You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना: लस येईपर्यंत जगभरात ’20 लाख’ लोकांचा मृत्यू होण्याची 'दाट शक्यता' - WHO चा इशारा
कोरोना विषाणूबाबत जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) गंभीर इशारा दिला आहे. "कोव्हिड-19 वर प्रभावी लस येईपर्यंत जगभरात जवळपास 20 लाख लोकांचा या आजाराने मृत्यू होण्याची दाट शक्यता आहे. एकत्रित जागतिक प्रयत्न झाले नाही तर ही संख्या आणखी वाढू शकते," असं जागतिक आरोग्य संघटनेचं म्हणणं आहे.
WHO च्या जिनिव्हामधल्या मुख्यालयातील आपत्कालीन विभागाचे प्रमुख डॉ. माईक रायन यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना डॉ. रायन यांनी हा इशारा दिला.
गेल्या वर्षाच्या शेवटी चीनमधून कोरोनाच्या साथीला सुरुवात झाली. त्यानंतर आजवर जगभरात 10 लाखांहूनही अधिक लोकांचा कोरोना विषाणूची लागण होऊन मृत्यू झाला आहे.
जगाच्या कानाकोपऱ्यात ही साथ पसरली आहे. 3 कोटी 20 लाखांहूनही जास्त जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
उत्तर गोलार्धात जसजसे थंडीचे दिवस येत आहेत, तसतसे इथल्या अनेक देशांमध्ये कोरोना विषाणूची दुसरी लाट डोकं वर काढत असल्याची चिन्हं आहेत.
आतापर्यंत अमेरिका, भारत आणि ब्राझिल या तीन देशांमध्ये सर्वाधिक कोरोनाग्रस्त आढळले आहेत. या तीन देशांमध्ये मिळून तब्बल 1 कोटी 50 लाख कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे.
मात्र, गेल्या काही दिवसात युरोपात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे युरोपातल्या काही देशांनी पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू करण्याचे संकेत दिले आहेत.
युरोपातल्या वाढत्या रुग्णसंख्येविषयी बोलताना डॉ. रायन म्हणाले, "एकूणच त्या मोठ्या प्रदेशात आजार पुन्हा बळावत असल्याने काळजी वाटू लागली आहे."
त्यामुळे लॉकडाऊन पुन्हा लागू होऊ नये, यासाठी आपण पुरेसे प्रयत्न केले आहेत का, हा प्रश्न प्रत्येक युरोपातील व्यक्तीने स्वतःला विचारायला हवा, असं डॉ. रायन यांचं म्हणणं आहे. तसंच टेस्टिंग, ट्रेसिंग, क्वारंटाईन आणि सोशल डिस्टंसिंग यांचं योग्य पालन झालं का, हेदेखील तपासायला हवं.
डॉ. रायन पुढे म्हणाले, "लॉकडाऊन अगदी शेवटचा उपाय असतो आणि सप्टेंबर महिन्यात आपण पुन्हा त्याच ठिकाणी आलोय, हा विचारच काळजीत टाकणारा आहे."
मृत्यूदराविषयी काय म्हणाले डॉ. रायन?
कोरोनावर लस येण्याआधी जगभरात 20 लाख लोकांचा मृत्यू होऊ शकतो का? या प्रश्नाचं उत्तर देताना डॉ. रायन म्हणाले, "हे अशक्य नाही?"
कोव्हिड-19 आजारावरील उपचारांमध्ये आलेल्या सुधारणांमुळे मृत्यूदर कमी झाला असला तरी उत्तम उपचार आणि इतकंच नाही तर प्रभावी लस आली तरीदेखील 20 लाखांपेक्षा जास्त मृत्यू रोखण्यासाठी ते पुरेसं ठरणार नसल्याचं डॉ. रायन यांचं म्हणणं आहे.
- वाचा - महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा - माझा जिल्हा कोणत्या झोनमध्ये? पाहा संपूर्ण महाराष्ट्राची यादी
- वाचा - दारू विक्री, बांधकाम, सलून - लॉकडाऊन 3.0मध्ये कुठे काय सुरू राहणार?
- वाचा - कोरोना व्हायरसवरील लस बनवण्याचं काम कुठवर आलं?
- वाचा - उन्हामुळे कोरोना विषाणूचा प्रसार थांबू शकतो का?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा-कोरोनाचं संकट कधी जाणार?
"इतके मृत्यू रोखण्यासाठी जे करणं गरजेचं आहे त्यासाठी आपण तयार आहोत का?" असा प्रश्न विचारत डॉ. रायन म्हणतात, "जोवर आपण ते करत नाही तोवर तुम्ही जी आकडेवारी सांगत आहात तिची केवळ कल्पनाच करता येते, असं नाही तर दुर्दैवाने ते शक्यही आहे."
सध्याची परिस्थिती काय?
कोरोना विषाणू संसर्गाची दुसरी लाट रोखण्यासाठी जगभरात सोशल डिस्टंसिंगच्या कठोर मार्गदर्शक सूचना आणि व्यापार-उद्योगांवर निर्बंध लागू करण्यात येत आहेत.
स्पेनमध्ये मॅड्रीड शहरात कोरोनाग्रस्तांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने या भागात अंशतः लॉकडाऊन लागू करण्याची शिफारस सरकारने केली आहे. तर स्थानिक अधिकाऱ्यांनी शहरातल्या काही भागांमध्ये कठोर निर्बंध लागू केल्याने त्याचा लाखों लोकांवर परिणाम झाला आहे.
तर फ्रान्सच्या दक्षिणेकडच्या मार्सेले शहरातल्या बार आणि रेस्टॉरंटच्या कर्मचाऱ्यांनी शनिवारी आस्थापनं बंद ठेवण्याविरोधात निदर्शनं केली. दुसरीकडे कोरोनाग्रस्तांच्या रोजच्या आकडेवारीत सातत्याने होत असलेली वाढ बघता शुक्रवारी युकेतल्या अनेक भागांमध्ये काही अधिकचे निर्बंध घालण्यात आले.
याउलट संपूर्ण अमेरिकेत कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असूनही तिथल्या काही प्रांतामध्ये व्यवसायांवरचे निर्बंध शिथील करण्यात आले आहेत.
अमेरिकेत कोरोना साथीचा उद्रेक झाल्यापासून कोरोनाग्रस्तांची संख्या पुरेशा प्रमाणात कमी झालेली नसल्याने जागतिक आरोग्य संकटाची पहिली लाट अजूनही संपलेली नाही, असं अमेरिकेचे संसर्गजन्य रोगतज्ज्ञ डॉ. अँथोनी फाऊसी यांनी म्हटलं आहे.
सीएनएनशी बोलताना डॉ. फाऊसी म्हणाले, "'दुसरी लाट' म्हणण्यापेक्षा 'हिवाळ्यात उद्भवणाऱ्या आव्हानाचा सामना करण्यासाठी आपण तयार आहोत का', असा प्रश्न का विचारू नये."
जगातल्या इतर भागांविषयी सांगायचं तर इस्राईलने गेल्या आठवड्यात दुसऱ्यांदा राष्ट्रव्यापी लॉकडाऊन घोषित केला. संपूर्ण देशभर दुसऱ्यांदा लॉकडाऊन घोषित करणारा ईस्राईल पहिला देश आहे. त्यानंतर तिथल्या उद्योग आणि प्रवासावरही निर्बंध अधिक कठोर करण्यात आले आहेत. जागतिक आरोग्य संघटना : कोरोना विषाणू संसर्गामुळे जगभरात '20 लाख' लोकांचा मृत्यू होण्याची दाट शक्यता
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)