अहिल्याबाई होळकर : विरोधकांना नमवून माळव्यावर सत्ता राबवली, अखेरच्या काळात त्या एकट्या का पडल्या?

- Author, रेहान फजल
- Role, बीबीसी हिंदी
अहिल्यादेवी होळकर, माळव्याच्या इतिहासात एक उत्तम शासक म्हणून ओळखल्या जातात. त्यांच्या प्रशासकीय कारकीर्दीतील दूरदृष्टी, धर्मनिष्ठा आणि न्यायप्रियतेमुळे त्या एक आदर्श शासक बनल्या.
केवळ नेतृत्व क्षमताच नाही, तर तत्वज्ञानी दृष्टिकोनामुळंही त्या आदर्श ठरल्या. त्यांनी त्यांच्या राज्यात न्याय, समृद्धी आणि सांस्कृतिक विकासासाठी जो दृष्टिकोन ठेवला, तो आजही प्रेरणादायक आहे.
माळव्याच्या राणी अहिल्यादेवी आजही देशाच्या कानाकोपऱ्यात लोककल्याणासाठी केलेल्या कार्यांसाठी ओळखल्या जातात.
वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिर आणि गुजरातमधील सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्धारामुळं त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली, पण त्यांच्या योगदानाच्या यादीत आणखी बरंच काही आहे.

फोटो स्रोत, OCEAN BOOKS
19व्या शतकाच्या सुरुवातीला भारतात आलेला ब्रिटिश प्रवासी बिशप हेबरनं त्यांना 'भारतातील सर्वोत्तम परोपकारी शासक' असं संबोधलं होतं.
भारतीय स्वातंत्र्य संग्रामात सहभागी झालेल्या ॲनी बेझंट यांनी त्यांच्याविषयी म्हटलं होतं की, "अहिल्यादेवींच्या कारकिर्दीला माळव्याचं सुवर्णयुग म्हणून ओळखलं जाईल. सामाजिक न्यायासाठी त्यांची बांधिलकी आणि सेवावृत्ती यांनी त्यांना दिव्यत्वाच्या दिशेनं नेलं."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
ब्रिटिश इतिहासकार जॉन की यांनी त्यांना 'तत्वज्ञानी राणी' असं म्हटलं होतं. त्या केवळ निर्भय नेत्या नव्हत्या, तर अतिशय चतुर शासकही होत्या.
अहिल्यादेवींचा जन्म 31 मे, 1725 रोजी महाराष्ट्रातील अहमदनगरमधील (सध्याचं अहिल्यानगर) चौंडी या गावात झाला होता.
त्या काळात मुलींच्या शिक्षणाला फारसं महत्त्व नव्हतं. तरीही त्यांच्या आई-वडिलांनी त्यांना केवळ शिक्षणच दिलं नाही तर घोडेस्वारी, धनुर्विद्या आणि तलवारबाजी यांमध्येही पारंगत केलं.
मंदिरात पाहिलं अन् खंडेरावांशी विवाह ठरवला
माळव्याचे सुभेदार मल्हारराव यांनी अहिल्यादेवींना एका मंदिरात पाहिलं. त्यांचा मुलगा खंडेरावांसाठी त्या योग्य वधू ठरतील असं तेव्हा त्यांच्या मनात आलं.
खंडेरावांचं शिक्षण झालं नव्हतं आणि त्यांना राज्यकारभारातही रस नव्हता.
खंडेराव आणि अहिल्यादेवी यांचा विवाह 1733 मध्ये झाला. त्यावेळी अहिल्यादेवी या फक्त आठ वर्षांच्या होत्या. खंडेरावांचा स्वभाव बदलण्यासाठी अहिल्यादेवींनी खूप प्रयत्न केले.
याचा परिणाम झाला आणि खंडेराव यांनी केवळ राज्याच्या कामांमध्ये रस घेण्यास सुरुवात केली नाही तर ते आपल्या वडिलांसोबत युद्धाच्या मैदानातही जाऊ लागले.

