You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरस : माझ्या जीवाला कोव्हिड-19 चा किती धोका आहे?
- Author, रॉबर्ट कफ
- Role, बीबीसी सांख्यिकी प्रमुख
कोरोनाचा प्रादुर्भाव जगभरात झाला आहे. कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या रुग्णांचा आकडा दररोज वाढत आहे.
चीन, इटली, स्पेनमध्ये कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्याही सर्वाधिक आहे. त्यामुळे सगळ्या जगानं या विषाणूचा धसका घेतला आहे.
ब्रिटन सरकारच्या वैज्ञानिक सल्लागारांच्या मते कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे मृत्यू होण्याचं प्रमाण 0.5 ते 1 टक्का इतकं आहे, तर जगभरात या विषाणू संक्रमणामुळे मृत्यू होण्याचं प्रमाण 4 टक्के असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेचं म्हणणं आहे.
23 मार्चपर्यंत ब्रिटनमध्येच हा मृत्यूदर 5 टक्के होता. कारण तोपर्यंत तिथे संसर्ग झालेल्या लोकांची निश्चित आकडेवारी समोर आली नव्हती.
कोरोनाबद्दल अधिक माहिती-
- वाचा - कोरोना व्हायरसची शरीरातील प्राथमिक लक्षणं कशी ओळखाल?
- वाचा- कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा - कोरोना व्हायरसची लक्षणं दिसायला किती दिवस लागतात?
- वाचा - कलम 144 म्हणजे नेमकं काय?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा - 'गो कोरोना': या लोकांनी केली कोरोना व्हायरसवर मात
- वाचा - कोव्हिड-19 पँडेमिक जाहीर, पण याचा नेमका अर्थ काय?
कोरोना संसर्गाबाबत कुणाची चाचणी घ्यायची आणि कुणाची नाही याबद्दलही वेगवेगळ्या देशांचे निकष वेगवेगळे आहेत. त्यामुळे कोरोना संसर्ग आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूची आकडेवारीही भ्रमित करणारी असू शकते. इतकंच नाही तर रुग्णाचं वय, आरोग्य आणि त्याला आरोग्य सुविधा मिळण्याची शक्यता यावरही मृत्यू दर अवलंबून असतो.
कोरोनाचा माझ्या जीवाला किती धोका आहे?
तज्ज्ञांच्या मते कोरोना संसर्गामुळे वृद्धांच्या आणि आधीपासूनच एखादा गंभीर आजार असणाऱ्या व्यक्तीच्या जीवाला धोका असू शकतो.
लंडनमधील इम्पेरियल कॉलेजनं केलेल्या संशोधनाच्या ताज्या निष्कर्षांनुसार 80 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या लोकांमध्ये मृत्यूदर सरासरीपेक्षा दहा टक्क्यांनी जास्त आहे, तर 40 पेक्षा कमी वयाच्या लोकांमध्ये मृत्यूचं प्रमाण कमी आहे.
ब्रिटन सरकारचे प्रमुख वैद्यकीय सल्लागार प्राध्यापक ख्रिस व्हीट्टी यांच्या मते वृद्धांमध्ये मृत्यूचं प्रमाण जास्त असलं तरी बहुतांश वृद्ध व्यक्तींमध्ये या संसर्गामुळे आजाराची किरकोळ ते मध्यम स्वरुपाची लक्षणं दिसू शकतात.
कोरोनाच्या संसर्गामुळे तरुणांना कमी धोका असल्याचा ग्रह बाळगू नका, असा इशाराही ख्रिस व्हिट्टी यांनी दिला आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे अनेक तरुण मंडळीसुद्धा आयसीयूमध्ये दाखल झालेली आहेत. त्यामुळे COVID-19 आजार पसरवणाऱ्या कोरोना फॅमिलीमधील Sars-Cov-2 या नवीन विषाणुपासून असलेल्या धोक्याला वयाशी जोडून बघू नका, असा सल्ला ते देतात.
चीनमध्ये कोरोनाचा संसर्ग झालेल्या 44 हजार रुग्णांच्या माहितीचं विश्लेषण केल्यावर असं आढळून आलं, की ज्या लोकांना मधुमेह, रक्तदाब, हृदय किंवा श्वसनासंबंधीचे आजार अशा आरोग्यविषयक तक्रारी होत्या त्या लोकांमध्ये मृत्यूदर कमीत कमी पाच पट जास्त होता.
ही सगळी कारणं मानवी शरीरात एकत्र काम करत असतात. जगाच्या वेगवेगळ्या कोपऱ्यातील वेगवेगळ्या प्रकारच्या माणसांमध्ये हा विषाणू कोणत्या समस्या निर्माण करू शकतो, याची माहिती सध्यातरी आपल्याला नाही.
कोरोना संसर्गामुळे झालेले मृत्यू बघता कोणाला कोरोनाचा जास्त धोका आहे, हे सांगता येऊ शकतं. पण किती आणि कसा धोका आहे, हे मात्र ठोसपणे सांगता येत नाही.
संसर्गाच्या अनेक प्रकरणांची नोंदच नाही?
