You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
ट्रंप यांच्या सल्लागारानं रशियन संबंधांबाबत खोटं बोलल्याची दिली कबुली
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या निवडणूक सल्लागारांनी रशियन मध्यस्थाला भेटण्याच्या वेळांची खोटी माहिती एफबीआयला सांगितल्याचं कबूल केलं आहे.
जॉर्ज पापाडोपोलस यांनी ट्रंप यांच्यासाठी काम करताना रशियाशी चर्चा झाल्याचं कबूल केलं आहे. कोर्टाचे दस्ताऐवज समोर आल्यानं हे प्रकरण समोर आलं आहे.
हिलरी क्लिंटन यांच्याविरुद्ध 'डर्ट' म्हणजेच विरोधात जाणाऱ्या गोष्टी रशियाकडे असल्याचं त्यांना सांगण्यात आलं होतं, असं पापाडोपोलस यांनी स्पष्ट केलं आहे.
त्याचप्रमाणे माजी प्रचारप्रमुख पॉल मॅनफोर्ट यांनी 2016 च्या निवडणुकीदरम्यान आर्थिक घोटाळ्यांच्या आरोपांचा इन्कार केला आहे.
निवडणुकीदरम्यानच्या रशियाशी कथित संबंधांबद्दल चौकशी करणारे विशेष काउंसिल रॉबर्ट मुलर यांनी पापाडोपोलस यांच्यावर हा आरोप केला आहे.
ट्रंप यांच्यावर परिणाम
या घटनेचा थेट परिणाम अमेरिकेच्या सर्वोच्च नेत्यावर होणार आहे असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
पापाडोपोलस हे शिकागो येथील वकील आहेत आणि ते ट्रंप यांचे निकटवर्तीय मानले जातात. (छायाचित्रात डावीकडून तिसरे) त्यांच्या सुरक्षा टीमचे ते महत्त्वाचे सदस्य होते. वरील छायाचित्र ट्रंप यांनी 1 एप्रिल 2016 रोजी ट्वीट केलं होतं.
कोर्टाच्या दस्ताऐवजानुसार ट्रंप यांच्या माजी परराष्ट्र सल्लागारांनी 5 ऑक्टोबर 2017 रोजी रशियाशी कथित संगनमत केल्याच्या प्रकरणात एफबीआयच्या चौकशीमध्ये जाणूनबुजून उशीर केल्याचं कबूल केलं आहे.
एफबीआयनं जेव्हा यावर्षी जानेवारीत त्यांची चौकशी केली, तेव्हा मार्च 2016 मध्ये रशियाशी संबंध असलेल्या दोन व्यक्तीना भेटल्याची बतावणी त्यांनी केली होती. पण, खरंतर प्रचाराचा भाग झाल्यानंतर ते या व्यक्तींना भेटले होते.
पापाडोपोलस यांच्या म्हणण्यानुसार त्यातील एक अज्ञात रशियन स्त्री होती, जिचे रशियन सरकारच्या अधिकाऱ्यांशी लागेबांधे होते.
त्याचप्रमाणे लंडनमधील एक प्राध्यापक ज्यांचं नाव अजून गुलदस्त्यात आहे, त्यांचे देखील रशियन अधिकाऱ्यांशी संबंध होते असं आता पुढे आलं आहे.
हे प्राध्यापक ट्रंप यांच्या प्रचाराचा महत्त्वपूर्ण भाग असल्यामुळेच पापाडोपोलस यांच्याशी संधान बांधल्याचं एका निवेदनात स्पष्ट केलं आहे.
याच प्राध्यापकांनी 26 एप्रिल 2016 रोजी लंडनमध्ये झालेल्या एका चहापानादरम्यान हिलरी क्लिंटन यांच्याविरुद्ध जातील असे हजारो ईमेल त्यांच्याकडे उपलब्ध असल्याचं सांगितलं.
या ईमेल्सची माहिती रशियाच्या अधिकाऱ्यांनी मॉस्को दौऱ्यादरम्यान दिल्याचं त्यांनी सांगितलं.
जॉर्ज पापाडोपोलस यांची निवडणूक प्रचारादरम्यान कमी महत्त्वाची भूमिका होती त्यांची ट्रंप यांच्यापर्यंत पोहोचसुद्धा नव्हती असं ट्रंप यांच्या सहकाऱ्यांचं म्हणणं आहे.
हे धमाकेदार होऊ शकतं
बीबीसीचे वॉशिंग्टन प्रतिनिधी अँटनी आर्चर यांचं म्हणणं आहे की हे "संपूर्ण प्रकरण धमाकेदार होऊ शकतं. ट्रंप यांचे परराष्ट्र धोरण सल्लागार असतांना ते रशियाच्या संपर्कात होते असं जॉर्ज पापाडोपोलस यांनी कबूल केलं आहे."
व्हाईट हाऊसकडून खंडन
व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या साराह सँडर्स यांनी पापाडोपोलस यांचा ट्रंप यांच्या प्रचारात मर्यादित भूमिका असल्याचं सांगितलं आहे.
"ते एका स्वयंसेवकाच्या भुमिकेत होते आणि त्यांच्या अधिकारात त्यांनी कोणताही मोठा निर्णय घेतलेला नाही."
तसंच ट्रंप यांच्या प्रचाराशी निगडीत कोणतेही आरोप पॉल मॅनफोर्ट यांच्यावर नाही यावर त्यांनी भर दिला.
"खरा घोटाळा हा क्लिंटन यांच्या प्रचारात झाला आहे. त्यांच्या प्रचाराचा संबंध, फ्युजन जीपीएस आणि रशियाशी आहे" असंही त्यांनी म्हंटलंय.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)