कोरोना व्हायरस: डॉक्टर, आरोग्य सेवक किती सुरक्षित आहेत?

    • Author, तुषार कुलकर्णी
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

जगभरात बहुतांश सर्व ठिकाणी कोरोनाचा उद्रेक झाला आहे. 100 हून अधिक देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.

भारतातही कोरोनाच्या रुग्णांचा आकडा 800च्या वर गेला आहे. भारतातल्या हॉस्पिटलमध्ये रांगा लागल्या आहेत. हे सर्व होत असताना रुग्णांच्या सेवेत असलेल्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काय स्थिती आहे, याचा आपण आढावा घेऊ.

चीन, इटली, स्पेन या देशांत अनेक डॉक्टरांचा आणि कर्मचारी वर्गाचा कोरोनाने बळी घेतला आहे. आपल्या देशातही काही डॉक्टरांना आणि त्यांच्या स्टाफला कोरोनाची बाधा झाली आहे.

कोरोनाचं आव्हान समोर असताना भारतात दिवसरात्र सेवा करणाऱ्या डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफबद्दल देशवासीयांनी रविवारी कृतज्ञता व्यक्त करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं. त्यानुसार देशात लोकांनी आरोग्य सेवा देणाऱ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली होती.

एकीकडे डॉक्टरांबद्दल आदर व्यक्त होत आहे तर दुसरीकडे पेशंटच्या सेवेत असलेल्या डॉक्टरांना काही घरमालकांनी घराबाहेर काढलं. डॉक्टर कोरोनाचे विषाणू सोसायटीत, कॉलनीत आणतील, अशी काही डॉक्टरांच्या घरमालकांना आणि शेजाऱ्यांना भीती वाटतेय.

जगभरात काय स्थिती आहे

भारतात डॉक्टरांची काय स्थिती आहे हे पाहण्याआधी आपण पाहूया की कोरोनाशी लढणाऱ्या जगभरातल्या डॉक्टरांची काय स्थिती आहे, कारण इतर देशांमध्ये कोरोना आपल्याआधी पोहोचला होता.

कोरोना व्हायरसमुळे जगात अनेकांचे जीव जाऊ शकतात, असं सांगणारे वुहानमधले डॉक्टर होते डॉ. ली वेनलिअँग. त्यांच्या म्हणणाल्या आधी तिथल्या सरकारने गांभीर्याने घेतलं नाही. काही दिवसांनंतर डॉ. ली यांचाच कोव्हिडमुळे मृत्यू झाला. जगभरात कोविडबद्दल धोक्याची घंटा वाजवणारा डॉक्टर त्याच रोगाचा बळी ठरला.

पण या साथीमध्ये आपला जीव गमावलेले डॉ. ली वेनलिअॅंग हे काही जगातील एकमेव आरोग्य कर्मचारी नाहीत. इटलीमध्ये 5000 हून अधिक डॉक्टर, नर्स, लॅब टेक्निशियन, अॅंबुलन्स ड्रायव्हर यांना कोरोनाची बाधा झाली आहे, असं 'द गार्डियन'ने सांगितलं आहे. त्यातल्या 41 जणांचे बळी गेले.

स्पेनमधल्या एकूण 40,000 कोरोनाबाधितांपैकी 5,400 आरोग्य कर्मचारी आहेत, म्हणजेच एकूण रुग्णांच्या 14 टक्के प्रमाणात आरोग्य कर्मचारी आहेत, असं 'न्यूयॉर्क टाइम्स'ने लिहिलंय.

अमेरिकेतही परिस्थिती वेगळी नाहीये. तिथे तर जॉन हॉपकिन इंस्टिट्यूटच्या कर्मचाऱ्याला कोरोनाची बाधा झाली. फिलाडेल्फिया चिल्ड्रन हॉस्पिटलच्या ट्रॉमा अॅंड एमरजन्सी विभागाच्या प्रमुखांना कोरोना व्हायरसची लागण झाल्यामुळे ते युनिटच बंद करावं लागलं आहे, असं CNNने सांगितलं.

भारतात काय परिस्थिती आहे?

राजस्थानमधल्या भिलवाड्यात 13 आरोग्य कर्मचाऱ्यांपैकी कोरोनाची बाधा झाली आहे. 8 मार्चला भिलवाड्यातील दवाखान्यात एक पेशंट भरती झाला. त्या पेशंटला न्युमोनिया झाला होता. त्याची स्थिती सुधारत नसल्याचं पाहून डॉक्टरांनी त्याला उदयपूरला पाठवलं.

पुढे कळलं की तो रुग्ण कोव्हिड-19चा होता. त्याच्या संपर्कात आलेल्या डॉक्टरांनी नंतर टेस्ट करून घेतली त्यात हे कळलं त्यांना देखील कोरोना झालाय.

भारतात यापुढे कोव्हिडचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढू शकतात, अशी भीती व्यक्त केली जात आहे. म्हणूनच देशभरात युद्धपातळीवर यंत्रणा सज्ज केली जातेय. पण हा आजार इतक्या सहज पसरतो की त्यामुळे डॉक्टरांना आता जोखीम पत्करावी लागू शकते.

