राज ठाकरे फेरीवाल्यांच्या विषयावर संजय निरुपम यांना राजकीय संधी देत आहेत का?

    • Author, मयुरेश कोण्णूर
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा उत्तर भारतीयांविरुद्ध मोर्चा उघडला आहे. एल्फिन्स्टन रोड रेल्वे स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीत 22 जणांचे जीव गेल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने रेल्वे स्टेशनबाहेरच्या फेरीवाल्यांवर हल्ले सुरू केले.

त्यावेळी मुंबई काँग्रेस प्रदेशाध्यक्ष संजय निरूपम फेरीवाल्यांच्या समर्थनासाठी रस्त्यावर उतरले. आज दादरमध्ये कॉग्रेसने फेरीवाल्यांच्या समर्थनार्थ काढलेल्या मोर्चात निरुपम आणि मनसेचे कार्यकर्ते पुन्हा आमनेसामने आले.

"मी मनसेच्या गुंडगिरीविरुद्ध उभं राहीन. फक्त तमाशा बघत राहणार नाही. फेरीवाल्यांना उठवण्याचा अधिकार कुणालाही नाही," असं निरूपम म्हणाले.

या वादाच्या निमित्ताने राज ठाकरेंसोबतच मुंबई महापालिका निवडणुकांतील पराभवानंतर बाजूला पडलेले संजय निरुपम हेही चर्चेत आले आहेत.

पण मुळात निरुपम फेरीवाल्यांची बाजू का घेत आहेत? या प्रश्नाचं उत्तर निरुपम यांची आतापर्यंतची राजकीय वाटचाल पाहिली तर लक्षात येतं.

बिहार ते मुंबई व्हाया दिल्ली

निरूपम मूळचे बिहारमधल्या रोहतास जिल्ह्यातले. तिथून पाटणा आणि नंतर दिल्लीत ते कामाच्या निमित्ताने गेले. 1988 साली ते मुंबईत जनसत्ता या वृत्तपत्रात काम करण्यासाठी आले.

त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली ती 'दोपहर का सामना' या शिवसेनेच्या हिंदी मुखपत्रात काम सुरू केल्यानंतर. हिंदी सामनाचे संपादक झाल्यानंतर आपसूकच त्यांचं मुंबईच्या राजकारणात पदार्पण झालं.

"निरूपम मूळचे संघाच्या विचारांचे. ते संघाच्या 'पांचजन्य' या मुखपत्रासाठी बिहारमधून काम करायचे. एस.पी.सिंग यांनी त्यांना मुख्य प्रवाहात आणलं. 'दोपहर का सामना'चे संपादक झाल्यानंतर निरुपम एक सदर लिहायचे आणि त्यात हिंदी लेखक, साहित्यिक, पत्रकार यांच्यावर सडकून टीका करायचे.

"चिखलफेकच असायची ती. आजच्या हिंदी भाषिकांच्या त्यांच्या कळवळ्याच्या अगदी विरुद्ध. 90 च्या दशकात ठाकरेंचा हिंदुत्ववाद आणि उत्तर भारतीयांचे मुद्दे यांना एकत्र आणत त्यांनी शिवसेनेतलं आपलं वजन वाढवलं," असं मुंबईचे पत्रकार अनुराग चतुर्वेदी सांगतात.

राजकारणात प्रवेश

'दोपहर का सामना' पासूनच त्यांच्या राजकीय आकांक्षा वाढीस लागल्या.

"शिवसेनेची प्रतिमा तेव्हा उत्तर भारतीय विरोधी अशी झाली होती. त्यांनाही ती बदलण्यासाठी कोणी व्यक्ती हवीच होती. निरुपम ठाकरेंच्या जवळ गेले," ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर सांगतात.

शिवसेनेनंच निरुपमांना पहिल्यांदा खासदार केलं. राज्यसभेत पाठवलं. पण लवकरच चित्र बदलत गेलं.

"सेंटॉर निर्गुंतवणूक प्रकरणात त्यांनी केंद्रातील तत्कालीन भाजप सरकारवर आरोप केले आणि तिथूनच परिस्थिती बदलायला सुरूवात झाली. नंतर उद्धव ठाकरेंच्या काळात कोअर टीममध्ये निरुपम नव्हते. पुढे 2005 मध्ये निरुपम यांनी शिवसेना सोडली," प्रकाश अकोलकर सांगतात.

काँग्रेसमध्ये कोलांटउडी

शिवसेनेतून संजय निरुपम काँग्रेसमध्ये दाखल झाले. तिथेही राज्यसभेतील जागा मिळवली आणि 2009 मध्ये उत्तर मुंबई मतदारसंघातून लोकसभेतही पोहोचले.

