अरब देशांमध्ये काम करणाऱ्या भारतीयांवर मुस्लीम द्वेषाच्या राजकारणाचा काय परिणाम होतो?

अरब देशांमध्ये लाखो भारतीय काम करतात (प्रतिकात्मक छायाचित्र)

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अरब देशांमध्ये लाखो भारतीय काम करतात (प्रतिकात्मक छायाचित्र)
    • Author, रजनीश कुमार
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

तेजस्वी सूर्या 31 वर्षांचे तरुण खासदार आहेत. त्यांचं 2015 सालचं एक ट्वीट दोन वर्षांपूर्वी वादाच्या भोवऱ्यात अडकलं होतं. '95 टक्के अरब महिलांना गेल्या काही वर्षांपासून ऑर्गेज्म मिळालं नाही,' असं ट्वीट त्यांनी केलं होतं.

तेजस्वी सूर्या खासदार बनल्यानंतर त्यांच्या या ट्वीटचा स्क्रिनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यावेळही आखाती देशांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.

पक्षाने त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही परंतु पाच वर्षांनंतर त्यांना हे ट्वीट काढावं लागलं. आता पुन्हा एकदा भाजपला 37 वर्षीय नेत्या नुपूर शर्मा यांच्या वक्तव्यावरून बॅकफूटवर जावं लागलं आहे.

नुपूर शर्मा यांनी एका न्यूज चॅनेलवरील चर्चासत्रात पैगंबर मोहम्मद यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. या मुद्यावरून नुपूर शर्मा आणि भाजपचे आणखी एक प्रवक्ते नवीन कुमार जिंदल यांनीही पैगंबरांविषयी वादग्रस्त ट्वीट केलं होतं.

या वक्तव्यांनंतर आखाती मुस्लीम देशांनी तीव्र शब्दात आक्षेप घेतला. भारताने माफी मागावी असंही कतारने म्हटलं. हा वाढता विरोध लक्षात घेता भाजपने ही आपली भूमिका नसल्याचं स्पष्ट केलं आणि नुपूर शर्मा आणि नवीन कुमार जिंदल यांची पक्षातून हकालपट्टी केली.

आखाती देशांशी भारताचे संबंध कायम चांगले राहिले आहेत. या देशांमध्ये लाखो भारतीय काम करतात. भारतीय कामगारांमध्ये हिंदूंची संख्या लक्षणीय आहे. UAE मध्ये 35 लाख भारतीय काम करतात.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

ही संख्या UAE च्या लोखसंख्येच्या एकूण 30 टक्के एवढी आहे. सौदी अरेबियामध्येही लाखोंच्या संख्येने भारतीय काम करतात. ऑक्टोबर 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा दौरा केला होता. यावेळी त्यांनी अरब न्यूजला 29 ऑक्टोबर रोजी मुलाखत दिली होती.

विरोधाभासी राजकारण

या मुलाखतीत नरेंद्र मोदी म्हणाले होते, "सुमारे 26 लाख भारतीयांचं सौदी अरेबिया दुसरं घर आहे. इथल्या प्रगतीत त्यांचंही योगदान आहे. दरवर्षी मोठ्या संख्येने भारतीय हज यात्रेसाठी आणि कामानिमित्त याठिकाणी येतात. मला त्यांना हे सांगायचं आहे की तुम्ही सौदीमध्ये आपली जी जागा बनवली आहे त्याचा मला अभिमान आहे. त्यांची मेहनत आणि निष्ठेमुळे सौदीत भारताचा सन्मान होतो. यामुळे दोन देशात द्वीपक्षीय संबंध आणखी दृढ होण्यास मदत होते. आम्हाला विश्वास आहे की सौदीसोबत तुमचे संबंध असेच कायम चांगले राहतील."

या भागात भारताचे 80 लाख लोक राहतात, असंही पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं होतं. हे लाखो भारतीय इथून अब्जावधी डॉलर्स कमवून भारतात पाठवतात. वर्ल्ड बँकनुसार, गेल्यावर्षी विदेशात स्थायिक झालेल्या भारतीयांनी 87 अब्ज डॉलर भारतात पाठवले आणि यात आखाती देशांमध्ये काम करणाऱ्या भारतीयांचं 45 टक्यांहून अधिक योगदान आहे.

ऊर्जा सुरक्षा प्रकरणात भारत आखाती देशांवर अवलंबून आहे. 2019 मध्ये नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा दौरा करत असताना म्हटलं होतं की, भारत सौदी अरेबियाकडून 18 टक्के कच्च तेल आणि आवश्यक असलेलं 30 टक्के एलपीजी आयात करतो.

शिवाय इराण आणि इराककडूनही भारत तेल आयात करतो. भारत आपल्या गरजेनुसार 80 टक्के तेल आयात करतो. यूएई भारताचा तिसऱ्या क्रमांकाच मोठा ट्रेड पार्टनर आहे आणि सौदी अरेबिया चौथ्या क्रमांकाचा.

