मराठी सोशल मीडिया गाजवणाऱ्या ट्रंप तात्याच्या जन्माची कहाणी

    • Author, अनघा पाठक
    • Role, बीबीसी मराठी, प्रतिनिधी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप ते सोशल मीडियावर नेहमी भेटणारा आणि आपला वाटणारा 'ट्रंप तात्या' व्हाया शेगाव कचोरी या रंजक सोशल मीडिया प्रवासाचा शोध.

ट्रंप तात्या कोण, ते जन्माला आले कसे? एवढे लोकप्रिय कसे झाले आणि या प्रवासात शेगाव कचोरीचा नेमका काय रोल आहे? सोशल मीडियावर कुठलं पात्र कसं जन्माला येतं, प्रचंड शेअर होणारे त्यांचे व्हीडिओ कसे आणि कुठे निर्माण होतात... कोण असतं याच्या मागे?

आपण भारतातल्या महाराष्ट्र नावाच्या राज्यातल्या खेड्यापाड्यात एवढे प्रसिद्ध होऊ याची कल्पना खऱ्याखुऱ्या डोनाल्ड ट्रंप यांनी स्वप्नातही केली नसेल. पण आताच्या घडीला ट्रंप यांना वाहिलेली अनेक मराठी फेसबुक पेजेस आहेत. त्यातलंच एक म्हणजे 'ट्रंप तात्या'.

फेसबुकवर लोकप्रियता

डोनाल्ड ट्रंप यांच्याविषयीच्या या सगळ्या मराठी फेसबुक पेजेसचा USP म्हणजे ट्रंप यांचा मराठमोळा लुक. अमेरिकेच्या अध्यक्षांची लोकप्रियता स्थानिक पातळीवर ट्रंप तात्याच्या रुपात दिसते ती अशी.

हा मराठमोळा ट्रंप तात्या मराठी बोलतो, शेगावची कचोरी खातो, वारीला जातो आणि चक्क बार्शीच्या किंवा यवतमाळमधल्या आर्णी तालुक्याची बोली बोलतो.

ट्रंप तात्याच्या फेसबुक पेजवर मुख्यतः खऱ्याखुऱ्या डोनाल्ड ट्रंप यांचे अमेरिकन व्हीडिओ घेऊन त्यावर मराठी व्हॉईस ओव्हर दिलेला दिसतो. फोटो असतील तर त्यावर एखादा मराठी विनोद जोडून टाकला जातो.

कधी कधी तर स्थानिक कलाकारांचं व्हीडिओ शूट करुन त्यावर तंत्रज्ञानाच्या करामतीनं ट्रंपचा चेहेरा चिकटवला जातो. हे सगळं झालं की, ट्रंप यांचा मराठमोळा अवतार लाखो जणांच्या फेसबुकवर अवतरतो आणि हजारो जण या 'ट्रंप तात्या'ला लाईक करतात.

पण ट्रंप यांच्यासारखा माणूस ग्रामीण तसंच निमशहरी भागात प्रसिद्ध होण्याचं कारण काय? मुळात ही माणसं एका आंतरराष्ट्रीय राजकारण्याशी स्वतःला रिलेट कसं करतात?

ट्रंप तात्या या एक लाखाहून अधिक फॉलाअर्स असणाऱ्या पेजचे अॅडमिन अमित वानखेडे पाटील यांच्याशी आम्ही बोललो.

अमित पाटील सांगतात, "ट्रंप हा बिनधास्त माणूस आहे. तो काहीही बोलू शकतो. तो इतर आंतरराष्ट्रीय राजकारण्यांसारखा परिटघडीचा नाही. त्यामुळे आमच्या गावाकडच्या लोकांना तो फार आवडतो."

अमित पुढे सांगतात "अमेरिकेच्या गेल्या निवडणुकांची चर्चा गावातल्या पारावरही होती. कारण एकच - डोनाल्ड ट्रंप."

डोनाल्ड ट्रंप म्हणजे त्यांच्यासाठी गावातला तो तात्या आहे जो काही ना काही उलट-सुलट बोलून गावकऱ्यांची करमणूक करत असतो. म्हणून पेजचं नाव पण तेच आहे, असं ट्रंपतात्याचे जनक अमित पाटील म्हणतात.

ट्रंप तात्याचा जन्म कसा झाला?

'ट्रंप तात्या'चा जन्म कसा झाला? "ती सगळी एक गंमतच होती," अमित सांगतात. "निवडणुकांमध्ये जेव्हा हिलरी क्लिंटन हरल्या तेव्हा पारावर मोठी चर्चा रंगली की हिलरी का हरली आणि ट्रंप का जिंकला?"

"मी गमतीत म्हणालो की, केला असेल त्याने नवस किंवा खाल्ली असेल शेगावची कचोरी. तेव्हा ख्रिस गेलचा शेगावच्या कचोरीचा व्हीडीओ फार प्रसिद्ध झाला होता."

"मग वाटलं की, असा व्हीडिओ आपण स्वतः का बनवू नये? तो व्हीडिओ मी बनवला आणि मित्रांना What'sApp वर पाठवून दिला. तो इतका व्हायरल झाला की मलाच पन्नास वेळा आला. मग ठरवलं का याचं फेसबुक पेज बनवायचं", अमित पाटील सांगतात.

ट्रंप तात्या या पेजचे आज एक लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत. इतकंच नाही तर आता इतर लोकही ट्रंपला कधी वऱ्हाडी तर सोलापुरी भाषेत बोलायला लावत आहेत. त्यातलचं एक YouTube चॅनल म्हणजे Khas Re TV.