"पण काँग्रेसमध्ये आल्यावर त्यांच्यासमोर अनेक आव्हानं होती. त्यांना निष्ठा सिद्ध करायची होती. शिवाय मुरली देवरा, गुरूदास कामत, कृपाशंकर सिंग अशी बस्तानं अगोदरच बसलेली होती. पण तरीही निरूपम सोनिया गांधींच्या निकटवर्तीयांमध्ये पोहोचले. राहुल गांधींच्याही विश्वासातले बनले," अनुराग चतुर्वेदी सांगतात.

काँग्रेसमध्ये त्यांना उत्तर भारतीय अस्मितेचं राजकारण मोठं करत गेलं, ज्याची सुरुवात वास्तविक त्यांनी शिवसेनेत असतांनाच केली होती. त्यांनी उत्तर भारतीय, त्यातही बिहारी भावनांसाठी छठ पूजेचा कार्यक्रम मुंबईत मोठा करत नेला.

छठचं राजकारण

"उत्तर भारतीयांची मतं एकगठ्ठा मिळतात. ती ज्यांच्याकडे जातात त्या पक्षाकडे पारडं झुकतं, हा मुंबईच्या निवडणुकांच्या इतिहास आहे. छठपूजेच्या निमित्तानं हे अस्मितेचं राजकारण सुरू झालं. संजय निरूपम यांनी जुहू चौपाटीवर तो कार्यक्रम सुरू केला. तो मोठा होत गेला. इतर ठिकाणीही असे कार्यक्रम होत गेले," राजकीय विश्लेषक प्रताप आसबे म्हणतात.

"जसं गणेशोत्सवाचं होतं तसंच इथंही झालं. उत्सव, त्याचं अर्थकारण, त्याचा विस्तार, त्यातून कार्यकर्ते मिळतात. सगळ्याच पक्षांना ते नंतर करावं लागलं. पण छठच्या निमित्तानं मुंबईच्या राजकारणात उत्तर भारतीयांना नवी ओळख संजय निरुपम यांनी मिळवून दिली हे नाकारता येणार नाही."

काँग्रेसमध्ये याच वाढलेल्या वजनामुळे 2014 च्या पराभवानंतर निरुपम यांना मुंबई प्रदेशाध्यक्ष केलं गेलं. 2017 च्या मुंबई महापालिका निवडणुकीत सगळ्यांनी त्यांच्या विरोधात जाहीर बंड करूनही ते टिकले. त्यावेळी गुरुदास कामत आणि नारायण राणेंनी निरुपम यांच्याविरोधात दंड थोपटले होते. तरीही ते पदावर कायम राहिले आणि तिकीट वाटपावरही त्यांनी पकड ठेवली.

त्या निवडणुकीतल्या दारुण पराभवानंतरही ते पदावर कायम राहू शकले यावरूच त्यांची काँग्रेसमधली मजबूत स्थिती लक्षात येते.

'राज ठाकरेंनी दिली संधी'

आता राज ठाकरेंनी उत्तर भारतीय फेरीवाल्यांविरोधात आंदोलन सुरू केल्यामुळे निरुपम यांना राजकीय संधी मिळाली आहे, असं अनुराग चतुर्वेदींना वाटतं.

"बहुतांश फेरीवाले हे उत्तर भारतीय आहेत. त्यांना सुरक्षेची आवश्यकता आहे. मनसे पहिल्यापासूनच उत्तर भारतीयांविरोधात हिंसेचं राजकारण करत आलेली आहे. मग अशा वेळेला मुंबईतले उत्तर भारतीय कायम भाजप हा आधार मानत आले आहेत. पण यावेळेस दिसतं असं आहे की भाजप सरकार मनसेच्या सोबत आहे."

"मग अशा वेळेस संजय निरुपम हिंदी भाषिकांचे तारणहार म्हणून पुढे येत आहेत. निरुपम यांच्यासाठी ती गरजही आहे आणि संधीही. लोकसभा आणि मुंबई महापालिका निवडणुकांमधल्या पराभवानंतर राजकीय दबदबा निर्माण करायला त्यांना मुद्दा हवाच आहे."

राजकारणाबाहेरही निरुपम चर्चेत राहिले जेव्हा ते 'बिग बॉस' च्या घरात दाखल झाले. तिथल्या सेलेब्रिटींशी न जुळल्यामुळे लवकरच त्यांना बाहेर पडावं लागलं होतं. आता फेरीवाल्यांना रेल्वे स्टेशनमधून बाहेर पडावं लागू नये, म्हणून ते मैदानात उतरले आहेत.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)