एकाबाजूला मोदी म्हटले की भारतीयांनी सौदी अरेबियात आपले जे स्थान मिळवले आहे त्याचा भारताला अभिमान आहे आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या पक्षाचे नेते पैगंबर मोहम्मद यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करतात? भाजपची राजकीय रणनीती परराष्ट्र संबंध वाढवण्यासाठी कमकुवत सिद्ध होतेय का?

जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात पश्चिम आशियाच्या तज्ज्ञ प्राध्यापक सुजाता ऐश्वर्या म्हणाल्या, "भाजपचं राजकारण परराष्ट्र धोरणांसाठी अडचणीचं आहे. तुमच्या राजकारणाचे पडसाद परराष्ट्र धोरणांवरही होत असतात.

आखाती देशांमध्ये लाखोंच्या संख्येने जे भारतीय काम करत आहेत त्यांच्यावरही याचा परिणाम होतो. काही व्यावसायिक भारतीयांना नोकरीसाठी नकार देतील. आखाती देशांच्या नाराजीमुळे भारताचंही मोठं नुकसान होऊ शकतं. तेल देणं बंद करतील असं नाही पण 1973 मध्ये इस्रायलला आखाती देशांनी तेल देणं बंद केलं होतं."

त्या पुढे सांगतात, "अरेबियाशी संबंध केवळ तेल आणि आर्थिक व्यवहारशी संबंधित नाहीय. तर आपले संबंध सांस्कृतिक आणि ऐतिहासिक सुद्धा आहे. भारतीयांनी मोठ्या मेहनतीने तिथे आपलं स्थान निर्माण केलं आहे. त्यांना भाजपच्या या राजकारणाचा फटका बसू शकतो.

तुम्ही अबूधाबी येथे मंदिराची पायाभरणी करता आणि इथे एवढ्या खालच्या स्तराचं राजकारण करता. आपल्या राजकारणाची एक पातळी होती आणि त्यामुळे विदेशातही आपली प्रतिष्ठा होती. आता ही प्रतिष्ठा धुळीला मिळत चाललीय. या राजकारणामुळे भारताचं आर्थिक नुकसान होईल. आखाती देशांमध्ये आतापासूनच भारतीय सामानांवर बहीष्कार टाकण्याची मोहीम सुरू झालीय."

आखाती देशांत काम करणारे भारतीय काय म्हणतात?

अलाहबादचे डॉ. तारीक अफाक सौदी अरेबियाची राजधानी रियाधमध्ये सर्जन आहेत. त्यांना आम्ही विचारलं की भारतात सुरू असलेल्या घडामोडींचा परिणाम सौदी अरेबियात राहणाऱ्या भारतीयांवर कसा होतो?

सौदी अरेबिया

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स सलमान आणि नरेंद्र मोदी

ते म्हणाले, "याठिकाणी शासन व्यवस्थेला विरोध करण्याला किंवा विरोधात आंदोलन करण्यावर बंदी आहे. माध्यमांवरही मर्यादा आहेत. इथले स्थानिक लोक काय विचार करतात याचा नेमका अंदाज घेता येत नाही. एका मुस्लीम व्यक्तीसाठी पैगंबर मोहम्मद सर्वकाही आहे. त्यांचा अपमान झालेला कोणालाही सहन होणार नाही."

ते पुढे म्हणाले, "अशा काही घटना घडल्यानंतर इथे काम करणाऱ्या हिंदूंसाठीही अडचण होते. सौदी अरेबिया आणि पैगंबर मोहम्मद यांच्या नात्याची इथे राहणाऱ्या हिंदूंनाही कल्पना आहे. भारतीयांची प्रतिमा इथे चांगली आहे, पण देशात अशाप्रकारचं राजकारण सुरू राहीलं तर आगामी काळात याचा परिणाम दिसेल.

लोक नोकरी देणार नाहीत. आखाती देशांनी सांगण्यापूर्वीच भाजपने कारवाई केली असती तर योग्य ठरलं नसतं का. यामुळे आम्हालाही अभिमान वाटला असता आणि भारताची धर्मनिरपेक्षतेची प्रतिमा आणखी मजबूत झाली असती."

बिहारच्या औरंगाबादचे श्यामकुमार दुबईत एका भारतीय कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर आहेत. ते स्वत:ला भाजप समर्थक सांगतात. त्यांना नुपूर शर्मा यांची प्रतिक्रिया आणि आखाती देशांच्या भूमिकेची माहिती आहे. त्यांना विचारलं की दुबईत त्यांच्याशी कधी भेदभाव करण्यात आला का? किंवा हिंदू धार्मिक आस्थेविषयी तिकडच्या सरकारने कधी आक्षेपार्ह वक्तव्य केलं का?

ते म्हणाले, "असं कधीही झालं नाही. हिंदू म्हणून मला कधीही भेदभावाचा सामना करावा लागला नाही. माझी पत्नी इथे छठ पूजा करते आणि तिला काधी अडचण आली नाही."

