पाकिस्तानातल्या गावात जाऊ न शकणाऱ्या आजोबांसाठी तो गावच भारतात घेऊन आला

भारत-पाकिस्तान

फोटो स्रोत, BBC/KAVITA PURI

फोटो कॅप्शन, स्पर्श आहूजा
    • Author, कविता पुरी
    • Role, बीबीसी न्यूज

75 वर्षांपूर्वी भारताची फाळणी झाली. दोन्ही बाजूच्या लाखो कुटुंबांना आपलं घर सोडावं लागलं होतं. स्पर्श आहूजांचे कुटुंबीयही घर सोडून पळून आले. त्यांच्या आजोबांना लहान वयातच घर सोडावं लागलं होतं.

स्पर्शच्या आजोबांनी, त्यांच्यासोबत लहानपणी घडलेल्या घटनेबाबत कधीच चर्चा केली नाही. पण, नातवाने आजोबांना या घटनेबाबत व्यक्त होण्यासाठी कायम प्रोत्साहित केलं.

धार्मिक आणि भौगोलिक परिस्थितीमुळे गेल्या काही दशकांपासून एकमेकांपासून वेगळी झालेली कुटुंब स्पर्श यांच्या अविरत प्रयत्नांमुळेच पुन्हा एकत्र आली आहेत.

स्पर्श आपल्या ओंजळीतील तीन दगड दाखवतात. जे त्यांच्यासाठी अत्यंत अनमोल आहेत. कारण, हे दगड त्यांच्या पूर्वजांची निशाणी आहे. त्या मातीशी त्यांची नाळ अजूनही जुळलेली आहे याची आठवण करून देणारे हे दगड आहेत.

या दगडांसोबत स्पर्श यांचा प्रवास सुरू झाला पाच वर्षापूर्वी. ते त्यांचे (आईचे वडिल) आजोबा इशर दास अरोरा यांच्याकडे गेले होते. आजोबा उर्दुमध्ये काही नोट्स लिहीताना आढळून आले. उर्दु पाकिस्तानची अधिकृत भाषा आहे. तेव्हापासूनच स्पर्श यांचा खरा प्रवास सुरू झाला.

आजोबांचं घर पाकिस्तानात होतं याची माहिती स्पर्शला होती. पण पाकिस्तानातील घराबाबत जास्त कोणीच बोलत नसल्याने त्यांना फार जास्त माहिती मिळाली नाही.

ते सांगतात, "टीव्ही पहाताना किंवा बोर्ड गेम खेळताना पाकिस्तानचं नाव जरी आलं किंवा कोणती गोष्ट समोर आली. तर, घरात सर्वजण अचानक गप्प होत असत."

भूतकाळातील आठवणी

पाकिस्तानात आजोबांचं घर, त्याचं बालपण याबाबत स्पर्श यांच्या मनात कायम उत्सूकता असायची. त्यामुळे एकदा बुद्धिबळ खेळत असताना, स्पर्श यांनी आजोबांना त्यांच्या बालपणाबाबत प्रश्न विचारण्यास सुरूवात केली.

त्या दिवसाची आठवण सांगताना स्पर्श म्हणतात, "आजोबा याबाबत बोलण्यात कचरत होते. त्यांनी काही वेळ विचार केला आणि म्हणाले, याची काही गरज नाही. तुला याची पर्वा करण्याची गरज काय?"

भारत-पाकिस्तान

फोटो स्रोत, SPARSH AHUJA

फोटो कॅप्शन, स्पर्श आणि इशर दास अरोरा

पण, हळूहळू ते याबाबत खुलून बोलू लागले. त्यांना मनातून कोणाला तरी याबाबत उस्तुकता आहे याचा त्यांना आनंद होता. स्पर्श यांनी आजोबांना विचारलं, तुम्ही तुमच्या कुटुंबाची गोष्ट लिहू शकता? इशर दास तयार झाले.

स्पर्श म्हणाले, "आजोबांनी आजीला त्यांचा सर्वांत चांगला सूट आणि टाय काढायला सांगितला. ते लगेचच तयार झाले." यानंतर पांढऱ्या रंगाचा सूट घातलेल्या इशर दास अरोरा यांनी त्यांच्या भूतकाळाबाबत मन मोकळं केलं.

फाळणीची सावली

त्यादिवशी आजोबांशी झालेल्या चर्चेमुळे स्पर्श यांच्या आयुष्याला नवी कलाटणी मिळाली.

