नुपूर शर्मा: काबुल गुरुद्वारावरील हल्ला हा मोहम्मद पैगंबरांवरील वक्तव्याचा बदला - इस्लामिक स्टेट

अफगाणिस्तान, गुरुद्वारा, शीख, भारत
फोटो कॅप्शन, स्फोटानंतरचं गुरुद्वारातलं दृश्य

अफगाणिस्तानची राजधानी काबूल इथल्या गुरुद्वारात शनिवारी शक्तिशाली स्फोट झाला. कट्टरतावाद्यांनी गुरुद्वारा परिसरात अंदाधुंद गोळीबार केला. शीख समाजाच्या लोकांवरही टीका केली.

कट्टरतावाद्यांनी सुरक्षारक्षकाला ठार केलं. ग्रेनेड्सचा मारा करत त्यांनी आतमध्ये प्रवेश मिळवला. गुरुद्वारा परिसरात असलेल्या तालिबानच्या तुकडीने त्यांच्यावर प्रतिहल्ला केला. या हल्ल्यात तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

तालिबाननं हल्लेखोरांना रोखण्याचा प्रयत्न केला. तीन तासांच्या संघर्षात सगळे हल्लेखोर मारले गेल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

"माझं घर गुरुद्वाराच्या अगदी समोरच आहे. मी जसा गोळीबाराचा आवाज ऐकला, तसं मी खिडकीतून पाहिलं. हल्लेखोर गुरुद्वाराच्या आत गेल्याचं आम्हाला दिसलं", असं कुलजीत सिंग खालसा यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं. सगळीकडे गोंधळाचं वातावरण होतं. तेवढ्यात बाहेर स्फोटाचा आवाज झाला.

तालिबानच्या चेकपोस्टजवळ गाडीत ठेवण्यात आलेल्या बॉम्बचा स्फोट झाला. युनिट कमांडरचा या स्फोटात मृत्यू झाला. हल्ल्याची तीव्रता एवढी होती की परिसरातली दुकानं आणि घरांमध्येही स्फोटाचे धक्के जाणवले.

"गुरुद्वारात रोज प्रार्थना होते. त्याच्या अर्धा तास आधी हा हल्ला झाला. थोड्या वेळानंतर हा हल्ला झाला असता तर आणखी लोक यात सापडले असते", असं खालसा यांनी सांगितलं.

अफगाणिस्तानात एकेकाळी हिंदू आणि शीख समाजाचे हजारो नागरिक राहत होते. मात्र अनेक वर्षांच्या संघर्षानंतर आता शीख समाजाच्या लोकांची संख्या खूपच कमी झाली आहे.

गेल्या काही वर्षात इथल्या स्थायिक झालेल्या शीख समाजाला इस्लामिक स्टेट संघटनेकडून वारंवार लक्ष्य केलं जातं. 2018 मध्ये आत्मघातकी कट्टरतावाद्याने जलालाबाद इथे स्वत:ला उडवून दिलं. 2020 मध्येही एका गुरुद्वारावर हल्ला झाला होता.

अफगाणिस्तान, गुरुद्वारा, शीख, भारत
फोटो कॅप्शन, स्फोटानंतरची अवस्था

जलालाबाद इथे हल्ला झाला तेव्हा त्या ठिकाणी 1500 शीख समाजाची माणसं होती. हल्ल्यानंतर आपण इथे राहू शकत नाही असं त्यांना वाटलं, असं सुखबीर सिंग खालसा यांनी सांगितलं. 2020 मध्ये झालेल्या हल्ल्यानंतर आणखी काही माणसं सोडून गेली. तालिबानने गेल्या वर्षी अफगाणिस्तानमध्ये सत्ता काबीज केली. त्यावेळी अफगाणिस्तानमध्ये तीनशेहून कमी शीख माणसं शिल्लक होती. आता तर त्यांची संख्या दीडशेच्या आसपासच शिल्लक आहे.

