You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरसबद्दल तुम्हाला माहीत नसलेल्या 'या' 9 गोष्टी
- Author, जेम्स गॅलघर
- Role, आरोग्य आणि विज्ञान प्रतिनिधी
कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी जगातील बहुतांश देशांनी आपल्या सीमा बंद केल्या आहेत. देशांतर्गतही 'लॉकडाऊन' करण्यात आलंय.
या लॉकडाऊनमुळं कितीतरी काळापासून आपण घरात बंद आहोत की काय, असं वाटू लागलंय. पण कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव तर गेल्या वर्षी डिसेंबरपासून म्हणजे तीन-साडेतीन महिन्यांपासूनच सुरू झालाय.
कोरोना व्हायरसबाबत जगभरातील शास्त्रज्ञ संशोधन करू लागले आहेत, जेणेकरून या विषाणूला रोखण्यासाठी औषध शोधले जाईल. मात्र, औषध दूरच राहिलं, आपल्याला अजूनही या विषाणूबद्दलच संपूर्ण माहिती मिळू शकलेली नाही. कोरोना व्हायरसबाबतचे अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहेत.
यातीलच काही प्रश्नांची आपण इथं चर्चा करणार आहोत.
1) आतापर्यंत किती लोकांना कोरोना व्हायरसची लागण झालीये?
खरंतर अत्यंत सर्वसाधारण प्रश्न आहे हा, पण तितकाच महत्त्वाचा आहे.
जगात संसर्ग झालेल्यांची संख्या सहा लाखांहून अधिक आहे, तर मृतांचा आकडा 30 हजारांवर पोहोचलाय.
पण हे आकडे नेमके आहेत का? तर नाही. हे आकडे नेमके नाहीत.
- वाचा - कोरोनाचा माझ्या जीवाला किती धोका आहे?
- वाचा -आधी कोव्हिड-19ची किट बनवली, मग बाळाला जन्म दिला
- वाचा-कोरोना व्हायरसची शरीरातील प्राथमिक लक्षणं कशी ओळखाल?
- वाचा- कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा - 'गो कोरोना': या लोकांनी केली कोरोना व्हायरसवर मात
- वाचा - कोव्हिड-19 पँडेमिक जाहीर, पण याचा नेमका अर्थ काय?
हे आकडे म्हणजे वास्तविक आकडेवारीचा काही अंशच असतील. कारण विषाणूची लागण झालेले, पण ज्यांची माहिती समोर आली नाहीये, अशा लोकांचा विचार केला तर जगभरातील रुग्णांचा आकडा कमी असेल.
अनेकजण तर असे आहेत, ज्यांना कोरोना व्हायरसची लागण झालीय, मात्र लागण झाल्याची कोणतीच लक्षणं दिसत नाहीत. ना त्यांना अशक्तपणा जाणवतो, ना दुसरी कुठली लक्षणं त्यांच्यात दिसतात.
अँटिबॉडी टेस्ट केल्यानंतरच नेमकी कुणाला विषाणूची लागण झालीये, हे कळू शकेल. शिवाय, त्यानंतरच खऱ्या अर्थानं कोरोना व्हायरस किती सहजपणे पसरतोय आणि कुणाला नेमकी लागण होतीये, हेही कळू शकेल.
2) कोरोना व्हायरस किती धोकादायक?
कोरोना व्हायरस नेमक्या किती जणांना लागण झालीय, याची नेमकी आकडेवारी जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत या साथीमुळे किती जणांचा मृत्यू झाला, हे सांगणंही अवघड आहे. आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार, कोरोना व्हायरसची लागण झालेल्यांपैकी एक टक्के लोकांचा मृत्यू झालाय.
मात्र, जर लागण झालेल्या लोकांची संख्या जास्त असेल, तर मृत्यूदर आणखी कमी असेल.
3) सर्वसामान्य लक्षणांव्यतिरिक्त इतर संभाव्य लक्षणं कोणती?
कोरोना व्हायरसची सर्वसामान्य लक्षणं म्हणजे ताप आणि सुका खोकला येतो. ही लक्षणं तुमच्यात असतील, तर तुम्ही कोरोना पॉझिटिव्ह असण्याची शक्यता आहे.
घसा खवखवणे, डोकेदुखी आणि अतिसार या तक्रारीही कोरोना व्हायरसच्या काही रुग्णांनी केल्या आहेत.
गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचं आणखी एक लक्षण समोर आलंय. कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह असणाऱ्या काही जणांनी सांगितलं, की त्यांना कसलाच वास जाणवत नाहीये. हेही आता कोरोनाचं एक लक्षण मानलं जात आहे.
मात्र, सर्दी-शिंका हीसुद्धा कोरोना व्हायरसची लक्षणं आहेत का? असाही प्रश्न विचारला जातो. तर सर्दी-शिंका असणारे काही रुग्ण आढळले आहेत.
संशोधकांच्या मते, विषाणूची लागण झालेली असूनही त्याच्यात कुठलीच लक्षणं दिसत नाहीत, अशीही एखादी व्यक्ती असू शकते.
4) लहान मुलं हा विषाणू कसा पसरवतात?
वयोवृद्धांना कोरोना व्हायरसचा सर्वाधिक धोका असल्याचेच आतापर्यंत बोलले जात होते. मात्र, याचा अर्थ असा नाहीय की, लहान मुलांना या विषाणूची लागण होणारच नाही. कोरोना व्हायरसची लागण लहान मुलांनाही होऊ शकते. मात्र, हेही खरंय की, लहान मुलांमधील संक्रमण अत्यंत कमी आहे आणि लहान मुलांच्या मृत्यूंचं प्रमाण देखील जगभरात कमी आहे.
