वाजिद अली शाह: उत्तम शायर आणि कलाप्रेमी नवाबांना 30 वर्षे इंग्रजांच्या पेन्शनवर का जगावं लागलं?

वाजिद अली शाह

फोटो स्रोत, RANDOM HOUSE

फोटो कॅप्शन, वाजिद अली शाह
    • Author, रेहान फजल
    • Role, बीबीसी हिंदी

बाबुल मोरा, नैहर छूटो ही जाए बाबुल मोरा, नैहर छूटो ही जाए

चार कहार मिल, मोरी डोलिया सजावें (उठायें) मोरा अपना बेगाना छूटो जाये | बाबुल मोरा...

अंगना तो परबत भयो और देहरी भयी बिदेश जाए बाबुल घर आपनो मैं चला पिया के देश | बाबुल मोरा...

ही ठुमरी ऐकली नसेल असा माणूस विरळाच. ही ठुमरी लिहिली होती एका राजानं. म्हटलं तर रसिक, कलासक्त... तर दुसरीकडे निम्मं आयुष्य राज्याबाहेर लांब राहण्याची वेळही या राजावर आली. ही गोष्ट वाचल्यावर तुम्हाला या ठुमरीचा अर्थ आपोआप समजू लागेल.

ही अशा व्यक्तीची कहाणी आहे, ज्यांच्याबद्दल लोकांची वेगवेगळी किंबहुना अगदी विरुद्ध मतं आहेत.

इंग्रज सांगायचे त्याप्रमाणं, ते एक विलासी शासक होते, ज्यांनी त्यांचं सर्व आयुष्य राज्यकारभार चालवण्याऐवजी आराम करण्यातच घालवलं होतं. तर बहुतांश भारतीयांना वाटतं तसं ते एक मोठे शायर (कवी), संगीततज्ज्ञ आणि कलासक्त व्यक्ती होते आणि इंग्रजांनी अन्याय करत त्यांची गादी हिसकावून घेतली आणि त्यांना कोलकात्याला जाण्यास भाग पाडलं.

सत्य कदाचित या दोन टोकांच्या मध्येच कुठेतरी आहे. ती व्यक्ती म्हणजे अवधचे नवाब वाजिद अली शाह.

वाजिद अली यांना कलाकार आणि कलेबद्दल आस्था होती. मात्र त्यांचं व्यक्तिमत्व गुंतागुंतीचं होतं.

वाजिद अली शाह यांचा जन्म 30 जुलै 1822 ला झाला होता. 13 फेब्रुवारी 1847 ला ते अवधच्या गादीवर आले. त्यांचं सुरुवातीचं शिक्षण घरातच झालं. ते दरबारात बोलली जाणारी फारसी भाषा शिकले, तसंच कुराण वाचता येण्याइतपत अरबी भाषादेखील शिकले.

वाजिद अली यांना लहानपणापासून जमिनीवर ठेका धरण्याची सवय होती. मिर्झा अली अजहर यांनी 'किंग वाजिद अली शाह ऑफ अवध' हे पुस्तक लिहिलं आहे.

त्यात मिर्झा लिहितात, "त्यांच्या या सवयीमुळे त्यांचे एक शिक्षक इतके रागावले की त्यांनी वाजिद अली यांच्या डोक्यावर जोरात फटका मारला. तो फटका इतका जोरात बसला की त्यांच्या एका कानाची श्रवणशक्ती कायमची गेली."

"लखनौच्या ब्रिटिश रेझिडेंटला माहित होतं की वाजिद अली शाह यांना ऐकण्यात अडचण येते. त्यामुळे आवश्यकता भासल्यास ते वाजिद अली शाह यांच्याशी बोलताना त्यांच्या वाक्यांची पुनरावृत्ती करत असत."

मजबूत आणि धिप्पाड शरीरयष्टीचे, कलाप्रेमी वाजिद अली शाह

1840 च्या दशकात अवध हे राजकीयदृष्ट्या अतिशय महत्त्वाचं राज्य किंवा राजवट होती. मात्र त्याचं क्षेत्रफळ जास्त मोठं नव्हतं. संपूर्ण अवध संस्थानचा विस्तार जवळपास 24 हजार चौ. मैलामध्ये झालेला होता. हा आकार स्कॉटलँडपेक्षाही लहान होता.

