मोहम्मद पैगंबरांचं चित्र का दाखवलं जात नाही?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, संशोधन – जॉन मॅकमेनॉस
- Role, संकलन – जान्हवी मुळे
इस्लाम धर्माचा पाया घालणारे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी जेव्हा जेव्हा चर्चा होते, तेव्हा तेव्हा एक गोष्ट अनेकांना प्रकर्षानं जाणवली असेल. या कुठल्याही चर्चेमध्ये मोहम्मद पैगंबरांचं चित्र कधीच दाखवलं जात नाही. इतकंच नाही, तर इस्लाममधले इतर कोणतेही प्रेषित तसंच अल्लाहचं कुठलंही चित्र कधीच दाखवलं जात नाही.
जगभरातील बहुतांश मुस्लिमांमध्ये असं चित्रण किंवा पुतळा हे मूर्तीपूजेला प्रोत्साहन देणारं आणि म्हणूनच निषिद्ध मानलं जातं. कधी कुणी असं चित्र रेखाटलं, तर त्यावरून अनेकदा मोठे वादही झाले आहेत. शार्ली एब्दो या फ्रेन्च साप्ताहिकावर झालेल्या हल्ल्याविषयीही तुम्ही वाचलं असेल.
पण पैगंबरांचं चित्र न दाखवण्यामागचं कारण काय आहे, पैगंबरांचं चित्र कधीच काढलं गेलं नव्हतं का? इस्लाममधला पवित्र ग्रंथ मानल्या जाणाऱ्या कुराणमध्ये त्याविषयी काय लिहिलं आहे आणि इतिहास काय सांगतो? या सगळ्याचा इस्लाममधल्या कलेवर कसा परिणाम झाला, जाणून घेऊयात.
कुराणमध्ये काय म्हटलं आहे?
कुराणमध्ये मोहम्मद पैगंबरांचं किंवा अल्लाहचं कुठल्याही स्वरूपातलं चित्रण करण्यावर स्पष्टपणे बंदी घातलेली नाही. म्हणजे असं चित्र काढू नये, कोरू नये किंवा रंगवू नये असं कुठे थेट म्हटलेलं नाही.
पण काही ओळी अल्लाहचं वर्णन करतात. सूरा (प्रकरण) क्र 42 मधील आयत 11 चं साधारण भाषांतर असं होतं, "(अल्लाह) हा आकाश आणि पृथ्वीचा निर्माता आहे... (तो इतका महान आहे की) त्याची तुलना कशाशीच होऊ शकत नाही."
इस्लामला मानणारे याचा अर्थ असा घेतात की, 'अल्लाहचं सौंदर्य आणि महानता एवढी आहे, की ती मानवी हातांना रेखाटता येणार नाही. त्यामुळेच माणसानं असं करणं हा अल्लाहचा अपमान ठरतो.' हाच नियम इस्लाममधील प्रेषितांना लागू होतो.

फोटो स्रोत, Getty Images
कुराणच्या 21 व्या सूरामध्ये 52 ते 54 व्या आयतांमध्ये एक संवाद आहे. त्यात म्हटलं आहे, "(इब्राहीम यांनी) आपल्या वडिलांना आणि लोकांना सांगितलं 'या काय प्रतिमा आहेत, ज्यांच्यासाठी तुम्ही इतके निष्ठावान बनला आहात?' लोकांनी उत्तर दिले, 'आमच्या वाडवडिलांना त्यांची पूजा करताना आम्ही पाहात आलो आहोत.' इब्राहीम यांनी (त्यावर) म्हटलं, 'निश्चितच, तुम्ही आणि तुमच्या वाडवडिलांनी धडधडीत चुकीचा मार्ग अंगीकारला आहे.' "
यातून इस्लाममध्ये एक विचार रुजला की, अशा प्रतिमा मूर्तीपूजेला प्रोत्साहन देतात - म्हणजेच, लोक ती मूर्ती ज्याचं प्रतीक आहे त्या ईश्वरापेक्षा केवळ प्रतिमेचीच लोक पूजा करू लागतात.
कुराणमध्ये पैगंबरांचं चित्रण करण्यावर थेट बंदी नसली, तरी 'हादिथ'मध्ये ही कल्पना मांडलेली दिसते.
इस्लामिक परंपरा काय सांगते?
'हादिथ' हा प्रेषित मोहम्मद आणि त्यांच्या साथीदारांचं जीवन तसंच त्यांची शिकवण सांगणाऱ्या कथांचा संग्रह आहे. पैगंबरांच्या मृत्यूनंतर ही लिहिली गेली आहेत. हादिथमध्ये अल्लाह, पैगंबर आणि अन्य प्रेषितांच्या चित्रणाला बंदी घातली आहे.
ढोबळ मानानं काही इस्लामिक परंपरांनुसार कुठल्याही जीवांचं, विषेशतः मानवी आकृतींचं चित्रणही निषिद्ध मानलं जातं. त्यामुळे इस्लामिक कलेमध्ये अमूर्त, भौमितिक आकृत्या, कॅलिग्राफी (सुलेखन) यांचा वापर मोठ्या प्रमाणात होताना दिसतो.