कोरोना व्हायरसच्या प्रसारात लहान मुलांची भूमिका मोठी आहे, हा दावा नाकारता येत नाही. याचं कारण, लहान मुलं वेगवेगळ्या वयोगटातील लोकांना नेहमी भेटत असतात. लहान मुलं कुठल्या स्तरापर्यंत हा विषाणू पसरवू शकतात, हे मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
5) कोरोना व्हायरस नेमका आला कुठून?
2019 च्या डिसेंबर महिन्यात कोरोना व्हायरसबाबत माहिती मिळाली. चीनमधील वुहान शहरात कोरोना व्हायरसचा पहिला रुग्ण आढळला. वुहानमधील ‘वेट मार्केट’मधून हा विषाणू आल्याचं मानलं जातं.
कोरोना व्हायरसला अधिकृतरित्या ‘Sars-CoV-2’ असं म्हटलं जातं. वटवाघूळांमधून माणसात येणाऱ्या विषाणूच्या जवळ जाणाराच कोरोना व्हायरस आहे.
कोरोना व्हायरस वटवाघळातून थेट माणसाच्या शरीरात आला नसून वटवाघूळ आणि माणूस यांच्या दरम्यान कुठलातरी ‘रहस्यमय जीव’ माध्यम बनल्याचंही मानलं जातंय.
आता या रहस्यमय जीवाबाबतही अनेक तर्क-वितर्क लढवले जातायत. मात्र, अधिकृतरित्या अद्याप काहीही सांगितलं जाऊ शकत नाही.
6) उन्हामुळं कोरोना व्हायरसचा प्रसार थांबेल?
साधारणपणे सर्दी-खोकला हिवाळ्याच्या तुलनेत उन्हाळ्यात कमी असतो. मात्र, उन्हाळ्यात हा विषाणू नक्की किती प्रभावी असेल, हे अद्याप कळू शकलं नाहीय. याबाबत अजूनतरी ठामपणे काहीही सांगितलं जाऊ शकत नाही.
कोरोना व्हायरसवर कुठल्या ऋतुचा परिणाम होईल, हे अद्याप स्पष्ट नाही, असं म्हणत ब्रिटीश सरकारच्या वैद्यकीय सल्लागारानं एकप्रकारे इशाराच दिलाय.
जर उन्हाळ्यात कोरोना व्हायरसची लागण कमी झाली, तर पुढे आणखी धोका असेलच. तो म्हणजे, पुन्हा जेव्हा हिवाळा येईल, तेव्हा लागण होण्याची शक्यता पुन्हा वाढेल. तेव्हा मात्र हॉस्पिटल आणि डॉक्टरांसाठी स्थिती आणखी आव्हानात्मक बनेल, कारण हिवाळ्यात आधीच सामान्य फ्लू आणि इतर आजारांचे प्रमाणही वाढतं.
7) काही लोकांमध्ये कोरोनाची लक्षणं इतकी तीव्र का?
अनेकांमध्ये कोरोना व्हायरसची सौम्य लक्षणंच दिसून आली आहेत. मात्र, 20 टक्के लोकांमध्ये तीव्र लक्षणं आढळून आली आहेत.
कुणामध्ये किती तीव्रतेची लक्षणं असतील, याचा संबंध त्या त्या व्यक्तीच्या शरीरातील रोग प्रतिकारकशक्तीशी आहे. तसंच, अनुवांशिक कारणंही असू शकतात.
8) रोग प्रतिकारशक्ती कधीपर्यंत विषाणूचा सामना करू शकते?
कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी किती रोग प्रतिकारशक्ती हवी असते किंवा किती क्षमतेची रोग प्रतिकारशक्ती कोरोनाचा सामना करू शकते, याचं काही विशिष्ट प्रमाण सांगता येत नाही. याबाबत अनेक अंदाज वर्तवले जात आहेत.
जर कोरोना व्हायरसची लागण झालेली व्यक्ती विषाणूचा सामना करत असेल, तर त्याचा अर्थ त्या व्यक्तीची रोग प्रतिकारशक्ती चांगली आहे.
मात्र, कोरोना व्हायरस नवा असल्यानं त्याबाबतची कुठलीही माहिती नवीनच आहे. त्यामुळं माहितीबाबतही मर्यादा येतात.
9) विषाणू बदलत गेल्यास धोका कमी होईल?
विषाणू कायमच बदलत राहतो. मात्र, कोरोनाच्या अनेक प्रकरणात असंही दिसून आलंय, की त्यांच्या जेनेटिक कोडमध्ये कुठलाच बदल होत नाही.
विषाणूत अंतर्गत बदल होत असताना, तो कमी धोकादायक होत जाईल, असं तुम्हाला वाटत असेल तर तसं नाहीय. किंबहुना, त्याचा धोका कमी होत जाईल, हे निश्चितपणे सांगता येत नाही.
विषाणू जर बदलत गेला, तर काळजीचं कारण आणखी वाढेल. कारण आपल्या शरीरातील रोगप्रतिकार प्रणाली बदललेल्या विषाणूला नेमकं ओळखू शकणार नाही. त्यामुळं विषाणूचा प्रतिकार करणं आणखी अवघड होऊन बसेल. शिवाय, जे औषध मूळ विषाणूचा प्रतिकार करण्यासाठी तयार केलेलं असेल, त्याचीही उपयुक्तता विशिष्ट काळानंतर संपेल.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)