आरुषी मर्डर केस : नेमकं काय घडलं?

फोटो स्रोत, PTI
देशातील बहुचर्चित अशा आरुषी हत्या प्रकरणावर आज अलाहाबादच्या उच्च न्यायालायाने निर्णय दिला आहे.
त्यानुसार न्यायालयाने आरुषीच्या आई-वडिलांना तिच्या हत्येप्रकरणी निर्दोष मुक्त केलं आहे.
या प्रकरणाचा निकाल यायला जवळपास नऊ वर्षं लागली. नेमकं काय घडलं आणि कधी घडलं
या प्रकरणाचा घटनाक्रम :
16 मे 2008
तलवार कुटुंब दिल्ली जवळील नोएडा भागात राहत होते. 2008 सालच्या मे महिन्यातल्या 15 आणि 16 तारखेदरम्यान त्यांच्या घरात त्यांची मुलगी आरुषी तलवार आणि नोकर हेमराज यांची हत्या करण्यात आली.

फोटो स्रोत, FIZA
16 मेच्या सकाळी आरुषीचा मृतदेह तिच्या रुममध्ये आढळून आला. धारदार शस्त्रानं तिचा गळा कापण्यात आला होता.
त्याच्या दुसऱ्या दिवशी नोकर हेमराजचा मृतदेह शेजारच्या घरातील गच्चीवर आढळून आला.
याप्रकरणी 23 मे 2008 रोजी उत्तर प्रदेश पोलिसांनी राजेश तलवार यांना अटक केली. त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे 24 मेला उत्तर प्रदेश पोलिसांनी राजेश तलवार यांना या प्रकरणात मुख्य आरोपी ठरवलं.
सीबीआय चौकशी
29 मे 2009 ला उत्तर प्रदेशच्या तत्कालीन मुख्यमंत्री मायावती यांनी सीबीआय चौकशीची शिफारस केली.

फोटो स्रोत, PTI
जून 2008 मध्ये सीबीआयने एफआयआर दाखल करुन चौकशी सुरु केली. यादरम्यान सीबीआयने राजेश तलवार यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली.
पुराव्यांअभावी 12 जुलै 2008 ला राजेश तलवार यांना मुक्त करण्यात आलं.
राजेश तलवार यांचे कंपाउंडर आणि इतर दोन नोकरांना सीबीआयने अटक केली होती. पण, त्यांच्या विरोधातही काही पुरावे न मिळाल्यामुळे सप्टेंबर 2008 ला त्यांनाही मुक्त करण्यात आलं.
क्लोजर रिपोर्ट
9 फेब्रुवारी 2009 ला तलवार दांपत्यावर आरुषी हत्येप्रकरणी केस दाखल करण्यात आल्यानंतर या प्रकरणाला वेगळं वळण लागले.

तलवार दांपत्य चौकशीत सहकार्य करत नाही, असं पोलिसांनी सांगितल्यानंतर जानेवारी 2010ला कोर्टाकडून नार्को टेस्टची परवानगी मिळाली.
30 महिन्यांच्या चौकशीनंतर डिसेंबर 2010 ला सीबीआयने क्लोजर रिपोर्ट न्यायालयात दाखल केला.
तलवार दांपत्याने या विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आणि नव्याने चौकशी करण्याची मागणी केली.
याच प्रकरणी न्यायालयात गेलेल्या राजेश तलवार यांच्यावर 20 जानेवारी 2011 ला चाकूने हल्ला करण्यात आला होता.
6 जानेवारी 2012ला तलवार दांपत्यावर खटला चालवण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला.
हत्येचा आरोप
नुपूर तलवार यांना 30 एप्रिल 2012ला अटक करण्यात आली. या अगोदर त्यांनी केलेल्या जमानत याचिकेला न्यायालयाने रद्दबातल ठरवलं होतं.

फोटो स्रोत, PTI
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, जून 2012 ला या प्रकरणाची पुन्हा सुनावणी सुरू झाली. यादरम्यान 25 सप्टेंबर 2012ला नूपुर तलवार यांची जामीनावर सुटका करण्यात आली.
12 नोव्हेंबर 2013ला या प्रकरणी बचाव पक्षाने शेवटची साक्ष नोंदवली. 25 नोव्हेंबर 2013ला निर्णय देण्याचं न्यायालयाकडून जाहीर करण्यात आलं.
त्यानुसार 25 नोव्हेंबर 2013ला सीबीआय न्यायालयाने तलवार दांपत्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
त्यांनतर ते गाझियाबादच्या 'डासना' जेलमध्ये कारावास भोगत होते.
12 ऑक्टोबर 2017
हत्येला नऊ वर्षं उलटून गेल्यानंतर आज अलाहाबादच्या उच्च न्यायालायाने या प्रकरणाचा निर्णय दिला आहे.
त्यानुसार न्यायालयाने तलवार दांपत्याला निर्दोष मुक्त केलं आहे.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








