फेसबुकची कबुली - अमेरिकी निवडणुकांमध्ये रशियाचा हस्तक्षेप

रशियामधील एका संस्थेने गेल्या दोन वर्षांत फेसबुकवर अपलोड केलेला मजकूर जवळपास 12.6 कोटी अमेरिकन युजर्सपर्यंत गेल्याचं फेसबुकचं म्हणणं आहे.

2016 साली झालेल्या राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीच्या आधी आणि नंतर तब्बल 80,000 पोस्ट लिहिल्या गेल्याचं या सोशल नेटवर्किंग साईटने म्हटलं आहे.

यातील बहुतांश पोस्ट राजकीय आणि सामाजिक फूट पाडणाऱ्या होत्या.

रशियाच्या लोकप्रिय सोशल मीडिया साइट्सवर होणाऱ्या परिणामाचं विश्लेषण गुगल आणि ट्विटर यांच्या संयुक्त विद्यमानं करण्यात येत आहे. यासंबंधी होणाऱ्या सेनेटच्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर फेसबुकने हे आकडे जाहीर केले आहेत.

रशियन कंपनीचा सहभाग

गेल्या वर्षी झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकींवर प्रभाव पाडल्याच्या आरोप रशियाने वारंवार फेटाळून लावला आहे. या निवडणुकीत डोनाल्ड ट्रंप यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव केला होता.

फेसबुकने जाहीर केलेल्या या आकड्यांची रॉयटर्स आणि वाँशिंग्टन पोस्टने दुजोरा दिला आहे.

जून 2015 ते ऑगस्ट 2017 या काळात 80,000 पोस्ट प्रकाशित झाल्या आहेत.

क्रेमलिनशी संबंधीत एका रशियन कंपनीनं या पोस्ट केल्याचे फेसबुकनं सांगितलं आहे. क्रेमलिन हे रशियाच्या राष्ट्राध्यक्षांच अधिकृत निवासस्थान आहे.

"हा सगळा प्रकार फेसबुकच्या मूल्यांच्या विरोधात आहे. चांगला समाज घडवण्यासाठी आम्ही ओळखलो जातो आणि हे त्याच्या विरोधात आहे," असं फेसबुकचे जनरल काउंसिल कोलीन स्ट्रेच यांनी लिहिल्याचं रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं सांगितलं आहे.

या नवीन धोक्याला तोंड देण्यासाठी आम्ही शक्य असेल ते सगळं करू, असंही त्यांनी सांगितलं आहे.

वॉशिंग्टन पोस्टनं दिलेल्या एका वृत्तानुसार "रशियन ट्रोल्सनी 1000 पेक्षा जास्त व्हीडिओ अपलोड केल्याचं गुगलनं उघड केलं आहे."

त्याचवेळी ट्विटरनं 2752 अकाउंटस सस्पेंड केले आहे. या अकांउंटसचा माग घेतल्यावर ते रशियात असलल्या रिसर्च एजन्सीचे होते असं सुत्रानी रॉयटर्सला सांगितलं आहे.

महत्त्वाच्या घडामोडी

  • नोव्हेंबर 2016- फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग म्हणाले, "फेसबुकवरच्या फेक न्यूजचा अमेरिकेच्या निवडणुकीवर परिणाम झाला हीच एक विचित्र कल्पना आहे."
  • नोव्हेंबर 2016- फेसबुकवरच्या कंटेटमुळे अत्यंत कमी प्रमाणात गोंधळ माजतो - मार्क झुकरबर्ग
  • ऑगस्ट 2017- ज्या बातम्यांमुळे गोंधळ होतो त्या फेक न्यूजची सत्यता पडताळून त्यासंबंधीचा अहवाल ऑनलाईन पब्लिश करू - फेसबुक
  • सप्टेंबर 2017- रशियान हस्तक्षेपाच्या माहितीला जास्त महत्त्व देण्याच्या आरोपावरून अमेरिकी सिनेटच्या समितीनं ट्विटरवर टीका केली.
  • ऑक्टोबर 2017- मीडिया रिपोर्टनुसार निवडणुकांवर प्रभाव पाडण्यासाठी रशियानं गुगल ऍड्सवर अमाप पैसा खर्च केल्याचं गुगलच्या लक्षात आलं आहे.
  • ऑक्टोबर 2017- निवडणुकीदरम्यानच्या 3000 पेक्षा अधिक जाहिरातींबद्दल माहिती देणार असल्याचे फेसबुकने सांगितलं.
  • ऑक्टोबर 2017- निवडणुकीत ढवळाढवळ होण्याच्या भीतीमुळे ट्विटरनं रशिया टुडे आणि स्पटनिक मीडिया आऊटलेटला जाहिराती विकत घेण्यावर बंदी घातली.

पुढे काय?

या संपूर्ण प्रकरणाविषयी सॅन फ्रांसिस्कोहून बीबीसीचे तंत्रज्ञानविषयक प्रतिनिधी डेव्ह ली सांगतात, "मागच्या वर्षी फक्त एक वायफळ बडबड म्हणून मार्क झुकरबर्ग यांनी याकडे दुर्लक्ष केलेलं हे प्रकरण सगळ्यांत मोठ्या सोशल नेटवर्कवर एवढा मोठा आकार घेईल असं वाटलं नव्हतं."

पण या चुकीपासून त्यांनी कोणताही धडा घेतला नाही. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार सरकारी समित्यांकडे फेसबुककडून जाणाऱ्या मेसेजेसचं प्रमाण 23,000 पैकी एक किंवा अशा प्रमाणात आहे.

मार्क झुकरबर्ग, ट्विटरचे सीईओ जॅक डोरसी, किंवा गुगलच्या कोणत्याही अधिकाऱ्यांबद्दल यासंदर्भात प्रतिक्रिया येणं शक्य नाही. हे काम सध्या त्यांनी आपल्या वकिलांवर सोडलं आहे.

आपणच उभ्या केलेल्या कंपन्याच्या पाठीशी त्यांचे संस्थापक किती काळ उभं राहणार हे बघणं औत्सुक्याचं ठरेल.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)