You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरस: ‘मार्केट उघडलं नाही तर लॉकडाऊनच्या काळात कांदा टिकवायचा तरी कसा?’
- Author, प्रवीण ठाकरे
- Role, बीबीसी मराठीसाठी नाशिकहून
हिरामण शेळके नाशिक जिल्ह्यातील चांदवडसारख्या दुष्काळी तालुक्यातील काळखोडे गावचे शेतकरी. चांदवड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत आपला ट्रॅक्टरभर कांदा विकायला घेऊन आले होते.
आतापर्यंत त्यांनी थोडाफार कांदा विकला तोही 12 रुपये किलो दरानं. पण त्यानंतर सरकारनं लॉकडाऊन जाहीरे केलं, याचा परिणाम असा झाला की, आज त्यांच्याकडे 3 ट्रॅक्टर ट्रॉली भरेल एवढा कांदा शिल्लक आहे. त्यामुळे त्यांनी धीर सोडला आहे.
"15 मार्चनंतर कांदा निर्यात चालू होणार होती. म्हणून कांदा बाहेर काढला. पण आता एकीकडे कोरोना व्हायरसमुळे कांदा मार्केटला न्यायला गाड्या नाहीत आणि दुसरीकडे संचारबंदीमुळे कांद्याला मागणी नसल्याचं व्यापारी सांगत आहे," हे सांगताना हिरामण यांचे डोळे पाणावले होते.
- वाचा - कोरोना व्हायरसची शरीरातील प्राथमिक लक्षणं कशी ओळखाल?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा - कोरोना व्हायरसची लक्षणं दिसायला किती दिवस लागतात?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा - 'गो कोरोना': या लोकांनी केली कोरोना व्हायरसवर मात
- वाचा - कोव्हिड-19 पँडेमिक जाहीर, पण याचा नेमका अर्थ काय?
सर्वसामान्य लोकांमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांबाबत असलेले गैरसमज आणि त्या गैरसमजांना माध्यमांकडून मिळणारा दुजोरा, याबाबत हिरामण शेळके खंत व्यक्त करतात.
ते म्हणतात, "लोकांना वाटत होतं 100 ते 150 रुपयांना कांदा विकला. शेतकऱ्याला खूप पैसा मिळाला. पण कोणत्याही प्रसारमाध्यमांनी हे नाही दाखवलं की, एकरी 120 ते 150 क्विंटल पिकणारा कांदा अवकाळी पावसामुळे केवळ 10 ते 20 क्विंटलवर आला होता. मात्र शहरातल्या माणसाच्या किचनमध्ये चॅनेल जाऊन वेगळंच चित्र दाखवत होती. कांद्याने त्यांचा काय वांदा केला, म्हणे."
उत्पादन खर्च भरून निघेल की नाही, अशी चिंता त्यांना आहे. ते म्हणाले, "माझी चार महिन्याची मेहनत आणि घरातील लोकांची मजुरीही निघाली नाही, शहरातला मजूरही दिवसाला कमीत कमी 300 रुपये घेतो. काहीही कारण असो नुकसान हे शेतकऱ्यानेच सोसायचे असंच दिसतंय."
मार्केट उघडलं नाही, तर कमी आयुष्य असलेल्या नाशवंत कांदा पुढील 20 दिवस कसा टिकवायचा, असा प्रश्न आता त्यांच्यासमोर आहे.
'सरकारनंच मदत करावी'
निवृत्ती न्याहारकर हे लासलगाव मनमाड रोडवरील वाहेगाव साळ येथील शेतकरी आहेत. प्रगतिशील शेतकरी म्हणून त्यांचा गौरव झाला आहे. ते पण कांदा घेऊन मार्केटला आले होते ,
कोरोनाची भीती नाही वाटत का?असं विचारल्यावर ते म्हणाले, भीती तर आहे ,पण मला पण कुटुंब आहे, प्रपंच आहे.
न्याहारकरांनी पुढे सांगितलं, "स्वतःला सुरक्षित ठेवत हे केलच पाहिजे. चांगल्या दर्जाच्या कांद्याला आज 1100 ते 1300 रुपये क्विंटलचा भाव मिळाला, पण सरासरी कांदा हा 600-700 रु क्विंटलने विकला गेला, म्हणजे शेतकऱ्याला उत्पादन खर्च काढणे मुश्किल झालं आहे."
"त्यातच आता जर मार्केट बंद झाल किंवा 10 ते 12 दिवस कांदा विकला नाही तर लाल अथवा रांगड्या कांद्याची टिकण्याची क्षमता कमी असल्यानं हा पडून राहिला तर खराब होणार. हा सरकारच्या चुकीमुळे पडून राहणार," ही चिंता न्याहारकरांना सतावतेय.
"सरकारची चुकी कारण, सरकारनं निर्यातबंदी 2 महिने अगोदर उठवली असती तर 75% कांदा निर्यात झाला असता आणि 25% कांदा देशांतर्गत विकला गेला असता. त्यामुळे सरकारने आता थेट शेतकऱ्याला मदत करावी. आता मार्केट बंद न करता योग्य ती सुरक्षिततेची काळजी घेत मार्केट चालू ठेवले पाहिजे," अशी न्याहारकरांसह कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मागणी आहे.