फोटो स्रोत, PRABHAT PRAKASHAN
सन 1745 मध्ये अहिल्यादेवींनी एका मुलाला जन्म दिला. त्याचं नाव मालेराव होतं. तीन वर्षांनंतर त्यांना एक मुलगीही झाली, जिचं नाव मुक्ताबाई ठेवण्यात आलं.
सन 1754 मध्ये खंडेराव आपल्या वडिलांसोबत राजपूतानाला गेले.
अरविंद जावळेकर अहिल्यादेवींच्या चरित्रात लिहितात, "त्यांनी राजपूतानातील अनेक राजघराण्यांकडून चौथ (एक प्रकारचा कर) वसूल केली, परंतु जेव्हा ते भरतपूरला पोहोचले, तेव्हा तिथले राजा सूरजमल यांनी चौथ देण्यास नकार दिला.
जेव्हा सर्व प्रयत्न निष्फळ ठरले, तेव्हा त्यांनी भरतपूरवर हल्ला केला. त्यांना तोंड देण्यासाठी भरतपूरचे जाटही समोर आले. त्यांनी झाडलेली एक गोळी खंडेरावांच्या छातीला लागली आणि तिथेच त्यांचा मृत्यू झाला."
सासरे मल्हाररावांनी सती जाण्यापासून रोखलं
विजया जहागीरदार आपल्या 'कर्मयोगिनी, लाइफ ऑफ अहिल्याबाई होळकर' या पुस्तकात लिहितात की, अहिल्यादेवी होळकर यांनी पतीच्या मृत्यूनंतर सती जाण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, त्यांच्या सासऱ्यांनी त्यांना असं करू नये, यासाठी समजावून सांगितलं होतं.
विजया जहागीरदार लिहितात, "मल्हारराव यांनी अहिल्यादेवींना म्हणाले, 'आजवर मी तुला जे काही शिकवलं आहे, त्या बदल्यात मी एकच गोष्ट मागतो, तुझं जीवन. कृपया या म्हाताऱ्या व्यक्तीवर दया कर.' असं म्हणून मल्हारराव जमिनीवर कोसळले."
अहिल्यादेवींनी आपल्या सासऱ्यांची गोष्ट मान्य केली आणि ठरवलं की आता आपलं उर्वरित जीवन आपल्या लोकांच्या सेवेत घालवायचं.
मल्हाररावांचं निधन आणि राज्याची धुरा
माळव्यात राहून अहिल्यादेवींनी तिथलं केवळ प्रशासनच उत्कृष्टपणे सांभाळलं नाही, तर युद्धभूमीवर लढत असलेल्या आपल्या सासऱ्यांना शस्त्रं आणि अन्नाचा पुरवठाही केला. इतकंच नव्हे तर काही छोट्या-छोट्या लढायांमध्ये त्यांनी स्वतः रणांगणावर जाऊन लढाईचं नेतृत्व देखील केलं.

फोटो स्रोत, MP TOURISM
परंतु, वयोमानामुळे त्यांच्या सासऱ्यांची तब्येत खालावू लागली आणि त्यांच्या कानात असह्य वेदना होऊ लागल्या.
अखेरीस, 30 मे 1766 रोजी वयाच्या 73 व्या वर्षी मल्हाररावांचं निधन झालं.
त्यानंतर मल्हाररावांचे नातू आणि अहिल्यादेवींचे पुत्र मालेराव यांना माळव्याचे सुभेदार करण्यात आलं. परंतु, राज्याचा कारभार खऱ्या अर्थाने अहिल्यादेवींच्याच हाती होता.
पुत्र मालेरावांचाही अचानक मृत्यू
मालेरावांमध्ये ते सर्व अवगुण होते जे अनेक वेळा श्रीमंत कुटुंबातील मुलांमध्ये असतात.
अरविंद जावळेकर लिहितात, "मालेरावांना नदीमध्ये अंघोळ करणं आणि हत्तींचं स्नान पाहण्याची आवड होती. ते शिकवणीसाठी आलेल्या शिक्षकांच्या बुटांमध्ये विंचू लपवायचे. विंचू चावल्यावर त्या शिक्षकांची होणारी तडफड पाहून त्यांना आनंद व्हायचा.

फोटो स्रोत, MP TOURISM
सत्ता मिळाल्यानंतर लोकांबरोबरची त्यांची वर्तणूक आणखी वाईट झाली. एकदा ते गंभीर आजारी पडले. त्यांना बरं करण्यासाठी खूप प्रयत्न केले गेले, पण ते बरे होऊ शकले नाही."
फक्त नऊ महिने राज्यकारभार केल्यानंतर, अवघ्या 23 व्या वर्षी त्यांचंही निधन झालं.
दिवाण गंगाधर यांना हटवलं आणि कारभार हाती घेतला
मालेरावांच्या मृत्यूनंतर माळव्याची सत्ता पूर्णपणे अहिल्यादेवींच्या हातात आली. त्यांनी एखाद्या अल्पवयीन मुलाला दत्तक घेऊन त्याला सुभेदार घोषित करावं, असा त्यांना सल्ला देण्यात आला. पण त्यांनी हा सल्ला नाकारला.
राणींचा हा निर्णय राज्याचे दिवाण गंगाधर चंद्रचूड यांना आवडला नाही. त्यांना गादीवर पुरुषच हवा होता.
त्यांनी रघुनाथराव पेशव्यांना पत्र लिहून सांगितलं की, अपत्य नसलेल्या मालेरावांच्या मृत्यूनंतर राज्याला कोणताही वैध वारस उरलेला नाही, त्यामुळं आपण मोठ्या सैन्यासह यावं आणि राज्याचा ताबा घ्यावा.
अहिल्यादेवींचे गुप्तहेर त्यांना गंगाधरच्या प्रत्येक हालचालीची माहिती देत होते. त्यांनी लगेचच गंगाधर आणि रघुनाथ यांचे डाव हाणून पाडण्याचा निर्णय घेतला.
यानंतर त्यांनी दिवाण गंगाधर यांना पदावरून हटवून राज्याचा कारभार पूर्णपणे स्वतःच्या हातात घेतला.
नवीन राजधानी म्हणून महेश्वरची घोषणा
त्यांनी नर्मदा नदीच्या काठावर महेश्वर येथे आपली नवी राजधानी स्थापन केली. आयुष्यातील उर्वरित 28 वर्षं त्यांनी याच ठिकाणी व्यतीत केली.

