You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मोनिका लुईन्स्की प्रकरणात बिल क्लिंटन यांनी सत्तेचा दुरूपयोग केला?
- Author, जॉर्जिया रानार्ड
- Role, बीबीसी प्रतिनिधी
पती बिल क्लिंटन यांचं 1998 साली 22 वर्षीय मोनिका लुईन्स्की यांच्याशी असणारे प्रेमसंबंध म्हणजे 'सत्तेचा दुरूपयोग' नव्हता असं विधान हिलरी क्लिंटन यांनी रविवारी केलं आहे.
त्यानंतर सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं आहे. अमेरिकेतलं चॅनल CBS ला दिलेल्या मुलाखतीमध्ये हिलरी बोलत होत्या.
लैंगिक छळाचे आरोप असणारे ब्रेट कॅव्हानॉव्ह यांची सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशपदी नेमणूक झाली त्याबदद्लही त्यांनी आपली मतं मांडली.
हिलरी म्हणाल्या की तेव्हा 49 वर्षांच्या असणाऱ्या बिल यांनी राजीनामा दिला नाही हे योग्यच केलं. मोनिका 'सज्ञान' होत्या असं ही त्या पुढे म्हणाल्या.
तेव्हा वादग्रस्त ठरलेल्या या प्रकरणावर हिलरी यांनी मोकळेपणानं आपली मतं मांडली आहेत. पण त्यांच्या वक्तव्याचा अर्थ आता #MeToo या चळवळीच्या अनुषगांनं लावला जात आहे. लैंगिक छळाचे आपोर झाल्यानंतर अनेक उच्चपदस्थ लोकांना यामुळे पायउतार व्हावं लागलं आहे.
अमेरिकचे माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांच्यावर मोनिका लुईन्स्की प्रकरणात खोटं बोलण्यासाठी महाभियोग चालवण्यात आला होता. पण हिलरी यांनी या संबंधांचं ज्याप्रकारे वर्णन केलं आहे ते मोनिका यांनी केलेल्या वर्णनाशी मिळतं जुळतं नाही.
हिलरी यांचं स्पष्टीकरण सोशल मीडियावर अनेकांना मान्य नाही. त्यांचं म्हणणं आहे की हे प्रेमसंबंध जुळले तेव्हा बिल क्लिंटन राष्ट्राध्यक्ष होते तर मोनिका व्हाईट हाऊसमधल्या एक इंटर्न. या नात्यामध्ये सत्तेचा गैरवापर झाला नाही असं म्हणणं चुकीचं ठरेल.
"ती फक्त 22 वर्षांची इंटर्न होती तर ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष. हे नातेसंबंध म्हणजे सत्तेचा दुरूपयोग नाही असा विचार करणं खरंच खूप अवघड आहे," वकील असणाऱ्या लिंडसे बॅरेट यांनी ट्वीटरवर लिहिलं.
अमेरिकन स्तंभलेखक क्रिस्टीन पॉवर्स लिहितात, "हे काही तितकंस अवघड नाहीये. आपल्या पतीने जे केलं त्याला हिलरी जबाबदार नाहीत. पण बिल यांनी जे केलं तो सरळसरळ सत्तेचा दुरूपयोग होता एवढं तरी त्यांना कळायला हवं होतं."
मार्च महिन्यात मोनिका लुईन्स्की यांनी लिहिलं होतं की त्यांचे संबंधं म्हणजे, "मोठ्या प्रमाणावर झालेला सत्तेचा दुरूपयोग होता." त्यांनी पुढे असंही लिहिलं, "ते माझे बॉस होते. इतकंच नाही तर जगातली सगळ्यांत शक्तीशाली व्यक्ती होते."
आधी मात्र 'हे संबंध परस्पर सहमतीने' झाले होते आणि जर सत्तेचा दुरूपयोग झालाच तर तो या प्रकरणानंतर उठलेल्या राजकीय वादळ शमवण्यासाठी झाला होता असं त्यांनी म्हटलं होतं.
इतरांनी सोशल मीडियावर म्हटलं की हिलरी यांचं हे विधान ज्या चळवळीमुळे लैंगिक शोषण आणि छळाकडे गांभीर्यानं पाहिलं जाऊ लागलं त्या #MeToo चळवळीला कमी लेखणारं आहे.
"एका वाक्यात त्यांनी कामाच्या ठिकाणी होत असलेल्या लैंगिक छळवणुकीचा आणि सत्तेचा तसंच हुद्द्याचा असणारा संबंध नगण्य आहे असंच ठसवलं," असं ट्वीट लेखक डेव्हिड रॉथकॉप्फ यांनी केलं.
#MeToo मुळे काय काय बदललं?
अर्थात काही जणांनी मोनिका यांची या संबंधांना 'सहमती' होती या मुद्द्यावरून अनेक जणांनी हिलरीच्या विधानाला समर्थन दिलं आहे.
"जर त्या इंटर्नने राजीखुशी या संबंधांत सहभाग घेतला असेल तर त्याला सत्तेचा दुरूपयोग कसा म्हणणार? उलट अशा गैरवापराची अनेक उदाहरणं मला माहिती आहेत," असं एका ट्वीटर युझरनं लिहिलं. "22 वर्षांच्या एका व्यक्तीला आपलं बरंवाईट नक्कीच कळू शकतं."
या वादाने #MeToo चळवळीतल्या एका महत्त्वाच्या मुद्द्याला हात घातला आहे. जर तरूण मुलींचे सत्तास्थानी असलेल्या पुरूषांशी सहमतीने संबंध असतील तर या मुलींचं शोषण झालं असं दाखवणं त्यांच्या 'सज्ञान' असण्यावर प्रश्नचिन्ह आहे का?
अनेक जणांनी विचारलं की आपल्या पतीच्या वागण्यासाठी हिलरींना जबाबदार धरणं कितपत योग्य आहे? त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांना जबाबदार धरणं हाही एक प्रकारचा लैंगिक भेदभावचं आहे.
दुसऱ्या ट्विटर युझर सिलिया बेडेलिया यांनी लिहिलं की, "मीडियानं हे प्रश्न हिलरींना विचारण्यापेक्षा बिल यांना विचारण्यात वेळ घालवावा अशी माझी इच्छा आहे."
तर दुसऱ्या युझरनं ट्वीट केलं की, "या प्रेम प्रकरणाशी हिलरींचा काही संबंध नव्हता. ती गोष्ट वीस वर्षांपूर्वी घडलेली आहे. त्याच त्या गोष्टी 20 वर्षांनंतरही का उकरून काढयच्या (आपल्याला माहिती आहे का)."
मुलाखतीच्या दरम्यान हिलरींनी प्रश्न विचारला की राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांच्या विरोधात जे लैंगिक छळवणुकीचे आरोप आहे त्यांची चौकशी का केली जात नाही? लोकांनी याकडेही लक्ष वेधलं.
अमेरिकेत मध्यावधी निवडणूका व्हायच्या एक महिनाआधी हिलरी यांनी ही विधानं केली आहेत.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)