आर्मेनिया-अझरबैजान वाद : अझरबैजानमधल्या भारतीयांवर युद्धाचा परिणाम झालाय का?

    • Author, तारेंद्र किशोर
    • Role, बीबीसी हिंदीसाठी

आर्मेनिया आणि अझरबैजान यांनी गेल्या आठवड्यात युद्धविरामाला सहमती दाखवल्यानंरही दोन्ही देशांमधला वाद सुरुच आहे.

नागोर्नो - कारबाखवरून आर्मेनिया आणि अझरबैजान या दोन देशांमधला अनेक दशकं जुना वाद पुन्हा एकदा उफाळून आलाय. आता या वादाने युद्धाचं रूप घेतलंय. दोन्ही बाजूंनी गोळाबार, बॉम्ब वर्षाव आणि आरोप-प्रत्यारोप केले जातायत.

पाकिस्तान, इराण आणि तुर्कस्तानने उघडपणे अझरबैजानला पाठिंबा दिलाय. पण भारताने याविषयी प्रतिक्रिया देताना काळजी व्यक्त करत शांततापूर्ण मार्गाने आणि चर्चेनं तोडगा काढण्याविषयी सुचवलंय.

परराष्ट्र मंत्रायलाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव म्हणाले, "आर्मेनिया - अझरबैजानच्या सीमेवर नागोर्नो-कारबाख भागामध्ये तणाव निर्माण झाल्याचं वृत्त आहे. 27 सप्टेंबरच्या पहाटे याला सुरुवात झाली. दोन्ही बाजूंची जीवित आणि वित्त हानी झालेली आहे. भारताला या भागातली शांतता आणि सुरक्षितता याविषयी चिंता आहे. हा तणाव ताबडतोब संपुष्टात येणं गरजेचं असून सीमेवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी आवश्यक ती सगळी पावलं उचलण्यात यावीत असं आम्हाला वाटतं."

तुर्कस्तान आणि पाकिस्तानने अझरबैजानला उघडपणे दिलेल्या पाठिंब्याविषयी भारताने अधिकृत भूमिका मांडलेली नाही.

भारताचा या वादाचा काय संबंध?

अझरबैजानमधल्या भारतीय दूतावासाच्या माहितीनुसार, तिथे सध्या 1300 भारतीय राहतात. तर आर्मेनियाच्या कॉन्स्युलेटनुसार सध्या आर्मेनियामध्ये 3000 भारतीय आहेत.

या दोन्ही देशांसोबतचे भारताचे संबंध चांगले आहेत. पण अझरबैजानच्या तुलनेत गेल्या काही वर्षांमध्ये आर्मेनिया आणि भारताच्या संबंधात सुधारणा झालेली आहे.

आर्मेनिया पूर्वी सोव्हिएत संघाचा हिस्सा होता. त्यानंतर 1991मध्ये सोव्हिएत संघ फुटला. यानंतरही भारताचे आर्मेनियासोबतचे संबंध चांगले राहिले. परराष्ट्र मंत्रालयानुसार 1991पासून आजपर्यंत आर्मेनियाचे राष्ट्राध्यक्ष तीनदा भारत दौऱ्यावर येऊन गेले आहेत. शेवटचा दौरा 2017मध्ये झाला.

अझरबैजानबाबत बोलायचं झालं तर तुर्कस्थानप्रमाणेच या देशाचंही काश्मीरच्या मुद्द्यावर पाकिस्तानला समर्थन आहे. मग सध्याच्या परिस्थितीत भारताच्या धोरणात्मक पवित्र्याने काही फरक पडेल का?

जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीमध्ये सेंटर फॉर वेस्ट एशियन स्टडीचे अध्यक्ष असणारे प्राध्यापक अश्विनीकुमार महापात्रा सांगतात, "निरपेक्ष राहण्याचं भारताचं अधिकृत धोरण असेल. पण अझरबैजानला पाठिंबा देण्याचा प्रश्नच येत नाही कारण त्यांचा मुख्य समर्थक तुर्कस्तान आहे. टर्की आणि अझेरी (अझरबैजानमध्ये राहणारे लोक) एकमेकांना भाऊ मानतात. आपण मूळ तुर्की वंशाचे असल्याचं अझेरींचं म्हणणं आहे. त्यांचा वंश आणि भाषाही समान आहे. म्हणूनच या दोन्ही देशांमध्ये मित्रत्वापेक्षा बंधुत्वाचं नातं जास्त आहे."

ते पुढे सांगतात, "ज्याप्रकारे तुर्कस्तानने काश्मीरच्या प्रत्येक मुद्द्यावर भारतावर टीका केलेली आहे, त्यावरून या परिस्थितीत भारत अझरबैजानला कोणत्याही प्रकारे पाठिंबा देणं कठीण आहे."

