आर्मेनिया-अझरबैजान यांच्यात संघर्ष, तुर्कस्तान, रशिया आणि इराणही सक्रिय

आर्मेनिया आणि अझरबैजान यांच्यातील दशकांपासून सुरू असलेला सीमावाद रविवारी (27 सप्टेंबर) पुन्हा एकदा समोर आला.

आर्मेनिया आणि अझरबैजान वादग्रस्त नागोर्नो-काराबाखच्या मुद्द्यावरून मुद्दा एकदा समोरासमोर आले आहेत. तिथं हेलिकॉप्टर आणि टँकरला उडवण्यात आल्याची बातमी आहे.

दोन्ही बाजूंकडील सैन्य आणि नागरिकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 23 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे.

रविवारी नियंत्रण रेषेवर ज्यापद्धतीनं शस्त्रात्रांचा वापर करण्यात आला, तो प्रकार गेल्या काही वर्षांतील सर्वांत मोठी झडप असल्याचं सांगितलं जात आहे.

अर्दोआन यांचा पाठिंबा, राणची मध्यस्थीची तयारी

दोन्ही देशांतील या वादाविषयी जगभरातून प्रतिक्रिया आल्या आहेत.

या वादाविषयी रविवारी तुर्कस्तानचे राष्ट्राध्यक्ष रेचेप तैय्यप अर्दोआन यांनी अझरबैजानला पाठिंबा देण्याची घोषणा केलीय. तर रशियानं आर्मेनिया आणि अझरबैजान यांना तत्काळ संघर्षाला विराम देण्याचं आणि संयम बाळगण्याचं आवाहन केलं आहे.

अमेरिकेनंही दोन्ही देशांना युद्ध थांबवण्यास आणि वादग्रस्त वक्तव्य टाळण्यास सांगितलं आहे.

फ्रान्सनं दोन्ही देशांना युद्दाला विराम द्या आणि चर्तेतून प्रश्न सोडवा, असं आवाहनं केलं आहे. फ्रान्समध्ये मोठ्या प्रमाणावर आर्मेनियाचे नागरिक राहतात.

इराणची सीमा अझरबैजान आणि आर्मेनिया या दोन्ही देशांना लागून आहे.

दोन्ही देशांदरम्यान शांतता प्रस्थापित करण्यासाठी मध्यस्थाची भूमिका निभावण्यास तयार असल्याचं इराणनं म्हटलं आहे.

दरम्यान, या परिसरावर पुन्हा एकदा नियंत्रण मिळवण्यास यशस्वी होऊ, असं अझरबैजानचे राष्ट्राध्यक्ष इल्हाम अलीयेव यांनी रविवारी स्पष्ट केलं आहे.

कॉकेशसमधील बीबीसी प्रतिनिधी रेहन दिमित्री काय म्हणतात?

दोन्ही देशांमधील हा वाद गेल्या अनेक दशकांपासून सुरू आहे. गोळीबार कुणी पहिल्यांदा केला, असा एकमेकांवर आरोप करणं आता सामान्य बाब झाली आहे.

ही केवळ सैन्य कारवाई नाही तर एकप्रकारे युद्धाची सूचनादेखील आहे. कारण, यासंबंधी येणाऱ्या बातम्यांची स्वतंत्रपणे खातरजमा करणं अवघड काम आहे.

आर्मेनियाच्या नियंत्रणाखालील भागाला स्वतंत्र केल्याचा अझरबैजानचा दावा आहे, तर आर्मेनियाच्या अधिकाऱ्यांनी हा दावा फेटाळून लावला आहे.

आर्मेनिया म्हणतं की, अझरबैजानचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. अझरबैजाने मात्र हा दावा फेटाळून लावला आहे.

यादरम्यान अझरबैजाननं देशांतर्गत इंटरनेटच्या वापरावर बंदी आणली आहे. सोशल मीडियावरही बंदी लादण्यात आली आहे.

रशिया हा आर्मेनियाचा पारंपरिक मित्र आहे. तुर्कस्तानने दिलेल्या पाठिंब्यामुळे अझरबैजानच्या धैर्यात वाढ होऊ शकते, कारण ऑगस्टमध्येच अझरबैजानच्या संरक्षण मंत्र्यांनी म्हटलं होतं की, तुर्कस्तानच्या सैन्याच्या मदतीनं अझरबैजान आपल्या 'पवित्र धर्माला' पूर्ण करेल. याचाच अर्थ ते देशानं गमावलेलं क्षेत्र पुन्हा ताब्यात घ्यायच्या तयारीत आहेत.

नागोर्नो-काराबाख

नागोर्नो-काराबाख हा 4,000 किमीवर पसरलेला प्रदेश आहे. इथं आर्मेनियातील ख्रिश्चन आणि मुस्लीम तुर्क राहतात.

सोव्हियत संघादरम्यान हे अझरबैजानमधील एक स्वायत्त क्षेत्र होतं.

आंतरराष्ट्रीय स्तरावर या परिसराला अझरबैजानचा भाग समजलं जातं. पण इथं बहुतांश आर्मेनियाचे नागरिक राहतात.

1980च्या दशकाच्या शेवटापासून ते 1990च्या दशकापर्यंत चाललेल्या युद्धात 30 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आणि 10 लाखांहून अधिक लोकांचं स्थलांतर झालं.

त्यादरम्यान फुटीरवादी शक्तींनी नागोर्नो-काराबाखच्या काही भागांवर कब्जा मिळवला होता. पण, 1994मधील युद्ध विरामानंतरही इथं सातत्यानं वाद सुरू आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)