You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अमेरिका कॅपिटॉल हल्ला : हल्लेखोर 'युद्धाच्या तयारीने आले होते', सुरक्षा अधिकाऱ्यांची साक्ष
अमेरिकी काँग्रेसवर 6 जानेवारीला झालेल्या हल्ल्यानंतर हकालपट्टी करण्यात आलेल्या यूएस कॅपिटॉलच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी गुप्तचर यंत्रणेला त्यांच्या अपयशाला जबाबदार धरलं आहे.
सिनेटच्या समितीसमोर साक्ष देताना अधिकाऱ्यांनी सांगितले की दंगेखोर शस्त्रं, रेडिओ आणि गिअरसह आले होते. ते "युद्धासाठी तयारी" करून आले होते.
कॅपिटॉलचे माजी पोलीस प्रमुख स्टीव्हन संड यांनी सांगितलं, "हा लष्करी पद्धतीचा समन्वयित हल्ला" नव्हता. तर निषेध करण्याची तयारी होती.
ट्रंप समर्थकांनी यूएस कॅपिटॉलवर केलेल्या हल्ल्यात चार जणांचा मृत्यू झाला होता.
मंगळवारी (23 फेब्रुवारी) होमलँड सेक्युरिटी अॅण्ड गव्हर्नमेंटल अफेअर्स समितीला साक्ष देणाऱ्या चार अधिकाऱ्यांपैकी तीन अधिकाऱ्यांनी राजीनामा दिला. यातील एक कॅपिटॉल पोलीस अधिकारी ठार झाला.
वॉशिंग्टन डीसीचे कार्यकारी पोलीस प्रमुख रॉबर्ट कॉन्टी तिसरे यांनी कायदेतज्ज्ञांना सांगितले की, दंगल शांत करण्यासाठी पेंटागॉनला नॅशनल गार्डचं सैन्य तैनात करण्यासाठी किती वेळ लागला हे पाहून ते अवाक् झाले.
हा हल्ला म्हणजे बंडखोरी होती असा आरोप डेमोक्रॅट्सने केला होता. जमावाला भडकवल्याच्या आरोपावरून माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्यावर महाभियोग चालवण्यात आला. नंतर सिनेटने त्यांची निर्दोष मुक्तता केली आणि दोनदा महाभियोग चालवण्यात आलेले ते अमेरिकेच्या इतिहासातील पहिले राष्ट्राध्यक्ष ठरले.
अधिकारी काय म्हणाले?
गर्दीत समन्वय आणि नियोजन झाल्याचं दिसून आलं हे तिन्ही अधिकाऱ्यांनी मान्य केलं.
कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून कॅपिटॉल इमारतीपासून दूर असलेल्या सुरक्षा सीमेवर पाईप बॉम्ब ठेवण्यात आल्याचं दिसून येतं, असं कॅपिटॉलचे माजी पोलीस प्रमुख स्टीव्हन संड सांगतात.
पोलीस दलातील 30 वर्षांचा अनुभव असलेला पोलीस म्हणाला, "हा गट कॅपिटॉलच्या परिसरात पोहोचला तेव्हा मी पाहिलेल्या आंदोलकांच्या कोणत्याही गटाप्रमाणे तो वागत नव्हता."
ते पुढे म्हणाले, " अनेक संस्थांच्या चुका आणि समन्वयाच्या अभावामुळे ही घटना घडू शकली. याला केवळ अमेरिकेच्या कॅपिटॉल पोलिसांचं ढिसाळ नियोजन कारणीभूत नाही."
कॅपिटॉल पोलीस कॅप्टन कार्नीशा मेंडोसा यांनी या संघर्षाचं वर्णन करत असताना कायदेतज्ज्ञांना सांगितले की, हल्लेखोरांकडून फेकण्यात आलेल्या रासायनामुळे त्यांचा चेहरा भाजला आणि अजूनही त्या पूर्णपणे बऱ्या झालेल्या नाहीत.
त्या म्हणाल्या, "माझ्या विभागातील जवळपास 19 वर्षांच्या कारकिर्दीत अनेक घटना घडल्या त्यापैकी ही सर्वांत वाईट घटना होती."
