You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
रेसेप तय्यप एर्डोगन : तुर्कस्तानवर एकछत्री अंमल गाजवणाऱ्या 'सुलताना'बद्दल 13 गोष्टी
तुर्कस्तानचे अध्यक्ष रेसेप तय्यप एर्डोगन यांनी पुन्हा सत्तेत येण्यासाठी आवश्यक स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. मतमोजणीत पहिल्या टप्प्यात एर्डोगन यांनी अजिंक्य आघाडी मिळवल्याचं निवडणूक आयुक्त सादी गुवेन यांनी सांगितलं. या निकालाचा मध्यपूर्वेच्या एकूण आणि त्यामुळे जागतिक राजकारणावरसुद्धा परिणाम होऊ शकतो.
तुर्कस्तानचे बारावे अध्यक्ष रेसेप तय्यप एर्डोगन यांचा राजकीय प्रवास आणि सत्तेवर असलेली त्यांची पकड थक्क करणारी आहे.
एर्डोगन गेली 16 वर्षं तुर्कस्तानमध्ये सत्तेवर आहेत. 2002मध्ये त्यांच्या AK या पक्षाला संसदेत भक्कम बहुमत मिळालं. तेव्हापासून ते सलग 11 वर्षं देशाचे पंतप्रधान होते. ऑगस्ट 2014 मध्ये ते राष्ट्राध्यक्ष झाले. थेट लोकांमधून निवडून आलेले ते पहिले राष्ट्राध्यक्ष.
एप्रिल 2017मध्ये त्यांनी आपल्या अस्वस्थ प्रजेला ताब्यात ठेवण्यासाठी सार्वमत घेऊन देशाचे सर्वाधिकार स्वत:कडे घेतले. एका अर्थाने लोकशाही पद्धतीने देशाच्या गादीवर स्वार झालेले ते सर्वाधिकारशाह आहेत, असंच म्हटलं जातं.
ऑटोमन इतिहासाची पार्श्वभूमी असल्यानं त्यांचे समर्थक त्यांना 'सुलतान'ही म्हणतात.
एर्डोगन यांच्याविषयी या 13 गोष्टी जाणून घेऊया.
- रेसेप तय्यप एर्डोगन यांचा जन्म २६ फेब्रुवारी 1954चा. त्यांचे वडील तुर्कस्तानच्या काळ्या समुद्राच्या किनाऱ्यावर कोस्टगार्ड होते. वडिलांनी कुटुंबाच्या भल्यासाठी इस्तंबूलला आपला बाडबिस्तारा हलवला. एर्डोगन त्यावेळी 13 वर्षांचे होते. याच इस्तंबूलचे ते पुढे महापौर झाले.
- शाळकरी वयात एर्डोगन काहीबाही विकून हातखर्चाला जास्तीचे पैसे जमवायचे. इस्तंबूलच्या मर्मारा विद्यापीठातून त्यांनी मॅनेजमेंटची पदवी घेतली. त्यापूर्वी ते इस्लामिक शाळेतही गेले. विद्यापीठात असताना व्यावसायिक फुटबॉलपटू म्हणूनही ते ओळखले जात.
- एर्डोगन यांचा थेट राजकारणात प्रवेश झाला तो नेकमॅटिन एर्बकन यांच्या वेलफेअर पक्षाचे सदस्य म्हणून. 1970-1998 या काळात ते या पक्षात होते. साधा कार्यकर्ता ते देशाचा सर्वाधिकारी अशी वाटचाल करणारे एर्डोगन 1994-1998 या काळात इस्तंबूलच्या महापौरपदावर होते. लष्करानं सत्ता ताब्यात घेऊन वेलफेअर पक्षावर बंदी आणली तोवर ते या पदावर होते.
- 1999मध्ये राष्ट्रभक्तीपर कवितेचं जाहीर वाचन केल्याबद्दल त्यांना चार महिन्यांचा कारावास झाला होता.
- ऑगस्ट 2001मध्ये त्यांनी इस्लामिक तत्वज्ञान हा मूलाधार असलेल्या AK पक्षाची अब्दुल्ला गुल यांच्यासह स्थापना केली. लगेच 2002-2003 मध्ये त्यांच्या पक्षानं संसदेच्या निवडणुकीत बहुमत मिळवलं आणि एर्डोगान पंतप्रधान झाले.
