कॅपिटलः इव्हांका ट्रंपनी डिलीट केलं आंदोलकांना देशभक्त म्हणणारं ट्वीट, डोनाल्ड ट्रंप यांचं फेसबुक, ट्विटर अकाऊंट लॉक

कॅपिटॉल बिल्डिंगमधल्या हिंसाचारानंतर सोशल मीडिया कंपन्यांनी डोनाल्ड ट्रंप यांचं अकाऊंट लॉक केलंय. तर सर्मथकांना आवाहन करणारा त्यांचा व्हीडिओही काढून टाकण्यात आलाय. तर इव्हांका ट्रंप यांनी हिंसक समर्थकांना देशभक्त म्हणणारं ट्वीट नंतर डिलीट केलं.

निवडणुकीविषयी राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांनी केलेल्या ट्विट्समुळे त्यांचं अकाऊंट 12 तासांसाठी लॉक करण्यात करण्यात आलंय. त्यामुळे आता पुढचे 12 तास ट्रंप यांना ट्वीट करता येणार नाही.

याविषयी ट्विटरने म्हटलंय, "वॉशिंग्टन डीसीमधली हिंसक स्थिती पाहता आमच्या 'सिव्हिक इंटिग्रिटी पॉलिसी' नुसार डोनाल्ड ट्रंप यांनी आज पोस्ट केलेली तीन ट्विट्स हटवणं गरजेचं होतं, जी या धोरणाचं उल्लंघन करत होती.'

ट्रंप यांनी ती तीन ट्विटस काढून टाकली नाहीत तर त्यांचं अकाऊंट लॉकच ठेवण्यात येईल.

भविष्यामध्ये आपल्या कंपनीच्या सोशल मीडियासाठीच्या नियमांचं उल्लंघन ट्रंप यांनी केल्यास "डोनाल्ड ट्रंप यांचं अकाऊंट कायम स्वरूपी बंद करण्यात येईल," असा इशाराही ट्विटरने दिलाय.

फेसबुकनेही राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांचं अकाऊंट पुढच्या 24 तासांसाठी लॉक केलाय. राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांनी कंपनीच्या दोन नियमांचा भंग केल्याचं कंपनीने म्हटलंय.

ट्रंप यांचा व्हीडिओ हटवला

या कारवाईसोबतच ट्विटर, फेसबुक आणि युट्यूबवरून राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांचा एक व्हीडिओ काढून टाकण्यात आलाय. आंदोलकांनी कॅपिटॉल बिल्डिंगमध्ये हिंसाचार केल्यानंतर ट्रंप यांनी त्यांच्यासाठी एक संदेश दिला होता.

समर्थकांनी घरी परतावं असं आवाहन त्यांनी यात केलं होतं, पण सोबतच निवडणुकीदरम्यान घोटाळा झाल्याच्या दाव्याचाही त्यांनी पुनरुच्चार केला होता.

या व्हिडिओमुळे हिंसाचार कमी होण्याऐवजी तो वाढेल अशी शक्यता असल्याने आपण हा व्हीडिओ काढून टाकत असल्याचं फेसबुकने म्हटलंय.

कॅपिटॉल बिल्डिंगमध्ये हिंसाचार होण्यापूर्वी राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांनी वॉशिंग्टनच्या नॅशनन मॉलमध्ये आपल्या समर्थकांशी संवाद साधला होता. निवडणुकीदरम्यान घोटाळा झाल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं होतं.

याच्या काही तासांनंतरच अमेरिकेच्या कॅपिटॉल इमारतीबाहेर आणि आत हिंसाचाराला सुरुवात झाली आणि ट्रंप यांनी एका नव्या व्हीडिओ संदेशाद्वारे आपल्या दाव्यांचा पुनरुच्चार केला.

तर या व्हीडिओमध्ये निवडणूक विषयक दावे करण्यात आले असल्याने आपण तो हटवत असल्याचं युट्यूबने म्हटलंय.

ट्विटरवरून हा व्हीडिओ सुरुवातीला काढून टाकण्यात आला नव्हता. पण हा व्हीडिओ रिट्वीट, लाईक आणि त्यावर कॉमेंट करण्याचा पर्याय बंद करण्यात आला होता. पण नंतर ट्विटरवरूनही हा व्हीडिओ हटवण्यात आला.

इव्हांकांनी डिलीट केलं ट्वीट

युएस कॅपिटल बिल्डिंगमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांची मुलगी इव्हांका ट्रंप यांनी या हिंसक आंदोलकांना देशभक्त म्हटलं होतं.

पण त्यांच्या या ट्वीटवर मोठी टीका झाली आणि नंतर त्यांना हे ट्वीट डिलीट करत स्पष्टीकरण द्यावं लागलं.

ट्रंप समर्थकांनी कॅपिटल बिल्डिंगमध्ये घुसत हिंसाचाराला सुरुवात केली त्यावेळी अमेरिकन काँग्रेसमध्ये इलेक्टोरल कॉलेजविषयी चर्चा सुरू होती.

यानंतर इव्हांकांनी ट्वीट केलं होतं, "अमेरिकन देशभक्तांनो, सुरक्षेचं कोणत्याही प्रकारचं उल्लंघन किंवा आपल्या कायद्याचा अनादर स्वीकारला जाणार नाही. हिंसाचार ताबडतोब थांबवावा. कृपया शांतता बाळगा."

कॅपिटल इमारतीवर हल्ला करणाऱ्यांना देशभक्त म्हटल्याबद्दल इव्हांका ट्रंप यांच्यावर टीका होऊ लागली. लोकांनी याचा निषेध केला. यानंतर त्यांनी स्वतःचं ट्वीट डिलीट करत स्पष्टीकरण दिलं.

नवीन ट्वीट करत त्यांनी सांगितलं, "शांततापूर्ण विरोध निदशर्नं ही देशभक्ती असते. हिंसा स्वीकारार्ह नाही आणि याचा कडक शब्दांत निषेध व्हायलाच हवा."

इव्हांका या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांची मुलगी आहेतच पण सोबतच त्यांचे पती हे ट्रंप प्रशासनात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत, म्हणूनच इव्हांका ट्रंप यांचं ट्वीट महत्त्वाचं आहे.

इव्हांकांना व्हाईट हाऊसमध्ये ऑफिसही देण्यात आलं होतं आणि त्या त्यांच्या वडिलांच्या सल्लागारही आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)