You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरस : 'अमेरिकेत लॉकडाऊन झालं नाही तर आमची परिस्थिती बिकट होईल'
- Author, संकेत सबनीस
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
अमेरिकेत कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे परिस्थिती गंभीर झाली आहे. अमेरिकेत 1 लाख 25 हजारहून अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे तर 2200 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
मूळचा ठाण्याचा असलेला प्रसाद दलाल हा विद्यार्थी सध्या अमेरिकेतल्या न्यूजर्सीमध्ये राहतोय. त्याने बीबीसी मराठीशी बोलताना न्यूयॉर्क परिसरातलं सध्याचं वातावरण कसं आहे हे सांगितलं.
'भारतात आई-बाबांसोबत राहिलो असतो तर सुरक्षित राहिलो असतो. कारण अमेरिकेत कोरोनामुळे परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. अमेरिका लॉकडाऊन का करत नाही ते सुद्धा कळत नाहीये. भीतीच्या वातावरणाने आम्हाला ग्रासून टाकलंय,' हे उद्गार आहेत सध्या अमेरिकेतल्या न्यूजर्सी इथे असलेल्या प्रसाद दलाल याचे. न्यूयॉर्क इथे शिक्षण घेत असलेला प्रसाद सध्या अमेरिकतल्या कोरोनाच्या वाढत्या उद्रेकामुळे धास्तावला आहे.
चीनमधून कोरोनाच्या प्रादूर्भावाला सुरुवात झाली आणि आता तो जगभर चांगलाच पसरला आहे. विशेषतः अमेरिका आणि युरोप खंडात या व्हायरसने अक्षरश: रौद्ररुप धारण केलंय. अमेरिकेतला कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 लाख 25 हजारांवर गेला असून मृतांचा आकडाही 2 हजारांवर पोहोचलाय.
मृत्यूमुखी पडलेल्यांपैकी 1 हजार जण हे केवळ न्यूयॉर्क परिसरातले आहेत. हे आकडे दिवसागणिक बदलत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी रविवारी (29 मार्च) अमेरिकेतली सोशल डिस्टंसिंगची नियमावली येत्या 30 एप्रिलपर्यंत लागू केली आहे. मात्र, संपूर्ण देशात लाखो रुग्ण सापडूनही देश लॉकडाऊन केलेला नाही. तसंच, येत्या इस्टर संडेपर्यंत अमेरिका पूर्ववत होईल असा विश्वासही ते सातत्याने व्यक्त करत आहेत. मात्र, यामुळे नागरिकांमधली चिंता वाढीस लागली आहे.
याच न्यूयॉर्क शहरात अनेक भारतीय नागरिक वास्तव्याला आहेत. इथून जवळच असलेल्या न्यूजर्सीमध्ये ठाण्याचा प्रसाद दलाल हा विद्यार्थी राहतो. मास्टर ऑफ सायन्स इन इन्फॉर्मेशन सिस्टम्स करण्यासाठी न्यूयॉर्कमधल्या पीस युनिव्हर्सिटीमध्ये त्याने प्रवेश घेतला असून तो पदवीच्या शेवटच्या वर्षाला आहे.
न्यूयॉर्क-न्यूजर्सी परिसरात वाढलेल्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येमुळे प्रसाद आणि त्याच्या मित्रांमध्ये भीतीचं वातावरण आहे. नेमकी तिथली सध्याची परिस्थिती जाणून घेण्यासाठी मी प्रसादसोबत स्काईप व्हीडिओ कॉलद्वारे संपर्क करुन माहिती घेतली.
- वाचा - महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग; पाहा सर्व ताजे अपडेट्स
- वाचा -कोरोना व्हायरस महाराष्ट्रात असा पसरला
- वाचा-कोरोना व्हायरसची शरीरातील प्राथमिक लक्षणं कशी ओळखाल?
- वाचा- कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा - 'गो कोरोना': या लोकांनी केली कोरोना व्हायरसवर मात
- वाचा - कोव्हिड-19 पँडेमिक जाहीर, पण याचा नेमका अर्थ काय?
प्रश्न : न्यूयॉर्क-न्यूजर्सीमध्ये कोरोनामुळे वातावरण कसं झालंय?
प्रसाद : अमेरिकेत कोरोनाच्या केसेस वाढतच आहेत आणि त्यातही सगळ्यांत जास्त न्यूयॉर्कमध्ये वाढत असल्याने इथे भीतीचं वातावरण पसरलेलं आहे. आम्ही विद्यार्थी खूप घाबरलो आहोत. आज भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा हजारापर्यंत पोहचण्याआधीच संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा करण्यात आलीये.
मात्र, इथला कोरोनाग्रस्तांचा आकडा काही लाखात पोहोचला असूनही जनजीवन सुरळीतपणे सुरू आहे. फक्त इथल्या कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करायला सांगितल्याने रस्त्यांवर विशेष गर्दी नाहीये, मात्र बाकी सगळं व्यवस्थित सुरू आहे. न्यूयॉर्क आणि न्यूजर्सीत अजिबात लॉकडाऊन नाहीये. लोकांनी भीतीने स्वत:ला घरातच क्वारंटाईन केलंय.
प्रश्न : ग्रोसरी स्टोअर्स ओपन आहेत का?
