांचं हे म्हणणं आहे. पाकिस्तानच्या इतिहासातील सर्वांत भयंकर सिरियल किलर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जावेद इक्बालच्या जीवनावर अलीहा यांनी चित्रपट तयार केला आहे. तिकीट काढून हा चित्रपट पाहायला येणारे प्रेक्षक निराश होणार नाहीत, असं अलीहा म्हणतात.
या चित्रपटासंदर्भातील वादविवाद, चित्रपटासाठीची तयारी, त्यातील मुख्य विचार या संदर्भात चित्रपटाचे दिग्दर्शक अबू अलीहा आणि जावेद इक्बालचं पात्र रंगवणारे अभिनेते यासिर हुसैन यांच्याशी बीबीसी उर्दूचे पत्रकार बराक शब्बीर यांनी सविस्तर चर्चा केली.
जावेद इक्बालने केलेलं 100 मुलांचं हत्याकांड, ही पाकिस्तानच्या इतिहासातली विसरली जाऊ नये अशी घटना आहे, असं अबू अलीहा म्हणतात.
जावेद इक्बाल पाकिस्तानच्या इतिहासाचा भाग आहे आणि अशा लोकांचीही आठवण ठेवायला हवी, असं अलीहा म्हणतात.
"आपल्या इतिहासातील ही एक वाईट बाजू आहे, त्यामुळे ती विसरून जाण्याऐवजी लक्षात ठेवायला हवी आणि असं का झालं याचा विचार करायला हवा."

अलीहा म्हणाले, "भारताच्या फाळणीची आठवण सुखावह नसते, पण त्यावर चित्रपट बनवले गेले आहेत. मग जावेद इक्बाल हीसुद्धा आपल्यासाठी एक वाईट आठवण आहे, तर त्यावर चित्रपट बनवायला हरकत नाही."
सिरियल किलरच्या जीवनावर चित्रपट का?
अलीहा म्हणाले, "ईधी साहेबांवरही चित्रपट व्हायला हवा, असं मला वाटतं. तसं झालं तर खूपच चांगलं होईल. सगळीकडे लोक त्यांच्या भोवती गोळा होत असत. ममी ईधी साहेबांवरही चित्रपट तयार करू इच्छितो. कोणी पैसे द्यायला तयार असेल तर त्यांनी पुढे यावं."
जावेद इक्बालवरील चित्रपटाचं समर्थन करताना ते परदेशांमधील दाखले देतात, तसंच पाकिस्तानातील लोकांच्या प्रवृत्तीवरही भाष्य करतात.
ते म्हणतात, "प्रत्येक विषयावर एक चित्रपट तयार व्हायला हवा आणि पूर्वीही असे चित्रपट तयार होत आले आहेत. अमेरिकेत सायको हा चित्रपट तयार करण्यात आला, तेव्हा असे चित्रपट करायला नकोत असं तिथले लोक म्हणाले नव्हते. पण पाकिस्तानात लोक तसं करत आहेत. वास्तविक हेच लोक स्क्विड गेम बघतात, त्यात कसलाही काही संदेश नसतो. मध्यंतरी 'यू' नावाची एक मालिका आली होती, ती पाकिस्तानात खूप लोकप्रिय झाली. म्हणजे पाकिस्तानात असा आशय पाहिला जातो आहे.
"'यू'मध्ये एक नोकर असतो आणि तो लोकांचा पाठलाग करताना दाखवला आहे. मग तुम्ही अशा माणसाची गोष्ट का बघता? त्यातून कोणता संदेश मिळतो? प्रत्येक गोष्टीत काही संदेश नसतो."

फोटो स्रोत, YASIR HUSSAIN INSTAGRAM
अबील अलीहा म्हणतात, "मी गेली चार वर्षं या प्रकल्पामध्ये व्यग्र आहे आणि आपल्याकडे एक सिरियल किलर आहे अशा दृष्टीने मी कधीच याकडे बघितलं नव्हतं. अमेझॉन आणि नेटफ्लिक्सवर सिरियल किलरवरील चित्रपट ढिगाने उपलब्ध आहेत, त्यामुळे आता आपणही सिरियल किलरची गोष्ट सांगूया, असं काही माझ्या डोक्यात नव्हतं."
ते म्हणाले, "तुम्ही जावेद इक्बाल पाहा. त्याची कोणतीही क्लिप तुम्ही पाहिलीत, तरी तो एक सर्वसामान्य माणूस असल्याचं लक्षात येतं. असा कोणी माणूस तुमच्या बाजूने चालत गेला, तर तुम्ही पुन्हा वळून त्याच्याकडे पाहणार नाही, इतका सर्वसामान्य. तो काही मॅचो मॅन नव्हता.