1850 च्या सुमारास संपूर्ण अवधची लोकसंख्या जवळपास एक कोटी होती. त्यातील जवळपास सात लाख लोक लखनौ आणि त्याच्या आसपासच्या भागात राहायचे.

वाजिद अली शाह

फोटो स्रोत, Hussainabad Picture Gallery

फोटो कॅप्शन, वाजिद अली शाह

असं असूनही त्याची लोकसंख्या त्याकाळच्या दिल्लीच्या जवळपास दुप्पट होती.

वाजिद अली शाह यांनी वयाच्या 26 व्या वर्षी त्यांचं आत्मचरित्र लिहिलं होतं. त्याचं नाव होतं, 'परीखाना'. यात त्यांनी त्यांचे प्रेमप्रसंग आणि संगीत-नृत्याबद्दलच्या त्यांच्या बहुआयामी चिंतनाची कहाणी लिहिली होती.

त्यांनी त्यांच्या आत्मचरित्राला 'परीखाना' असं नाव का दिलं होतं?

या प्रश्नाचं उत्तर शकील सिद्दीकी यांनी त्यांच्या चरित्रात दिलं आहे. त्यात लिहिलं आहे की, "नवाब साहेबांनी त्यांच्या मनोरंजनासाठी संगीत-नृत्य शिकवण्याची व्यवस्था केली होती. या शाळेचं नाव 'परीखाना' ठेवण्यात आलं होतं. त्यामध्ये त्याकाळच्या संगीत आणि नृत्यातील निपुण तरुणींना भरती केलं जायचं."

वाजिद अली शाह यांनी 'परीखाना' या नावानं आत्मचरित्र लिहिलं होतं

फोटो स्रोत, RAJPAL AND SONS

फोटो कॅप्शन, वाजिद अली शाह यांनी 'परीखाना' या नावानं आत्मचरित्र लिहिलं होतं

"यात दाखल होणाऱ्या तरुणींना 'परी' म्हटलं जायचं. परीखान्यात त्याकाळचे काही निष्णात संगीततज्ज्ञदेखील नोकरीस होते. या तरुणी त्यांच्याकडून शिक्षण घ्यायच्या. स्वत: वाजिद अली शाह देखील शिकवायचे."

नंतर 1878 मध्ये कॅनिंग कॉलेजची जिथे सुरू झालं, तिथेच तो परीखाना होता. आज तिथे संगीताच्या क्षेत्रातील प्रसिद्ध भातखंडे संगीत संस्थान महाविद्यालय आहे.

संगीताच्या वेडामुळे वडिलांनी नजरकैदेत ठेवलं

नवाब वाजिद अली शाह यांना संगीत आणि नृत्याचं उत्तम ज्ञान होतं. त्यांनी त्यांच्या या छंदावर बरीच मोठी रक्कम खर्च केली.

शेवटी अवधचे रेझिडेंट कर्नल स्लेमन यानं हे थांबवलं. त्याचबरोबर त्यानं अनेक संगीतकारांना शहरातून हाकलून दिलं.

1847 मध्ये वाजिद अली शाह अवधच्या गादीवर बसले

फोटो स्रोत, RANDOM HOUSE

फोटो कॅप्शन, 1847 मध्ये वाजिद अली शाह अवधच्या गादीवर बसले

वाजिद अली शाह यांनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहिलं आहे, "माझे वडील अमजद अली शाह यांनी संगीत आणि नृत्याबद्दल मला असलेल्या आवडीबद्दल आणि त्यासाठी मी जे करत होतो, त्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. इतकंच काय मला एका नजरकैद ठेवण्याक आलं होतं."

"सरंजामी परंपरा जपण्यासाठी आवश्यक असलेल्या काही मूल्यांचं रक्षण करण्याची त्यांना चिंता वाटायची. त्यासाठी त्यांनी हे पाऊल उचललं होतं."

