You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अमेरिका कॅपिटल हल्ला : पंतप्रधान मोदींसह जगभरातल्या नेत्यांनी केला निषेध
वॉशिंग्टन डीसीमधल्या कॅपिटल बिल्डिंगवर झालेल्या हल्लयाचा जगभरातल्या नेत्यांनी निषेध केलाय.
या हल्ल्यामुळे अमेरिकन काँग्रेसमध्ये होऊ घातलेलं संयुक्त सत्र होऊ शकलं नाही. यामध्येच जो बायडन यांच्या निवडणुकीतल्या विजयावर शिक्कामोर्तब होणार होतं.
अमेरिकन नागरिकांनी शांतता बाळगावी असं आवाहन करत, कॅपिटल इमारतीवरचा हा हल्ला म्हणजे लोकशाहीवरचा हल्ला असल्याचं अनेक जागतिक नेत्यांनी म्हटलंय.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवर म्हटलंय, "वॉशिंग्टन डीसीमधल्या दंगल आणि हिंसाचाराच्या बातम्यांनी मी व्यथित आहे. सत्तेचं हस्तांतरण शांततापूर्ण व्हावं. बेकायदेशीर विरोधामुळे लोकशाहीतल्या एका प्रक्रियेत अडथळा येता कामा नये."
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनीही हिंसाचारावर टीका केलीय. ते म्हणतात, "साऱ्या जगात अमेरिका लोकशाहीचं एक आदर्श उदाहरण आहे. म्हणूनच इथलं सत्तेचं हस्तांतरण शांततापूर्ण रीतीने होणं गरजेचं आहे."
कॅपिटल बिल्डिंगवर झालेला हा हल्ला म्हणजे पदावर असलेल्या राष्ट्राध्यक्षाने कायदेशीररित्या पार पडलेल्या निवडणूक निकालांवर कोणत्याही पुराव्यांशिवाय केलेल्या खोट्या दाव्यांची परिणीती असल्याचं अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी म्हटलंय. देशासाठी हा अतिशय शरमेचा आणि अवमानाचा क्षण असल्याचंही त्यांनी म्हटलंय.
स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सँचेज यांनी म्हटलंय, "माझा अमेरिकेतल्या लोकशाहीच्या ताकदीवर विश्वास आहे. नवे राष्ट्राध्यक्ष जो बायडन देशाला या तणावपूर्ण परिस्थितीतून बाहेर काढतील आणि अमेरिकन नागरिकांना एकत्र आणतील."
अशा प्रकारे हिंसा करणं चूक असल्याचं सांगत 'हा हल्ला अमेरिकेतल्या लोकशाहीवरचा हल्ला असल्याचं' फ्रान्सचे परराष्ट्र मंत्री जीन ले द्रियान यांनी म्हटलंय. तर आपला लोकशाहीवर विश्वास असल्याचे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्राँ यांनी म्हटलंय.
कॅपिटलमधला हिंसाचार चूक असल्याचं ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनीही म्हटलंय. ते म्हणाले, "वॉशिंग्टनमधली दृश्यं ही व्यथित करणारी आहेत."
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो म्हणाले, "शेजारच्या देशात झालेल्या हिंसाचाराचा कॅनडातल्या लोकांनाही धक्का बसलाय. हा लोकशाहीवरचा हल्ला आहे. लोकांचं मत हिंसाचाराद्वारे बदलता येऊ शकत नाही."
सर्वच राजकीय पक्षांनी संयम दाखवावा, असं तुर्कस्थानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलंय. तर या दुर्दैवी घटनेकडे पाहता अमेरिकेच्या आक्रमक धोरणाचे परिणाम आता त्यांच्या देशातच दिसू लागले असल्याचं व्हेनेझुएला सरकारने म्हटलंय. ट्विटरवर अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष, चिलीचे राष्ट्राध्यक्ष यांनी देखील वॉशिंग्टनमधील घटनेचा निषेध केलाय.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)