"जावेद इक्बालचं पात्र निर्माण करणं आव्हानात्मक होतं. तुम्ही हा चित्रपट बघायला जाल तेव्हा तुम्हाला यासिर हुसैन दिसणार नाहीत, आयशा उमर किंवा राबिया कुलुसम दिसणार नाहीत. तुम्हाला एक पोलीस अधिकारी दिसेल, एक आई दिसेल आणि एक सिरियल किलर दिसेल."
चित्रपटातील कलाकारांची निवड कशी केली?
यासिर यांचा चेहरा जावेद इक्बालशी मिळताजुळता आहे, असं अजिबातच नाही, असं अबू अलीहा सांगतात. पण यासिर हुसैन खूप चांगले अभिनेते आहेत आणि ते हे पात्र चांगल्या तऱ्हेने रंगवू शकतात, हे आपल्याला माहीत होतं, असं अलीहा म्हणतात.
आयशा उमर यांच्या निवडीविषयी अलीहा म्हणाले, "आयशा यांच्यावर 'सुंदर' पात्रच रंगवण्याचा शिक्का बसला आहे. इथे आम्हाला लोकांना चकित करायचं होतं, त्यामुळे या कथेतील पात्र म्हणून त्यांचा पर्याय चांगला ठरेल असं आम्हाला वाटलं.
"गेली दहा वर्षं जी अभिनेत्री तुमच्या चेहऱ्यावर हास्य फुलवते आहे, ती आता रडेल, शंभर मुलांच्या आयांच्या वतीने ती रडत आहे आणि मारेकऱ्याकडे तिरस्काराने पाहील. हा एक आश्चर्याचा धक्का असेल."

फोटो स्रोत, Social media
हा चित्रपट तयार करणं आव्हानात्मक होतंच, शिवाय त्यातील पात्रं रंगवण्यासाठी मोठ्या तारेतारकांची मनं वळवणंही अवघड होतं, असं अबू अलीहा म्हणतात.
ते सांगतात, "मर्यादित आर्थिक पाठबळ हे माझ्यासाठी सर्वांत मोठं आव्हान होतं. या चित्रपटात काम करण्यासाठी यासिर हुसैन आणि आयशा उमर यांच्यासारख्या तारेतारकांचं मन वळवणं, हे माझ्यासाठी तितकंच आव्हानात्मक होतं. या प्रकल्पात जोखीम आहे आणि त्यावर बरेच कष्ट करावे लागतील, पण या कष्टाचा म्हणावा तितका आर्थिक मोबदला मी देऊ शकणार नाही, हे मी त्यांना समजावून सांगितलं."
चित्रपटाचा प्रस्ताव तीन वेगवेगळ्या लोकांकडून आला
अभिनेते यासिर हुसैन सांगतात की, तीन वेगवेगळ्या लोकांनी जावेद इक्बालच्या जीवनावरील चित्रपटात काम करण्यासाठी त्यांच्यासमोर प्रस्ताव ठेवला होता आणि त्यांनी तिघांचेही प्रस्ताव स्वीकारले.
यासिर म्हणतात, "माझं जावेद इक्बालशी एक वेगळंच नातं आहे. सहा-सात वर्षांपूर्वी लाहोरमध्ये मला एका शॉर्ट फिल्मच्या प्रदर्शनासाठी बोलावण्यात आलं होतं. ती शॉर्ट फिल्म तयार करणारे लोकही जावेद इक्बालवर चित्रपट तयार करणार होते. तर, त्या प्रकल्पात सहभागी व्हायला आवडेल का, असं त्यांनी मला विचारलं होतं.
"मी त्यासाठी तयार असल्याचं त्यांना म्हणालो होतो. असा चित्रपट झाला तर त्यातली गोष्ट खूप घाबरवणारी असेल, मी नक्कीच त्यात काम करायला तयार आहे, असं मी त्यांना सांगितलं."

यासिर पुढे म्हणतात "दरम्यान, दुसरे एक गृहस्थ मला भेटले आणि तेही जावेद इक्बालच्या जीवनावर चित्रपट करत असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांनीही मला त्यात अभिनय करण्याबाबत विचारणा केली आणि मी त्यांनाही होकार दिला. त्यानंतर अबू अलीहा माझ्याकडे आले आणि जावेद इक्बालवर चित्रपट करत असल्याचं त्यांनी सांगितलं. गेला बराच काळ मी या गंमतीला सामोरा जातो आहे, असं मी त्यांना म्हणालो.