आमचे ऐतिहासिक गुरुद्वारा हल्ल्यांच्या लक्ष्यस्थानी पडले आहेत. जो शिल्लक होता त्यालाही आता लक्ष्य करण्यात आलं आहे.

शनिवारी झालेल्या हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेट संघटनेनं घेतल्याचं वृत्त एएफपी आणि रॉयटर्स वृत्तसंस्थेनं दिलं आहे. नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबरांसंदर्भात केलेल्या वादग्रस्त उद्गारांना प्रत्युत्तर म्हणून हा हल्ला केल्याचं इस्लामिक स्टेट संघटनेनं म्हटलं आहे.

अफगाणिस्तानमध्ये शिया आणि सुफी मुस्लीम समाज अल्पसंख्याक आहे. त्यांनाही हल्लेखोर लक्ष्य करतात.

तालिबानच्या तुलनेत इस्लामिक स्टेट संघटनेची ताकद खूपच कमी आहे. त्यांच्याकडे कोणत्याही प्रांताचा ताबा किंवा नियंत्रण नाही. पण अफगाणिस्तानच्या इतिहासात सगळ्यात विनाशकारी स्फोट घडवून आणण्यात या संघटनेचं नाव आघाडीवर आहे.

तालिबानने सत्ता मिळवल्यानंतर अफगाणिस्तानमधल्या हिंसक घटनांची वारंवारता लक्षणीयरीत्या घटली. इस्लामिक स्टेट संघटना मात्र तालिबान सत्तेत आल्यानंतरही सातत्याने आपली ताकद दाखवत आहे. आम्ही अफगाणिस्तानमध्ये स्थैर्य आणलं या तालिबानच्या दाव्याला तालिबान पुरुन उरलं आहे.

अफगाणिस्तान, गुरुद्वारा, शीख, भारत
फोटो कॅप्शन, गुरुद्वाराची स्थिती भीषण झाली आहे.

सर्वसामान्य माणसांवर हल्ले करण्यातून भ्याड मानसिकता दिसते, असं काबूल पोलीसचे प्रवक्ते खालीद झाद्रान यांनी सांगितलं. आमच्या जवानांनी शीख समाजासाठी जीवाची बाजी लावली आहे. या देशात सुरक्षित राहणं हा त्यांचा अधिकार आहे.

गुरुद्वारावर हल्ला करणाऱ्या सगळ्या हल्लेखोरांना काही तासातच मारण्यात आलं. या धुमश्चक्रीवेळी अंदाधुंद गोळीबार आणि स्फोटांचे आवाज सातत्याने ऐकायला येत होते. शीख समाजातील एक व्यक्ती आणि तालिबानच्या सुरक्षा यंत्रणेतील एक जण यांचा या हल्ल्यात मृत्यू झाला.

धुळीचे लोळ आणि स्फोटामुळे निर्माण झालेला धूर यामुळे गुरुद्वारा परिसराला अवकळा आली आहे. हल्ल्यातून सावरायला शीख समाजाला वेळ लागेल. शीख समाजाने हल्ल्यावेळी तत्परतेने मदतीला धावून आल्याबद्दल तालिबानचे आभार मानले आहेत. पण आम्हाला आता इथे सुरक्षित वाटत नाही, आम्हाला हा देश सोडून जायचं आहे असं त्यांनी सांगितलं.

"आम्हाला व्हिसा द्या असं आवाहन आम्ही भारत सरकारला केलं आहे, आम्हाला आता इथे राहायचं नाहीये", असं सुखबीर सिंग खालसा यांनी म्हटलं आहे.

"आम्ही इथे उरलो आहोत कारण आमच्याकडे भारतात जायला व्हिसा नाही, कोणालाही इथे राहायचं नाहीये. आज गुरुद्वारावर हल्ला झाला. भविष्यातही हे घडू शकतं. हे सातत्याने असंच घडत राहू शकतं", असं ते सांगतात.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)