डोनाल्ड ट्रंप यांना आवडतात मित्रांच्या पत्नी?

आपली अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली, यावर डोनाल्ड ट्रंप यांना काही काळ विश्वासच बसला नव्हता. एवढंच नव्हे, तर शपथविधीच्या वेळीही ते थोडेसे घाबरलेले होते. अशा अनेक रंजक गोष्टींचा उलगडा डोनाल्ड ट्रंप यांच्यावरच्या नवीन पुस्तकात केला आहे.

पत्रकार मायकल वुल्फ यांचं 'Fire and Fury : Inside the Trump's White House' हे पुस्तक प्रकाशनापूर्वीच सगळीकडे चर्चेत आलं आहे. 5 जानेवारीला त्याचं प्रकाशन आहे. ट्रंप यांची, मुलगी इवांकालाही अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी बसवण्याची इच्छा असल्याचं याच पुस्तकात म्हटलं आहे.

व्हाईट हाऊसने मात्र या पुस्तकात करण्यात आलेल्या दाव्यांचा इन्कार केला आहे. तसंच हे दावे गैरसमज निर्माण करणारे आहेत, असंही त्यांनी म्हटलं आहे. तर, आपण या पुस्तकासाठी 200 पेक्षा जास्त लोकांशी बोललो आहोत, असं लेखक मायकल वुल्फ यांनी सांगितलं आहे.

पण एवढंच नव्हे. या पुस्तकात अशा जगाला माहिती नसलेल्या अनेक भन्नाट गोष्टी आहेत. त्यापैकी या 10 निवडक गोष्टी -

1. 'मी जिंकलो कसा?'

नोव्हेंबर 2016 मध्ये झालेल्या निवडणुकीतल्या विजयाबद्दल डोनाल्ड ट्रंप साशंक होते. त्याबद्दलचा प्रसंग वुल्फ पुस्तकात लिहितात : "निकालाच्या रात्री 8 वाजता, जसजसे निकालाचे कल येऊ लागले तसतसं ट्रंप राष्ट्राध्यक्षपदी निवड होणार असल्याचं स्पष्ट होत होतं. तेव्हा त्यांच्या मुलाने, ट्रंप ज्युनियर यानं त्याच्या मित्राला तसं सांगितलं. या बातमीमुळे मेलेनिया यांच्या डोळ्यात अश्रू येऊ लागले."

"साधारण तासाभरानं स्टीव्ह बॅनन यांचं म्हणणं खरं होऊ लागलं. पण तरीही ट्रंप यांचा आपण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होत असल्याचं यावर विश्वास बसत नव्हता."

2. शपथविधीचा आनंद घेता आला नाही

वुल्फ लिहितात, "ट्रंप यांना त्यांच्या शपथविधीचा आनंद घेता आला नाही. नामवंत कलाकार या सोहळ्यास हजर राहू शकले नाहीत, यावरून ते नाराज होते. त्यांना ब्लेअर हाऊसही फारसं पसंत नव्हतं. शिवाय ते त्यांच्या पत्नीशी भांडताना दिसत होते. कोणत्याही क्षणी त्यांच्या डोळ्यातून अश्रू येतील, असं वाटत होतं."

परंतु, मेलेनिया ट्रंपच्या कार्यालयानं याचा इन्कार केला आहे. स्टिफिन ग्रिशम यांनी प्रसिध्द केलेल्या एका पत्रकात म्हटलं की, "मेलेनिया यांनी नेहमीच ट्रंप यांना राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरण्याच्या निर्णयास पाठिंबा दिला होता. त्यांना प्रोत्साहन दिलं होतं आणि पतीच्या विजयामुळे त्यांना अत्यंत आनंद झाला."

3. ट्रंपना आवडतात मित्रांच्या पत्नी

पुस्तकाच्या एका भागात वुल्फ दावा करतात की, डोनाल्ड ट्रंप यांना मित्रांच्या पत्नींसह राहणं आवडतं. त्याने जगण्याचा आनंद त्यांना खऱ्या अर्थानं मिळतो.

"ते मित्रांच्या पत्नींचा पाठलाग करतात. या काळात ज्या मित्रांच्या पत्नी आपल्या पतीवर नाराज आहेत, अशा पत्नींच्या जवळ जाण्याचा ते नेहमी प्रयत्न करतात."