उत्तम शायर आणि नाटककार

वाजिद अली शाह हे एक सर्जनशील, गुंतागुंतीचं आणि रंजक व्यक्तिमत्व होतं. त्यांचे केस कुरळे होते. त्यांचा पेहराव अशा प्रकारचा असे की त्यांची छाती लोकांना दिसायची. 1847 मध्ये अवधच्या गादीवर येण्याआधीच त्यांनी 'बहार-ए-इश्क' सारखं साहित्य लिहिलं होतं.

कित्येक महिने तालमी केल्यानंतर त्यांचं नाटक सादर केलं जायचं. 1853 मध्ये त्यांनी एक योगी मेळावा भरवला होता. त्यात त्यांनी त्यांच्या महालाची बाग सर्वसामान्य लोकांसाठी खुली केली होती.

वाजिद अली शाह (पेंटिंग)

फोटो स्रोत, LUCKNOW TOURISM

फोटो कॅप्शन, वाजिद अली शाह (पेंटिंग)
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

मनु एस पिल्लई यांनी 'द कोर्टिझन, महात्मा अँड द इटालियन ब्राह्मिन' हे पुस्तक लिहिलं आहे.

त्यात ते लिहितात, "या मेळाव्यात सर्व लोकांना केशरी वस्त्रं परिधान करून येण्यास सांगण्यात आलं होतं. 1843 मध्ये त्यांनी कृष्णाच्या जीवनावर आधारित एक नाटक लिहून त्याच्या तालमी करून ते लोकांसमोर सादर केलं होतं. यात त्यांच्या चार पत्नींनी गोपींच्या भूमिका केल्या होत्या."

वाजिद अली शाह यांना शेकडो पत्नी होत्या असं सांगितलं जातं.

रोझी जोन्स यांनी 'द लास्ट किंग ऑफ इंडिया' हे पुस्तक लिहिलं आहे. त्यात त्या लिहितात, "कोलकात्यात (त्यावेळचं कलकत्ता) राहणाऱ्या त्यांच्या एका वंशजानुसार, नवाब वाजिद अली इतके सभ्य व्यक्ती होते की ते तोपर्यंत एखाद्या महिलेशी संबंध ठेवायचे नाहीत, जोपर्यंत त्यांनी तिच्याशी तात्पुरता विवाह केलेला नसेल. त्यांना महिलांच्या घोळक्यात राहायला आवडायचं यात कोणतीही शंका नाही."

शकील सिद्दीकी लिहितात, "ते 'रंगीले पिया' आणि 'जान-ए-आलम' यासारख्या विशेषणांनी प्रसिद्ध होते. या नवाबानं लैंगिक संबंध ठेवताना महिलांच्या इच्छेचा सन्मान केला आणि धार्मिक नियमांचं कठोर पालन केलं."

"विधीपूर्वक किंवा रीतसर विवाह न करता त्यांनी कोणत्याही महिलेशी संबंध ठेवले नाहीत. त्याचबरोबर, त्यांनी सर्व बेगमांना घटस्फोट घेण्याचं स्वातंत्र्यदेखील दिलं होतं. त्यांनी प्रत्येकीच्या पात्रतेनुसार दरमहा निश्चित रक्कम किंवा तनखा मिळण्याचीही व्यवस्था केली होती."

अवधमध्ये इंग्रजांचा वाढता हस्तक्षेप

16 नोव्हेंबर 1847 ला नवाब वाजिद अली शाह, इंग्रज गव्हर्नर जनरल लॉर्ड हार्डिंग यांना भेटण्यासाठी कानपूर गेले. गव्हर्नर जनरल हार्डिंगनं अवधमधील परिस्थितीबाबत असमाधान व्यक्त केलं.

अवधमधील राज्यकारभार व्यवस्थितपणे चालवण्यासाठी त्यांनी वाजिद अली शाह यांनी एका पत्राद्वारे दोन वर्षांचा कालावधी दिला.

