अमेरिका : जो बायडन यांच्या विजयावर अमेरिकन काँग्रेसचं शिक्कामोर्तब

जो बायडन हे अमेरिकेचे पुढचे राष्ट्राध्यक्ष आणि कमला हॅरिस उप-राष्ट्राध्यक्ष असतील यावर अमेरिकन काँग्रेसने शिक्कामोर्तब केलंय. तर आपण सत्तेचं सुरळीत हस्तांतरण करणार असलो तरी या निवडणुकीचा निकालांशी सहमत नसल्याचं डोनाल्ड ट्रंप यांनी म्हटलंय.

काँग्रेसच्या संयुक्त सत्रामध्ये माईक पेन्स यांनी नॅन्सी पलोसी यांच्यासोबत बायडन यांच्या विजयाविषयीची घोषणा केली.

पेन्सलव्हेनिया आणि अॅरिझोनामधल्या मतांवर घेण्यात आलेले आक्षेप सिनेट आणि हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज अशा दोन्हीकडे फेटाळून लावण्यात आल्यानंतर इलेक्टोरल व्होट्सना मान्यता देण्यात आली.

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी एका निवेदनाद्वारे आपण सत्तेचं सुरळीत हस्तांतरण करणार असल्याचं म्हटलंय. पण यासोबतच त्यांनी निवडणूक निकालांविषयीच्या त्यांच्या दाव्यांचा पुनरुच्चार केला.

या निवेदनात ट्रंप म्हणतात, "निवडणूक निकालांशी जरी मी सहमत नसलो आणि ही गोष्ट जरी मला खटकणारी असली तरी 20 जानेवारीला सत्तेचं सुरळीतपणे हस्तांतरण होईल."

ट्रंप यांचा ट्विटर अकाऊंट सध्या ट्विटरने लॉक केलेला आहे. डोनाल्ड ट्रंप यांचे प्रवक्ते डॅन स्कॅव्हिनो यांनी हे निवेदन प्रसिद्ध केलंय.

बायडन यांच्या विजयावर शिक्कामोर्तब करण्यासाठीची चर्चा सदनात सुरू असताना अमेरिकेत बुधवारी (6 जानेवारी) कॅपिटल बिल्डिंगवर ट्रंप समर्थकांनी हल्ला केला. हा हल्ला करताना कॅपिटल इमारतीमध्ये शिरण्याचा प्रयत्न करताना चार जणांचा मृत्यू झाल्याचं वॉशिंग्टन डीसी पोलिसांनी म्हटलंय.

या हल्ल्यानंतर अमेरिकन संसदेतल्या कामकाजाला पुन्हा सुरुवात करण्यात आली होती.

बुधवारी ( 6 जानेवारी) ही चर्चा सुरू असतानाच कॅपिटल इमारतीच्या बाहेर निदर्शनं करत असलेले ट्रंप समर्थक इमारतीत घुसले. हे आंदोलक सदनापर्यंत पोहोचल्याने चर्चा थांबवण्यात आली होती.

या दरम्यान पोलिसांनी झाडलेली गोळी लागून एका महिलेचा मृत्यू झाला, तर इतर तीन जणांचा मृत्यू 'मेडिकल इमर्जन्सी'मुळे झाल्याचं वॉशिंग्टन डीसी पोलिसांनी म्हटलंय.

आतापर्यंत 52पेक्षा अधिक लोकांना अटक करण्यात आली असून त्यातल्या 47 जणांना कर्फ्यूच्या नियमांचा भंग केल्याबद्दल अटक करण्यात आली आहे.

अमेरिकन काँग्रेसचं सत्र सुरू असताना ट्रंप समर्थकांनी बॅरिकेड तोडून आत घुसखोरी केली. पोलिसांबरोबर त्यांची झटापटही झाली.

वॉशिंग्टन डीसी मेट्रोपोलिटन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 5 बंदुकाही जप्त करण्यात आल्या आहेत. यामध्ये हँडगन आणि लाँग गनचा समावेश आहे.