म्हणूनच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतंच आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी 50 लाख रुपयांपर्यंतची विमा संरक्षण जाहीर केलं. यासाठी तीन महिन्यांचा प्रिमियम सरकारतर्फे देण्यात येईल, असं निर्मला सीतारामन यांनी सांगितलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 15,000 कोटींचं पॅकेज जाहीर केलं आहे. त्यामध्ये डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठीची साधनंविकत घेण्याची तरतूद आहे. तसेच आयसोलेशन वॉर्ड, मेडिकल ट्रेनिंग, पॅरामेडिक्सची संख्या वाढवण्यावर सरकारने जोर दिला आहे.

सरकारने ही घोषणा केली आहे पण ती प्रत्यक्षात येण्यासाठी काही काळ जाईलच. आत्ता कोव्हिडचे पेशंट्स दवाखान्या यायला सुरुवात झाली असताना अनेक डॉक्टर्सकडे सुरक्षेसाठीचे हॅझमॅट सूट्स नाहीयेत.

हॅझमॅट सूट काय असतो?

कोव्हिड रुग्णाच्या संपर्कात येणाऱ्या डॉक्टर किंवा वैद्यकीय कर्मचाऱ्याने स्वतःच्या सुरक्षेसाठी हॅझमॅट सूट घालणं आवश्यक असतं. हा सूट अगदी स्पेस सूटसारखा दिसतो.

एका हॅझमॅट सूटची किंमत 2,000 रुपये असते, त्याबरोबरच लॅटेक्स ग्वोव्हज, गॉगल्स या गोष्टीदेखील असणं आवश्यक आहे. पण भारतात बऱ्याच ठिकाणी हॅझमॅट सूट उपलब्ध नसल्यामुळे आरोग्य कर्मचारी फक्त मास्क किंवा अॅप्रनवर दिसत आहेत.

राज्य सरकारच्या वतीने आरोग्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितलं की "कोरोना व्हायरसबाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या प्रत्येक डॉक्टरकडे पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट देण्यात आले आहेत. यामुळे डॉक्टरांचं संपूर्ण शरीर कव्हर करण्यात येतं. हा एक प्रकारचा ड्रेस आहे, ज्यामध्ये डोक्यावरील केसांपासून ते बुटापर्यंत शरीर कव्हर केलं जातं."

आम्ही ज्यावेळी देशभरातल्या विविध ठिकाणच्या हॉस्पिटल्समध्ये संपर्क साधला तेव्हा लक्षात आलं की अनेक ठिकाणी हॅझमॅट सूट उपलब्ध नाहीयेत.

मुंबईत सायन हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या डॉ. यश सबरवाल यांनी बीबीसी मराठीला सांगतलं की त्यांना HIV सूट्सचा वापर करावा लागत आहे. "डॉक्टर्स हे कोणत्याही रुणाचा पहिला संपर्क असतात. त्यामुळे आम्हाला आवश्यक सुरक्षाकवच पुरवण्यात आलं होतं. आमच्याकडे हॅझमॅट सूट्स नाहीत. पण त्यासारखेच HIV सूट्स आम्ही वापरतो. ते हॅझमॅट इतके प्रभावी नसले तरी नड भागवतात."

भारतात पुरेसे डॉक्टर आहेत का?

जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार 1,000 लोकसंख्येसाठी एक डॉक्टर असणं अपेक्षित आहे. भारतात दर 1,457 जणांसाठी एक डॉक्टर उपलब्ध आहे. महाराष्ट्रात हे प्रमाण जागतिक आरोग्य संघटनेनी सांगितलेल्या गाईडलाइन्स नुसार आहे - 800 रुग्णांसाठी महाराष्ट्रात 1 डॉक्टर उपलब्ध आहे.

पण यातले अनेक डॉक्टर्स हे मोठ्या शहरांमध्ये एकवटले आहेत. त्यामुळे पूर्ण राज्यात तुम्हाला एकसारखी आरोग्यसेवा मिळत नाही. झारखंडसारख्या मागास राज्यात 8,180 लोकांमागे फक्त 1 डॉक्टर आहे तर तामिळनाडूमध्ये 253 जणांसाठी एक डॉक्टर आहे.

आता सर्व राज्यांच्या आणि जिल्ह्यांच्या सीमा बंद झाल्यामुळे गरीब राज्यांमधले रुग्ण आणि तिथे संख्येने कमी असलेले डॉक्टर्स या सगळ्यांचेच हाल होऊ शकतात.

आता केंद्र सरकारने आरोग्य सेवांसाठी 15 हजारो कोटींची घोषणा केली आहे. त्यामुळे आपण अपेक्षा करूया की आपलं रक्षण करणाऱ्या डॉक्टर आणि मेडिकल स्टाफचं आधी रक्षण व्हायला हवं, कारण जर डॉक्टरच आजारी पडले तर आपल्याला बरं कोण करणार?

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)