रोझी जोन्स यांचं पुस्तक, 'द लास्ट किंग ऑफ इंडिया'

फोटो स्रोत, RANDOM HOUSE

फोटो कॅप्शन, रोझी जोन्स लिखित पुस्तक, 'द लास्ट किंग ऑफ इंडिया'

जानेवारी 1849 मध्ये कर्नल स्लेमन यांना अवध संस्थानचा रेसिडंट म्हणून नियुक्त करण्यात आलं आणि त्यांची रवानगी लखनौला करण्यात आली. त्या संपूर्ण वर्षभर वाजिद अली गंभीररित्या आजारी होते.

या परिस्थितीचा फायदा घेत स्लेमननं संपूर्ण अवध संस्थानची दौरा केला आणि राज्यकारभारात हस्तक्षेप वाढवण्याचा प्रयत्न केला.

त्यानं वाजिद अली शाह यांच्या एका खास सल्लागाराला काढून टाकण्याचा सल्ला दिला. मात्र त्याचा तो सल्ला वाजिद अलींनी मान्य केला नाही.

स्लेमन यांनी त्यांच्या वरिष्ठांना पाठवलेल्या अहवालात लिहिलं, "वाजिद अली यांच्याकडून फारशा आशा नाहीत. ते स्वच्छंदी व्यक्ती आहेत. ते दिवसरात्र जनानखान्यात असतात. विलासीपणा, ऐषोआराम आणि वायफळ खर्च हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा भाग झाला आहे."

वाजिद अली शाह यांना सोडावं लागलं अवधचं नवाबपद

अर्थात त्यानंतर वाजिद अली शाह यांनी त्यांच्या राज्यकारभारात अनेक सुधारणा केल्या. 'दस्तूर-ए-वाजिदी' नावाचा एक नियमावलींचा दस्तावेज देखील लिहिला.

मात्र 21 नोव्हेंबर 1851 ला लॉर्ड डलहौसीच्या शिफारशीवरून ईस्ट इंडिया कंपनीच्या संचालक मंडळानं अवध संस्थानचा समावेश इंग्रजांच्या राज्यात करण्याच्या प्रस्तावाला मंजूरी दिली.

वाजिद अली शाह यांच्या काळात कर्नल स्लेमन लखनौचे इंग्रज रेझिडेंट होते

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, वाजिद अली शाह यांच्या काळात कर्नल स्लेमन लखनौचे इंग्रज रेझिडेंट होते

17 फेब्रुवारी 1856 ला अवधचं ईस्ट इंडिया कंपनीत विलीनीकरण करण्याची अधिकृत घोषणा झाली. त्यानंतर नवाब वाजिद अली शाह यांनी अवधच्या गादीवरून पायउतार व्हावं लागलं.

नवाव वाजिद अलींनी इंग्रजांकडे तक्रार केली की, त्यांना अशी वर्तणूक का दिली जाते आहे?

मनु पिल्लई लिहितात, "या प्रश्नाचं कोणतंही साधं सरळ उत्तर नव्हतं. मात्र काहीजण असं म्हणायचे की ईस्ट इंडिया कंपनीनं नवाबाकडून खूप मोठं कर्ज घेतलं होतं. त्या कर्जाची परतफेड करण्यापेक्षा, कर्ज देणाऱ्यालाच उदध्वस्त करणं, हा चांगला पर्याय होता."

वाजिद अली कोलकात्याला रवाना

एकेकाळी नवाब वाजिद अली शाह यांच्याकडे 60 हजारांहून अधिक सैन्य होतं. मात्र त्यांनी या सैन्याचा वापर इंग्रजांच्या विरोधात केला नाही.

13 मार्चला इंग्लंडच्या राणीकडे अर्ज देण्यासाठी ते कोलकात्याला गेले. तिथून त्यांना लंडनला जायचं होतं. वाजिद अली शाह यांच्याशी इंग्रज ज्याप्रकारे वागले, त्यामुळे लखनौ आणि अवधच्या ग्रामीण भागात लोकांमध्ये असंतोष निर्माण झाला.