विषाणुची बाधा झालेल्या बहुतांश व्यक्तींमध्ये आजाराची किरकोळ लक्षणं आढळतात. त्यामुळे ते डॉक्टरांकडेही जात नाहीत. त्यामुळे संसर्गाच्या बहुतांश प्रकरणांची नोंदच होत नाही.
याच वर्षी 17 मार्चला ब्रिटनचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार सर पॅट्रीक वॉलेंस यांनी अंदाज व्यक्त केला होता, की ब्रिटनमध्ये कोरोना संसर्गाची 55 हजार प्रकरणं असू शकतात. मात्र, आजपर्यंत तिथे जवळपास 2000 प्रकरणांचीच नोंद झाली आहे.
त्यामुळे कोरोनामुळे झालेल्या मृत्यूच्या संख्येला 2000 ने भाग दिला तर येणारी संख्या 55 हजारने भाग दिल्यावर येणाऱ्या संख्येच्या कितीतरी जास्त असेल.
जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार ब्रिटनमध्ये 6,600 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे आणि जवळपास 335 जणांचा मृत्यू झाला आहे.
वेगवेगळ्या देशांमध्ये मृत्यूदर वेगळा का?
इम्पेरियल कॉलेजने केलेल्या संशोधनानुसार संसर्गाची किरकोळ लक्षणं ओळखण्याच्या तसंच विषाणूची लागण झालीये का, याची चाचणी करण्याची प्रत्येक देशाची पद्धत ही भिन्न आहे. या चाचण्यांच्या निष्कर्षांमध्येही तफावत दिसून येते.
सुरुवातीच्या दिवसांमध्ये युकेमध्ये एका दिवसात 10 हजार चाचण्या होत होत्या. आता मात्र दिवसाला 25 हजार जणांची चाचणी करण्याचा त्यांचा मानस आहे. सध्या तरी इथे प्रामुख्याने हॉस्पिटल्समध्येच टेस्ट होत आहेत.
एका दिवसात 20 हजार लोकांची चाचणी करण्याची जर्मनीची क्षमता आहे आणि ज्यांना संसर्गाची किरकोळ लक्षणं आहेत, त्यांच्याही चाचण्या घेणं सुरू आहे. त्यामुळेच जर्मनीत आतापर्यंत जेवढे रुग्ण आढळले आहेत त्यातील किरकोळ संसर्ग आणि गंभीर संसर्ग यांचा ठोस असा तुलनात्मक अभ्यास करता येतो.
जर्मनीमध्ये कोरोनाची लागण झालेल्यांमध्ये मृत्यूदर 0.5 म्हणजेच अर्धा टक्का आहे. संपूर्ण युरोपात हा सर्वात कमी मृत्यूदर आहे. मात्र, संसर्गाची नवीन गंभीर प्रकरणं येतील, ही आकडेवारी बदलेल.
कशाप्रकारचा उपचार उपलब्ध आहे आणि आरोग्य सेवा ते उपचार करण्यास सक्षम आहे का, यावरही आजाराची ओळख आणि त्यावरील उपचार अवलंबून असतो. शिवाय तुम्ही साथीच्या कोणत्या टप्प्यावर आहात, यावरही हे अवलंबून असतं.
एखाद्या देशाच्या आरोग्य सेवेकडे अचानक क्षमतेपेक्षा जास्त संख्येने असे रुग्ण आले, की ज्यांना आयसीयूमध्ये ठेवण्याची गरज आहे तर तिथे मृत्यूदर वाढणं स्वाभाविक आहे.
मृत्यूदराचा अचूक अंदाज कसा बांधतात?
वैज्ञानिक सर्व डेटा एकत्रित करून त्यातून मृत्यूदराचं एक चित्र बनवण्याचा प्रयत्न करतात.
उदाहरणार्थ- किरकोळ लक्षणांच्या प्रकरणामधलं प्रमाण काढण्यासाठी ते छोट्या गटांवर लक्ष ठेवतात. या छोट्या-छोट्या गटांशी संबंधित सर्व माहिती मिळवली जाते. उदाहरणार्थ, एका विमानात प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांचा समूह. मात्र, अशा प्रकारे अंदाज बांधताना एक छोटासा पुरावाही संपूर्ण चित्र बदलू शकतो. शिवाय हा पुरावाही काळानुरूप बदलू शकतो.
युनिर्व्हसिटी ऑफ ईस्ट एंजिलियामध्ये मेडिसीन विभागाचे प्राध्यापक असलेले पॉल हंटर सांगतात, की मृत्यूदर कमी होऊ शकतो किंवा वाढूही शकतो.
त्यांनी सांगितलं, "इबोलाबाबतीत लोक या आजाराचा सामना करायला शिकले आणि मृत्यूदर घसरला. मात्र, तो वाढूही शकतो. आरोग्य सेवा यंत्रणाच कोलमडली तर मृत्यूदर वाढ होईल."
म्हणूनच वैज्ञानिक मृत्यूदर सांगताना किमान आणि कमाल असे दोन दर सांगतात. शिवाय, एक अंदाजही व्यक्त करतात जो त्यावेळचा सर्वोत्तम अंदाज असतो.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)