आरुषी हत्या प्रकरणी तलवार दांपत्याची सुटका - CBIने केल्या होत्या 7 चुका

फोटो स्रोत, FIZA
2008 साली देशभर खळबळ माजवलेल्या आरुषी-हेमराज यांच्या दुहेरी हत्या प्रकरणी अलाहाबाद हायकोर्टाने आरुषीचे आईवडील नूपुर आणि राजेश तलवार यांना निर्दोष मुक्त केलं आहे. पुराव्याअभावी त्यांची सुटका होणार आहे.
16 मे 2008 रोजी दिल्लीजवळ नॉयडामध्ये एका घरात 14 वर्षाच्या आरुषीचा मृतदेह सापडला होता. दुसऱ्याच दिवशी त्यांच्या घरी काम करणाऱ्या हेमराजचा मृतदेह घराच्या गच्चीवर सापडला होता.
नॉयडा पोलिसांनी सांगितलं की राजेश तलवार यांनी आरुषी आणि हेमराज यांना अवघडलेल्या अवस्थेत बघितलं आणि रागातच त्यांची हत्या केली.
नंतर खटला CBIकडे गेला. 26 नोव्हेंबर 2013 रोजी CBI कोर्टाने तलवार दांपत्याला दोषी ठरवलं.
यानंतर पत्रकार अविरुक सेन यांनी 'आरुषी' या नावाने पुस्तक लिहिलं. या पुस्तकात अविरुक यांनी CBIच्या चौकशीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आणि तलवार दांपत्याचा बचाव केला आहे.
तर पुस्तकाप्रमाणे या आहेत CBIच्या 7 चुका...
1. पुराव्यांमध्ये फेरफार
पुस्तकात केलेल्या उल्लेखानुसार CBIने घटनास्थळावर जे नमुने गोळा केले आणि प्रयोगशाळेत पाठवले, त्या नमुन्यांमध्ये छेडछाड झाली.
काही नमुन्यांना कोर्टाच्या आदेशाविनाच सील-कव्हरमधून काढलं आणि त्यांचे फोटो काढले.

फोटो स्रोत, PTI
घटनास्थळावरच्या छायाचित्रांमध्ये फेरफार झाली असा पुस्तकात दावा आहे.
सेन सांगतात की, हैद्राबाद येथील सेंटर फॉर DNA फिंगरप्रिटिंग अँड डायगोन्स्टिक लॅबच्या अहवालात सांगितलं आहे की हेमराजच्या रक्ताचे डाग तलवारांच्या खोलीपासून दूर असलेल्या कृष्णाच्या पलंगावर सापडले, पण चौकशी करणाऱ्यांनी हे लक्षात घेतलं नाही.
2. ऑनर किलिंगचा दावा मजबूत
अविरुक यांच्या म्हणण्यानुसार जर अहवाल नीट वाचला असता तर बाहेरून कुणी व्यक्ती आली होती या तलवार दांपत्याच्या दाव्याला दुजोरा मिळाला असता.