पण शिया इस्लामच्या काही परंपरांमध्ये ही बंदी थोडी शिथिल आहे. सातव्या शतकात तेव्हाच्या इराणमध्ये, म्हणजे पर्शिया (फारस) या देशात प्रेषितांची चित्रं तयार केलेली आढळून आली आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
युकेतील एडिंबरा विद्यापीठाच्या पोउलप मोना सिद्दीकी त्याविषयी माहिती देतात की, मोंगोल आणि ऑटोमन साम्राज्याच्या काळातही अशा प्रतिमा सापडतात. त्यात मोहम्मद पैगंबरांचा चेहरा स्पष्टपणे दाखवलेला नाही, मात्र हे त्यांचंच चित्रण आहे हे स्पष्टपणे लक्षात येतं. पण या प्रतिमा "लोकांनी प्रेम आणि आदराच्या भावनेतून काढल्या आहेत आणि त्यांची पूजा करण्याचा कुठलाही उद्देश त्यामागे नव्हता," असंही त्या स्पष्ट करतात.
मग असं चित्रण 'हराम' किंवा निषिद्ध कधीपासून झालं?
अशा प्रतिमा खासगी स्वरूपातच अस्तित्वात होत्या आणि त्यांचं सार्वजनिक प्रदर्शन केलं जात नसे, असं अमेरिकेच्या मिशिगन विद्यापीठात इस्लामिक कलेचा अभ्यास करणाऱ्या ख्रिस्तियन ग्रबर आवर्जून सांगतात.
त्यांच्या मते, "प्रिंटिंग तंत्रज्ञान विकसित झालं आणि यरोपियन देशांनी मुस्लिम राष्ट्रांमध्ये सत्ता मिळवून वसाहती स्थापन करायला सुरूवात केली तेव्हा हे बदल प्रकर्षानं होऊ लागले. ख्रिश्चन धर्मापेक्षा इस्लाम कसा वेगळा आहे, हे दर्शवण्यासाठी प्रेषित मोहम्मदांचं चित्रण बंद झालं असं त्यांचं म्हणणं आहे."
बहुतांश मुस्लीम अभ्यासकांच्या मते अगदी सुरुवातीपासूनच प्रेषित मोहम्मदांचं चित्रण निषिद्ध मानलं गेलं आहे. लीड्सच्या मक्का मशिदीचे इमाम कारी असीम यांनी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं, की "प्रेषित महोम्मदांची जी चित्रं उपलब्ध आहेत, त्यांचे मध्ययुगातील संदर्भ समजून घ्यायला हवेत. यातली बहुतेक चित्र त्या रात्रीचं दृष्य मांडणारी आहेत, जेव्हा पैगंबरांनी रात्री स्वर्गात प्रवास करून अल्लाहची भेट घेतली होती. (इस्रा आणि मेराज) या चित्रांवरही तेव्हाच्या इस्लामिक तज्ज्ञांनी आक्षेप घेतला होता."
इथे लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे ही थेट पैगंबरांची व्यक्तिचित्रं नाहीत. या चित्रांचा विषय स्पष्ट नाही, तसंच त्यात पैगंबरांचं चित्रण आहे की त्यांच्या कुणा साथीदाराचं हेही स्पष्ट होत नाही, असंही असीम नमूद करतात.

फोटो स्रोत, Getty Images
प्राध्यापक ह्यू गोडार्ड एडिंबरा विद्यापीठात अलवालीद सेंटर फॉर स्टडी ऑफ इस्लाम इन कंटेंपररी वर्ल्डमध्ये संचालक आहेत. ते सांगतात की, "कुराण आणि हादिथमध्ये याविषयी एकवाक्यता दिसत नाही. नंतरच्या काळातही मुस्लीम समुदायात याविषयी वेगळी मतं दिसून येतात."
पण कट्टर वहाबी विचारसरणी आल्यापासून अल्लाहशिवाय इतर कुणाची, अगदी प्रेषितांची उपासनाही संशयानं पाहिली जाऊ लागली, असं ते सांगतात. सौदी अरेबियातले धर्मगुरू मोहम्मद इब्न अब्द अल वहाब हे या विचारसरणीचे प्रणेते होते.
"गेल्या दोनशे किंवा तीनशे वर्षांत हा वाद टोकाचा बनला आहे," असं ते सांगतात.
इस्लामिक कलेचा उदय
आधी नमूद केल्याप्रमाणे इस्लामच्या शिया आणि सुन्नी पंथांच्या परंपरेमध्ये या मुद्द्यावरून मतभिन्नता आढळून येते. पण इस्लामिक तज्ज्ञ अभ्यासकांमधल्या एका सर्वसाधारण मान्यतेनुसार प्रेषित मोहम्मद पैगंबरांचं चित्रण केलं जात नाही.