अझरबैजानमध्ये राहणाऱ्या भारतीयांवर परिणाम

मग भारताच्या पवित्र्याचा तिथे राहणाऱ्या भारतीयांवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो का?

सध्यातरी याची शक्यता नसल्याचं प्राध्यापक महापात्रा सांगतात. कारण भारत अजून यात थेट सहभागी झालेला नाही. या देशामध्ये भारताची सर्वांशी मिळूनमिसळून राहणारा देश म्हणून प्रतिमा आहे. हिंदी सिनेमेही इथे अतिशय लोकप्रिय आहेत.

अझरबैजानमध्ये राहणाऱ्यां भारतीयांपैकी बहुतेकजण देशाची राजधानी बाकू इथे राहतात. यापैकी बहुतेक भारतीय डॉक्टर, शिक्षक म्हणून काम करतात. सोबतच अनेकजण गॅस आणि तेल कंपन्यांमध्ये काम करतात.

मूळच्या आंध्र प्रदेशातल्या विजयवाड्याच्या असणाऱ्या डॉ. रजनी चंद्र डिमेलो यांचं राजधानी बाकूमध्ये क्लिनिक आहे.

बीबीसीशी बोलताना त्यांनी सांगितलं, "भारतीयांसाठी फारशी काळजीची गोष्ट नाही. जिथे युद्ध सुरू आहे ती जागा राजधानी बाकूपासून जवळपास 400 किलोमीटर दूर आहे आणि बहुतांश भारतीय बाकूमध्येच राहतात. पण आता दोन दिवसांपूर्वीच बाकूपासून सुमारे 60-70 किलोमीटरच्या अंतरावर असणाऱ्या रहिवासी क्षेत्रावर आर्मेनियाकडून हल्ला करण्यात आला होता."

भारतीय समाजाचे लोक मदत म्हणून तिथे रक्तदान मोहीम राबवत असल्याचं डॉ. रजनी सांगतात. मदत निधी उभारण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत.

आर्मेनियाने नागरी भागांवरही हल्ला केला असला तरी अझरबैजानकडून नागरी आणि रहिवासी क्षेत्रांवर हल्ला करण्यात येत नसल्याचंही डॉ. रजनी यांनी सांगितलं.

संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेच्या प्रस्तावानुसार नागोर्नो - काराबाख परिसर अझरबैजानच्या अखत्यारित येत असून आपल्याच भूभागासाठी अझरबैजानींना हे युद्ध लढावं लागत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

डॉ. रजनी सांगतात, "या देशात वयाची 18 वर्षं झाल्यानंतर प्रत्येक तरूण दोन वर्षांसाठी सेनेत दाखल होतो. आणि आता युद्धाच्यावेळी सामान्य नागरिकही सैन्यात भरती होत आहेत."

त्यांच्या शेजारी राहणाऱ्या तरुणाचा या युद्धादरम्यान नुकताच मृत्यू झाला. त्याच्याविषयी सांगताना त्या गहिवरून जातात.

आर्मेनिया - अझरबैजानमध्ये वाद काय आहे?

नागोर्नो - काराबाख हा 4400 चौरस किलोमीटरवर पसरलेला प्रांत आहे. इथे आर्मेनियन ख्रिश्चन आणि तुर्की मुस्लिम राहतात.

सोव्हिएत संघाच्या वेळीच हा भाग अझरबैजानमध्ये असणारा स्वायत्त प्रांत बनला.

आंतरराष्ट्रीय पातळीवर याला अझरबैजानचा हिस्सा मानलं जातं, पण इथली बहुतांश लोकसंख्या आर्मेनियन आहे.

इथे 1980च्या दशकाच्या अखेरपासून सुरू झालेलं युद्ध 1990च्या दशकापर्यंत चाललं. यादरम्यान 30 हजारांपेक्षा जास्त लोक मारले गेले तर 10 लाखांपेक्षा जास्त विस्थापित झाले.

या काळात फुटीरतावाद्यांनी नागोर्नो - काराबाखच्या काही भागांचा ताबा घेतला. 1994 इथे युद्धबंदीची घोषणा करण्यात आली, पण त्यानंतरही इथल्या घडामोडी सुरूच असतात आणि अनेकदा या भागात तणाव निर्माण होतो.

सध्याच्या वादाची सुरुवातही दोन्ही देशांनी एकमेकांवर हल्ला करण्याच्या आरोपांपासून झाली. या लढाईत आतापर्यंत 100पेक्षा जास्त जण मारले गेले आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)