"मोदी सरकार आल्यानंतर एनआरआयला कधी समस्या आली नाही. अनेक सकारात्मक गोष्टी घडल्या. एवढच काय तर यूएईच्या सरकारी कार्यालयात हिंदीत महत्त्वाच्या सूचना लिहिलेल्या दिसतात.

सीएए आणि एनआरसीचा वाद झाल्यानंतर मी सुद्धा सोशल मीडियावर लिहायचो पण अनेक मुस्लीम मित्र नाराज झाल्याने मी फेसबुक सोडलं. नुपूर शर्मा यांचं वक्तव्य जरा अती आहे. आपण कोणाच्याही आराध्यांविषयी असं बोलायला नको," असंही श्यामकुमार म्हणाले.

द्विपक्षीय संबंधांवर परिणाम?

अशा वक्तव्यांचा आखाती देशांमध्ये राहाणाऱ्या भारतीयांवरही परिणाम होतो का? श्याम सांगतात, "इथल्या व्यवस्थेत पैसे, रोजगार आणि व्यवसाय हेच रोजचं आयुष्य आहे. धार्मिक वादांवर इथ चर्चा होत नाही.

हां, वैयक्तिकरित्या लोक काय विचार करतात हे सांगणं कठीण आहे. यूएईमध्ये खरंच धर्माला इतकं महत्त्व असतं तर त्यांनी इस्रायलशी संबंध सुरळीत केले नसते किंवा इस्रायलबरोबर व्यापारी करारही केले नसते. युएई आणि सौदी अरेबिया, कतार, कुवैत हे अगदीच वेगवेगळे आहेत."

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

श्याम सांगतात, "भारत आणि अरबस्तानातील इस्लामी देशांमधील संबंध काही एकतर्फी नाहीत. त्यांच्याकडे इंधन आहे पण हे तेलाचं नाटक पुढच्या 50 वर्षांपेक्षा जास्त चालणार नाही.

खाण्या-पिण्यासकट हे देश दुसऱ्या देशांवर अवलंबून आहेत. भारतातील लोक तेथे काम करत आहेत म्हणजे ते काही भारतीयांवर उपकार करत नाहीयेत. भारतीय लोक तिथं भरपूर कष्ट करतात. मजुरांपासून सीईओंपर्यंत भारतीय लोक तिथं आहेत."

सौदी अरेबियामधील दमाम शहरात बिहारमधील रामेश्वर साव एक बांधकाम कंपनीत मजूर आहेत.

यूएई

फोटो स्रोत, Getty Images

नुपूर शर्मांच्या टीप्पणीबाबत अरब देशांनी दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल विचारतात ते म्हणाले,

"मलासुद्धा फेसबुकवर समजलंय. सौदी अरेबियामध्ये लोक फक्त काम करतात आणि घरी जातात. जर धर्म सगळं काही देत असतात तर मला भारतातच रोजगार मिळाला असता. मी माझी पत्नी आणि मुलांपासून इतका दूर का राहातोय? याचं कारण स्पष्ट आहे. पर्याय नाही.

इथं भारताची प्रतिमा चांगली आहे, पण भारताचं राजकारण असंच सुरू राहिलं तर आमची प्रतिमा खराब होईल. आपली प्रतिमा चांगली आहे म्हणूनच पाकिस्तानी लोक इथं स्वतःला भारतीय म्हणतात. आता भारतीयांना स्वतःला पाकिस्तानी म्हणवून घेण्याची वेळ येऊ नये हीच इच्छा."

भारताचं अंतर्गत राजकारण आपल्या अर्थव्यवस्थेला धक्का पोहोचवेल का, याबद्दल युपीए-2 मध्ये परराष्ट्रमंत्री असणारे सलमान खुर्शीद सांगतात, "या विषयाची जास्त काळजी घेणं आवश्यक आहे. देशात सत्ता मिळवण्यासाठी अशा अर्थव्यवस्था आणि परराष्ट्रनितीला धक्का पोहोचवणाऱ्या राजकारणाचा वापर टाळला पाहिजे."

X पोस्टवरून पुढे जा, 3
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 3

युएई आणि भारतात मुक्त व्यापार करार होणार आहे. सौदी अरेबियाने 2019 साली भारतात पेट्रोकेमिकल्स, पायाभूत सुविधा आणि तेलशुद्धिकरण प्रकल्पात 100 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला होता.

इराण आणि भारत चाबहार बंदरासाठी काम करत आहेत. अफगाणिस्तानात तालिबान आल्याने तिथलं भारताचं हित आधीच धोकत्यात आलं आहे.

सौदी अरेबियात भारताचे राजदूत म्हणून काम केलेले तलमीज अहमद सांगतात, भारताची प्रतिमा अरब जगतात फार चांगली आहे. पण असलं राजकारण सगळं संपवून टाकेल.

ते म्हणतात, "अऱब देशांमध्ये विरोध प्रदर्शन करण्यावरच बंदी आहे. त्यामुळेच लोक रस्त्यावर उतरून निदर्शनं करत नाही, पण सामान्य लोकांच्या मनात राग असतो."

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)