"आम्ही चार महिन्यांपूर्वी आमचं चॅनल सुरु केलं आणि आता आम्हाला 44 हजार फॉलाअर्स आहेत. लोकांना ट्रंप वेगवेगळ्या मराठी बोलीभाषांमध्ये बोलतोय हे फार आवडतं. त्यामुळे आता आम्हाला फिल्म प्रमोशनचं प्रोजेक्टही मिळत आहेत," Khas Re TV चालणारे संजय श्रीधर सांगतात.

संजय आणि त्यांच्या टीमने सुरुवातीला ट्रंप 'बाहुबली 2' सिनेमाचा रिव्हू करत आहे असा व्हीडिओ बनवला आणि तो प्रचंड हिट झाला होता.

"पहिला व्हीडीओ बनवला, तेव्हा आम्ही एक नक्की ठरवलं होतं की आमचा ट्रंप मराठीतच बोलणार आणि तेही बार्शीच्या बोलीत", संजय श्रीधर सांगतात.

"आमची थीमच अशी होती की डोनाल्ड ट्रंप जर महाराष्ट्राचा नेता असता आणि मुख्य म्हणजे तो बार्शीतून पुढे राजकारणात गेला असता, तर कसा बोलला किंवा वागला असता? तसंच कॅरेक्टर आम्ही बनवलं."

"ट्रंपच का असं म्हणाल तर त्यांची लोकप्रियता हेच कारण आहे," संजय म्हणतात.

ट्रंपचा प्रयोग यशस्वी झाल्यानं आता ही मंडळी जगभरातल्या अजून काही लोकप्रिय लोकांवर व्हीडिओ तयार करणार आहेत.

अस्सल ग्रामीण निर्मिती

काही हजारांच्या घरात लाईक आणि शेअर मिळवणारे हे व्हीडिओ बनतात मात्र गावातच.

अमित पाटील यवतमाळ जिल्ह्यातल्या आर्णी तालुक्यात राहातात. तर संजय श्रीधर सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी तालुक्यात.

ते आणि त्यांचे सहकारी आपआपली पेजेस गावातूनच मॅनेज करतात.

"माझा मित्र ट्रंपला आवाज देतो आणि तो इतका प्रसिद्ध झालाय की, आता खराखुरा ट्रंप त्याच्या स्वतःच्या आवाजात बोलायला लागला तर ते लोकांना बोअर होईल. सगळ्या स्क्रिप्ट आम्हीच लिहितो आणि शूटिंग-एडिटिंगसुद्धा आम्हीच करतो," असं संदीप यांनी सांगितलं.

डोनाल्ड ट्रंपना साऱ्या महाराष्ट्रात सोशल पेजवर प्रसिद्ध करणाऱ्या अशा फेसबुक किंवा यूट्यूब पेजेसवर फक्त दोन-चार जणांची टीम काम करत असते.

"माझा एक मित्र फोटोशॉपमध्ये तज्ज्ञ आहे. आमच्या टीममधे एक कार्टूनिस्टसुद्धा आहे. चार जण मिळून आम्ही सगळा कंटेट बनवतो," अमित यांनी पुढे आणखी माहिती दिली.

नेटकऱ्यांमध्ये डोनाल्ड ट्रंपची किती क्रेझ आहे हे त्यांनी केलेल्या कमेंटवरूनच कळतं. संकेत शेटेनं 'डोनू तात्या लयं भारी' अशी कमेंट केली आहे.

लोकांना काय वाटतं?

प्रसाद वाघनं तर पेज अॅडमिनला 'अशक्य आहात तुम्ही. आमच्या गावात या कधी, तुम्हाला ट्रॅव्हलिंग फ्री' अशी सरळ सरळ ऑफर देऊन टाकली आहे.

ट्रंप तात्याला कीर्तनात तल्लीन होताना पाहून सागर वानखेडे म्हणतोय की, तात्या इंदोरीकर महाराजांच्या पोटावर पाय देऊ नका.

यूट्यूबवर ट्रंपचे व्हीडिओ बघून 'द स्ट्रीट गाय' हा व्हीडिओ बनवणाऱ्यांचं कौतुक करतो आहे. 'तुम्हाला नॅशनल अॅवॉर्ड दिला पाहिजे', अशी त्यांची कमेंट आहे.

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या मुलाखतींच्या शोचादेखील एक व्हीडिओ मध्यंतरी व्हायरल झाला होता. यात निखिल वागळे ट्रंप तात्याची मुलाखत घेत आहेत असं दाखवलं होतं. हा धमाल व्हीडिओ वागळेंनीदेखील त्यांच्या ट्विटरवरून रिट्विट केला होता.

ट्रंप तात्या हे पेज सुरु झाल्यापासून त्याच्या बऱ्याच आवृत्या निघाल्या आहेत. खूप जणांनी ट्रंप तात्या पेजच्या लोकप्रियतेवर स्वार होऊन आपआपली पेजेस सुरू केली आहेत. पण, अमित यांना याविषयी काही तक्रार नाही.

उलट ते सांगतात, "मुळात हे पेज सुरू करण्यामागे हेतू हाच होता की, शेतकरी दिवसभराच्या कामानं थकलेला असतो त्याला विरंगुळा मिळावा. गावाकडचे लोक हे पेज पाहतील आणि त्यांची करमणूक होईल."

"अजून कुणी ट्रंप तात्याची कॉपी करत असेल तर काय हरकत आहे. तेवढचं लोकांना हसायला आणखी एक कारण मिळेल."

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)