You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पाकिस्तानी प्रेयसीला भेटायला जाणाऱ्या उस्मानबादच्या प्रियकराला सीमेवर कसं पकडलं?
आपल्या पाकिस्तानातील प्रेयसीला भेटण्यासाठी जात असलेल्या एका तरूणाला भारताच्या सीमा सुरक्षा दलाने काल भारत-पाक सीमेवर ताब्यात घेतलं आहे.
झिशान सिद्दीकी असं या 20 वर्षीय तरूणाचं नाव असून तो महाराष्ट्रातील उस्मानाबादचा रहिवासी आहे.
विशेष म्हणजे, झिशान आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी उस्मानाबाद ते कच्छच्या रणापर्यंत चक्क दुचाकीवर गेला होता.
पीटीआयने दिलेल्या बातमीनुसार, भारत-पाक सीमेपासून फक्त दीड किलोमीटर अंतरावर त्याला पकडण्यात आलं. झिशान सध्या सीमा सुरक्षा दलाच्या ताब्यात आहे.
विविध माध्यमांमध्ये आलेल्या बातमीनुसार, झिशान हा पाकिस्तानच्या कराचीजवळ शाह फैसल गावातील एका मुलीच्या प्रेमात आकंठ बुडालेला होता.
तिची ओळख फेसबुक आणि व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून झाल्याचं तो सांगतो.
सर्वप्रथम, झिशान उस्मानाबादवरून सायकलवर अहमदनगरला गेला. त्यानंतर तिथं त्याने एक दुचाकी घेतली. तिथून गुजरातपर्यंत तो दुचाकीने गेला. पुढे कच्छच्या रणात गेल्यानंतर त्याची दुचाकी वाळूत अडकली. त्यानंतर तो पायी पाकिस्तानच्या दिशेने निघाला. हे सर्व करत असताना त्याने मोबाईलवर गुगल मॅपची मदत घेतली.
परिसरात गस्त घालणाऱ्या सीमा सुरक्षा दलाच्या पथकाला वाळूत अडकलेली ही दुचाकी दिसली. त्यानंतर त्यांनी शोधमोहीम सुरू केली असता त्यांना झिशान आढळून आला.
त्याची चौकशी केल्यानंतर तो महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यातील असल्याचं त्यांना समजलं.
संबंधित मुलगा घरातून निघून गेल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती.
गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील बलसार पोलीस ठाण्यातील पोलिसांनी याप्रकरणी महाराष्ट्र पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर आता झिशानला ताब्यात घेण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांचं पथक रवाना होणार आहे. प्रेयसीला भेटालया जाण्याबाबत त्याचा दावा कितपत खरा, याबाबतही चौकशी करण्यात येणार आहे.
झिशान इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होता, अशी माहिती मिळाली आहे.
बीएसएफने दिलेल्या माहितीनुसार, झिशान त्यांना सापडला तेव्हा त्याची प्रकृती खालावली होती. त्याच्या शरीरातील पाणी कमी झालं होतं.
झिशान दोन तास कच्छच्या रणात बेशुद्ध होता, अशी माहिती त्यांना मिळाली. त्याच्याकडून पॅनकार्ड, आधार कार्ड, एटीएम कार्ड आणि मोबाईल जप्त करण्यात आला आहे.
हे प्रकरण पुढील चौकशीसाठी संबंधित तपास संस्थांकडे सोपवण्यात आलं आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)