प्रेस रिव्ह्यू : 'मुख्यमंत्र्यांच्या मुलाखती म्हणजे 'विकास गांडो थयो छे'ची पुढील आवृत्ती'

देवेंद्र फडणवीस सरकारला तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्तानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुलाखती वेगवेगळ्या प्रसार माध्यमांना मुलाखती देत आहेत.

त्यांच्या या मुलाखती म्हणजे 'विकास गांडो थयो छे'ची पुढील आवृत्ती आहे अशी टीका शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून केली आहे.

'शिवसेनेमुळे विकासाला खीळ बसला आहे अशी ओरड मुख्यमंत्री करतात मग, त्यांनी विकासाच्या कामात अडसर असणाऱ्यांच्या वाऱ्यालाही उभं राहू नये,' असं सामनात लिहीण्यात आलं आहे.

'जमतंय का बघा नाहीतर सोडून द्या. असं म्हणत समझनेवालों को इशारा काफी है,' असं शिवसेनेनं आपल्या मुखपत्रातून म्हटलं आहे.

मुंबई बॅंकेत कोट्यवधींचा कर्ज घोटाळा उघड

मुंबई जिल्हा मध्यवर्ती बॅंकेत कोट्यवधीचा कर्ज घोटाळा झाला आहे असं बॅंकेच्या दक्षता पथकानं केलेल्या चौकशीतून उघड झाल्याचं वृत्त लोकसत्तानं दिलं आहे.

पात्र नसलेल्या कर्मचाऱ्यांना बेकायदा कर्ज मंजूर करणं, सभासदांच्या नावावर परस्पर कर्ज देणं असे गैरप्रकार झाले आहेत, असं चौकशीतून समोर आल्याचं लोकसत्तानं म्हटलं आहे.

मुंबई बॅंकेवर सध्या सत्ताधारी भाजपचे नियंत्रण आहे. आमदार प्रवीण दरेकर हे बॅंकेचे अध्यक्ष आहेत.

15 डिसेंबरपर्यंत महाराष्ट्र खड्डेमुक्त करू- राज्य सरकार

खड्डेमुक्त महाराष्ट्रासाठी आता सरकारनं नवी डेडलाइन जाहीर केली आहे.

'15 डिसेंबरनंतर राज्यात एकही खड्डा दिसणार नाही,' असं सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे, असं वृत्त एबीपी माझा डॉट कॉमनं दिलं आहे.

त्यांच्या या वक्तव्यावर सर्वांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. केवळ दीड महिने बाकी राहिलेले असताना हे उद्दिष्ट कसं गाठता येईल? यावर चर्चा होत असल्याचं एबीपी माझानं म्हटलं आहे.

संपामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारावर गदा

ऐन दिवाळीत चार दिवसांचा संप पुकारल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या अडचणीत वाढ होणार आहे.

चार दिवस संप पुकारला म्हणून कर्मचाऱ्यांचा 36 दिवसांचा पगार कापण्यात येणार असल्याचा निर्णय एसटी महामंडळानं घेतला आहे.

या निर्णयावर एसटी कर्मचारी नाराज आहेत असं वृत्त आयबीएन लोकमतने दिलं आहे.

दोन तोंडांच्या बाळाचा मृत्यू

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईमध्ये सरकारी रुग्णालयात एका मातेनं दोन तोंडाच्या बाळाला जन्म दिला होता. त्या बाळाचा प्रसुतीदरनंतर मृत्यू झाल्याचं वृत्त दिव्य मराठीनं दिलं आहे.

या बाळाच्या प्रसुतीदरम्यान खूप अडचणी आल्या होत्या. हे सयामी जुळं होतं. प्रसुतीची तारीख उलटून गेल्यावर पंधरा दिवसांनी या बाळाचा जन्म झाला होता, अशी माहिती डॉक्टरांनी दिव्य मराठीला दिली.

ट्रंप यांना न्यायालयाचा दणका

ट्रांसजेंडर व्यक्तींना लष्करात काम करता येणार नाही असा आदेश अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी काढला होता. या आदेशाची अंमलबजावणी थांबवण्यात यावी असा निर्णय वॉशिंग्टनच्या कोर्टानं दिला आहे.

या निर्णयामुळे LGBT समुदायानं सुटकेचा निःश्वास टाकला आहे. 'या निर्णयामुळे आम्हाला दिलासा मिळाला आहे,' असं नॅशनल सेंटर फॉर लेस्बियन राइट्सच्या प्रमुख शॅनन मिंटर यांनी म्हटलं आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)