You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
झुकरबर्गचा नववर्षाचा संकल्प - 'फेसबुक स्वच्छता अभियान'
फेसबुकचे CEO मार्क झुकरबर्ग यांनी नवीन वर्षाचा जरा वेगळा संकल्प जाहीर केला आहे. फेसबुकचा दुरुपयोग होण्यापासून रोखण्याचा हा संकल्प आहे.
2009 पासून झुकरबर्ग नवीन वर्षाचा संकल्प जाहीर करत आहेत. फेसबुकवरच एका पोस्टद्वारे त्यांनी 2018चा संकल्प जाहीर केला आहे. यंदाचा संकल्प आधीच्या संकल्पांपेक्षा वेगळा आहे.
अमेरिका आणि इतर देशांच्या निवडणुकीत फेसबुकवरून तथाकथित खोट्या बातम्या पसरल्या गेल्या, अशी टीका फेसबुकवर झाली. विशेषत: 2016 मध्ये अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत रशियाच्या बाबतीत राजकीय जाहिराती फेसबुकवर प्रसिद्ध झाल्या होत्या.
पोस्टमधील महत्त्वाचे मुद्दे
झुकरबर्ग यांनी यावर्षीच्या काही 'महत्त्वाच्या मुद्द्यांची' यादी तयार केली आहे. "शिवीगाळ आणि द्वेषापासून लोकांना दूर ठेवणं, सरकारकडून होणाऱ्या हस्तक्षेपाविरोधात आवाज उठवणं, तसंच फेसबुकवर घालवलेला वेळ कसा सत्कारणी लावता येईल याचा विचार करणं अशा मुद्द्यांवर विचार होईल", असं त्यांनी सांगितलं आहे.
"आम्ही सगळ्या त्रुटी आणि शिवीगाळ पूर्णपणे थांबवू शकणार नाही, पण सध्या फेसबुकडून भरपूर चुका होत आहेत. त्यामुळे या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा गैरवापर केला जात आहे," असं त्यांनी लिहिलेल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.
"हे सगळं साध्य झालं तर 2018ची अखेर चांगल्या पद्धतीनं होऊ शकेल," असंही झुकरबर्ग म्हणाले. फेसबुकमध्ये वेगळं काही करण्यापेक्षा सध्या असलेल्या आव्हानांचा बारकाईनं अभ्यास केला जाणार आहे.
झुकरबर्ग दरवर्षी नवीन वर्षाचा संकल्प जाहीर करतात. आत्तापर्यंतच्या संकल्पांत त्यांनी दररोज टाय घालणे आणि स्वत: मारलेल्या प्राण्याचंच मांस खाण्याचा समावेश होता.
पण अशी कामं करण्यासाठी झुकरबर्ग यांना संकल्पाची गरज का भासावी? असा प्रश्न टीकाकारांनी उपस्थित केला आहे.
तंत्रज्ञानावर लिहिणाऱ्या माया कोसॉफ्फ यांनी "झुकरबर्ग यांचा 2018 चा संकल्प म्हणजे... फेसबुकचे CEO म्हणून त्यांना जे काम करावंच लागणार आहे त्यासंदर्भातलाच आहे," अशा आशयाचं ट्वीट केलं आहे.
तंत्रज्ञानाच्या केंद्रीकरण आणि विकेंद्रीकरणाच्या मुद्द्यांवर उपाय शोधण्याचंही झुकरबर्ग यांनी ठरवलं आहे.
तंत्रज्ञानामुळे लोकांचं सशक्तीकरण होईल अशी आशा होती, पण भरपूर लोकांचा यावरचा विश्वास उडाला आहे आणि उलट तंत्रज्ञानामुळे सत्तेचं अधिक केंद्रीकरण झालं आहे, असं त्यांना वाटू लागलं आहे.
दरम्यान झुकरबर्ग लिहितात की, "एनक्रिप्शन आणि डिजिटल करन्सी या समस्येला उत्तर देऊ शकते. म्हणूनच फेसबुक या अस्त्रांचा वापर करणार आहे."
"स्वयंसुधारणेसाठी हे वर्ष महत्त्वाचं ठरणार आहे आणि फेसबुकच्या या समस्यांवर सर्वांनी मिळून कशी मात करता येईल, यावर माझा भर असणार आहे", या शब्दात त्यांनी आपल्या पोस्टची सांगता केली.
झुकरबर्ग यांचे आतापर्यंतचे संकल्प
- 2009 - दररोज टाय घालणं
- 2010 - मँडेरीन (चिनी भाषा) शिकणं
- 2011 - फक्त स्वत: मारलेल्या प्राण्याचंच मांस खाणार
- 2013 - फेसबुक विश्वाबाहेरच्या एका नव्या व्यक्तीला दररोज भेटणं
- 2015 - दर आठवड्याला किमान एक पुस्तक वाचणं
- 2016 - घरगुती काम करण्यासाठी 'आर्टिफिशिअल इंटेलिजन्स'चं उपकरण बनवणार
- 2017 - अमेरिकेतल्या सर्व राज्यांना भेट देणं
- 2018- फेसबुकचा गैरवापर टाळण्यासाठी सुधारणा करणं
आणखी वाचा -
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)