रुद्रांशु मुखर्जी यांनी 'अ बेगम अँड द रानी' नावाचं पुस्तक लिहिलं आहे. त्यात ते लिहितात, वाजिद अली शाह यांना अवधच्या गादीवरून काढून टाकण्यास जनतेनं विरोध केला. त्याकाळी त्या भागात एक लोकगीत प्रचलित झालं होतं. ते होतं, 'अंग्रेज बहादुर आइन, मुल्क लै लीन्हो'."

"वाजिद अली शाह कोलकात्याला जाण्यास निघाल्यानंतर त्यांच्या प्रजेतील अनेकजण कानपूरपर्यंत त्यांच्याबरोबर गेले."

भारतात ईस्ट इंडिया कंपनीचे गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, भारतात ईस्ट इंडिया कंपनीचे गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसी

विलियम क्रूक यांनी 'साँग्स अबाउट द किंग ऑफ अवध' या पुस्तकात लिहिलं आहे, "जान-ए-आलम निघून गेल्यानंतर, लखनौच्या परिस्थितीबद्दल कोणतीही अतिशयोक्ती न करता सांगायचं तर, जणूकाही शहराचा आत्माच निघून गेला होता."

"लखनौमधील असा कोणताही बाजार, रस्ता आणि घर नव्हतं की जिथे जान-ए-आलम यांच्यापासून दुरावण्याचं दु:ख झालं नसेल."

लखनौचा निरोप घेताना वाजिद अली शाह यांनी एक शेर म्हटला होता -

दरो-दीवार पे हसरत से नज़र करते हैं/ख़ुश रहो अहले वतन हम तो सफ़र करते हैं...

बंडात सहभाग असल्याच्या संशयावरून नजरकैद

13 मे 1856 ला वाजिद अली शाह जलमार्गानं कोलकात्याला पोहोचले.

तिथे पोहोचताच ते आजारी पडले. त्यामुळे ते लंडनला जाऊ शकले नाहीत. 18 जूनला नवाब वाजिद अलींच्या आई मलिका किश्वर, भाऊ सिकंदर हश्मत आणि त्यांचा मुलगा लंडनला रवाना झाले.

या दरम्यान लखनौ आणि मेरठसारख्या ठिकाणी इंग्रजांच्या विरोधात जोरदार बंड झालं. ते 1857 चं बंड होतं.

वाजिद अली शाह यांची पत्नी, बेगम हजरत महल

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, वाजिद अली शाह यांची पत्नी, बेगम हजरत महल

वाजिद अली शाह यांच्या पत्नी बेगम हजरत महल यांनी त्यांच्या मुलाला बादशाह घोषित करून इंग्रजांविरोधातील बंडाचं नेतृत्व केलं.

बंडखोरांशी हातमिळवणी केल्याच्या संशयावरून इंग्रजांनी वाजिद अली शाहांना 15 जून 1857 ला ताब्यात घेतलं. वाजिद अलींना फोर्ट विलियममध्ये नजरकैदेत ठेवण्यात आलं. 9 जुलै 1858 ला इंग्रजांनी त्यांची सुटका केली.

आयुष्याची शेवटची 30 वर्षे कोलकात्यात वास्तव्य

1874 मध्ये 'न्यूयॉर्क टाइम्स'नं भारतातील या अत्यंत श्रीमंत व्यक्तीच्या आयुष्याची कहाणी लिहिण्यासाठी त्यांचा एक प्रतिनिधी भारतात पाठवला.

मनु एस पिल्लई लिहितात, "न्यूयॉर्क टाइम्सचा तो प्रतिनिधी भारतात पोहोचेपर्यंत वाजिद अली शाहांनी प्रतिकूल परिस्थितीत अनेक दशकं घालवली होती. त्यांचा राज्यकारभार हिरावून घेण्यात आला होता. त्यांची संपत्तीदेखील आधीपेक्षा खूपच कमी राहिली होती. पूर्वीचा तो बडेजाव राहिला नव्हता"

कोलकात्यात याच महालात वाजिद अली शाह 30 वर्षे राहिले

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, कोलकात्यात याच महालात वाजिद अली शाह 30 वर्षे राहिले

"आता ते कोलकात्याच्या एका भागात राहत होते. त्यांचा महाल आणि त्याच्या चारी बाजूंना त्यांची जवळपास सात हजार माणसं राहत होती."

