You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
भारत-चीन सीमावादात पल्लवी-हाईगोचा संसार कसा अडकला?
- Author, भार्गव पारिख
- Role, अहमदाबादहून, बीबीसी गुजरातीसाठी
"चीनमध्ये कोरोनाची साथ पसरायला लागल्यावर मी माझी पत्नी आणि लेकीकडे अहमदाबादला आलो. आता आम्ही इथे अडकलो आहोत आणि चीनला कधी परतता येईल हे मला माहीत नाही. मी माझ्या देशात परण्याची वाट पहातोय..." अहमदाबादमधल्या पल्लवीने तिचा नवरा - हाईगोचं म्हणणं भाषांतरित करून सांगितलं. हाईगो चिनी नागरिक आहे.
पेशानं इंजीनियर असणारे हाईगो चीनच्या शिजुआन प्रांतातले आहेत. चिनी भाषेच्या इंटरप्रिटर - दुभाषी असणाऱ्या गुजरातच्या पल्लवीसोबत त्यांनी 2016 च्या डिसेंबरमध्ये लग्न केलं.
त्यांच्या अडीच वर्षांच्या लेकीचं नाव आहे - आंची.
हाईगो सांगतात, "वुहानमध्ये कोरोना व्हायरस थैमान घालत असताना अख्ख्या चीनमध्ये भीतीचं वातावरण होतं. प्रत्येक जण कसल्यातरी भीतीच्या छायेत जगत होता."
"पल्लवी आणि तिच्या वडिलांना माझ्या आरोग्यआणि सुरक्षिततेविषयी काळजी वाटत होती. भारतात येऊन मी माझ्या कुटुंबासोबत रहावं, असं त्यांना वाटत होतं."
"त्यावेळी भारतात कोरोनाच्या संक्रमणाची एकही केस आढळेलेली नव्हती. माझ्याकडे भारतीय व्हिसा होताच. मला वाटलं मी कुटुंबासोबत असणं चांगलं. म्हणून मग जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात मी अहमदाबादला आलो."
एकीकडे कोरोना, दुसरीकडे सीमावाद
भारतात आल्यानंतर हाईगोसमोरचं सर्वात मोठं आव्हान होतं अहमदाबादेत चिनी जेवण शोधण्याचं.
ते सांगतात, "मला वाटलं मी लवकरच शाकाहारी होईन. इथे पारंपरिक नॉन - व्हेजिटेरियन चिनी जेवण मिळत नव्हतं. कोरोनाच्या साथीचं भय जसजसं वाढत गेलं तसतसे मांसाहारी जेवणाचे पर्याय कमी होत गेले. मी बहुतेकदा अंडी खायचो."
हाईगोंना गुजराती जेवणाची सवय नव्हती. चपाती आवडत असली तरी आपल्यासाठी ते रोजचं जेवण असू शकत नसल्याचं ते सांगतात.
पल्लवी सांगतात, "यापूर्वी जेव्हा हाईगो अहमदाबादला यायचे तेव्हा अनेकदा स्वतःचं जेवण स्वतःच तयार करायचे. मी शाकाहारी आहे आणि जेव्हा मी चीनला जाते तेव्हा बहुतेकदा मी फळं आणि भाज्यांवरच अवलंबून असते."
कोरोनाच्या या साथीच्या काळातच गेल्या काही दिवसांत भारत आणि चीनमधला सीमावाद वाढला आणि या जोडप्यासमोरच्या अडचणींतही वाढ झाली.
हाईगो म्हणतात, "यावेळी इथे आल्यानंतर मी माझ्या पत्नी आणि लेकीच्या पर्मनंट व्हिसासाठीचे सगळे सोपस्कार पूर्ण करायचा माझा विचार होता. मला माझ्या कुटुंबाला कायमचं चीनला घेऊन जायचं होतं."
पल्लवी सांगतात, "भारत - चीन दरम्यान सुरू असलेल्या सीमावादामुळे माझ्या चीनच्या व्हिसाचं काम थांबलंय. मी डिपेंन्डंट व्हिसासाठीही अर्ज केला आहे. मला आणि माझ्या लेकीला कधी चीनला जाता येईल, माहित नाही."
हाईगो विषयी पल्लवी सांगतात, "ते अनेकदा रोजच्या बारीकसारीक गोष्टी आणायला घराबाहेर पडत. त्यांना फक्त चिनी भाषा येते. इंग्रजी किंवा दुसरी कोणती भाषा येत नाही. पण असं असूनही ते आरामात सगळी खरेदी करून येत. पण गलवान खोऱ्यातल्या त्या घटनेनंतर मात्र ते घरातून बाहेर पडलेले नाहीत."
"आम्ही ज्या सोसायटीत रहातो, तिथे कोणाचाही हाईगोच्या चिनी नागरिक असण्यावर आक्षेप नाही. पण सध्याची परिस्थिती पाहता त्यांनीच घरी थांबायचं ठरवलंय."
चीनसोबतचा सीमावाद वाढल्यानंतर भारत सरकारने 59 चिनी मोबाईल अॅप्सवर बंदी लावली. यानंतर हाईगो आणि पल्लवीचा चीनमधल्या हाईगोच्या कुटुंबाशी संपर्क होणं कठीण झालं.