6. गेझी पार्क हा इस्तंबूलमधला हरित पट्टा. त्यावर एक बांधकाम प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला. त्याचा विरोध करण्यासाठी जमलेल्या आंदोलकांवर त्यांनी लष्करी कारवाई केली. जून 2013 चीही गोष्ट.
7. डिसेंबर-2013मध्ये भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणं उघडकीस आल्यामुळे एर्डोगन यांच्या सरकाराला मोठा फटका बसला. त्यांच्या कॅबिनेटमधील तीन मंत्र्यांच्या मुलांना अटक झाली. त्याच खापर एर्डोगन यांनी गुलेनिस्टांवर म्हणजेच इस्लामिक सामाजिक चळवळीवर फोडलं.
8. ऑगस्ट 2014 त्यांनी राजकारणातलं एक मोठं पाऊल उचललं. पंतप्रधान पदावर असतानाच त्यांनी अध्यक्षपदाची पहिलीवहिली थेट निवडणूक लढवली आणि जिंकले.
9. जुलै 2016 - लष्करातल्या एका गटानं केलेलं बंड मोडून काढण्यात त्यांना यश आलं. अवघ्या 12 तासांत एर्डोगन अज्ञातवासातून बाहेर आले आणि त्यांनी टीव्हीवरील थेट प्रक्षेपणात आपणच मुख्य कमांडर असल्याचं जाहीर केलं. या बंडानंतर सुमारे 50 हजार लोकांची धरपकड करण्यात आली. त्यात सैनिक, पत्रकार, पोलीस, कुर्दिश राजकीय नेते यांचा समावेश होता. तर, एक लाखाहून अधिक सरकारी कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आलं.
10. एप्रिल 2017 - सार्वमत घेऊन यांनी अध्यक्षांकडे सर्वाधिकार घेतले. या सार्वमतात त्यांना 51.4 टक्के मतं मिळाली. मतांची ही मोजकी आघाडी एर्डोगन यांच्यासाठी धोक्याची घंटा मानली गेली. त्यांना अॅटोलियाचा मध्यवर्ती भाग, काळा समुद्र पट्टा येथे समर्थन मिळालं. परंतु विरोधकांना अंकारा, इस्तंबूल, इझ्मीर या पट्ट्यात तसंच भूमध्य समुद्र किनारपट्टी, कुर्दिश प्राबल्य असलेला भाग येथे बहुमत मिळालं. त्यांच्या अध्यक्षपदाची मुदत 2019मध्ये संपणार होती, पण त्याआधीच त्यांनी निवडणुका जाहीर केल्या आणि अध्यक्षपदाच्या दुसऱ्या टर्मसाठी जोरदार प्रचार केला.
11. तुर्कस्तानची आर्थिक प्रगती हाच एर्डोगन यांच्या लोकप्रियतेचा मोठा आधार आहे. अर्थव्यवस्थेच्या वाढीचा सरासरी वार्षिक वेग 4.5 टक्के एवढा राहिला आहे. मॅन्युफॅक्चरिंग आणि एक्स्पोर्टचं तुर्कस्तान हे केंद्र बनलं. 2014मध्ये अर्थव्यवस्था मंदावली आणि वाढीचा दर 2.9 टक्के एवढा खाली आहे तर बेरोजगारीचा दर 10 टक्क्यांवर गेला.
12. विरोधात उठलेले आवाज दाबून टाकल्याची टीकाही त्यांच्यावर होते. टीकाकार मग तो कोणत्याही वयाचा किंवा क्षेत्रातला असो त्यांना एर्डोगन दयामाया दाखवत नाहीत. एका सोळा वर्षांच्या मुलाला अध्यक्षांचा अपमान केला म्हणून अटक करण्यात आली होती. एवढंच नव्हे, एकेकाळी मिस टर्की राहिलेल्या मॉडेलला अध्यक्षांवर टीका करणारी कविता तिनं शेअर केली म्हणून त्रास झाला. ती कविता तिला महागात पडली होती. एर्डोगन यांच्या या भूमिकेमुळेच त्यांचा युरोपीयन युनियनमधील सहभाग लांबला.
13. एर्डोगन यांनी इस्लामविषयी केलेली विधानं, त्यांचा एक हजार खोल्यांचा राजप्रासाद, परदेश दौऱ्यावर त्याचं वागणं हे सगळं नेहमीच चर्चेत असतं.
हे पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)