"पण त्यांनाही मी तत्काळ होकार दिला. अलीहा खरोखरच हा चित्रपट करतील याची मात्र मला खात्री होती, कारण त्यांनी आधी चित्रपट केलेले होते आणि कितीही मर्यादित आर्थिक पाठबळ असलं तरी ते चित्रपट करू शकतात."
जावेद इक्बालसारखं दिसण्यासाठी कोणती तयारी केली?
जावेद इक्बालबद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न केल्यावर बरेच उपयुक्त धागेदोरे हाती लागल्याचं यासिर हुसैन म्हणतात.
"जावेद इक्बालसंबंधीचा एक छोटा व्हिडिओ बाहेर आला होता. त्यात जावेद इक्बालची प्रवृत्ती दिसते, कारण त्याने स्वतःच शरणागती पत्करली होती. मी स्वतः इथे आलोय, तुमची यात कसलीच कर्तबगारी नाहीये, असं लोकांना दाखवण्याचा त्याचा प्रयत्न होता. त्याच्या देहबोलीत अहंकार दिसत होता. जावेद स्वतःला पोलिसांपेक्षा श्रेष्ठ मानत होता. असं दिग्दर्शकानेही मला सांगितलं. त्यामुळेच तो स्वतः समोर आला आणि शंभर मुलांना मारल्याचं कबूल करून अटक करवून घेतली."
यासिर म्हणतात, "हे पात्र शांतही असणं गरजेचं होतं. कारण, जावेद इक्बाल दहशत माजवत होता आणि त्याने एक मुखवटा चढवला होता. मी तो मुखवटाच पुढे नेतो आहे. पोलिसांच्या गाडीतून मी ज्या तऱ्हेने उतरतो नि आजूबाजूला बघतो ते पाहून खूप चांगलं वाटतं, असं काही लोक मला म्हणाले. जावेद इक्बालसुद्धा जेव्हा पोलिसांच्या गाडीतून उतरला, तेव्हा त्याच्यासाठी तो अभिमानाचा क्षण होता."
"हे काम करत असताना मी काय विचार करत होतो, असं एका नवीन अभिनेत्याने मला विचारलं. त्याला मी सांगितलं की, मी काम करत असताना विचार करत नव्हतो, तर त्याआधी मी विचार केला होता. अभिनय करत असताना डोक्यात स्वाभाविकपणे जे येईल ते आपण पडद्यावर उतरवत असतो," असं यासिर सांगतात.
'कट म्हटलं गेलं नसतं तर मी रडायला सुरुवात केली असती'
हा चित्रपट लगबगीत चित्रीत झाला, हेसुद्धा आपल्यासाठी बरं झाल्याचं यासिर हुसैन म्हणतात. हा चित्रपट जावेद इक्बालच्या पूर्ण जीवनावर आधारलेला नाही, तर त्याच्या आयुष्याचा काही भाग यात आला आहे आणि मग लवकरच त्याला गोळी मारण्यात आली. यासिर यांच्यासाठी ही आनंदाची बाब होती, कारण त्यांना दीर्घ काळ हे पात्र निभावणं शक्य नव्हतं.
"मी रंगवलेल्या एखाद्या पात्रात मी पुन्हा प्रवेश करू शकतो का, असं मला विचारलं तर मी लगेच होकार देईन. एक बटणच आपल्याला उपलब्ध झालेलं असतं, ते दाबलं की आपण अमुक पात्रात प्रवेश करू शकतो. पण आता या (जावेद इक्बालच्या) भूमिकेत मी परत जाऊ इच्छित नाही. या पात्रात पुन्हा प्रवेश करावासा वाटेल, अशी कोणतीही सुखावह भावना त्यातून मिळाली नाही."
एका दृश्याचा उल्लेख करून ते म्हणाले, "राबिया कुलसुम खूप चांगली अभिनेत्री आहे. ती एका हरवलेल्या मुलाची आई दाखवली आहे. तर, माझा मुलगा तुझ्याकडे आहे का, असं ती जावेद इक्बालला विचारायचा प्रयत्न करत असते. हे अगदी हादरवून टाकणारं दृश्य होतं. राबिया अभिनय करत असताना मला अभिनेता म्हणून असुरक्षित वाटायला लागलं. त्यावेळी दिग्दर्शकाने कट म्हटलं नसतं, तर मी धाय मोकलून रडायला लागलो असतो."
यासिर म्हणतात, "मला स्वतःच्या भावना ताब्यात ठेवता येत नव्हत्या, कारण मी कलाकार म्हणून ती भूमिका निभावत असलो, तरी माणूस म्हणून स्वतःवर नियंत्रण ठेवणं अवघड जात होतं."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