फोटो स्रोत, MP TOURISM
अरविंद जावळेकर लिहितात, "महेश्वरमध्येच त्यांनी आपलं निवासस्थान उभारलं, जे राजवाड्यापेक्षा आश्रमासारखं जास्त दिसत होतं. हे एक लहान, साधं दोन मजली घर होतं, जे कुठल्याही मध्यमवर्गीय व्यक्तीचं असावं असंच वाटत होतं.
याच छोट्याशा घरात अहिल्यादेवी राजे, मंत्री, सेनापती आणि सामान्य जनतेला भेटत असत आणि राष्ट्रीय महत्त्वाचे निर्णय घेत असत. एका खोलीत त्यांनी आपल्या पूजेसाठी एक छोटीशी जागा सोडली होती, जिथे त्या दररोज सकाळी पूजा करत असत."
प्रशासकीय सुधारणांवर दिला भर
महेश्वरमध्ये आपली राजधानी स्थलांतरित केल्यानंतर, त्यांनी प्रशासकीय सुधारणांना प्राधान्य देण्यास सुरूवात केली होती.
आपल्या नागरिकांना चोर आणि डाकूंपासून वाचवण्यासाठी त्यांनी काही कठोर निर्णय घेण्याचे ठरवले.

फोटो स्रोत, OCEAN BOOKS
त्यांनी आपल्या सल्लागारांची बैठक बोलावली आणि घोषणा केली की, जो कोणी आपल्या नागरिकांना चोर आणि डाकूंपासून मुक्त करेल, त्या व्यक्तीबरोबर आपल्या मुलीचा विवाह करून देतील.
हे ऐकून यशवंतराव फणसे नावाचा एक तरुण जागेवर उभा राहिला.
"मी हे आव्हान स्वीकारतो. परंतु, त्यासाठी मला राज्याच्या सर्व संसाधनांचं, विभागांचं पूर्ण सहकार्य मिळालं पाहिजे," असं त्यानं म्हटलं.
अल्पवधीतच राज्याची चोर आणि दरोडेखोरांपासून सुटका झाली. अहिल्यादेवींनी आपलं वचन पूर्ण करत यशवंतराव फणसे यांच्याशी आपल्या मुलीचा विवाह केला.
बंड मोडून काढलं
त्याचवेळी राजपूतांमध्ये राणी अहिल्यादेवी होळकर यांच्याविरुद्ध एक विद्रोह उभा राहत होता. लालसेटोच्या लढाईत महादजी शिंदे पराभूत झाले होते आणि त्यांचे सैनिक राजस्थानातून पळून गेले होते.
त्याचा परिणाम असा झाला की, राजस्थानात मराठ्यांचा प्रभाव कमी होऊ लागला. याचा फायदा घेत राजपूत शक्ती मराठ्यांविरूद्ध एकत्र होऊ लागले होते.
याची माहिती मिळताच राणी अहिल्यादेवींनी आपल्या सैन्यांसह राजपुतांवर आक्रमण केले होते.

फोटो स्रोत, PRABHAT PRAKASHAN
अरविंद जावळेकर लिहितात, "बंडखोरांचा नेता सौभाग सिंह चंद्रावत पळून गेला आणि त्यानं एका किल्ल्यात आश्रय घेतला होता. अहिल्यादेवींच्या सैन्यानं किल्ल्याला चारी बाजूंनी वेढा घातला होता. त्यांच्याकडे 'ज्वाला' ही अतिशय प्रसिद्ध तोफ होती.
त्या तोफांच्या गोळ्यांनी किल्ला उद्धवस्त झाला होता. शेवटी बंडखोरांचा नेता सौभाग सिंह चंद्रावत याला पकडून अहिल्यादेवीं समोर आणण्यात आलं. त्यांनी त्याला तोफेच्या तोंडाला बांधून ठार मारण्याचा आदेश दिला."
चंद्रावतच्या मृत्यूनंतर सर्व बंडखोरांनी शरणागती पत्करली होती. चार वर्षांनी झालेल्या एका दुसऱ्या बंडात अहिल्यादेवींनी स्वत: जाऊन ते बंड चिरडले होते.
अहिल्यादेवींचं व्यक्तिमत्व
अहिल्यादेवींचा रंग सावळा होता. त्या मध्यम उंचीच्या होत्या. त्यांचे केस खूप घनदाट होते. त्या काळी पडद्याची प्रथा असली तरी त्यांनी ती प्रथा कधीही पाळली नव्हती. त्यांची लोकशाहीवादी विचारसरणी होती.
त्या ज्या खोलीत जेवण करत असत त्याच कक्षात त्यांच्यासोबत त्यांचे सहायकही जेवण करत असत.
ग्वाल्हेरचे महाराज महादजी शिंदे यांच्याबद्दल त्यांना खूप आदर होता. तेही त्यांना 'मातोश्री' असं म्हणत असत.