अविरूक सांगतात की CBIचे अधिकारी धनकर यांनी 2008मध्ये प्रयोगशाळेला एक पत्र लिहून सांगितलं की रक्ताचे डाग लागलेली हेमराजची उशी, उशीची खोळ हे आरुषीच्या खोलीतून सापडले होते.
तसंच CBIने अलाहाबाद उच्च न्यायालयासमोर सादर केलेल्या क्लोजर रिपोर्टमध्ये सांगितलं की हे सामान हेमराजच्या खोलीतून मिळालं.
पण खटल्यादरम्यान CBIच्या न्यायालयात दिलेल्या साक्षीकडे कानाडोळा करत CBI अधिकारी धनकर यांनी चुकीच्या चिठ्ठीवर विश्वास ठेवला होता.
अविरूक सांगतात की CBIच्या चिठ्ठीनुसार त्या शक्यतेला बळ मिळालं की हेमराज आपल्या गादी आणि उशीसकट आरुषीच्या खोलीत होता. आरुषीने त्याला आपल्या खोलीत येऊ दिलं होतं.
त्यामुळे आरुषीच्या हत्येत बाहेरच्या व्यक्तीचा हात होता या तलवार दांपत्याच्या दाव्याला बळकटी मिळते.
3.गोल्फ स्टिकवर अनेक प्रश्न
राजेश तलवार यांनी एका गोल्फ स्टिकने हत्या केली असा दावा CBIने केला होता. ही स्टिक नंतर स्वच्छ करण्यात आली. पण सरकारी पक्षाने एक दुसरीच गोल्फ स्टिक सादर केली होती.
खटला सुरू असताना दोन वेगळ्या गोल्फ स्टिक कशी सादर झाल्या, असा सवाल अविरूक विचारतात. सरकारी वकिलांनी दावा केला होता की आरुषीचा गळा डेंटिस्ट वापरत असलेल्या स्कालपेलने (शस्त्रक्रियेत वापरले जाणारे अवजार) कापला होता.

फोटो स्रोत, FIZA
पण CBIने तलवार यांच्या घरातून असं कोणतंही स्कालपेल जप्त केलं नाही. तसंच अशा कोणत्याही स्कालपेलला प्रयोगशाळेत पाठवलेलं नाही.
स्कालपेलने हत्या होऊ शकते का, याची फॉरेन्सिक चौकशीसुद्धा केली नाही.
सेन यांच्यानुसार CBI न्यायालयाने तपास अधिकाऱ्यांच्या दाव्याला जास्त महत्त्व दिलं होतं, ज्यांना खरंतर न्यायवैद्यक चाचण्यांची काहीही माहिती नव्हती.
4. का वापरला हेमराजचा ईमेल आयडी?
तलवार दांपत्याशी संपर्क साधण्यासाठी, त्यांना कार्यालयात बोलवण्यासाठी आणि माहिती घेण्यासाठी CBIने [email protected] हा ईमेल आयडी तयार केला आणि वापरला.
त्यामुळे खटल्याच्या सुरुवातीपासूनच अधिकाऱ्यांच्या विचारसरणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचं पुस्तकात सांगण्यात आलं.

फोटो स्रोत, PTI
सेन सांगतात की या ईमेल आयडीवरून CBIच्या मोठ्या अधिकाऱ्यांना देखील ईमेल पाठवण्यात येत असे.
सेन विचारतात की CBIचे अधिकारी शासकीय ईमेल आयडीचा वापर करण्याऐवजी हेमराजच्या ईमेलचा वापर का करत होते?
5. मोलकरणीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
पुस्तकात म्हटल्याप्रमाणे तलवार दांपत्याच्या घरात काम करणाऱ्या भारती मंडल यांच्या साक्षीमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
कागदपत्रांनुसार भारती जे न्यायालयात बोलल्या, ते पढवलेलं होतं.
कोर्टात गोंधळात टाकणाऱ्या प्रश्नांमध्ये एक प्रश्न होता की भारती यांनी तलवार यांच्या घराच्या बाहेरचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला होता का?

फोटो स्रोत, FIZA
यावर भारती यांनी सांगितलं की त्यांनी बाहेरच्या दरवाज्याला फक्त स्पर्श केला होता.
न्यायालयात त्याचा अर्थ असा काढला गेला की भारतीने दरवाजा बाहेरून उघडण्याचा प्रयत्न केला होता. कारण दरवाजा आतून बंद होता, असा दावा पुस्तकात केला आहे.
जर दरवाजा आतून बंद होता, तर बाहेरून कुणीही आलं नाही. आणि त्यावेळेला तलवार यांच्याशिवाय घरात कोणीच नव्हतं
अविरुक यांच्याशी बोलतांना भारतीने सांगितलं की रोज ती जे करायची तेच तिने 'त्या' दिवशी केलं होतं.
भारती यांनी सांगितलं, त्यांनी बेल वाजवली आणि दार उघडण्याची वाट पाहिली. त्यांनी दरवाजाला हात लावला नाही किंवा उघडण्याचा प्रयत्नसुद्धा केला नाही.
6. बाहेरून कुणी आलं होतं का?
जर आरुषीने दरवाजा उघडला नाही, तर आरुषीच्या खोलीच्या दरवाजाशिवाय एखाद्या दरवाज्यातून आत येऊ शकत होतं का, असा सवाल पुस्तकात उपस्थित केला आहे.

