You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नायजेरिया : जमिनीच्या वादावरून शेतकरी-गुराखी भिडले, 86 ठार
मध्य नायजेरियामध्ये शेतकरी आणि गुराखी यांच्यात झालेल्या हिंसाचारात 86 लोक ठार झाले आहे. इथल्या प्लॅटो राज्य पोलिसांनी ही माहिती दिली आहे.
जमिनीच्या हक्कावरून सुरू असलेल्या या वादाला गेल्या काही दशकांचा वंशवादाचा इतिहास आहे. गुरुवारी इथल्या बेरॉम वंशाचे शेतकऱ्यांनी फुलनी वंशाच्या गुराखींवर हल्ला केला. त्यात पाच गुराख्यांचा मृत्यू झाला होता.
त्यानंतर शनिवारी झालेल्या प्रतिहल्ल्यात अनेकांचा बळी गेला आहे.
मध्य नायजेरियातील प्लॅटो राज्यात ही घटना घडली असून राज्याच्या तीन भागांत संचारबंदी लावण्यात आली आहे.
राज्याचे पोलीस आयुक्त अंडी एडी यांनी सांगितलं की या हिंसाचारात 50 घरांना आग लावण्यात आली तर 15 दुचाकी आणि इतर काही वाहनंही बेचिराख झाली. यानंतर इथे 86 मृतदेह काढण्यात आले तर सहा जण जखमी आढळून आले.
रियॉम, बिरकीन लडी आणि जॉस साऊथ या भागांत जमावबंदी लागण्यात आली आहे.
राज्यपाल सिमॉन लाँग म्हणाले की पीडितांना मदत दिली जात असल्याचं सांगत, सरकार या हिंसाचाराला जबाबदार असणाऱ्यांना शोधून काढेल, असं म्हटलं आहे. "या कठीण समयी मार्ग दाखवण्याची प्रार्थना आम्ही देवाकडे करत आहोत."
बीबीसीच्या लेगॉस इथल्या प्रतिनिधी स्टेफनी हेगार्टी यांच्या माहितीनुसार, नायजेरियातील मध्य भागात शेती करणारे स्थायिक झालेले आहेत, तर गुराखी भटके लोक आहेत. गुरांना चराईसाठी जागा मिळावी, अशी गुराख्यांची मागणी आहे. त्यामुळे गेली काही दशकं शेतकरी आणि गुराखी यांच्यात संघर्ष सुरू आहे. पण दोन्हीकडून 'जशास तसे' भूमिका स्वीकारण्याच्या प्रकारांमुळे गेल्या वर्षंभरात या हिंसेत बळी गेलेल्यांची संख्या हजारांत आहे.
याला धार्मिक रंगही आहे. गुराखी हे फुलानी वंशाचे असून बहुतांश गुराखी मुस्लीम आहेत. तर बहुतांश शेतकरी ख्रिश्चन आहेत.
पण गेल्या काही महिन्यांत हा संघर्ष का वाढला आहे, याची कारणं स्पष्ट नाहीत.
नायजेरियाच्या राष्ट्राध्यक्षांच मत आहे की लिबियातून बेकायदेशीररीत्या शस्त्रास्त्र येत असल्याने हा संघर्ष वाढला आहे. तर काही जणांचं मत आहे की नयजेरियाचं लष्कर आणि संरक्षण दल बोको हराम या बंडखोर संघटनेशी लढत असल्याने कायदा सुव्यवस्था कोलमडली आहे.
नायजेरियाचे राष्ट्राध्यक्ष मुहम्मदू बुहारी स्वतः फुलानी आहेत.
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)