फोटो स्रोत, OCEAN BOOKS
अरविंद जावळेकर लिहितात, "दररोज अहिल्यादेवी सूर्योदयाच्या एक तास आधी उठायच्या. त्या नर्मदा नदीच्या तीरावर जाऊन स्नान करायच्या. त्यानंतर त्या रामायण, महाभारत आणि वेदांचे पाठ ऐकत असत.
त्यानंतर त्या भिकारी आणि शारीरिकदृष्ट्या अपंग लोकांना धान्य, कपडे आणि पैसे दान करत असत. त्यांच्या कुटुंबात मांसाहारी आहार घेण्याची परंपरा असली तर त्या नेहमीच शाकाहारी जेवण घेत असत. त्या दिवसातून एकदाच जेवायच्या. सरकारी काम सांभाळण्यासाठी त्या रात्री 1 वाजेपर्यंत जागायच्या.
बद्रीनाथमध्ये धर्मशाळा बांधल्या
होळकर घराण्याचे वैशिष्टय म्हणजे ते आपल्या वैयक्तिक व कौटुंबिक खर्चासाठी सरकारी निधी वापरत नसत. वैयक्तिक खर्चासाठी त्यांचा स्वतंत्र वैयक्तिक निधी असायचा.
अहिल्यादेवींनी अनेक मंदिरांच्या जीर्णोद्धारासोबतच अनेक नद्यांवर घाट बांधले होते. याशिवाय त्यांनी अनेक दवाखाने बांधले आणि विहिरीही खणून घेतल्या होत्या.
त्यांच्या कारकिर्दीत मूर्तिकार आणि शिल्पकार हे नेहमीच व्यस्त असायचे.

फोटो स्रोत, Getty Images
सर जॉन माल्कम यांनी त्यांच्या 'मेमरीज ऑफ सेंट्रल इंडिया' या पुस्तकात लिहिलं आहे, "माझे सहकारी कॅप्टन डी. टी. स्टुअर्ट वाटेत अनेक अडचणीनंतर 1818 साली बद्रीनाथपर्यंत पोहोचू शकले.
पण ते हे पाहून थक्क झाले की, बद्रीनाथसारख्या एकाकी आणि दुर्गम भागातसुद्धा अहिल्याबाईंनी तीर्थयात्रेकरूंसाठी धर्मशाळा आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून ठेवली होती.
त्यांनी हेही पाहिलं की देवप्रयाग येथे राणींच्या सौजन्यानं एक सार्वजनिक स्वयंपाकगृह चालवलं जात होतं, जिथे यात्रेकरूंना अन्न दिलं जात असत."
शेवटी केवळ गंगाजलच घेतलं...
अहिल्यादेवींचं वैयक्तिक आयुष्य खूप दुःखद होतं, वृद्धापकाळात त्या पूर्णपणे एकट्या पडल्या आणि आजारीही पडल्या. त्यांनी औषधंही नियमितपणे घेतली नाहीत.
13 ऑगस्ट 1795 च्या सकाळपासून तर त्यांनी केवळ गंगाजलच घेतलं होतं.
त्यांनी ब्राह्मणांना बोलावून त्यांना एक गाय दान दिली. काही वेळातच त्यांनी या जगाचा निरोप घेतला. हे वृत्त समजताच महेश्वरीत मोठ्या प्रमाणावर लोक त्यांच्या अंतिम दर्शनासाठी जमा झाले.

फोटो स्रोत, OCEAN BOOKS
महेश्वर येथील नर्मदा नदीच्या घाटावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
जदुनाथ सरकार अहिल्यादेवी होळकर यांना भारताच्या सर्वात मोठ्या महिला शासकांपैकी एक मानतात.
ते लिहितात, "शासक आणि अमाप संपत्तीच्या मालक असूनही, त्या साधं आणि आध्यात्मिक जीवन जगल्या. पण त्या एक उच्च दर्जाच्या राजकारणी देखील होत्या."
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