फोटो स्रोत, PTI
आरुषीच्या खोलीत यायचा आणखी एक रस्ता होता, ज्यावर तपास अधिकाऱ्यांनी लक्ष द्यायला हवं होतं.
आरुषीच्या खोलीच्या आधी एक गेस्ट टॉयलेट होतं, जे आरुषीच्या टॉयलेटच्या बाजूला उघडायचं.
दोन्ही टॉयलेटच्या मध्ये एक दरवाजा होता, तो गेस्ट टॉयलेटच्या बाजूनेसुद्धा उघडला जाऊ शकत होता.
7. डॉ. चौधरींची साक्ष महत्त्वाची?
पुस्तकानुसार ज्या साक्षींमुळे तलवार दांपत्याची बाजू आणखी मजबूत होऊ शकली असती अशा साक्षीदारांना CBIने हजर केलं नाही.
सेन यांच्यामते, CBIने 141 साक्षीदारांची यादी तयार केली होती, पण त्यापैकी फक्त 39 साक्षीदारांना न्यायालयात हजर केलं. सेन आपल्या पुस्तकात तलवार यांच्या अगदी जवळ असलेल्या नेत्रतज्ज्ञ सुशील चौधरी यांचं उदाहरण देतात.
आरुषी प्रकरणातील एक माजी पोलीस कर्मचारी के.के.गौतम यांनी सांगितलं की डॉ. सुशील चौधरी यांनी फोन करून आरुषीचा शवविच्छेदन अहवाल लवकर मिळेल का, याबाबत विचारणा केली होती.
के. के. गौतम यांचा दावा होता की डॉ. चौधरी यांनी गौतम यांना 'बलात्कार' शब्द हटवण्याची विनंती केली होती. पण चौधरी या आरोपाचा इन्कार करतात.

CBIने सर्वोच्च न्यायलयात सांगितलं की चौधरी यांची साक्ष महत्त्वाची आहे, कारण तलवार दांपत्याला जामीन मिळाला, तर ते चौधरी यांच्यावर दबाव टाकू शकतात.
सर्वोच्च न्यायालयाने CBIला एक महिन्याचा वेळ दिला, पण CBIने सुशील चौधरी यांना साक्ष देण्यासाठी बोलवलं नाही.
पुस्तकाचा आधार घ्यायचा झाला तर डॉ.चौधरी यांची साक्ष महत्त्वाची ठरू शकत होती.
'प्रत्येक मुद्द्यावर चर्चा'
CBIवर झालेल्या आरोपांवर चर्चा करतांना CBIचे वकील RK सैनी यांनी सांगितलं की त्यांनी सेन यांचं पुस्तक वाचलं नाही, पण या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयापर्यंत चर्चा झाली आहे.

फोटो स्रोत, PTI
RK सैनी म्हणतात, "या पुस्तकात काहीही नवीन नाही. अविरुक सेन हे तलवार दांपत्याचे मीडिया मॅनेजर आहेत. ते निष्पक्ष पत्रकार नाहीत. CBIने ज्या पद्धतीने खटला हाताळला ते पाहण्यासाठी अनेक न्यायालयं आहेत. हे लोक (तलवार दांपत्य) 30-40 वेळा उच्च न्यालयात गेले. अगदी एक एक स्वल्पविराम, अल्पविराम, पूर्णविरामासाठी सुद्धा हे लोक सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत."
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