पल्लवी सांगतात, "हाईगोचे आई-वडील चीनमध्ये आहेत. त्यांच्याशी वी चॅटच्या माध्यमातून संपर्क करता येत नाही. ही बंदी घालण्यात येण्यापूर्वी आमचं चॅट आणि व्हिडिओ कॉलद्वारे दिवसातून किमान चारदा त्यांच्याशी बोलणं व्हायचं. पण आता हे करणं कठीण झालंय."
कुठे भेटले पल्लवी - हाईगो?
आपल्या कुटुंबाचा बौद्ध धर्मावर विश्वास असल्याचं पल्लवी सांगतात.
त्या म्हणतात, "मला नेहमीच चिनी परंपरा, संस्कृती आणि लोकांबद्दल कुतुहल होतं. म्हणून मग मी चिनी भाषा शिकायचं ठरवलं. बिहारच्या बोधगयातून पदवी घेतल्यानंतर मी चिनी भाषा शिकून दुभाषी (Interpreter) म्हणून काम करू लागले. भारत दौऱ्यावर येणाऱ्या चिनी व्यापाऱ्यांनी मी मदत करत असे. कारण त्यांना ना हिंदी येते ना इंग्लिश."
"2016 साली मी आंध्र प्रदेशातल्या नेल्लूरच्या एका टेक कंपनीत इंटरप्रिटर म्हणून कामाला लागले. तिथेच हाईगो क्वालिटी इंजिनियर म्हणून होते. ऑफिसमध्ये आमची वेगवेगळ्या मुद्दयांवर चर्चा होई."
"हाईगोला मित्र नव्हते. आम्ही गप्पा मारत सोबत जेवायचो. एकमेकांची आवडनिवड, छंद याविषयी बोलायचो. मग एकदिवस मला हाईगोने विचारलं की मला कसा जोडीदार हवा आहे. मी म्हटलं मला अशा व्यक्तीशी लग्न करायचंय जो मला समजून घेईल."
आपल्याला भारतीय संस्कृती आवडते आणि बौद्ध धर्म मानणाऱ्या एखाद्या भारतीय मुलीशी लग्न करायची आपली इच्छा असल्याचं हाईगोने सांगितलं.
यानंतर अनेक महिने पल्लवी आणि हाईगो भेटत राहिले. हाईगोने वी चॅटवरच्या त्याच्या कुटुंबाच्या ग्रुपमध्ये पल्लवीलाही सामील केलं. तिथे पल्लवीची त्याच्या कुटुंबाशी ओळख झाली.
यानंतर पल्लवीने हाईगोची भेट तिच्या अहमदाबादेतल्या कुटुंबाशी घालून दिली. कुटुंबातल्या सगळ्यांना हाईगो आवडल्यानंतर दोघांनी लग्न करायचं ठरवलं.
पल्लवी सांगतात, "आम्ही आमच्या कुटुंबात आमच्या लग्नाविषयी सांगितल्यानंतर कोणीही विरोध केला नाही. 2016मध्ये आम्ही लग्न केलं."
हाईगो सांगतात, "लग्न भारतीय पद्धतीने व्हावं अशी पल्लवीची इच्छा होती. म्हणून आम्ही अहमदाबादमध्ये लग्न केलं. माझं कुटुंब चीनहून त्यासाठी इथे आलं होतं. नंतर आम्ही शिजुआनमध्ये रिसेप्शन पार्टी दिली."
कामाच्या निमित्ताने हाईगोंना चीनला परतायचं होतं. कामानिमित्त वेगवेगळ्या देशांमध्ये काही काळ राहणं हे त्यांच्या कामाचा एक भाग आहे. म्हणून मग पल्लवी अहमदाबादलाच राहणार आणि हाईगो वरचेवर भेट देणार असं ठरलं.
हाईगो सांगतात, "मी भारतात यायचो. 2017मध्ये आम्हाला मुलगी झाली. तिचं नाव आम्ही आंची ठेवलं. चिनी भाषेत आंचीचा अर्थ होतो - शांतता."
पल्लवी आणि आंची हाईगोच्या कुटुंबासोबत चिनी नवीन वर्षं साजरं करण्यासाठी 2018मध्ये चीनला गेल्या होत्या. हाईगो सांगतात, "कधी मी भारतात यायचो तर कधी पल्लवी आणि आंची चीनला यायच्या. आमचं छान चाललं होतं. पण 2019 मध्ये कोरोना व्हायरस आला आणि सगळंच बदललं."
"यातली एकच चांगली बाब म्हणजे मला माझ्या लेकीसोबत खूप वेळ घालवता आला. फक्त मला चीनला माझ्या घरी कधी जाता येईल, याच गोष्टीची काळजी आहे."
- वाचा- महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा -लहान मुलांना कोविड 19 चा धोका किती?
- वाचा - व्हेंटिलेटर्स काय असतात? कोरोनाच्या लढ्यात ते इतके महत्त्वाचे का आहेत?
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)