लंडनच्या पूर्व भागातील ब्रिक लेनच्या घरी माझी स्पर्शसोबत भेट झाली. त्यांनी सांगितलं की, आजोबांचा जन्म पाकिस्तानातील बेला भागात 1940 साली झाला होता. पंजाबमधील हे एक मुस्लिम बहुल लोकसंख्येचं गाव होतं. माझ्या आजोबांचे आई-वडील रस्त्याकडेला असलेल्या दुकानात भुईमुगाच्या शेंगा विकण्याचं काम करायचे.

भारत-पाकिस्तान फाळणीच्यावेळी इशर दास अरोरा यांच्या गावावर हल्ला झाला. तेव्हा ते फक्त सात वर्षांचे होते. 1947 मध्ये भारताची फाळणी होऊन पाकिस्तानचा जन्म झाला.

फाळणीमुळे दोन्ही बाजूचे लाखो लोक बेघर झाले. आपलं रहातं घर सोडून त्यांना दुसरीकडे जावं लागलं. एक ते सव्वा कोटी लोक बेघर झाले होते. युद्ध किंवा दुष्काळ सोडता एवढ्या मोठ्या संख्येने कधीच लोकांनी पलायन केलं नव्हतं.

मिशन पाकिस्तान

गावात सुरू असलेल्या हिंसाचारात इशर दास आणि त्यांच्या कुटुंबियांना गावातील प्रमुखाकडे आश्रय मिळाला. ते मुसलमान होते. हल्लेखोर हातात बंदूक घेऊन हिंदूंना शोधत होते. त्यावेळी या मुस्लिम सरपंचाने घराचा दरवाजा उघडला नाही. त्यांनी कोणालाच घरात प्रवेश दिला नाही.

इशर दास यांच्या मनात खोलवर ही घटना कोरली गेलीये. यानंतर त्यांना दिल्ली येण्याबाबत आठवत नाही. पण, आता ते इथेच रहातात.

भारत-पाकिस्तान

फोटो स्रोत, SPARSH AHUJA

फोटो कॅप्शन, पाकिस्तानच्या बेला गावात स्पर्श आहूजा

स्पर्श यांनी आजोबांची गोष्ट ऐकली. त्यांचा जीव एका मुस्लिम व्यक्तीने वाचवल्याचंही ऐकलं. मग त्यांचं कुटुंब पाकिस्तानातून दिल्लीत कसं पोहोचलं? स्पर्श पहिल्यांदाच आजोबांच्या भूतकाळाबाबत खऱ्या अर्थाने जाणून घेत होते.

त्यानंतर स्पर्श यांनी मिशन पाकिस्तान सुरू केलं. ते सांगतात, "माझी फक्त एकच इच्छा होती. त्या गावात पोहोचण्याची. पूर्वजांच्या गावात गेल्याशिवाय माझ्या घराची गोष्ट पूर्ण होणार नाही याची मला जाणीव झाली."

"मला बेला गावात जायचं आहे." स्पर्शने आपल्या आजोबांना सांगितलं. आजोबा इशर दास अरोरा म्हणाले, "तिथे जाण्यात धोका आहे. तू इथेच रहा. गावात आता काय ठेवलंय?"

पण, स्पर्श यांनी अजिबात ऐकलं नाही. ते गावी जाण्यासाठी उस्तुक होते. आजोबा गावी जाण्याच्या निर्णयाबाबत थोडे घाबरलेले होते. पण, त्यांच्या चेहऱ्यावर उस्तुकता होती. आजोबा अजूनही बेला गावाला आपलं 'घर' म्हणतात.

स्पर्श यांनी पाकिस्तानला जाण्याची तयारी सुरू केली. ते पुढे सांगतात, "माझा एक हिस्सा तिथे आहे. माझा जन्म भारतात झाला. मी ऑस्ट्रेलियामध्ये मोठा झालो. ब्रिटनमध्ये शिकलो, नोकरी केली. त्यामुळे मी नक्की कुठला आहे असं सांगणं माझ्यासाठी कठीण आहे. माझ्याकडे अशी कोणतीही जागा नाही. ज्याला मी इथून आहे असं सांगू शकेन."