प्रसाद : ग्रोसरी स्टोअर्स ओपन आहेत. वॉलमार्ट, कॉस्को, पटेल ब्रदर्स हे सगळं सुरू आहे. पण, ग्रोसरी स्टोअर्सच्या रांगेत पुढच्या किंवा मागच्या व्यक्तीला काय झालंय हे आपल्याला माहीत नसतं. त्यामुळे ग्रोसरी स्टोअर्समध्ये जायलाही खूप भीती वाटतेय. तसंच, आता जीवनावश्यक वस्तूंचा साठाही संपत चाललाय. टॉयलेट पेपर, सॅनिटायझर या सगळ्याचाच तुटवडा झालाय. या वस्तू मिळत नाहीयेत.
अमेरिकेतलं प्रसिद्ध इंडियन ग्रोसरी स्टोअर म्हणजे पटेल ब्रदर्स. पण आम्हाला आता अशी माहिती मिळालीये, की हे स्टोअर बंद होणार आहे. कारण भारतात लॉकडाऊन असल्याने तिथून अमेरिकेत माल येणं बंद झालंय. पुढचे काही दिवस हा माल मिळणार नाहीये. त्यामुळे पटेल ब्रदर्समधल्या वस्तू संपत आल्या आहेत. त्यामुळे पुढची सूचना मिळेपर्यंत ते बंद राहणार आहे.
प्रश्न : लोक काळजी घेताहेत का?
प्रसाद : हो. लोक काळजी घेत आहेत. परिसरात वावरताना लोक सॅनिटायझर वापरत आहेत. 90 टक्के लोक आता मास्कचा वापर करत आहेत. जनजागृती झाल्यामुळे हे बदल दिसत आहेत. पण, काहींना अजूनही असं वाटतंय, की आपल्याला काही होणार नाही.
विशेषत: यंग जनरेशनला. 20 ते 35 वयोगटातल्या तरुणांचं कोरोनामुळे विशेष नुकसान होणार नाही, अशीही काहींची समजूत झालीये. त्यामुळे तरुणांना आपण सुरक्षित आहोत असं वाटतंय. त्यांच्यात निष्काळजीपणा दिसून येतोय.
प्रश्न : भारतात कमी केसेस असताना देश लॉकडाऊन झालाय. मात्र, अमेरिकेत अजून तसं झालेलं नाहीये. याची भीती वाटते का?
प्रसाद : होय, अमेरिकेत लॉकडाऊन व्हायला हवं होतं. ते अजून झालेलं नाहीये. दुसरीकडे परिस्थितीही आटोक्यात येत नाहीये. रोज सकाळी जेव्हा आम्ही झोपेतून उठतो तेव्हा कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 5 ते 7 हजाराने वाढलेला असतो.
यामुळे छातीत धडकीच बसते. यात सर्वात घाबरण्याची गोष्ट म्हणजे कोरोनाग्रस्तांचा आकडा हा न्यूयॉर्क आणि न्यूजर्सीमध्ये वाढतोय हे माझ्यासाठी चिंतेची बाब आहे.
प्रश्न : तिथे राहणाऱ्या इतर भारतीयांमध्ये सध्या कसं वातावरण आहे?
प्रसाद: भारतीय लोकांनी चांगलीच काळजी घेतली आहे. एका इंडियन स्टोअरमध्ये नुकताच गेलो होतो. तिथे त्यांनी चांगली काळजी घेतली आहे. सोशल डिस्टन्सिंग केलं जातंय, प्रत्येक जण मास्क वापरतोय. सॅनिटायझर्स, सोप्सचा वापर केला जातोय. कारण, भारतीय लोकांना त्यांचे भारतातले नातेवाईक भारतातल्या लॉकडाऊनबद्दल सांगत आहेत. भारतातले परिणाम सांगत आहेत. त्याचा अवलंब इथले भारतीय लोक करताना दिसत आहेत.
प्रश्न : तू सध्या काय काळजी घेतो आहेस?
प्रसाद: माझं कॉलेज न्यूयॉर्कमध्ये आहे. पण, ते आता बंद झालंय आणि आम्ही आता सगळं ऑनलाईन सगळं शिकतोय. त्यामुळे मी घराखाली उतरत नाहीये. आम्ही तांदूळ आणि डाळ वगैरे 2-3 महिन्यांचं भरुन ठेवलं आहे. पण दूध, फळं घ्यायला आम्हाला ग्रोसरी स्टोअर्समध्ये जावं लागतं.
त्यासाठी सकाळी ग्रोसरी स्टोअर्स उघण्याआधी तिथे जाऊन थांबतो. जाताना ग्लोव्हज, मास्क घालून जातो. कोणाचाही संपर्क येऊ न देता वस्तू घेऊन पटकन घरी निघून येतो. गेल्या 4 मार्चपासून आम्ही दूध आणण्याव्यतिरिक्त घराखालीच उतरलो नाही आहोत. खाण्या-पिण्याचे त्यामुळे हाल होत आहेत. नाशवंत वस्तू आणण्यासाठी घराखाली उतरत नाही. त्यामुळे कधी डाळ-भात तर कधी मॅगीवर आम्ही दिवस काढतोय.
प्रश्न: घरचे काळजीत आहेत का?
प्रसाद : आम्ही 4 मित्र इथे एकत्र राहतोय. त्यामुळे आम्हा चौघांचे आई-बाबा काळजी करत आहेत आणि ते साहजिकही आहे. भारतातली परिस्थिती कशी आहे हे देखील ते सांगत आहेत. घरी असतो तर आई-बाबांसोबत राहिलो असतो, सेफ राहिलो असतो असंही वाटतंय. तिथेही परिस्थिती बिकट होत आहे. पण, घरी असतो तर सुरक्षित वाटलं असतं.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)