"आमच्यासोबत त्यादिवशी असलेल्या मनुष्यबळाच्या दहापटीने मनुष्यबळ असतं तरीही हा हल्ला तितकाच विध्वंसक ठरला असता असं माझं मत आहे."
हल्ला होऊ शकतो हा इशारा देणारा एफबीआयचा अहवाल सुरक्षा अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचू शकलेला नाही. अधिकाऱ्यांशी संपर्क करण्यात अपयशी ठरल्याचंही अधिकाऱ्यांनी सांगितलं.
अधिकाऱ्यांना कॅपिटॉलमध्ये लष्करी सैन्य नको असल्याचं वृत्त त्यांनी फेटाळलं.
सिनेटचे माजी सार्जंट मायकल स्टेंजर म्हणाले, "गुप्तचर यंत्रणांनी सहकार्य केले नाही हे आम्ही सर्वांनी मान्य केलं."
गर्दीला आळा घालण्यासाठी त्यादिवशी कोणतंही नागरी पोलीस दल सज्ज झालं नसतं, असे संड यांना वाटते.
सुनावणीचं नेतृत्व करणारे सिनेटर एमी क्लोबुचर यांनी सांगितले की, नॅशनल गार्डचं सैन्य तैनात करण्याबाबत साक्ष देण्यासाठी पेंटागॉनच्या अधिकाऱ्यांना पुढील आठवड्यात बोलावलं जाईल. या सुनावणीमुळे सुरक्षेच्या नवीन उपाययोजना ठरवण्यास मदत होईल असंही सिनेटर्सना वाटतं.
हल्ला कसा झाला?
बायडन यांच्या विजयावर शिक्कामोर्तब करण्यासाठीची चर्चा सदनात सुरू असताना अमेरिकेत बुधवारी (6 जानेवारी) कॅपिटल बिल्डिंगवर ट्रंप समर्थकांनी हल्ला केला. हा हल्ला करताना कॅपिटल इमारतीमध्ये शिरण्याचा प्रयत्न करताना चार जणांचा मृत्यू झाला.
या हल्ल्यानंतर अमेरिकन संसदेतल्या कामकाजाला पुन्हा सुरुवात करण्यात आली होती.
6 जानेवारीला ही चर्चा सुरू असतानाच कॅपिटल इमारतीच्या बाहेर निदर्शनं करत असलेले ट्रंप समर्थक इमारतीत घुसले. हे आंदोलक सदनापर्यंत पोहोचल्याने चर्चा थांबवण्यात आली होती.
या दरम्यान पोलिसांनी झाडलेली गोळी लागून एका महिलेचा मृत्यू झाला, तर इतर तीन जणांचा मृत्यू 'मेडिकल इमर्जन्सी'मुळे झाल्याचं वॉशिंग्टन डीसी पोलिसांनी म्हटलंय.
अनेक ट्रंप समर्थकांकडे शस्त्रंही होती. ट्रंप समर्थकांनी इमारतीच्या खिडक्या तोडल्या आणि पोलिसांच्या अंगावर ते धावूनही गेले. याचदरम्यान एका महिलेला गोळी लागली आणि तिचा नंतर मृत्यू झाला. नंतर ट्रंप यांनी आपल्या समर्थकांना घरी जाण्यास सांगितले परंतु आपलाच विजय निवडणुकीत झाल्याचा पुनरुच्चारही केला.
14 डिसेंबर रोजी सील बॅलटबॉक्समधून सर्टिफिकेट्स पाठवण्यात आले. ते 6 जानेवारी रोजी काँग्रेसमध्ये आणले गेले. इलेक्टोरोल मतांची मोजणी या घुसखोरीनंतर थांबवावी लागली.
कॅपिटलच्या पोलिसांनी ट्रंप समर्थकांच्या आंदोलनाला थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी पोलिसांचं न ऐकता झटापट सुरू केली. यादरम्यान स्टाफमधील कही लोकांनी बॅलट बॉक्स सुरक्षित बाहेर काढलं.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)