व्यापारीही हतबल
व्यापाऱ्यांच्या मात्र वेगळ्या समस्या आहेत. लासलगाव बाजार समितीअंतर्गत येणाऱ्या विंचूर उपबाजार समितीचे व्यापारी प्रतिनिधी सोमनाथ शिरसाठ म्हणतात, "कोरोनाच्या भीतीमुळे जे काही स्त्री-पुरुष कामगार होते ते कामावर यायला तयार नाहीत. त्यामुळे वखारीवर माल आहे, पण मालाची ने-आण होत नाही. माल पडून आहे त्यामुळे मार्केट पडेल आणि थेट शेतकऱ्याचे नुकसान होईल. आमचंही नुकसान होईल. आज बाहेरील राज्यात मागणी आहे परंतु गेलेल्या गाड्या परत आल्या नाहीत. ज्या गाड्या आहेत ते जास्त भाडे मागत आहेत."
हे सर्व कामगार नसल्याने होत असल्याचं शिरसाठ सांगतात. मार्केट कमिट्या बंद करण्याची मागणी बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. परंतु, शासनाच्या आदेशानुसार कमिट्यांचं काम चालू आहे.
‘मार्केट कमिट्या बंद केल्यास दर कोसळतील’
व्यापारी नवीन सिंग सांगतात, "कांद्याला इतर देशांकडून मागणी आहे. पण व्यापारी कोरोनामुळे घाबरलेला आहे. माल पाठवताना कोणता कंटेनर कुठे थांबवला जाईल याचा भरोसा नाही. कंटेनर कमी उपलब्ध आहेत. पोर्टमध्ये पण मनुष्यबळ कमी आहे. त्यात मार्केट कमिट्या बंद ठेवल्या तर कांद्याचे दर कोसळणार आणि थेट शेतकऱ्यांना नुकसान होणार आहे."
मुख्य अडचण कामगार नसणे ही असून सरकारने यावर लवकर तोडगा काढला पाहिजे, असं नवीन सिंग म्हणतात.
"काही ठिकाणी गोणी मार्केट चालू आहे. तेथे शेतकऱ्यांनी जुना लाल कांदा प्रथम विकावा. नवीन कांदा उन्हाळ्यानंतर मार्केटला आणलेला योग्य राहील," असंही ते सूचवतात
'कांदा शेतातून बाहेर पडला नाही, तर नुकसान होईल'
नाफेडचे संचालक तथा तज्ज्ञ नानासाहेब पाटील सांगतात, "सध्याची परिस्थिती बघता व्यापारी कामगार नाही म्हणून मार्केट बंद करायचे सांगत आहेत, पण तसे व्हायला नको."
कांदा हा जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत आहे.
कोरोनाच्या भीतीमुळे मोडकळीस आलेली कांदा वितरण प्रणाली सरकारने योग्य निर्णय घेऊन व्यवस्थित करावी, अशी अपेक्षा नानासाहेब पाटील व्यक्त करतात.
नानासाहेब पाटील म्हणतात, "हे वर्ष कांदा उत्पादकांसाठी वाईटच गेलं. सरकारनं जसं मागील वेळेस केलं, त्याच प्रकारे पावलं उचलावीत. राज्यांची मागणी नोंदवून कांदा वितरण व्यवस्था सुरू करावी. जेणेकरून मागणी आणि पुरवठा याचा समतोल राहील."
भारतात ह्यावर्षी कांदा लागवडीत 40% वाढ झाली आहे. तर एकट्या महाराष्ट्रात 55% कांदा लागवड क्षेत्रात वाढ झाली आहे.
"या परिस्थितीत कांदा शेतातून बाहेर पडला नाही तर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होईल. त्याबरोबर ग्राहकांचेही नक्की नुकसान होईल. त्याला चढ्या दरात कांदा विकत घ्यावा लागेल," असं नानासाहेब पाटील म्हणतात.
कृषी उद्योगाशी संबंधित वाहतूक सुरू राहणार - कृषी मंत्री
कृषी संबंधित वाहतुकीवर लॉकडाऊनमध्ये कोणत्याही प्रकारची बंदी नसल्याचं राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी स्पष्ट केलं आहे.
पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, "शेतीविषयक कुठल्याही कामकाजाच्या वाहतुकीत अडथळा येणार नाही या संदर्भात प्रत्येक प्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) यांना सूचना देण्यात आल्या आहेत."
"प्रत्येक आरटीओने जीवनावश्यक आणि अत्यावश्यक सेवेसाठी वाहतूक करणाऱ्या वाहनांना ऑनलाईन परवाने व स्टीकर देण्याची व्यवस्था केलेली आहे. कृषी मालवाहतुकीसाठी नाशिक जिल्ह्याला जोडल्या गेलेल्या मुंबई, पुणे या जिल्ह्यांच्या सेवा सुरु राहतील यासाठी नियोजन करण्यात आलं आहे."
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)