वाजिद अली शाहांनी त्यांच्या आयुष्याची शेवटची 30 वर्षे कोलकात्यातच वास्तव्य केलं.

वयाच्या 65 व्या वर्षी झालं निधन

21 सप्टेंबर 1887 ला पहाटे दोन वाजता कोलकात्यातील मटियाबुर्जमध्ये वाजिद अली शाह यांचं निधन झालं.

रोझी जोन्स लिहितात, "आयुष्याच्या अखेरच्या दिवसांमध्ये त्यांचं चालणं बंद झालं होतं. त्यांना खुर्चीवर बसवून इकडून तिकडे नेलं जायचं. शेवटच्या दिवसांमध्ये पान आणि हुक्का हेच त्यांचे साथीदार होते."

"आजारपणामुळे शौचालयात त्यांचे कित्येक तास जायचे. त्यांचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या निवासस्थानाला घेरलं होतं. नवाब वाजिद अलींचे नातेवाईक आणि नोकर-चाकरांनी त्यांच्या महालातील मौल्यवान वस्तूंची लूट करू नये म्हणून पोलिसांनी असं केलं होतं."

ब्रिटनच्या तत्कालीन राणी व्हिक्टोरिया

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, राणी व्हिक्टोरिया

स्टेट्समन या वृत्तपत्रानं 23 सप्टेंबर 1887 च्या त्यांच्या अंकात वाजिद अली शाह यांच्या अंत्ययात्रेचं वर्णन केलं होतं. त्यात त्यांनी लिहिलं होतं, "नवाबाच्या मृतदेहाला संपूर्ण ब्रिटिश सन्मानानं दफन करण्यासाठी नेण्यात आलं. त्यांच्या मृतदेहाला आंघोळ घालून पांढऱ्या रंगाच्या कफनमध्ये गुंडाळण्यात आलं. त्यावर लाल रंगानं कुराणातल्या आयत लिहिल्या होत्या."

"सुरक्षारक्षकांनी शोक म्हणून त्यांची शस्त्र उलटी केलेली होती. सैन्याचा 'डेड मार्च' हा बँड वाजत होता. सोबत चालणारे लोक जोरजोरात रडत होते. एक तासानंतर त्यांची अत्यंयात्रा सिब्तैनाबाद इमामबाड्याला पोहोचली."

त्यांच्या निधनाच्या वेळेस त्यांना इंग्रज सरकारकडून दरवर्षी 12 लाख रुपयांचं पेन्शन मिळत होतं. त्यातील पाच हजार रुपये त्यांना कर म्हणून भरावे लागत असत.

वाजिद अली शाह त्याकाळात भारतात सर्वाधित पेन्शन मिळणारे व्यक्ती होते.

एलन्स इंडियन मेल अँड ओरिएंटल गॅझेटनुसार, "वाजिद अली शाह यांना त्यावेळेस मिळणारी पेन्शनची रक्कम ही व्हिक्टोरिया राणीला मिळणाऱ्या प्रिवी पर्सपेक्षाही अधिक होती."

'अख्तर' या टोपणनावानं शायरी

वाजिद अली शाह यांच्यात आश्चर्यकारक सर्जनशीलता आणि अद्भूत कल्पनाशक्ती होती.

ते 'अख्तर' या टोपणनावानं नावानं शायरी लिहायचे. प्रसिद्ध शायर जोश मलीहाबादी यांनी त्यांच्या एका शेरमध्ये वाजिद अलींची आठवण करत म्हटलं होतं, 'तुमने क़ैसर बाग़ को देखा तो होगा बारहा, आज भी आती है जिसमें हाय 'अख़्तर' की सदा'.

'लखनवी भैरवी', 'ठुमरी' आणि कथ्थकलाही त्यांनी आश्रय दिला. ते स्वतः गातही असत.

'बाबुल मोरा नैहर छूटोहि जाए' ही त्यांनी लिहिलेली ठुमरी प्रसिद्ध आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)