अटक करण्यात आलेले लोक डीसीमध्ये राहात नसल्याचे पोलीसप्रमुख रॉबर्ट कॉन्टी यांनी सांगितले. या घटनेत जखमी झालेल्या अधिकाऱ्यांवर उपचार सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

अनेक ट्रंप समर्थकांकडे शस्त्रंही होती. ट्रंप समर्थकांनी इमारतीच्या खिडक्या तोडल्या आणि पोलिसांच्या अंगावर ते धावूनही गेले. याचदरम्यान एका महिलेला गोळी लागली आणि तिचा नंतर मृत्यू झाला. नंतर ट्रंप यांनी आपल्या समर्थकांना घरी जाण्यास सांगितले परंतु आपलाच विजय निवडणुकीत झाल्याचा पुनरुच्चारही केला.

14 डिसेंबर रोजी सील बॅलटबॉक्समधून सर्टिफिकेट्स पाठवण्यात आले. ते 6 जानेवारी रोजी काँग्रेसमध्ये आणले गेले. इलेक्टोरोल मतांची मोजणी या घुसखोरीनंतर थांबवावी लागली.

कॅपिटलच्या पोलिसांनी ट्रंप समर्थकांच्या आंदोलनाला थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी पोलिसांचे न ऐकता झटापट सुरू केली. यादरम्यान स्टाफमधील कही लोकांनी बॅलट बॉक्स सुरक्षित बाहेर काढले.

'ट्रंप यांचा जॉर्जिया निवडणुकीचा दावा साफ चुकीचा'

जॉर्जियामध्ये निवडणूक जिंकल्याचा माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांचा दावा साफ चुकीचा आहे असं जॉर्जियाचे मुख्य निवडणूक अधिकारी ब्रॅड राफेनस्पर्जर यांनी म्हटलं आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांचे एक फोन रेकॉर्डिंग समोर आलं होतं. या रेकॉर्डिंगमध्ये ते जॉर्जिया प्रांताच्या वरिष्ठ निवडणूक अधिकाऱ्याला म्हणजेच ब्रॅड यांना विजयासाठी आवश्यक मतांची जुळवाजुळव करण्यास सांगत आहेत.

या कॉलसाठी ट्रंप यांच्यावर जोरदार टीका होते आहे. बेकायदेशीर पद्धतीने मतं बळकावण्याचा हा प्रकार असल्याचं अनेकजण म्हणत आहेत.

रिपब्लिकने पक्षाने जॉर्जियातील दोन जागांवर विजय मिळवला तर त्यांना संसदेच्या वरिष्ठ सभागृहात नियंत्रण राखता येईल. त्यांच्या उमेदवार हरला तर डेमोक्रॅट्स, हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह, व्हाईट हाऊसवर सिनेटवर वर्चस्व असेल.

तेच प्रामुख्याने बोलत होतो, आम्ही ऐकण्याचं काम केलं. मात्र मला हेच सांगायचं आहे की त्यांचा दावा साफ चुकीचा आहे असं ब्रॅड यांनी स्पष्ट केलं. ट्रंप यांनी सुमारे तासभर संवाद साधला होता.

कॉल रेकॉर्ड होत आहे हे मला माहिती नव्हतं आणि घरून ट्रंप यांच्याशी संवाद साधला असं ब्रॅड यांनी सांगितलं.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांचे एक फोन रेकॉर्डिंग समोर आले आहे. या रेकॉर्डिंगमध्ये ते जॉर्जिया प्रांताच्या वरिष्ठ निवडणूक अधिका-याला विजयासाठी आवश्यक मतांची जुळवाजुळव करण्यास सांगत आहेत.

'वॉशिंग्टन पोस्ट'ने हे रेकॉर्डिंग प्रसिद्ध केले आहे. यात राष्ट्राध्यक्ष ट्रंप रिपब्लिकन स्टेट सचिव ब्रेड रेफेनस्पर्जर यांना सांगत आहेत, "मला फक्त 11,780 मतं मिळवायची आहेत." रेफेनस्पर्जर ट्रंप यांना सांगत आहेत की जॉर्जियाचा निकाल योग्य आहे.

डेमोक्रॅटचे उमेदवार जो बायडन यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत जॉर्जिया प्रांतात विजय मिळवला. त्यांना एकूण 306 मतं मिळाली, तर ट्रम्प यांना 232 मतं मिळाली.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)