4. वेगवेगळ्या खोल्यांमध्ये झोपतात

डोनाल्ड ट्रंप यांना व्हाईट हाऊसमध्ये भीती वाटत होती, असं वुल्फ यांनी लिहिलं आहे. "ट्रंप यांना व्हाईट हाऊस फारसं आवडलं नाही. एवढंच नव्हे तर त्यांना तिथं थोडी भीतीही वाटत होती. त्यांनी झोपण्याची खोलीही अनेकदा बदलली."

"केनेडी यांच्यानंतर व्हाईट हाऊसमध्ये आलेलं ही पहिलीच अशी जोडी आहे, की ज्यात नवरा-बायको वेगवेगळ्या खोल्यांमध्ये झोपतात. ट्रंप यांच्या खोलीत एक टीव्ही होताच, शिवाय पहिल्याच दिवशी त्यांनी आणखी दोन टीव्ही मागवले. तसंच, त्यांनी खोलीसाठी कुलुपंही मागून घेतली."

5. इवांकाला व्हायचंय राष्ट्राध्यक्ष

डोनाल्ड ट्रंप यांची मुलगी इवांका भविष्यात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. वुल्फ यांच्यानुसार, इवांका आणि तिचे पती जॅरेड कुश्नर यांच्यात याबद्दल एक तहसुद्धा झाला आहे.

"इवांका आणि जॅरेड यांनी विचारपूर्वक एक निर्णय घेतला आहे. त्यानुसार जॅरेड वेस्ट विंगचं काम पाहतील. भविष्यात संधी मिळाली तर, इवांका राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढू शकते आणि अमेरिकेची पहिली महिला राष्ट्राध्यक्ष होऊ शकते."

6. केसांवरून इवांका वडिलांना चिडवते

इवांका नेहमीच ट्रंप यांच्या केसांची मस्करी करते, असं या पुस्तकात म्हटलं आहे. डोनाल्ड ट्रंप यांनी स्कॅल्प रिडक्शन सर्जरी केली आहे. त्याबद्दल इवांका तिच्या मित्रमंडळींमध्ये नेहमीच थट्टा करत असते.

7. ट्रंप यांचा प्राधान्यक्रम व्हाईट हाऊसला कळला नाही

पुस्तकात वुल्फ यांनी एक किस्सा सांगितला आहे - व्हाईट हाऊसमधल्या स्टाफच्या उपप्रमुख कॅटी वॉल्श यांनी राष्ट्राध्यक्षांचे ज्येष्ठ सल्लागार कुश्नर यांना एकदा ट्रंप यांचा प्राधान्यक्रम विचारला. पण कुश्नर यांच्याकडे या प्रश्नाचं उत्तर नव्हतं.

"ट्रंप यांचं प्राधान्य असलेल्या तीन गोष्टी कोणत्या, असं कॅटी वॉल्श यांनी विचारलं होतं. सर्वसाधारणपणे राष्ट्राध्यक्षांकडे यावर भलं मोठं उत्तर तयार असतं. पण सहा आठवडे उलटूनही कुश्नर यांनी कुठलंही उत्तर दिलं नाही," असं वुल्फ यांनी पुस्तकात म्हटलं आहे.

8. मरडॉक यांच्याविषयी ट्रंप यांना आदर

मीडिया टायकून रुपर्ट मरडॉक यांच्याविषयी ट्रंप यांना विशेष आदर वाटतो. या पुस्तकाचे लेखक वुल्फ यांनी मरडॉक यांचं चरित्रही लिहिलं आहे.

एका पार्टीत ट्रंप बोलले होते, "मरडॉक एक महान व्यक्ती आहेत. जगातल्या शेवटच्या काही महान लोकांपैकी एक."

9. मरडॉक ट्रंपना म्हणाले 'मुर्ख

डोनाल्ड ट्रंप यांना फॉक्स समूहाचे सर्वेसर्वा मरडॉकविषयी आदर असला तरी त्या दोघांच्या मोठं मतभेद आहेत. H1B व्हीसाच्या प्रकरणात मरडॉक त्यांना मुर्खही म्हणाले होते.

10. फ्लिनला कल्पना होती...

रशियाची मदत घेतली तर पुढे अडचणी येतील याची कल्पना अमेरिकेचे माजी सुरक्षा सल्लागार माइक फ्लिन यांना होती. ट्रंप यांच्या भाषणासाठी रशियाकडून 45 हजार डॉलर घेणं योग्य नाही, ट्रंप जिंकल्यास तो मुद्दा त्राकदायक ठरेल, असं त्यांचं म्हणणं होतं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)