गावातील ती टेकडी

मार्च 2021 मध्ये स्पर्श इस्लामाबादमध्ये होते. आपल्या पूर्वजांच्या घरी जाण्यासाठी त्यांनी सकाळी उठून प्रवास सुरू केला. त्यांच्या पूर्वजांचं गाव 100 किलोमीटर दूर होतं. त्यांनी पारंपारिक सलवार-कुर्ता घातला आणि विशिष्ठ प्रकारची पगडी परिधान केला. त्यांनी आपल्या पणजोबांचा फोटो पाहिला आणि आपल्या आजोबांनी बनवलेला नकाशा हातात घेऊन ते टॅक्सीतून निघाले.

तो प्रवास आठवताना स्पर्श सांगतात, "नकाशात आजोबांनी एक नदी, एक मशिद आणि एका टेकडीचं चित्र काढलं होतं. या टेगडीवरून मोठ्या आवाजात आरोळी दिली तर, आवाज एको होऊन परत येत असे."

भारत-पाकिस्तान

फोटो स्रोत, Alamy

फोटो कॅप्शन, बेला गाव

प्रवास लांबचा होता. काळी वेळाने स्पर्श एका डोंगराळ परिसरात पोहोचले. त्याठिकाणी एक नदी होती. नाव लिहीण्यात आलं होतं 'बेला'.

गाडीतून उतरल्यानंतर स्पर्श यांनी पंजाबीमध्ये एका महिलेला ते कोणत्या कारणाने आले आहेत याचं कारण सांगितलं. त्या महिलेने गावातील सरपंच याबाबत जास्त माहिती देऊ शकतील असं सांगितलं.

गावात पोहोचल्यानंतर स्थानिक गावकरी स्पर्श यांना निरखून पहात होते. गावात गाडी आल्याची गोष्ट वाऱ्यासारखी गावभर पसरली.

स्पर्श सांगतात, "गावातील तिसऱ्या भागात पोहोचेपर्यंत एक युवक फिरत-फिरत गावात आल्याची माहिती गावभर झाली. लोक फोनवर एकमेकांना याबाबत सांगू लागले."

हिंदू-मुस्लिमांनी एकमेकांना मिठी मारली

स्पर्श यांनी बेला गावच्या सरपंचाच घर शोधून काढलं. त्यांनी सरपंचांना विचारलं,

"75 वर्षापूर्वी गावातील एका व्यक्तीने माझ्या आजोबांचा जीव वाचवला होता. त्यांना तुम्ही ओळखता का?"

स्पर्श पुढे सांगतात, "ते एकदम शांत झाले. ते म्हणाले, तुम्ही माझ्या वडीलांबाबत बोलत आहात का?" सरपंच वयोवृद्ध होते. फाळणीच्यावेळी ते लहान असावेत.

स्पर्श पुढे सांगतात, "सरपंच पुढे म्हणाले, की त्यांना माझे आजोबा आणि कुटुंबियांची माहिती होती." आजोबांच्या गावात त्यांना ओळखणारी व्यक्ती भेटल्यामुळे स्पर्श भावूक झाले. स्पर्श सरपंचांना म्हणाले, "त्यावेळी जर तुमचे वडील नसते तर आज मी इथे उभा नसतो."

भारत-पाकिस्तान

फोटो स्रोत, BBC/KAVITA PURI

फोटो कॅप्शन, आजोबांसोबत स्पर्श आहूजा

स्पर्श यांना सरपंचांच्या घरी नेण्यात आलं. त्यांना त्यांच्या आजोबांचा जीव वाचवण्याची गोष्ट सांगितली गेली. स्पर्श यांनी आजोबांकडून ही कहाणी ऐकली होती. आता ते त्यांच्या जीव वाचवणाऱ्यांकडून ही गोष्ट ऐकत होते. त्यानंतर स्पर्श यांच्या आजोबांचा जीव वाचवणाऱ्या कुटुंबियांनी त्यांचा हात धरून गावात फेरफटका मारला.

एकेठिकाणी ते थांबले, "स्पर्श हीच ती मशिद. ज्याच्या थोडं पुढे तुझे आजोबा रहात होते," बेला गावातील त्या व्यक्तीने स्पर्श यांना सांगितंल. त्यानंतर त्यांनी मातीच्या एका घराकडे इशारा करताना म्हटलं की, इशर दास अरोरा इथेच रहात होते. स्पर्श त्याठिकाणी गेले आणि जमीनीचं चूंबन घेतलं. त्यानंतर स्पर्श यांना एका हिंदू आणि मुस्लिम व्यक्तीने मिठी मारली.