इस्लाममध्ये व्यक्तीचित्रणावर सर्रास बंदी नाही, मात्र धार्मिक संदर्भात अशी व्यक्तीचित्रणं येत नाहीत. त्यामुळेच आपल्याला मुस्लीम राज्यकर्त्यांची व्यक्तीचित्रं काढलेली दिसून येतात, पण अल्लाह, पैगंबर किंवा कुराणातील कुठल्याही व्यक्तीचं चित्रण दिसत नाही.

फोटो स्रोत, Getty Images
परिणामी इस्लामिक कलेचा इतर धार्मिक कलांपेक्षा वेगळा विकास झाल्याचं दिसून येतं. म्हणजे एकीकडे भारतात मंदिरांमध्ये देवदेवतांच्या मूर्ती आढळून येतात किंवा युरोपियन चर्चमध्ये जिजस किंवा मेरी आणि संतांची चित्रं आढळून येतात. पण मशिदी सजवण्यासाठी भौमितिक आकृत्या, सुलेखन किंवा कलाकुसर यांचा वापर केलेला दिसून येतो.
पैगंबरांचं चित्रण करण्यास बंदी असल्यानं काही ठिकाणी कुराणमध्ये पैगंबरांचं वर्णन करणाऱ्या आयत सुलेखनातून रेखाटल्या गेल्या. ऑटोमन साम्राज्याच्या काळातले अशा सुलेखनाचे नमुने जगभरातील अनेक संग्रहालयांमध्ये जतन करून ठेवण्यात आले आहेत.
पैगंबरांची वादग्रस्त चित्रं
- 2005 साली डेन्मार्कच्या युलांड्स-पोस्टेन (Jyllands-Posten) या वृत्तपत्रानं प्रेषित मोहम्मद यांना दर्शणारी 12 कार्टून्स काढली होती, ज्यावरून गदारोळ उडाला आणि मुस्लीम देशांनी टीकेची झोड उठवली.
- 2010 साली शार्ली एब्दो या फ्रेन्च साप्ताहिकानं प्रेषित मोहम्मद एडिटर इन चीफ असल्याची कल्पना करत शरिया एब्दो नावानं एक विशेषांक काढायचं जाहीर केलं होतं. त्यानंतर पुढच्या वर्षी शार्ली एब्दोच्या पॅरीसमधील कार्यालयावर पेटता गोळा टाकून हल्ला करण्यात आला होता.
- त्यानंतर 2012 साली शार्ली एब्दोनं प्रकाशित केलेल्या कार्टून्समध्ये प्रेषित मोहम्मदांच्या चित्रणावरून पुन्हा वाद झाला. प्रेषित मोहम्मदांची कार्टून्स प्रकाशित केल्यानंतर 2015 साली प्रेषित या साप्ताहिकावर पुन्हा कट्टरतावाद्यांनी हल्ला केला ज्यात बारा जणांचा मृत्यू झाला.
- 2015 साली इराणी चित्रपट निर्माते माजिद मजिदी यांच्या 'मोहम्मद द मेसेंजर ऑफ गॉड' या चित्रपटावरूनही अनेक ठिकाणी वाद झाला. प्रेषित मोहम्मद यांच्या जीवनावर आधारीत या चित्रपटात पैगंबरांचं कुठलंही थेट चित्रण नव्हतं आणि इराणमध्ये अनेकांनी त्याची प्रशंसाही केली होती.
- 2020 साली एक धडा शिकवताना प्रेषित मोहम्मदांची कार्टून्स वापरल्यानं सॅम्युएल पेटी या शिक्षकावर हल्ला झाला आणि त्यांचं शीर धडावेगळं करण्यात आलं.
भारतातील कायदा काय सांगतो?
प्रेषित मोहम्मदांच्या चित्रणाविषयी भारतीय कायद्यात कुठलीही विशेष तरतूद नाही. पण यासंदर्भातल्या तक्रारी धार्मिक गोष्टींसंदर्भात भारतीय दंडविधानातले कलमांअंतर्गत नोंदवल्या जातात.
भारतीय दंडविधानाचं कलम 295 ते 298 हे धार्मिक गोष्टींसंदर्भातील अपराधांशी निगडित आहे. त्यातलं कलम 298 नुसार एखाद्याच्या धार्मिक भावना दुखावण्याच्या उद्देशानं कृत्य करण - तसे शब्द उच्चारणं, आवाज काढणं किंवा खाणाखुणा करणं अशा गोष्टी हा गुन्हा मानला जातो. भारतीय दंडविधानाच्या कलम 153 नुसार दंगल माजवण्याच्या उद्देशानं केलेलं प्रक्षोभक कृत्यही गुन्हा ठरतं.
या दोन कलमांअंतर्गत प्रेषित मोहम्मद यांच्या चित्रणासंदर्भातले गुन्हे नोंदवले जाऊ शकतात आणि त्यावर कारवाई केली जाऊ शकते.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








