You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अमेरिका-तुर्की: वेळ आल्यावर आम्ही सूड घेऊत, निर्बंधांनंतर तुर्कीचा अमेरिकेला इशारा
रशियन बनावटीची क्षेपणास्त्र विरोधी यंत्रणा तैनात केल्यावरून अमेरिकेने नाटोतील सहकारी राष्ट्र तुर्कीवर निर्बंध लादले आहेत. तुर्कीने गेल्याच वर्षी रशियाकडून ही क्षेपणास्त्र विरोधी यंत्रणा खरेदी केली होती.
रशियाची जमिनीवरून हवेत मारा करणारी S-400 क्षेपणास्त्र यंत्रणा नाटोच्या तांत्रिक निकषांची पूर्तता करत नाही. तसंच युरो-आटलांटिक एकीसाठीही हे धोकादायक असल्याचं अमेरिकेचं म्हणणं आहे.
अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने सोमवारी तुर्कीवर निर्बंध लादत असल्याची घोषणा केली. या निर्बंधांमुळे तुर्कीच्या शस्त्रास्त्र खरेदीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
निर्बंध लादण्याच्या अमेरिकेच्या घोषणेनंतर रशिया आणि तुर्की दोघांनीही तत्काळ प्रतिक्रिया देत अमेरिकेच्या या निर्णयावर टीका केली.
रशियाकडून क्षेपणास्त्र खरेदी केल्यामुळे याआधीच अमेरिकेने तुर्कीला F-35 फायटर जेट कार्यक्रमातून बाहेरचा रस्ता दाखवला आहे.
अमेरिकेचा आक्षेप
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पियो यांनी एक निवेदन प्रसिद्ध करत म्हटलं, "अमेरिकेने यापूर्वीच तुर्कीला वरिष्ठ पातळीवरून S-400 यंत्रणेच्या खरेदीमुळे अमेरिकी मिलिट्री टेक्नॉलॉजी आणि सेना धोक्यात येईल, हे सांगितलं आहे. यामुळे रशियाच्या संरक्षण उद्योगाला मोठ्या प्रमाणावर पैसा मिळेल आणि तुर्कीचं सैन्य आणि त्यांच्या संरक्षण उद्योगात रशियाचा हस्तक्षेप वाढेल."
माईक पॉम्पियो पुढे म्हणाले, "असं असूनही तुर्कीने S-400 यंत्रणा खरेदी आणि चाचणी करण्याचा निर्णय घेतला. खरंतर याला पर्याय उपलब्ध होते. त्यातून तुर्कीच्या संरक्षणविषयक गरजाही भागल्या असत्या."
ते म्हणाले, "तुर्कीने S-400 चा मुद्दा अमेरिकेशी चर्चेतून सोडवावा, असं आवहन मी करतो. तुर्की अमेरिकेसाठी एक महत्त्वाचा प्रादेशिक सहकारी आहे. तुर्कीने शक्य तेवढ्या लवकर S-400 मुद्दा सोडवून गेल्या अनेक वर्षांपासून या दोन राष्ट्रांमध्ये (अमेरिका-तुर्की) सुरू असलेलं संरक्षण सहकार्य कायम ठेवावं."
या निर्बंधांअंतर्गत अमेरिकेकडून जारी करण्यात आलेल्या परवान्यांवर बंदी घालण्यात आली आहे. तसंच अमेरिकेच्या हद्दीतील तुर्कीची मालमत्तेवर टाच आणण्यात आली आहे.
तुर्कीचं काय म्हणणं आहे?
दुसरीकडे तुर्कीच्या परराष्ट्र मंत्रालयाने, "अमेरिकेला पक्षपातीपणे घेतलेल्या निर्णयावर फेरविचार करण्याचं आवाहन" केलं आहे.
दोन्ही राष्ट्रांचे सौहार्दपूर्ण संबंध बघता धोरणात्मक चर्चेतून तोडगा काढण्यास तयार असल्याचंही तुर्कीने म्हटलं आहे.
तुर्कीच्या परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवदेनात पुढे म्हटलं आहे, "अमेरिकेने घातलेल्या निर्बंधांमुळे आमच्या संबंधांवर नकारात्मक परिणाम होईल." इतकंच नाही तर वेळ आल्यावर तुर्की याचा सूड उगारेल.
अमेरिकेने तुर्कीला पेट्रियॉट क्षेपणास्त्र विकण्यास नकार दिला होता आणि त्यानंतरच आम्ही रशियाकडून S-400 यंत्रणा विकत घेतल्याचं तुर्कीचं म्हणणं आहे.
नाटोतील सहकारी राष्ट्र असलेल्या ग्रीसकडेही S-300 यंत्रणा आहे, असंही तुर्कीच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. मात्र, ही यंत्रणा ग्रीसने रशियाकडून थेट खरेदी केलेली नाही.
रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लाव्हरोव्ह अमेरिकेने लादलेल्या निर्बंधावर टीका करत म्हणाले, 'अमेरिकेची ही कृती म्हणजे आंतरराष्ट्रीय कायद्यांप्रति अहंकारपूर्ण व्यवहार दर्शवते.'
अमेरिका कायमच अशाप्रकारची एकतर्फी आणि बेकायदेशीर दडपशाही करत असल्याचंही सर्गैई लॅव्हरोव्ह यांनी म्हटलं आहे.
तुर्कीचं महत्त्व
नाटो या तीस राष्ट्रांच्या गटात तुर्कीकडे दुसऱ्या क्रमांकाचं सर्वांत मोठं सैन्य आहे. तुर्की अमेरिकेचा महत्त्वाचा सहकारी आहे. इतकंच नाही तर सीरिया, इराक आणि इराण या तीन महत्त्वाच्या राष्ट्रांशी तुर्कीची सीमा लागून असल्याने तुर्कीचं धोरणात्मक महत्त्वही अधिक आहे.
सीरियाविरुद्धच्या संघर्षातही तुर्कीने महत्त्वाची भूमिका बजावली होती. सीरियातील काही बंडखोर गटांना तुर्कीने लष्करी आणि शस्त्रास्त्र मदत पुरवली होती.
मात्र, गेल्या काही दिवसात नाटो आणि युरोपीय संघाच्या काही राष्ट्रांशी तुर्कीचे संबंध ताणले आहेत. तुर्कीमध्ये 2016 साली झालेल्या सत्ताबदलानंतर विद्यमान राष्ट्राध्यक्ष रेचेप तैय्यप अर्दोआन मनमानी पद्धतीने राज्यकारभार करत असल्याचा या राष्ट्रांचा आरोप आहे.
S-400 क्षेपणास्त्र विरोधी यंत्रणा
लांब पल्ल्यावर लक्ष ठेवण्यात सक्षम रडार पाळत ठेवून कमांड व्हेईकलला त्याची सूचना देतो. कमांड व्हेईकलमध्ये संभाव्य लक्ष्याचं आकलन केलं जातं. लक्ष्य निर्धारित झाल्यावर कमांड व्हेईकल क्षेपणास्त्र डागण्याचा आदेश देतं.
यासंबंधीचा डेटा लॉन्च व्हेईकलकडे पाठवला जातो आणि तिथून जमिनीवरून हवेत मारा करणारं क्षेपणास्त्र डागतात.
रडार क्षेपणास्त्राला लक्ष्यापर्यंत पोहोचण्यास मदत करतं.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)