त्रासातून मुक्तता झाली

तो अनुभव सांगताना स्पर्श यांचा आवाज खोल गेला होता. डोळ्यात पाणी तरळून आलं. ते सांगतात, "मी जे स्वप्न पाहिलं होतं. ते अखेर पूर्ण झालं होतं. मी असा कधीच विचार केला नव्हता की, मी हा दिवस पाहू शकेन."

स्पर्श पुढे म्हणतात, "बेला गावात पोहोचेपर्यंत माझ्या मनात राग होता. आजोबांचं सर्व संपलं आहे. पण, गावात पोहोचल्यानंतर माझा राग शांत झाला." अशा प्रवासामुळे एका पिढीला झालेला त्रास तुम्ही संपवू शकता, स्पर्श सांगतात.

बेला गावातील दगडांसोबतचं नातं

बेला गाव सोडण्याअगोदर स्पर्श यांनी त्याठिकाणहून काही दगड उचलून आपल्या खिशात टाकले. या जमीनीवर कधीकाळी त्यांचे पूर्वज रहात होते. इस्लामाबादला पोहोचल्यानंतर त्यांनी आपल्या आजोबांना मेसेज केला.

आजोबांनी उत्तर दिलं, "मला तुझ्यावर गर्व आहे. तू माझ्या मातृभूमिला स्पर्श केला आहेस. या क्षणी माझ्या मनात काय सुरू आहे, हे मी तुला सांगू शकत नाही."

आता दोन्ही कुटुंब एकमेकांसोबत वॉट्सअॅपने जोडली गेली आहेत. ते एकमेकांना सणा-सुदिला शुभेच्छा देतात. पण काही गोष्टी अजूनही स्पष्ट झालेल्या नाहीत.

ज्यावेळी दोन्ही देशातील राजकीय परिस्थिती बिघडते. तेव्हा स्पर्श यांचे आजोबा मेसेज करणं बंद करतात. ते म्हणतात, मी यावेळी मेसेज करणार नाही. मला हे सुरक्षित आहे का नाही हे माहित नाही.

दोन्ही बाजूच्या लोकांच्या काही विषयांवर भावना अत्यंत तीव्र आहेत. गेल्यावर्षी बेला गावच्या सरपंचाच्या नातेवाईकांनी लिहीलं, "अफगाणिस्तानवर तालिबानचा कब्जा इस्लामचा विजय आहे." त्यावर स्पर्श यांनी लिहीलं, "मी तुमची पोस्ट पाहून फार निशार झालोय. अशा कारणांमुळेच माझ्या आजोबांना त्यांचं घर सोडून पळून जावं लागलं होतं."

बेला गावच्या सरपंचांच्या कुटुंबियांनी या पोस्टवर माफी मागितली. त्यांनी म्हटलं की कोणाच्याही भावनांना ठेच पोहोचवण्याचा त्यांचा विचार नव्हता. स्पर्श पुढे सांगतात, "काहीवेळा परिस्थिती तणावपूर्ण होते."

भारत-पाकिस्तान

फोटो स्रोत, SPARSH AHUJA

या अनुभवानंतर स्पर्श आणि त्यांच्या मित्रांनी प्रोजेक्ट दास्तान सुरू केलं. याच्या माध्यमातून भारत, पाकिस्तान आणि बांग्लादेशमधील विस्थापितांना व्हर्च्युअल रिअॅलिटीच्या माध्यमातून अशी ठिकाणं दाखवली जातात. जी इतिहासात नष्ट झाली आहेत.

काही महिन्यापूर्वीच स्पर्श यांनी आजोबांना व्हर्च्युअल रिअॅलिटीच्या माध्यमातून बेला गाव दाखवलं. त्यांच्या घराजवळची मशिद आणि टेकडीची सैर करवली.

इशर दास अरोरा आता 82 वर्षांचे आहेत. त्यांना आपल्या मूळगावी जाण्याची इच्छा आहे. पण त्यांच्याकडे भारतीय पासपोर्ट असल्यामुळे त्यांना पाकिस्तानचा व्हिसा मिळणं कठीण आहे.

बेला गावातून आणलेले दगड स्पर्श यांनी आपल्या आजोबांना दिले आहेत. त्यातील एक दगड ते आपल्या खोलीत टेबलवर ठेवतात. उरलेल्या दोन दगडांची त्यांनी गळ्यातील हार बनवला आहे. दोघंही तो हार गळ्यात घालतात.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)