You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
फडणवीस सरकारची 3 वर्षं : 'घोषणांवर घोषणा आणि आश्वासनांची कोटींच्या कोटी उड्डाणं'
देवेंद्र फडणवीस सरकारला 31 ऑक्टोबरला तीन वर्षं पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर 'फडणवीस सरकारच्या ३ वर्षांच्या कारभाराविषयी तुम्हाला काय वाटतं?' असा प्रश्न बीबीसी मराठीनं वाचकांना विचारला होता.
त्यावर अनेक वाचकांनी त्यांची मतं व्यक्त केली आहेत. त्यापैकी या काही निवडक प्रतिक्रिया आणि मतं.
'कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा' असा सवाल करत राज्यात सत्ता मिळविणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप-शिवसेना सरकारला तीन वर्षं पूर्ण झाली.
सरकारचा तीन वर्षांचा कारभार तुम्हाला कसा वाटतो, याविषयी फेसबुकवर व्यक्त होताना अनेकांनी फडणवीस सरकारविषयीची नाराजी उघड केली. काही जणांनी फडणवीस यांच्या स्वच्छ प्रतिमेचा उल्लेख करत आणखी पाच वर्षं दिली पाहिजेत, अशा अर्थाची सकारात्मक मतंही नोंदवली.
2014च्या निवडणुकीत राज्यात भाजपला पूर्ण बहुमत न मिळाल्याने शिवसेनेच्या साथीनं त्यांनी सत्ता स्थापन केली. शिवसेना भाजपविषयी वारंवार तीव्र शब्दांत थेट नाराजी व्यक्त करत असल्याने युतीविषयीच्या शक्याशक्यतांवर अनेक वेळा चर्चा झाल्या.
'सरकारला धोका नाही. अदृश्य हात सरकार चालवतील', असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं.
प्रथमेश पाटील म्हणतात, "मोठे निर्णय परंतु अंमलबजावणी नाही... ठोस निर्णय नाहीत. मराठा मोर्चा वा शेतकरी मोर्चा तोंडाला पाने पुसलीत."
"या सरकारचा कारभार अजूनही मागच्या सरकारसारखाच सुरू आहे. पवारांचे गुणगान गाण्यात ३ वर्षं गेली, कृती शून्य", असंही ते लिहितात.
"कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा", असं किशोर अडसड विचारतात. अजूनही आपण सत्तेत आहेत की, विरोधात हेच कळत नसल्याची प्रतिक्रिया अडसड यांनी दिली आहे.
"फेकाफेकी आणि गाजर दाखवल्याशिवाय काय केलं यांनी", असा प्रश्न मयूर अंधारे यांनी उपस्थित केला आहे.
"काहीच केलं नाही असं नाही, तीन वर्षात १,५०,००० कोटींची उधळपट्टी करायलाही वाघाचं काळीज लागतं," असं म्हणत जयप्रकाश संचेती यांनी फडणवीस सरकारला टोला लगावला आहे.
अजय चौहान म्हणतात, "घोषणांवर घोषणा, आश्वासनांची कोटीच्या कोटी उड्डाणं याशिवाय तीन वर्षांत फडणवीस सरकारने काहीच केलं नाही. पण फडणवीसांच्या प्रामाणिकतेवर जनतेचा अजुनही विश्नास आहे," असंही त्यांनी म्हटलं आहे.
तर माऊली रूद्रे यांनी देवेंद्र फडणवीस सराकरने न केलेल्या कामांचा लेखाजोखाच मांडला आहे. "कोणत्याही सरकारच्या कामाचं मूल्यमापन करण्यासाठी तीन वर्षांच्या कालखंड पुरेसा असतो, या तीन वर्षांत कोणतंच भरीव काम या सरकारनं केलं नाही," असंही त्यांनी म्हटलं आहे.
दहा लाख बोगस शेतकरी, खडा दाखवा हजार रुपये मिळवा, चिक्की, शिक्षण मंत्र्याच्या डिग्रीचा प्रश्न, जलयुक्त शिवार, SRA प्रकल्प या सगळ्याचा उल्लेख करून फेरीवाल्यांचा प्रश्न सरकारनं सोडवला नाही, असं ते म्हणतात.
"नुसत्या घोषणांचा पाऊस, कर्तृत्वाचं कामंच अरे कुठे नेवून ठेवलाय महाराष्ट्र माझा?" असा खडा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
टीकाकारांसोबतच अनेकांनी फडणवीस सरकारचे गोडवेही गायले आहेत.
जलशिवार योजना, मागेल त्याला शेततळे, कर्जमाफी, मेट्रो प्रकल्प, समृद्धी महामार्ग, उत्तम कामगिरी केली असून या सरकारला आणखी ५ वर्षं संधी दिली पाहिजे, असं मोहन गवंडे सांगतात.
तर स्वच्छ प्रतिमा, दमदार सरकार, असं म्हणत लक्ष्मीकांत मुळे यांनी फडणवीस सरकारची स्तुती केली आहे. नंदिनी पठारे, तुषार देशमुख, चंदू दीक्षित यांनीही सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)